निष्ठावंत जनसेवक

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार रंगराव नामदेव पाटील आमदारकीच्या काळात तालुक्याचा बैलगाडीतून दौरा करत.
former mla rangrao namdev patil
former mla rangrao namdev patilsakal
Summary

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार रंगराव नामदेव पाटील आमदारकीच्या काळात तालुक्याचा बैलगाडीतून दौरा करत.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार रंगराव नामदेव पाटील आमदारकीच्या काळात तालुक्याचा बैलगाडीतून दौरा करत. दौऱ्यादरम्यान ते आपल्यासोबत तांदूळ आणि स्वयंपाकाच्या वस्तू जवळ ठेवत. ज्या गावात ते जात त्या गावातील चावडी अथवा धर्मशाळेत रहात. तिथे जेवण बनवत आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जेवण करत. गावातील लोकांशी संवाद करत असत. गावातील लोकांना आपल्या खाण्याजेवण्याची झळ लागू नये, त्यांना आपला त्रास होऊ नये, ही त्यांची भूमिका असायची.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हा आडवळणी मतदारसंघ. या मतदारसंघात सन १९५२ मध्ये वडगावच्या रंगराव पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी केली. त्यात त्यांचा विजय झाला. आमदार असताना त्यांनी जो साधेपणा दाखवला, प्रतिकूल परिस्थितीत तालुक्यातील जनतेची जी सेवा केली त्याची आठवण तालुक्यातील तिसऱ्या चौथ्या पिढीचे लोक काढतात. माजी आमदार पाटील यांच्याबाबत लिखित स्वरूपात काहीही साहित्य आढळत नाही, मात्र मौखिक माध्यमातून हा माणूस, त्यांचे कार्य, त्यांच्या कामाचे वेगळेपण लोकांनी जपले आहे.

शाहूवाडी हा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या शेजारील तालुका. या गावांची वैशिष्ट्येसुद्धा वेगवेगळी. प्रत्येक गावाने आपली नवी ओळख जपलेली. त्या-त्या गावातून जाताना या गोष्टी आठवत होत्या. देशात ब्रिटिशांची सत्ता असतानाही सत्ता उथलवून लावण्यासाठी ज्या गावांनी पुढाकार घेतला, सातारा जिल्ह्यात स्थापन झालेल्या प्रतिसरकार चळवळीला बळ दिलं तो हा परिसर. कुंडल आणि वाळव्याचा हा परिसर. या दोन गावांत तसं अंतर; पण हे अंतर पार झालं राष्ट्रीय विचारांनी. इंग्रजी सत्ता घालवून इथं स्वराज्य आणायचं, हा विचार गावागावात गेला.

आज माझ्यासोबत जो सहकारी आहे त्याच नाव चंद्रकांत यादव. अठरा वर्षांचा तरुण. आयटीआय शिकणारा. माझा मामेभाऊ. त्याला मी हा सगळा परिसर सांगतोय. मला जेवढा समजला तेवढा इतिहास त्याला ऐकवतोय. त्यालाही ते ऐकण्याची गोडी लागली आहे. यातील बरंच त्यांनं ऐकलं आहे, याला कारण म्हणजे या भागातील लोकांच्यात असलेलं इतिहासाचं वेड. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या लढाईत ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांच्यावर या परिसरातल्या लोकांनी अफाट प्रेम केलं. त्यांच्या आठवणी सतत जागत्या ठेवल्या. या तरुण मुलाच्या कानावरून यापैकी इतिहासातील गोष्टी गेलेल्या. त्याच्यासोबत शाहूवाडीत जाताना आजही तो एकाग्रतेने ऐकत होता.

सरूड कोल्हापूर जिल्ह्यात; तर सागाव सांगली जिल्ह्यात. मध्ये वारणा नदी. अलीकडे सागाव पलीकडे सरूड. दोन्ही गावं भावंडांसारखी एकमेकांना जोडलेली. तालुके आणि जिल्हे वेगवेगळे असले तरी नाव एकमेकांना जोडून.

गावातील ऋणानुबंध तसेच. मैत्री, नातेसंबंध, आर्थिक देणंघेणं या माध्यमातून गावात जिव्हाळा आहे. दोन्ही गावाच्या मध्ये वारणा नदी. या नदीवर पूर्वी पूल नव्हता तेव्हा दोन्ही गावाच्या दरम्यान नाव (होडी) असे. सरूडच्या लोकांना सांगलीला जायचं असेल, तर नावेतून बसून अलीकडच्या सागावामध्ये यावं लागे. तिथून एसटीने पुढं प्रवास सुरू होई. सागाव येथील लोकांना कोल्हापूरला जायचे असेल, तर सरूडला नावेने यावे लागे.

माजी आमदार रंगराव पाटील यांनी अनेकदा नावेने प्रवास केल्याचे लोक सांगतात. शिराळा-वाळवा मतदारसंघाचे आमदार यशवंतराव चंद्रोजी पाटील (वायसीपाटील) व त्यांच्या पत्नी अनेकदा कोल्हापूरला जाताना नावेतून सरूडला यायच्या, अशी आठवण जुनेजाणते लोक सांगतात. शिराळा तालुक्यातील कनदूर हे त्यांचे गाव. या गावाच्या बरोबर पलीकडे रंगराव पाटील यांचे वडगाव आहे. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर हे दोन आमदार नदीतून चालत एकमेकांना भेटायला येत असत, असेही इथले लोक सांगतात. आजच्या काळात राजकारणी लोकांच्यात झालेला बदल बघता या गोष्टी नक्कीच लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.

१९५२ ची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत वडगावसारख्या छोट्या गावातील रंगराव पाटील शेतकरी कामगार पक्षाकडून उभे राहिले. त्यांच्याविरोधात होते काँग्रेसचे उदयसिंहराव गायकवाड. या निवडणुकीत पाटील विजयी झाले. तालुक्याचे पहिले आमदार ठरले. आमदार होण्याच्या अगोदर ते भाई माधवराव बागल यांनी स्थापन केलेल्या प्रजा परिषदेचे तालुका अध्यक्ष होते. क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढत होते, त्यावेळी विद्यार्थी असलेल्या रंगराव पाटील यांनी शाहूवाडी तालुक्यात एक विद्यार्थी परिषद घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता.

शाहूवाडी हा डोंगराळ परिसर. या तालुक्यात अनेक भूमिगत क्रांतिकारकांना त्यांनी आश्रय दिला होता. त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून, त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली होती. विद्यार्थी असल्यापासून ते चळवळे होते. त्यांचा कल सामाजिक आणि राजकीय कामाकडे होता. त्या काळी मॅट्रिक शिक्षण होऊनही त्यांनी नोकरी व्यवसायात न पडता पूर्णवेळ स्वतःला शेतकरी कामगार पक्षाच्या कामासाठी वाहून घेतले. तेव्हा त्यांना काँग्रेसकडून अनेक ऑफर आल्या, त्यांचे अनेक जवळचे मित्र काँग्रेसचे मोठे नेते होते; मात्र त्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडला नाही. १९५२च्या एका विजयानंतर त्यांना १९५७ मध्ये निवडणुकीत अपयश आले, त्यांचे भाऊ शंकरराव पाटील १९६२ मध्ये पराभूत झाले; पण पराभव होऊनही त्यांनी प्रस्थापित वाट पकडली नाही. अगदी मरेपर्यंत ते शेकापमध्ये राहिले.

आमदार पाटील यांचे सुपुत्र भारत पाटील सांगतात, ‘‘माझ्या वडिलांचा तसा मला फार सहवास लाभला नाही. मी आठवीत असताना ते गेले. त्यांची राजकीय कारकीर्द मला बघता आली नाही; मात्र जेव्हा जेव्हा मी महाराष्ट्रात फिरायचो तेव्हा मात्र मला लोक त्यांच्याबद्दल सांगायचे. तालुक्यात फिरताना जुनी लोकं आजही त्यांची आठवण काढून गहिवरून जातात. म्हातारी माणसं मला त्यांचा मुलगा म्हणून खूप मान देतात,’’ असे ते सांगू लागले.

‘‘आमचा तालुका हा असा. निसर्गाच्या अडचणी. वाटेत नद्या, ओढे, कुठे डोंगर. असा हा तालुका. आजही दौरा करताना अडचणी येतात. मग त्यावेळी कसं वातावरण असेल? नुकतेच देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. अजून विकास योजना गावोगावी यायच्या होत्या. तेव्हा दीडशे गावांना भेटी देणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे, त्यांच्या सुखदुःखप्रसंगी जाणे या गोष्टी अवघड होत्या; पण वडील घरी फार कमी काळ असत. ते सतत तालुक्यात असत. सतत लोकांच्यात असत.

गावोगावी जाऊन मुक्काम करत. सकाळी उठून दुसऱ्या गावाला जात. दिवसात जेवढी होतील तेवढ्या गावाना भेटी देत. जिथं रात्र होइल तिथं देवळं, धर्मशाळा अशा ठिकाणी थांबत. घरातून जाताना तांदूळ, मीठमिरची, स्वयंपाकाला लागणारी भांडी सोबत असत. विद्यार्थी असल्यापासून त्यांना स्वतः स्वयंपाक बनवून खाण्याची सवय होती. आपल्या मतदारसंघातले लोक गरीब आहेत. आपण त्यांच्याकडे गेल्यावर त्यांची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः जेवण बनवणे आणि लोकांना सोबत घेऊन जेवण करणे हा पायंडा पाडला होता.’’

तालुक्यात निसर्गाने अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे प्रगती होत नाही; पण शिक्षणाचा अभाव हेही कारण आहे, हे आमदार पाटील यांनी ओळखले आणि तालुक्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी लोकांच्यात खूप प्रबोधन केले. भेटल्यावर ‘मुलं शाळेत जातात का?’ हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा. त्यांनी अनेक पालकांना मुलांना शाळेत घालण्यासाठी प्रवृत्त केले. आजही जेव्हा भारत पाटील यांना सरकारी सेवेतून निवृत्त झालेली लोक भेटतात, तेव्हा तुमच्या वडिलांनी आमच्या वडिलांना मला शाळेत घालायला लावले, असं सांगतात.

गावांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल, तर दळणवळण सोयी झाल्या पाहिजेत, हे रंगराव पाटील यांनी जाणले होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (त्या वेळेचे स्टेट ट्रान्स्पोर्ट) कारभाराबाबत त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात स्वतःची भूमिका मांडली. स्वतःच्या शाहूवाडी मतदारसंघात जास्तीत जास्त गावांत एसटी कशी येईल, यासाठी प्रयत्न केले. एसटी महामंडळाचा कारभार सुधारावा म्हणून त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात आवाज उठवला. स्वतः प्रवास करून त्यांनी एसटी महामंडळाच्या कामातील उणिवा शोधून काढल्या. नेमक्या चुका आणि सरकारी पातळीवरची एसटीबाबतची चुकीची धोरणे त्यांनी मांडली.

आमदारकीची एक टर्म संपली. पुढच्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही, म्हणून ते गप्प बसले नाहीत. त्यांनी सतत लोकांच्यात जाणे, त्यांना भेटणे, त्यांचे प्रश्न सोडवणे सुरूच ठेवले. एका सकाळी ते घराच्या बाहेर पडले की गावातील चार-दोन लोक सोबत असायचे. जसे ते पुढे जात तसे पुढच्या गावातील लोक त्यांच्यासोबत चालत राहत. बैठका सुरू असत. लोकांचे प्रश्न, गावचे प्रश्न जाणून घेऊन त्याच गावात त्याबाबतचे पत्र लिहून पोस्टात टाकत. अशी त्यांच्या कामाची पद्धत होती. १९६२ च्या निवडणुकीत त्यांचे बंधू शंकरराव पाटील यांनी उमेदवारी केली, त्यांनाही अपयश आले; पण तरीही या अपयशाने ते खचले नाहीत. त्यांच्या कामात काहीही बदल झाला नाही. मुळात सत्ता हे त्यांचे ध्येय नव्हते.

‘‘मी आठवीत शिकत होतो तेव्हा वडील गेले. मी थोडा कळता झालो आणि मीही वडिलांच्या पक्षात गेलो. आजअखेर इथंच आहे. मी तीन निवडणुका लढवल्या. केडर नसल्यानं पराभूत झालो; पण मला त्या पराभवाचे शल्य नाही. माझे वडील आणि चुलते ज्या पक्षात होते त्या पक्षात मी आहे, अगदी अनेक अडचणी, आर्थिक उणिवा आहेत, तरीही मी अन्य पक्षांकडे गेलो नाही. आणि भविष्यातसुद्धा जाणार नाही,’’ भारत पाटील सांगत होते.

भारत पाटील यांच्याशी बोलताना संध्याकाळ झाली आहे. वडगावची रानात गेलेली माणसं गावात यायला लागली आहेत. दिवस मावळतीला निघालाय. शाहूवाडी तालुक्यातील त्या सह्याद्रीच्या डोंगररांगात तो निघालाय. दोन तासांपूर्वी पडून गेलेल्या पावसामुळे थोडा गारवाही जाणवतोय. भारतभाऊ आम्हाला निरोप द्यायला रोडवर आलेत. कधीकाळी तालुक्यातील राजकारण ज्या घरात ठरायचं तो थोरातवाडा आमचं लक्ष वेधून घेतोय. जुन्या काळातील भव्य वाडा अजूनही तग धरून उभाय. त्याच वाड्याच्या दारासमोर उभे आहोत आम्ही. वयोमानानुसार थकलेले भारतभाऊ आणि त्यांचा मुलगा प्रणव तिथं आहे. वेळ खूप झालाय. घाटमाथ्यावर जायचं होतं आम्हाला. कधीकाळी दंतकथा बननेल्या आमदारांची कुळकथा आणि इतिहास समजून घ्यायला आलो होतो. अनेक प्रश्न घेऊन आलेलो, काहींची उत्तर मिळाली होती, काहींची मिळवायची होती. वेळ झाला होता, रात्र होण्याच्या अगोदर निघायला हवं होतं. आम्ही निघालो.

(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com