भाजे लेणी : अद्भुत इतिहासाचं दर्शन

सम्राट अशोकाच्या काळात निर्माण झालेलं स्थापत्य आपण मागील काही लेखांमध्ये पाहिलं. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोकाच्या काळात निर्माण झालेल्या लेणी स्थापत्यानं फार मोठा बदल घडवून आणला.
samrat ashok era bhaje leni historical place bihar maharashtra
samrat ashok era bhaje leni historical place bihar maharashtra Sakal

- केतन पुरी

सम्राट अशोकाच्या काळात निर्माण झालेलं स्थापत्य आपण मागील काही लेखांमध्ये पाहिलं. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोकाच्या काळात निर्माण झालेल्या लेणी स्थापत्यानं फार मोठा बदल घडवून आणला. पण, या लेणींचा जन्म जरी बिहार राज्यात झाला असला, तरी त्या प्रकारच्या लेणींची निर्मिती महाराष्ट्रात किंवा दख्खनच्या भूभागात मोठ्या प्रमाणात झाली.

म्हणजे, आपल्या देशात आजपर्यंत सापडलेल्या अठराशे लेणींपैकी जवळपास अकराशे लेणी महाराष्ट्रात निर्माण झाल्या आहेत. लेणींचे अनेक प्रकार आहेत. आपण लेणी असा विचार करताना फक्त एखादा स्तूप असलेली किंवा अनेक खोल्या असलेली रचना डोळ्यांसमोर आणतो. पण, या सर्वांना विशिष्ट नावं आहेत. जिथं स्तूपाची निर्मिती होते, ते चैत्यगृह.

जिथं बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी व्यवस्था केलेली असते, ते विहार. जिथं एकत्र बसण्याची व्यवस्था असते किंवा जिथे एकत्र जमण्यासाठी मोठ्या खोलीची रचना केली असते ती उपत्थानशाळा, जेवणाची व्यवस्था असलेल्या लेणीला भोजनशाळा, मंडप, पाणीयमंडप, उदपानशाळा आणि असे कित्येक प्रकार आपल्याला लेणींमध्ये आढळतात. यांच्यावरून सदर लेणी आणि तिथं राहणाऱ्या लोकांचं दैनंदिन जीवन कसं असावं, याचा अंदाज आपण लावू शकतो.

महाराष्ट्राचा विचार केल्यास, पुणे जिल्ह्यात दख्खन भागातील सर्वांत पहिल्या लेणीपैकी एकाची निर्मिती झाली. लोहगड आणि विसापूर किल्ल्याच्या अगदी जवळ असलेली भाजे लेणी. एकूण २६ लेणींचा या लेणीसमूहात समावेश होतो. प्राचीन बोरघाट मार्गावर निर्माण करण्यात आलेल्या इथल्या लेणींमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत.

गजपृष्ठाकार आकारात निर्माण केलेलं चैत्यगृह महत्त्वाचं आहे. याच्या छतावर अर्धगोलाकार आकारात लावलेली लाकडे ही जवळपास तेवीसशे वर्ष जुनी आहेत. भाजे लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व तिसरे शतक ते इसपू दुसऱ्या शतकात झाली.

जेव्हा या चैत्याची निर्मिती झाली, त्याच वेळेस या लाकडांना छतावर लावण्यात आले. एका बाजूला स्तूप, त्याच्या बाजूनं स्तंभाची रांग, बाहेरील बाजूस काही प्रतिमा आणि थोड्याफार प्रमाणात दिसून येणारं रंगकाम असं एकंदरीत चैत्याचं स्वरूप आहे.

विशेष गोष्ट म्हणजे, अनेक अभ्यासकांच्या मतानुसार दख्खन भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात खोदण्यात आलेलं हे सर्वांत पुरातन चैत्यगृह आहे. चैत्य कमान मात्र आज अस्तित्वात नाही. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या लेणीमधून स्थापत्यकीय चळवळीचं एकंदरीत स्वरूप समजून घेण्यास मदत होते.

चैत्याला मागे टाकून लेणी क्रमांक २२ कडं निघाल्यास वाटेत एकाच जागी अनेक स्तूपांची एकत्रित रचना केल्याचं पाहायला मिळतं. एकाच जागेवर दहा- बारा स्तूप एकत्रितपणे निर्माण केले आहेत. यांना स्मृतिस्तूप विथीका असं म्हणतात.

एखाद्या बौद्ध भिख्खूचं किंवा त्या लेणी समूहात राहिलेल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास, त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अशाप्रकारच्या स्तूपांची निर्मिती करण्यात येते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे स्तूप दिसतात.

पण भाजे येथील स्मृतिस्तूपांची रचना ही भव्य, सुबक आणि आकर्षक आहे. त्यापैकी काहींवर ब्राह्मी लिपीमध्ये लेख कोरला आहे. धम्मगिरी, संघदिन यांसारख्या बौद्ध भिक्खूची नावं यावर कोरलेली आहेत. त्यांचं वास्तव्य या भाजे लेणीसमूहात होते.

येथील सर्वांत आकर्षक लेणी १९ क्रमांकाची आहे. हा विहार आहे. बौद्ध भिख्खू आणि साधकांच्या राहण्याची व्यवस्था इथं केली आहे. पण तत्कालीन विहाराच्या स्थापत्यकीय नियमांना छेद देत इथं बऱ्याच गोष्टींना पहिल्यांदाच स्थान देण्यात आलंय.

या लेणीच्या बाहेर एका वऱ्हांड्याची रचना केलेली आहे. त्याचं छत गजपृष्ठाकार आहे. आतमध्ये दोन बाजूला दोन खोल्यांची रचना केलेली आहे. त्यातील एका खोलीच्या बाहेर दोन प्रतिमांचं अंकन केले आहे. एक प्रतिमा चार अश्वांच्या रथावर आरूढ झालेली असून, चाकांच्या खाली एका असुराचं निर्दालन करतानाचं दृश्य कोरले आहे तर दुसऱ्या प्रतिमेमध्ये एक व्यक्ती हत्तीवर आरूढ झालेला दाखवला आहे.

काही अभ्यासकांच्या मते, या दोन प्रतिमा सूर्य आणि इंद्राच्या असाव्यात. तर काही अभ्यासकांच्या मते, या बौद्ध जातक कथेतील प्रसंगावर आधारित आहेत. इसपू तिसऱ्या शतकातील महाराष्ट्रातील धार्मिक व सामाजिक संरचना तसेच,

बौद्ध लेणींच्या परिसरात खोदण्यात आलेल्या या प्रतिमांचा विचार करता दुसरं मत हे वास्तव्याच्या जवळ जाणारे असावे, असं अभ्यासक नमूद करतात. यांच्यासोबतच, काही नृत्य व वादन करणाऱ्या लोकांचेही अंकन केले आहे. त्यांचे अलंकार, कपडे आणि एकूणच रचनेवर व्यापारामुळं पडलेला प्रभाव लगेच जाणवतो.

या लेणी समूहापासून थोड्या लांब अंतरावर लेणी क्रमांक २६ आहे. बऱ्याच अभ्यासकांचं असं मत आहे, की भाजे लेणी समूहातील ही सर्वांत पहिल्यांदा खोदलेली लेणी असावी. या लेणीच्या मार्गावर दोन ठिकाणी पाणी अडवण्यासाठी प्राचीन काळात केलेली बांधाची रचना पाहायला मिळते.

एवढ्या मोठ्या संख्येनं व्यापारी, बौद्ध भिख्खू आणि इतर लोकांची या परिसरात रेलचेल असताना त्यांच्या दैनंदिन पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाण्यांच्या टाक्यांबरोबरच अशी रचना करण्यात येते. कोंढाणे, कान्हेरी, पितळखोरा यांसारख्या कित्येक लेणींमध्ये हे बांध आपल्याला पाहायला मिळतात.

लोणावळा किंवा मळवली स्थानकापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लेणी दख्खनच्या इतिहासाच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात दिसून येणारी आणि सुस्थितीत असलेली ही सर्वांत पुरातन धार्मिक वास्तू असल्यामुळं भाजे येथील लेणीचं महत्त्व प्रचंड आहे.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com