भाजपला हरवण्याचं उद्धव ठाकरेचं महासत्तानाट्य

uddhav_thackeray- Shivaji Park
uddhav_thackeray- Shivaji Park

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे... अशी शपथ मुंबईच्या शिवाजी पार्कवर २८ नोव्हेंबरला घेतल्यावर शिवसेना नावाच्या राजकीय पक्षाच्या वाटचालीचा तिसरा टप्पा लिहिण्यास सुरुवात झाली आहे. आक्रमक मराठीबाणा, आक्रमक हिंदुत्व, या दोन टप्प्यांची तब्बल पाच दशकांची वाटचाल संपवून शिवसेना सर्वसमावेशकतेच्या नव्या राजकारणाकडे वळणारा हा तिसरा टप्पा आहे. आत्तापर्यंतच्या दोन्ही टप्प्यांचे नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होते. तिसरा टप्पा सर्वार्थाने उद्धव ठाकरे यांनी सुरू केला आहे. 

उद्धव यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा आणि आज (३० नोव्हेंबर) विधानसभेत बहुमत सिद्ध केले तेव्हाही एकच प्रश्न विचारला गेला, ‘हे सरकार किती दिवसांचे...?’  या प्रश्नामागे शिवसेनेच्या वाटचालीतील आधीच्या दोन टप्प्यांची पार्श्वभूमी होती. कारकिर्दीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्धव शिवसेनेला कुठे नेऊ शकतात, याबद्दल आता चर्चा सुरू होईल. 

उद्धव मवाळ आणि मितभाषी आहेत, याबद्दल बरेच लिहिले-बोलले गेले. त्यांच्या संघटनकौशल्याबद्दल आणि व्यावहारिक शहाणपणाबद्दल फारशी चर्चा कधी झाली नाही. उद्धव यांचा राजकारण प्रवेश २००२ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतला. तेव्हा बाळासाहेब शिवसेनाप्रमुख होते. त्यांच्या विरोधकांच्या चिंधड्या उडविणाऱ्या नेतृत्वाच्या छायेत उद्धव यांची वाढ झाली. मुंबई महापालिकेची २००२ ची निवडणूक असो अथवा २०१२ ची, उद्धव यांनी बाळासाहेबांची आक्रमकता संघटनात्मक ताकदीत बदलविली. २०१७च्या मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या प्रचाराची धग नव्हती; मात्र संघटनात्मक बळावर उद्धव यांनी विरोधकांना मात दिली.  बाळासाहेबांच्या कारकिर्दीत भाजपने शिवसेनेसमोर दुय्यम भूमिका स्वीकारली होती. तशी परिस्थिती उद्धव यांना गेल्या सात वर्षांत लाभली नाही. बाळासाहेबांपाठोपाठ शिवसेनाही संपेल, ही केवळ भाजपचीच नव्हे; तर तमाम विरोधकांची अटकळ. ती खोडून काढत उद्धव यांनी प्रत्यक्षात शिवसेनेचा विस्तार केला. भाजपची छुपी स्पर्धा, बंधू राज ठाकरेंचा आणि अन्य पक्षांचा विरोध यामधून उद्धव यांनी संघटनात्मक कौशल्याच्या बळावर स्वतःचा रस्ता शोधला.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी १९९५ मध्ये शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री दिला तेव्हा त्यांनी, ‘सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे,’ असे सांगितले होते. ‘रिमोट कंट्रोल’ने सरकार चालविण्याचे दिवस आता नाहीत आणि राज्यातील चार प्रमुख पक्षांपैकी तीन पक्षांची सहमती असलेल्या व्यक्तीने सरकारमध्ये बसून महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचे निर्णय घेण्याची ही वेळ आहे, इतके ओळखण्याचे व्यावहारिक शहाणपण उद्धव यांच्यामध्ये आहे. ते त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत प्रकर्षाने दाखविले. अशा शहाणपणात राजकीय उड्या अपरिहार्य बनतात. त्या उड्या उद्धव यांनी २०१४ पासून सातत्याने मारल्या आहेत. सत्तेत राहून विरोधकाची भूमिका शिवसेनेने २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत बजावली. त्यावर टीका झाली, तरीही ते डगमगले नाहीत.  

येत्या काळात केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष उद्धव ठाकरे सरकारकडे असणार आहे. अजेय भासू लागलेल्या भाजपला नमविण्याचे महासत्तानाट्य उद्धव यांनी आरंभिले आहे. त्या नाटकाचे शिल्पकार उद्धव स्वतः असले, तरी सूत्रधार, लेखक अनेक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससारख्या कट्टर विरोधकांना सोबत घेतानाच शिवसेना वाढवायची आणि महाराष्ट्रात स्थिर सरकारही द्यायचे, असा अभूतपूर्व उद्योग उद्धव यांना करावा लागेल. त्यांच्या आतापर्यंतच्या संघटनात्मक कौशल्याची आणि व्यावहारिक शहाणपणाची ती कसोटी  असेल.

जमेच्या बाजू
 गेल्या सतरा वर्षांमधील संघटनात्मक कौशल्य, सात वर्षे दाखविलेले 
व्यावहारिक शहाणपण.
 मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरावर सातत्याने वर्चस्व.

आव्हाने
 ठाकरे परिवाराच्या निर्णयक्षमतेची परीक्षा.
 राजकारणातील थेट सहभागामुळे पारदर्शीपणाची अपेक्षा. 
 तिन्ही पक्षांमध्ये समन्वय ठेवून भाजपच्या विरोधाचा सामना.

सम्राट फडणीस, samrat.phadnis@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com