देवेंद्रजी, हा इथे आहे महाराष्ट्रातला विरोधी पक्ष !

Devendra Fadnavis, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Sharad Pawar

महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक कुठे आहे...? आम्ही कुस्ती कुणाबरोबर लढू... आहेत कुठे पैलवान? असं विचारणाऱया भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मतदारांनी आज अत्यंत चोख उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्राने (टिकली तर) युतीला सत्ता जरूर दिली; मात्र ती देतानाच विरोधी पक्ष अत्यंत बळकट केला. येत्या काळात विशेषतः भाजपच्या नेतृत्वाला मनमानी, मग्रुरीने वागता येणार नाही, अशी व्यवस्था महाराष्ट्रातील मतदारांनी करून ठेवली.

विधानसभा निवडणुकीचे कल आणि निकाल जस जसे हाती येत आहेत, तस तसे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. निवडणुकीपूर्वीच युती म्हणून लढण्याचा निर्णय योग्य होता, हे भाजप नेतृत्वाच्या आता पुरेसं ध्यानात आलं असेल. युती झाली नसती, तर भाजपला शतक गाठताना दमछाक झाली असती. शिवसेनेची पाच वर्षे शक्य तितकी फरफट करून झाल्यानंतर युतीसाठी हात पुढे केला, तेव्हाही भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या मनात युतीसाठीची फारशी अनुकुलता नव्हती. आजचे निकाल पाहिल्यानंतर महाराष्ट्रात युती करणाऱया प्रत्येक नेत्याचे उर्वरित बहुसंख्य भाजप नेत्यांनी मनोमन आभार मानले असतील.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि 'सत्तेचा उन्माद लोकांना पसंत नाही,' असं विधान भाजपला उद्देशून केलं. पवारांवर भाजपच्या नेतृत्वाने केलेली टिका, त्यांना केलेलं टार्गेट आणि या साऱयांना पुरून उरत पवारांनी भाजपला दिलेली धोबीपछाड पाहता मघाशी पत्रकार परिषदेत पवारांनी वापरलेली भाषा सौम्यच आहे. राजकारणातल्या विनम्रतेचा धडा पवारांनी भाजपला दिला.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये राज्यात सत्तेचा उन्माद वरचेवर दिसला. निवडणुकीत आत्मविश्वास हवाच. त्याबद्दल दुमत नाही. मात्र, उन्माद लोकं खपवून घेत नाहीत. आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यामध्ये धुसर सीमारेषा असते. ती सीमारेषा लोकसभेनंतर भाजपच्या नेतृत्वाने ओलांडली. एकदा नेतृत्वाने ओलांडल्यानंतर उर्वरित दुय्यम, तृतीय श्रेणीच्या नेत्यांनी ओलांडण्यात गैर काहीच नाही. त्यामुळे, आधी नेतृत्वाने सुरू केले, की राज्यात 220 च्या पुढेच युतीच्या जागा मोजा. तीच री अन्य नेत्यांनी ओढली.

फडणवीस म्हणाले, आहे कुठे विरोधी पक्ष राज्यात. पाठोपाठ उर्वरित नेत्यांनी सुरू केले, आहे कुठे विरोधी पक्ष. फडणवीसांनी विचारले, कुस्ती लढायचीय आम्हाला. आहे कुठे समोर कोण पैलवान? उर्वरित नेत्यांनी सुरू केले, आहे कुठे लढायला कोण.

आज या साऱया प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. राज्यात सत्ता ठेवूनही भाजपला पुरेशी वेसण मतदारांनी घातली आहे. उन्माद बरा नसतो. तो सत्तेवरून खाली खेचतो, याची जाणिव भाजपला झाली असावी, अशी अपेक्षा आहे.

एक शरद पवार भाजपच्या विरोधात उभे राहिले, तर सत्ता टिकविण्यासाठी युतीशिवाय पर्याय राहिला नाही भाजपसमोर. काँग्रेसने निवडणूक लढवताना पहिल्या दिवसापासून जिगर दाखवलीच नव्हती. ती दाखवली असती आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य पिंजून काढले असते, तर आहे ही सत्ता टिकवतानाही भाजपला अवघड झाले असते, हे आता भाजपनेही मान्य करायला हवे.

(लेखकाची मते वैयक्तिक आहेत. या मतांशी esakal.com सहमत असेलच, असे नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com