देवमाणूस!

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हंबीरराव यांनी बैठकीच्या खोलीत भिंतीवर क्रांतिसिंह यांचं एक मोठं तैलचित्र करून घेतलं.
krantisinh nana patil
krantisinh nana patilsakal
Summary

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हंबीरराव यांनी बैठकीच्या खोलीत भिंतीवर क्रांतिसिंह यांचं एक मोठं तैलचित्र करून घेतलं.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हंबीरराव यांनी बैठकीच्या खोलीत भिंतीवर क्रांतिसिंह यांचं एक मोठं तैलचित्र करून घेतलं. हंबीरराव कॉम्रेड होते. नास्तिक होते; पण ते रोज सकाळ-संध्याकाळ जेवण करण्यापूर्वी त्या तैलचित्राजवळ जात. हात जोडत आणि नंतर जेवण करत. आयुष्यभर देवाला नमस्कार केला नव्हता; या फोटोला रोज हात जोडत... ते म्हणायचे, ‘‘तुम्ही ज्या देवाला जाता, तो देव तुम्ही पाहिला नाही; पण हा देव मी पाहिला आहे.’’

क्रांतिसिंह नाना पाटील खासदार होते तेव्हाची गोष्ट आहे. ते एकदा काही कामानिमित्त मुंबईला निघाले होते. त्यांच्यासोबत भाळवणीचे हंबीरराव धनवडे नावाचे कार्यकर्ते होते. हे दोघे कराड रेल्वेस्थानकावर गेले तेव्हा त्यांना समजलं गाडी निघून गेलेली आहे. दुसरी गाडी रात्री खूप उशिरा होती. ते पोहोचले तेव्हाच रात्रीचे दहा वाजले होते. आता गाडी तर गेलेली. वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून ते दोघे तिथेच बसले. ते थंडीचे दिवस. कडाक्याची थंडी होती. पांघरायलाही काही नव्हते. तशाच थंडीत ते गाडीची वाट पाहत बसले. त्या स्टेशनवर ते दोघे आणि एखाददुसरा कर्मचारी होता. बाकी सगळी शांतता होती. दरम्यान, दिवसभराच्या कामाने थकून गेलेल्या हंबीररावांना झोप यायला लागली म्हणून ते बाकड्यावर कलंडले तशीच त्यांना झोप लागली. काही वेळातच ते घोरायला लागले.

साधारण दोन तासांनी स्टेशनवर वाजणाऱ्या घंटेच्या आवाजाने त्यांना जाग आली. ते एकदम उठले तर तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या अंगावर लुंगी पांघरलेली आहे आणि खासदार क्रांतिसिंह नाना पाटील मात्र थंडीत कुडकुडत बसले आहेत. त्यांनी त्यांच्या अंगावरील लुंगी झोपलेल्या हंबीररावांच्या अंगावर टाकली होती आणि स्वतः थंडीत बसलेले. तो प्रसंग पाहून हंबीरराव गहिवरून म्हणाले, ‘‘अण्णा, असं का केलंसा? माझ्या अंगावर लुंगी टाकून तुम्ही थंडीत कुडकुडत बसलाय?’’

‘हंबीरराव तुम्ही दिवसभर रानात राबून कंटाळला होतात. बाकड्यावर पडल्या पडल्या तुम्हाला झोप आली; पण ही थंडी अशी. कुडकुड कराया लागलात. थंडीनं झोपतच गळ्यापातूर गुडघं आखडून घेतलंत. मग टाकली लुंगी तुमच्या अंगावर’’ ते ऐकून हंबीरराव यांना हुंदका फुटला. ते रडायलाच लागले.

त्यांची समजूत घालत क्रांतिसिंह म्हणाले, ‘‘हंबीरराव रडू नका, आरं मला सवय झालीय. इंग्रज सरकारच्या विरोधात लढताना भूमिगत असताना लय वाईट दिवस काढल्याती. मला थंडी, वारा, पाऊस सगळ्याची सवय झालीय. तुमी दिवसभर रानात राबून आलात, तुम्हाला चांगली विश्रांती मिळावी असं वाटलं मला.’’ मग नाना बोलत होते आणि हंबीरराव हुंदके देत ऐकत होते.

काही काळानंतर क्रांतिसिंह नाना पाटील जग सोडून गेले, हंबीरराव यांना खूप दुःख झालं. त्यांना या शोकातून बाहेर यायला बरेच दिवस लागले. नंतर ते सावरले. नानांची स्मृती जतन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या घराला नाव दिलं ‘कॉम्रेड निवास’ आणि बैठकीच्या खोलीत भिंतीवर क्रांतिसिंह यांचं एक मोठं तैलचित्र करून घेतलं. हंबीरराव कॉम्रेड होते. हंबीररावसुद्धा नास्तिक होते; पण ते रोज सकाळी-संध्याकाळी जेवण करण्यापूर्वी त्या तैलचित्राजवळ जात. हात जोडत आणि नंतर जेवण करत. लोक त्यांना म्हणत, ‘‘तुम्ही आयुष्यभर देवाला कधी नमस्कार केला नाही आणि या फोटोला मात्र रोज हात जोडता, हे कसं काय?’’

ते सांगत ‘‘बाबांनो, तुम्ही ज्या देवाला जाता तो देव तुम्ही पाहिला नाही; पण हा देव मी पाहिला आहे, त्यांचं देवपण मी जवळून बघितलं आहे. म्हणून या देवाच्या मी पाया पडतो.’’ बोलता बोलता गहिवरून जायचे.

हंबीरराव थकले. त्यांनी एक दिवस त्यांच्या मुलांकडून वचन घेतलं, ‘‘माझ्या माघारी अण्णांना विसरू नका. मी जसं त्यांना नमस्कार केल्याशिवाय जेवत नव्हतो, तसंच वागा.’’ दिवस निघून गेले. एक दिवस वयस्कर झाल्यावर हंबीरराव काळाच्या पडद्याआड गेले.

आता ‘कॉम्रेड निवास’ तसेच आहे. बैठकीच्या खोलीत असणारा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा फोटो दुरून दिसतो. सकाळी जेवणाची वेळ झाली की त्या घरातील कर्ता माणूस त्या फोटोसमोर येतो. फोटोचे दर्शन घेतो आणि मगच जेवतो. हंबीरराव धनवडे यांनी मुलाला दिलेलं वचन आजही त्या घरात पाळलं जातंय. उद्याही त्यांची नातवंडं ही जित्या देवाची आठवण जागवतील. आजोबांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या क्रांतिसिह नाना पाटील या माणसातल्या देवाचं विस्मरण त्यांना कधीही होणार नाही.

राजकारणाच्या बदलत्या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांची सहृदयता आणि त्यांचे अनुयायी हंबीरराव यांनी काळजाच्या कप्प्यात जपलेली त्यांची आठवण या गोष्टी पटणार नाहीत. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या चरित्राचा अभ्यास करताना असे अनेक प्रसंग आपल्याला दिसतील. ते खासदार असताना ‘मोहिते वडगाव’ या गावातून त्यांना बैलगाडीतून ताकारी रेल्वेस्थानकावर सोडले होते. त्यांना बैलगाडीतून जाताना बघणारी लोकं आजही हयात आहेत.

खासदार नाना पाटील बैलगाडीतून ताकारीकडे निघाले आहेत. वाटेत लोक ती गाडी थांबवत आहेत. त्यांच्या पाया पडत आहेत, असे प्रसंग लोकांनी पाहिले आहेत. साधेपणा ही त्यांची सहजता होती. आज राजकीय नेत्यांना साधेपणासाठी इव्हेंट करावे लागतात. लोकांच्यात आम्ही साधे आहोत, हे दाखवण्यासाठी अगोदर सगळा सेट अप उभा करून पुन्हा राजकीय नेत्यांनी तिथं जायचं आणि फोटोसेशन करून स्वतःची साधी इमेज लोकांच्यावर बिंबवायची, असा काळ असताना कधीकाळी स्वाभाविक साधे असलेल्या लोकनेते नाना पाटील यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांची आठवण त्यांना पाहिलेल्या लोकांना आल्याशिवाय राहत नाही.

कराडवरून आपल्या मुलीच्या सासरी हणमंतवडियेला अनेकदा खासदार क्रांतिसिंह नाना पाटील एसटीने गेले आहेत. ‘‘मी नानांना कराडच्या बस स्टॅंडवर पाहिले आहे’’ असं सांगणारा एक वयोवृद्ध माणूस मला योगायोगाने एसटीने प्रवास करत असताना भेटला होता. कराड तालुक्यातील ‘कोडोली’ हे त्यांचं गाव. मी पुण्यातून गावाकडे निघालो होतो. सातारा एसटी स्टँडवर माझ्याशेजारी एकजण बसले. एसटी सुरू झाली. मी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चरित्र वाचत होतो. त्याने मध्येच विचारलं, ‘‘नाना पाटलांचे पुस्तक हाय नव्हं का?’’

मी ‘हो’ म्हणालो.

‘मी त्यांना कराडच्या स्टँडवर बघितलं होतं. आले आले नाना पाटील आले असं कोणीतरी म्हणाले. मी वडिलांच्यासोबत बाजाराला गेलो होतो. वडील मला त्या गर्दीच्या दिशेने घेऊन गेले. नाना पाटील भाषण सांगत होते. आम्ही लांब होतो. आवाज ऐकू येत नव्हता; पण ज्यांना आवाज ऐकू येत होता ती लोकं टाळ्या वाजवत होती... सभा संपली. मग एका गाडीत बसून ते गेले. ती एसटी लगेच हलली. तेवढंच त्यांना पाहिलेलं..’’ त्यांनी प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा केला...

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com