क्रांतिवीर नागनाथ अण्णा

क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी म्हणजे आमच्या भागातील एक मोठा माणूस. देशावर ब्रिटिशांची सत्ता असताना हातात हत्यार घेऊन लढलेले सशस्त्र क्रांतिकारक.
Krantiveer nagnath anna naikwadi
Krantiveer nagnath anna naikwadisakal

क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी म्हणजे आमच्या भागातील एक मोठा माणूस. देशावर ब्रिटिशांची सत्ता असताना हातात हत्यार घेऊन लढलेले सशस्त्र क्रांतिकारक. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विश्वासू सहकारी. ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून सातारच्या तुरुंगात ठेवले. तेव्हा ते तुरुंग फोडून भूमिगत झाले. पुन्हा क्रांतिकार्यात सक्रिय झाले. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी अखंड समाजकार्य केले.

अनेक वर्षे झाली या गोष्टीला. मी तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थी होतो. माझ्या गावापासून दूर असलेल्या मंगळवेढ्याला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो. मी ज्या कार्यक्रमासाठी गेलो होतो तो झाल्यावर गावात गेलो. एका ठिकाणी सभा सुरू होती.. त्या ठिकाणी जाऊन बघितलं आणि मला एक आश्चर्याचा धक्का बसला. आमचे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी त्या स्टेजवर होते.

एवढ्या दूरगावी अण्णांना बघून मला खूप आधार वाटला. कार्यक्रम सुटेपर्यंत थांबलो. अण्णांचे भाषण नेहमीप्रमाणे जोरदार झाले. कार्यक्रम संपला. अण्णा स्टेजवरून खाली उतरत असताना मी जवळ गेलो. नमस्कार केला. मलाही एवढ्या दूर बघून त्यांनाही आश्चर्य वाटले. मी त्यांना गावाकडे येणार आहे असं सांगितल्यावर त्यांनी एका माणसाला बोलवलं.

‘ह्ये पोरगं आपल्यासोबत येणार आहे’ असं सांगितलं. मग मी अण्णांच्या त्या सहकाऱ्यासोबत गेलो. त्यांनी मला एका गाडीत बसवलं. थोड्या वेळाने सर्वांचा निरोप घेऊन आण्णा आले. आमच्यासमोर असलेल्या दुसऱ्या गाडीकडे गेले. गाडीत बसताना त्यांनी विचारलं, ‘तो पोरगा गाडीत बसला काय? मला ज्यांनी गाडीत बसवलं होतं ते म्हणाले ‘होय!’

‘त्याला आपल्यासोबत वाळव्याला घेऊन चला. तिथं थांबून सकाळी जाईल तो ’ सहकारी हो म्हणाला. मग आमचा प्रवास सुरू झाला. आमच्या गाडीच्या पुढ अण्णांची गाडी. रात्री उशिरा आमच्या गाड्या वाळवा गावी पोहोचल्या. त्या दिवशी मी तिथं साखर शाळेत मुक्काम केला.

क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी म्हणजे आमच्या भागातील एक मोठा माणूस. देशावर ब्रिटिशांची सत्ता असताना हातात हत्यार घेऊन लढलेले सशस्त्र क्रांतिकारक. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विश्वासू सहकारी. त्यांच्या क्रांतिकारी कारवायांनंतर ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली आणि सातारा तुरुंगात ठेवले; पण अवघ्या काही दिवसांत सातारचा तुरुंग फोडून अण्णा भूमिगत झाले.

पुन्हा क्रांतिकार्यात सक्रिय झाले. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत अण्णा भूमिगत राहिले. प्रतिसरकारच्या माध्यमातून लढत राहिले. या त्यांच्याबद्दल आम्ही ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी. त्यामुळे विद्यार्थीदशेत असतानाच अण्णांना भेटण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची ओढ निर्माण झाली.

अण्णा जेव्हा बोलत तेव्हा सातारा प्रतिसरकार डोळ्यापुढे उभे राहत असे. अनेक प्रसंग ऐकता आले आणि त्यांनीच घडवलेले पराक्रम त्यांच्याच तोंडून ऐकण्याचे भाग्य लाभले.

देशावर ब्रिटिशांची सत्ता असताना त्यांच्याविरोधात लढलेले नागनाथ अण्णा पुन्हा स्वातंत्र्याचं सुराज्य व्हावं म्हणून लढू लागले. काँग्रेसचं भांडवलदारधार्जिणं धोरण न पटल्याने त्यांनी डावा विचार स्वीकारला. १९५७ मध्ये वाळवा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी संस्थात्मक उभारणी सुरू केली.

वाळवा या त्यांच्या गावी त्यांनी सहकारी क्षेत्रातील हुतात्मा सहकारी साखर कारखाना उभारला. तो आदर्श ठरला होता. तिथं काम करणाऱ्या गरीब माणसाला दोन रुपयांत पोटभर जेवण मिळे. कारखान्याचा काटकसरीने सुरू असलेला कारभार याची सर्वदूर चर्चा होती.

या कारखान्याच्या माध्यमातून अण्णांनी अनेक सामाजिक चळवळी, सांस्कृतिक चळवळी उभ्या केल्या. त्यांना बळ मिळाले. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यांतील दुष्काळी जनतेला पाणी मिळावे म्हणून नागनाथ अण्णा यांनी पाणी परिषद उभी केली. पाणी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी एक लोकलढा उभा केला. परिणाम म्हणून आज दुष्काळी भागात हिरवी पिके डोलतात.

नागनाथ अण्णांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचे मोठे योगदान आहे. नंतर त्यांनी वाळवा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा प्रतिनिधित्व केले. एकदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. कराड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. ते पराभूत झाले; मात्र त्यांची खूप चर्चा झाली.

कारण त्यांचे निवडणूक चिन्ह सिंह होते आणि त्यांनी जिवंत सिंह प्रचाराला आणला होता. १९८५ मध्ये जेव्हा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली तेव्हाही त्यांना निवडणूक निशाणी सिंह मिळाली होती. तेव्हाही वाळवा मतदारसंघात त्यांनी पिंजऱ्यातला सिंह फिरवला होता.

नागनाथ अण्णा खूप हळवे होते. त्यांचे मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांची एका दुपारी त्यांना तार आली. ‘मी खूप आजारी आहे’ असा मजकूर तारेत होता. त्यांनी सुर्वे यांची तार मिळताक्षणीच गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. मुंबईत जाऊन सुर्वे यांच्यावर एका दवाखान्यात उपचार करून घेतले आणि त्यांना विश्रांतीसाठी वाळव्याला घेऊन आले. तब्येत ठीक झाल्यावर त्यांना ते मुंबईला पोहोचवायला गेले.

एक गोष्ट अनेक जण सांगतील. एखादा माणूस त्यांना भेटायला गेला, की पहिल्यांदा त्यांना ते जेवायला घालत. अगोदर जेवण आणि मग त्या माणसाचे काही काम असेल ते मार्गी लावत. त्यांच्याकडे जो माणूस भेटायला येईल त्यांना ते अगोदर जेवण देत. साखरशाळेत तशी सोय केली होती. त्यांच्या आयुष्यात हजारो लोकांना त्यांनी जेवण दिलं.

त्यांच्याकडे भेटायला गेलेला एकही माणूस त्यांना न भेटता आला नाही. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईला नेले होते. त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यांना जेव्हा लोक भेटायला यायचे. त्यांच्याशी थोडं बोलल्यावर निरोप घेण्याची वेळ आली की ते त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना म्हणायचे. ‘यांना जेवण द्या.’ ते गावापासून दूर मुंबईला दवाखान्यात होते तरीही भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला जेवण द्या असे सांगत होते.

जेव्हा अण्णा या लोकांना जेवण द्या असं म्हणत, तेव्हा लोक गहिवरून जात. दवाखान्यात शेवटच्या घटका मोजत असतानाही आपल्याला भेटायला येणारा माणूस उपाशी गेला नाही पाहिजे, असं वाटणारा हा माणूस होता.

क्रांतिवीर नागनाथ अण्णा १९४७ च्या अगोदर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढले. १९४७ नंतर सुराज्यासाठी लढत राहिले. सामान्य माणूस सुखी व्हावा ही त्यांची तळमळ होती. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानला. गोरगरीब कष्टकरी लोकांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून हा क्रांतिवीर प्रयत्नशील राहिला.

स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे पेन्शन त्यांनी घेतले नाही. त्यांनी पेन्शन घ्यावे म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांनी प्राचार्य पी. बी. पाटील यांना पाठवून अण्णांनी पेन्शन घेण्यासाठी प्रयत्न केले; पण त्यांनी स्वातंत्र्यसैनिकाला मिळणारी पेन्शन नाकारली.

अजून एक प्रसंग. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जात असे. त्यांची मुलगी विशाखा शिक्षण घेत होत्या. त्यांनी मोफत शिक्षणाच्या फॉर्मवर अण्णांना सही मागितली; पण अण्णांनी मुलींना सांगितले, ‘तुला मोफत शिक्षण मिळावे म्हणून मी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नव्हता.’ मग विशाखा यांनी त्यांच्या आजीची सही घेतली; पण वडिलांऐवजी आजीची सही घेतली म्हणून तो अर्ज नाकारला गेला, पण अण्णांचे एक सहकारी शिक्षणखात्यात अधिकारी होते.

त्यांनी विशेष बाब म्हणून तो अर्ज मंजूर केला. स्वतःच्या मुलीच्या शिक्षणासाठीसुद्धा स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारा लाभ त्यांनी घेतला नाही. त्यागाचे असे किती तरी प्रसंग सांगता येतील. त्यांचे जीवन अशा विलक्षण प्रसंगांनी भरलेले आहे.

(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com