एक होता सरपंच....

वाळवा तालुक्यातील मसूची वाडी गाव. या गावाला आम्ही दत्तू आप्पा खोत यांना भेटायला गेलेलो. ते त्या गावचे माजी सरपंच. बोरगावचं शिवार आलं. या गावाला एक इतिहास आहे.
dattu rattu khot
dattu rattu khotsakal
Summary

वाळवा तालुक्यातील मसूची वाडी गाव. या गावाला आम्ही दत्तू आप्पा खोत यांना भेटायला गेलेलो. ते त्या गावचे माजी सरपंच. बोरगावचं शिवार आलं. या गावाला एक इतिहास आहे.

अलीकडे पाच वर्षांचं सरपंचपद नऊ जणांत वाटून घेतलं जातं. अनेक ठिकाणी हाणामारी होतात पदावरून. अशा आजच्या परिस्थितीत एखाद्या खेड्यात एक माणूस सलग ३२ वर्षे हे पद भूषवतो. गावाला नवी ओळख देतो. कायापालट करतो. गावकऱ्यांसाठी पदरची भाकरी घेऊन घराच्या बाहेर पडतो. लोकांची काम करतो. या सरपंचाच्या सेवेची दखल घेत गाव वर्गणी काढून त्यांना जीपगाडी घेऊन देतो, या सरपंचाचं नाव आहे दत्तू रत्तू खोत!

वाळवा तालुक्यातील मसूची वाडी गाव. या गावाला आम्ही दत्तू आप्पा खोत यांना भेटायला गेलेलो. ते त्या गावचे माजी सरपंच. बोरगावचं शिवार आलं. या गावाला एक इतिहास आहे. आत्माराम बापू पाटील यांचं हे गाव. नेतृत्वाची एक परंपरा या गावाला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचं गाव. तिथूनच मसूची वाडीला रोड आहे. याच गावात आप्पांना भेटायला निघालो होतो.

गावच्या विकासाच्या शिल्पकाराकडे निघालो होतो, असं म्हटलं तरी चालेल. कारण या गावाला रस्ता नव्हता. एक पाऊलवाट होती. झाडंझुडपं होती. आप्पांनी हातात कुऱ्हाड घेतली आणि रस्ता करायला सुरुवात केली. हा रस्ता एका दिवसात झाला नाही. अनेक दिवस गेले. आप्पानी प्रसंगी स्वतःचं शेत दिलं; पण गावाला रस्ता केला. गावाला मुख्य रस्त्याशी जोडलं. इथून त्यांच्या कामाची सुरुवात होते...

गावाला रस्ता झाला, की मग गावाला एसटी आली पाहिजे म्हणून आप्पा प्रयत्न करू लागले; पण एसटी कशी येईल? लोक म्हणू लागले. रस्ता झाला, एवढं रग्गड झालं; पण आप्पा कसे थांबतील? त्यांनी गावात एसटी आणली. ज्या दिवशी गावात एसटी आली त्या दिवशी गावातील लोकांना पटत नव्हतं. गावात एसटी आली; पण पुन्हा येईल, अशी खात्री नव्हती; पण ती सुरू राहिली. अगदी आज गावात प्रत्येक घरात वाहन आलं तरीही.

गावाला पोस्ट नव्हतं. आप्पांनी गावाला पोस्ट आणलं. पोस्ट वाढावं म्हणून आप्पांनी घरोघरी मोफत पोस्टकार्ड वाटली आणि लोकांना आपापल्या पाहुण्यांना पत्र लिहायला लावली. मायना आप्पांनी शिकवला. मग गावात प्रत्येकाच्या नावानं पत्रं यायला लागली. पोस्ट गावात रुजलं. पोस्ट आल्यावर काही काळाने गावात टेलिफोन ऑफिस आणलं. गावात फोनची रिंग वाजू लागली.

१९६९ मध्ये आप्पांनी गावचे सरपंच म्हणून सूत्रे हाती घेतली. सन २००० पर्यंत. सलग ३२ वर्षं सरपंच होण्याचा विक्रम त्यांनी केला. या काळात सरपंच म्हणून नाही, तर गावचा पालक म्हणून त्यांनी काम केलं. गावाला रस्ता आणल्यापासून ते हायस्कूलपर्यंत त्यांनी गावाला सर्व काही आणलं. मसूची वाडी या गावाची नवी ओळख सांगली जिल्ह्याला झाली आणि आप्पांच्या नावानं गाव ओळखू लागलं. गाव कुठलं? मसूची वाडी म्हणताच ‘आप्पांचं गाव काय?’ असं लोक विचारायचे.

त्यांचे चिरंजीव संजय कदम आणि गावातील काही लोक मध्य प्रदेशला गेलेले. एका गावात त्यांच्या गाडीचा घोटाळा झाला. मग ते मिस्त्रीचा शोध घेऊ लागले. काही वेळातच एक गृहस्थ आले. त्यांनी गाडी सांगली जिल्ह्यातील आहे का, असं मराठीत विचारलं. मराठी भाषा बोलणारा माणूस पाहून हे लोक आनंदी झाले. त्यांनी सांगलीतील कोणत्या गावातील गाडी आहे, असं विचारल्यावर ‘मसूची वाडी’ म्हणताच ते गृहस्थ म्हणाले, ‘दत्तू आप्पा माहिती असतील?’

‘हो, मी त्यांचा मुलगा आहे,’ असं संजय यांनी सांगितलं.

‘मी त्यांना भेटलेलो नाही; पण सांगलीला होतो तेव्हा त्यांच्याबद्दल ऐकलं आहे. खूप चांगला माणूस आहे तो.’ असं म्हणत त्यांनी सगळ्यांना घरी नेलं, पाहुणचार केला आणि पुढच्या प्रवासाला मदत केली. असा आप्पांचा रुबाब बघायला मिळाला.

आप्पा गावचे सरपंच होते; पण ते गावातील प्रत्येक कुटुंबातील लोकांना आपले वाटायचे. सगळा प्रवास मोटरसायकलवरून. कोणत्याही भागात गेले आणि त्या भागात जर गावातील मुलगी असेल, तर आप्पा त्या घरी जाणार. त्या मुलीला भेटणार. एखादा जावई जर खट्याळ असेल, तर मुद्दाम जाणार. त्यामुळे पोरीचं बळ वाढायचं. जावईसुद्धा वचकून राहायचा. गावातील प्रत्येक माहेरवाशिणीच्या घरी आप्पा किमान एकदा तरी गेलेले आहेत. हा कसला सरपंच, हा तर गावचा कुटुंबप्रमुख होता.

३२ वर्षे सरपंच राहिलेला हा माणूस. अलीकडे पाच वर्षांचं सरपंचपद नऊ जणांत वाटून घेतलं जातं. प्रत्येकाला वाटतं आपलं नाव बोर्डावर आलं पाहिजे. अनेक ठिकाणी हाणामाऱ्या होतात पदावरून. अशा वेळी एखाद्या खेड्यात एक माणूस सलग ३२ वर्षे हे पद भूषवतो. गावाला नवी ओळख देतो. कायापालट करतो. गावकऱ्यांसाठी पदरची भाकरी घेऊन घराच्या बाहेर पडतो. लोकांची कामं करतो.

अगदी गावातील कोणी आजारी पडले आणि वाहन नसेल तर आप्पांनी त्या व्यक्तीला स्वतःच्या खांद्यावरून बोरगावपर्यंत पाच किलोमीटर नेले आहे. आप्पांच्या सेवेची दखल घेत गावाने वर्गणी काढून त्यांना जीपगाडी घेऊन दिली; पण ती जीपही त्यांनी सार्वजनिक म्हणून वापरली. प्रत्येक माणसाला त्याचा लाभ झाला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं. लोकांनी वर्गणी काढून ज्याला जीप दिली, असा हा एकमेव सरपंच असावा- दत्तू रत्तू खोत!

आम्ही आप्पांना भेटलो. घराच्या बाहेर कॉटवर बसलेले होते. जुन्या आठवणी सांगत होते. राजारामबापू पाटील, क्रांतिवीर नागनाथ अण्णा, आर. आर. आबा यांच्या आठवणी सांगितल्या. वयाची ऐंशी पार केली होती; पण अजूनही आमदार जयंत पाटील यांच्या निवडणुकीसाठी भाग घेतो, असं म्हणालेले. हा माणूस ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनाही माहिती. त्यांचं नाव त्यांच्यापर्यंतही गेलेलं. वय झालं आहे, पण त्यांच्यातला कार्यकर्ता जागा राहिलेला.

आम्ही गेल्यावर आम्हाला लगेच विचारले, ‘काय काम आहे का?’

आपल्याकडे जो माणूस येतो तो काम घेऊन येतो आणि त्याला मदत करायची, एवढं आप्पांना माहिती. महापुराच्या काळात आप्पांना इस्लामपूरमध्ये ठेवलं होतं; पण सकाळपासून रात्रीपर्यंत ते अस्वस्थपणे मुलांना फोन करत होते. गावातील सगळी माणसं बाहेर पडली का? कोण राहील न्हाई ना? त्यांचा मुलगा मदतकार्यात होता; पण आप्पांची घालमेल सुरू होती गावासाठी. आप्पा आता थकले होते; पण स्वस्थ नव्हते. सारखी काळजी करत होते.

अखंड आयुष्य गावासाठी दिलेला हा माणूस. साध्या घरात राहायचे. त्याची त्यांना ना खंत, ना खेद. घरात येईल त्याला असेल ते खाऊ-पिऊ घालणं. त्याचा पाहुणचार करणं, ही रित. त्यांनी त्यांचे नातू तेजस आणि श्रेयस यांनाही ती शिकवली. तो वारसा ते चालवत आहेत. आम्ही भेटलो तेव्हा वयोमानानुसार आप्पांचे हात हलू लागले होते; पण रोज सकाळी आप्पा तशाच हाताने अंगण झाडतात, घरामागचा रस्ता स्वच्छ करतात, असं त्यांच्या नातवाने सांगितलं होतं.

चार वाजता उठून आप्पांचा दिवस सुरू व्हायचा. वय झाल्यावर त्यांच्याकडं कामासाठी कोणी येत नव्हतं; पण आप्पा मात्र लोकांशी वाट बघत बसायचे. लोक काम घेऊन येत नाहीत, त्यांना त्रास द्यावा असं लोकांना वाटत नाही. माणसं यायची आप्पांना भेटायला. माणसं आली की आप्पांच्या गप्पा सुरू व्हायच्या. मग आप्पा लोकांना भूतकाळात घेऊन जायचे. गप्पा रंगायच्या.

सूर्य मावळत्या दिशेला निघाला होता. आम्ही आप्पांचा निरोप घेतला. ‘पुन्हा जेवायला येतो’ असं त्यांनी वदवून घेतलं मगच जायची परवानगी दिली. काठी टेकत चालत आम्हाला सोडायला रस्त्यावर आले. अगदी आम्ही वळणापर्यंत जाईपर्यंत आमच्या दिशेने पाहात उभे होते. आमची वाट बघत. गाव बदलतात. गावांचा विकास होतो; पण त्यासाठी दत्तू रत्तू खोत आप्पा यांच्यासारखे लोक पायरीचे चिरे होतात म्हणूनच विकासाचा कळस दिसतो.

या पायरीच्या चिऱ्याकडं कोणाचं लक्ष नसतं. त्यांना कसली प्रसिद्धी मिळत नसते किंवा त्याना कुठला पुरस्कार मिळत नाही. आणि ही माणसंही अपार मेहनत करतात; पण प्रसिद्धीपासून दूर राहतात म्हणूनच उपेक्षित राहतात. ३२ वर्षे गावासाठी सरपंच म्हणून काम केलेले आणि गावासाठी स्वतःच्या आयुष्यातला वेळ देणारे आप्पा असेच उपेक्षित राहिले. गेल्या आठवड्यात आप्पा गेले. दत्तू रत्तू खोत नावाचा कृष्णाकाठचा हा माणूस ज्यांनी पाहिला त्या लोकांना तो रुबाब माहिती आहे, ते लोक दत्तू आप्पा यांना विसरणार नाहीत.

(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com