स्वातंत्र्याचे साक्षीदार!

पोरगं कळतं झालं की त्याला शेतीतील कामं करायला लावायची, अशी मानसिकता त्याकाळी होती
Sampat More writes witness to freedom farmer satara
Sampat More writes witness to freedom farmer satarasakal
Summary

सांगली जिल्ह्यातील भाळवणीचा परिसर. पत्रीसरकारच्या क्रांतीची सुरुवात ज्या परिसरात झाली, ते कुंडल गाव आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधात बंड करणारा हा मुलुख.

पोरगं कळतं झालं की त्याला शेतीतील कामं करायला लावायची, अशी मानसिकता त्याकाळी होती. त्याच काळात भाळवणी गावच्या धोंडीराम धनवडे यांच्या आईने त्यांना शिक्षण देण्याचा निश्चय केला. धनवडे गुरुजी शिक्षक म्हणून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कार्वे या गावात रुजू झाले. कार्वे गावात ते शिकवत होते. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. धनवडे गुरुजी यांच्या मनातही स्वातंत्र्य चळवळीबद्दल ओढ निर्माण झाली. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि क्रांतिकारी लढ्यात सहभागी झाले. कारावासही भोगला. आयुष्याच्या संध्याकाळी धनवडे गुरुजी स्वातंत्र्य चळवळीचा मंतरलेला काळ आमच्यासमोर उभा करत होते...

सांगली जिल्ह्यातील भाळवणीचा परिसर. पत्रीसरकारच्या क्रांतीची सुरुवात ज्या परिसरात झाली, ते कुंडल गाव आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधात बंड करणारा हा मुलुख. याच मुलुखात धोंडीराम धनवडेंची गोष्ट सुरू होते. शिक्षण मिळावं म्हणून संघर्ष करावा लागायचा असा तो काळ. पोरगं कळतं झालं की त्याला शेतात घेऊन जायचं. शेतीतील कामं करायला लावायची. औत धरायला शिकवायचं, अशी मानसिकता त्याकाळी होती. त्याच काळात भाळवणी गावच्या धोंडीराम धनवडे यांच्या आईने त्यांना शिक्षण देण्याचा निश्चय केला.

त्यांच्या आईने वडिलांना सांगितले. ‘माझ्या मुलाला पंतोजी (शिक्षक) करायचे, आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी गावातील चौथीचे शिक्षण पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी गावापासून आठ किलोमीटरवर असलेल्या देवराष्ट्रला गेले. आई-वडील यांच्यापासून दूर राहून पाहुण्यांच्या गावी त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षक होणं हे त्या काळातील तरुण पिढीचं मोठं ध्येय असायचं. त्या काळात त्यांच्या गावातील शेतकरी परंपरा असलेल्या कुटुंबातील पहिले शिक्षक ठरले. शिक्षक म्हणून नोकरी लागलेल्या माणसाला तेव्हा आजच्या कलेक्टरसारखा मान मिळत होता. आपल्या गावातील धोंडीराम शिक्षक झाला, याचा गावातील लोकांना आनंद झाला. त्यांच्या आईलाही खूप आनंद झाला. तिने साखर वाटली. ते शिक्षक म्हणून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कार्वे या गावात रुजू झाले. शिक्षणाची कसलीही परंपरा नसलेल्या घरातील एक तरुण शिक्षक झाला, तो इतरांना शिकवू लागला, ही त्या काळातील खुप मोठी गोष्ट होती.

धोंडीराम धनवडे यांची शिक्षकाची नोकरी सुरू होती. सर्व काही सुरळीत सुरू होतं; पण त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. झालं असं, ज्यावेळी धनवडे गुरुजी कार्वे गावात शिकवत होते, तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. पुणे जिल्ह्यातील निराकाठ ते सातारा-कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, कृष्णा, कोयना, मोरणा, येरळा नद्यांच्या प्रदेशात प्रतिसरकार स्थापन झाले होते. गावोगावी लोक ब्रिटिश सत्तेच्या विरोध करत पेटून उठले होते. याच भागातील सुमारे ६५० गावात ब्रिटिश राजवट नाकारत प्रतिसरकार उभे राहिले होते. या गावांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या हाकेला साद देत गावोगावी स्वतःचे सरकार स्थापन केले होते. आम्हाला ब्रिटिश राजवट मान्य नाही. आमचे सरकार प्रतिसरकार अशी गर्जना लोकांनी केलेली.

ब्रिटिश राजवट नाकारत लोकांनी आपल्या गावात आपलं सरकार स्थापन केलं होतं. या गावातून ब्रिटिश सरकारचे आदेश मानले जात नसत. त्यांची स्वतंत्र प्रशासन आणि न्यायव्यवस्था होती. स्वतःची तुफान सेना होती. त्या काळी देशभक्तीने वेडे झालेले शेकडो तरुण या पत्रीसरकारमध्ये सहभागी झाले. त्याच काळात शिक्षकांची नोकरी करत असलेल्या धनवडे गुरुजींनासुद्धा या गोष्टी कानावर पडत होत्या. त्यांचेही मन प्रतिसरकारकडे जावं असं म्हणत असतानाच त्यांना भेटले संभाजीराव थोरात. ते पत्रीसरकार चळवळीमधील महत्त्वाचे नेते होते. कराड सातारा जिल्ह्यात त्यांनी ही चळवळ सुरू केली होती. त्यांच्या घरी धनवडे गुरुजींचं जाणं-येणं होतं. थोरात यांनी धनवडे यांना स्वातंत्र्यचळवळीच्या अनेक घटना सांगितल्या.

सतत त्यांच्या घरी चळवळ करणारे लोक येत, त्यांच्या गप्पा ऐकून धनवडे गुरुजी यांच्या मनात स्वातंत्र्य चळवळीबद्दल ओढ निर्माण झाली. धोंडीराम गुरुजींना वाटलं आपणही यात सहभागी व्हावं. त्यांनी तत्काळ नोकरीचा राजीनामा दिला आणि क्रांतिकारी लढ्यात सहभागी झाले. नोकरी सोडताना पुढं काय होईल, स्वतःच्या भवितव्याची काळजी न करता गुरुजी स्वातंत्र्य रणसंग्रामात उतरले. त्यांनी गावाकडे येऊन लोकांच्या मनात ब्रिटिश सरकारच्या विरोधात चीड निर्माण होईल, अशी भाषणे करायला सुरुवात केली. गावात राष्ट्रसेवा दलाची शाखा उघडली आणि त्यांनी गावातील तरुणांना एकत्र केले. त्यांना प्रतिसरकारमध्ये सामील होण्याचं आवाहन करू लागले. गावातली आणि पंचक्रोशीतील अनेक तरुण राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत येऊ लागले. भाळवणी गावचा एक तरुण शिक्षकाची नोकरी सोडून ब्रिटिश सरकारच्या विरोधात काम करत आहे, ही बातमी खबऱ्यांनी कळवली आणि मग एक दिवस राष्ट्र सेवा दलाची शाखा सुरू असतानाच पोलिसांची गाडी आली. त्यांनी धोंडीराम गुरुजींना अटक केली. अटक केलेल्या गुरुजींना धारवाड आणि येरवडा येथील तुरुंगात कैद करून ठेवले होते.

आजकाल नोकरी मिळावी म्हणून केले जाणारे सायास या सगळ्या गोष्टींचा विचार करता मिळालेली शिक्षकाची नोकरी सोडून देणाऱ्या गुरुजींना व्यवहारशून्य किंवा वेडे ठरवले जाईल. गुरुजी वेडे होते; पण त्यांना देशप्रेमाचं वेड लागलं होतं. त्यांना स्वातंत्र्याचं वेड लागलं आणि घरादाराची कसलीही पर्वा न करता गुरुजी ब्रिटिश सरकारच्या विरोधात गेले. सरकारी नोकरी सोडत लाल मातीत कुस्ती केलेल्या या पैलवानाने सरकार विरोधात दंड थोपटले. तुरुंगात गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर धोंडीराम गुरुजी यांनी नाना पाटील, जी. डी. बापू लाड यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या पक्षात काम केले. स्वातंत्र्य मिळालं; पण स्वराज्य मिळालं नाही, अशी खंत वाटणारे जे काही लोक होते, त्यात गुरुजी होते. पुन्हा एकदा स्वराज्य यावं म्हणून ते प्रयत्नशील राहिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा त्यांना भारत सरकारने शिक्षण सेवेत घेतले. या काळात त्यांनी शेकडो विद्यार्थी घडवून त्यांच्या मनात देशभक्ती रुजवली. त्यांचे अनेक विद्यार्थी आजही गुरुजींनी दाखवलेल्या वाटेवरून जातात.

आम्हाला गुरुजी भेटले ते त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी. तेव्हा त्यांनी वयाची नव्वद वर्षं पूर्ण केली होती; तरीही ते एकटे एसटीने प्रवास करत. सतत उत्साही असत. शंभरी त्यांनी पार केली. त्यांचे सगळे सहकारी जग सोडून गेले. आयुष्याच्या संध्याकाळी गुरुजी स्वातंत्र्य चळवळीचा मंतरलेला काळ आमच्यासमोर उभा करत होते. आमच्या बोटाला धरून ते त्या काळात घेऊन जात होते. तो ऐकून आम्ही भारावून जात होतो. ते त्या सगळ्या इतिहासाचे भाष्यकार होते. इतिहासाचे साक्षीदार होते. ज्या प्रतिसरकारने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली, त्या सरकारचे एक योद्धे होते. ते जोवर होते तोवर इतिहासाचे एक पुस्तक सोबत होते. ते गेले आणि मंतरलेल्या काळातील एक साक्षीदार गेला. आता त्यांनी आमच्या पिढीला सांगितलेल्या आठवणीच उरल्या. इतिहास घडवण्यात सहभागी असलेल्या माणसाची झालेली आमची भेट आमच्यासाठीही अविस्मरणीय राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com