
तंत्रज्ञानाचा मानवी वर्तनावर आणि पर्यायानं समाजावर परिणाम होतो हे मानवी इतिहासात वारंवार सिद्ध झालेलं आहे.
तंत्रज्ञानाचा मानवी वर्तनावर आणि पर्यायानं समाजावर परिणाम होतो हे मानवी इतिहासात वारंवार सिद्ध झालेलं आहे. चाकाचा शोध लागण्यापूर्वीचा माणूस आणि चाकाची गती प्राप्त झालेला माणूस एकसारखा राहिलेला नव्हता. निसर्गात खाण्यासाठी योग्य काय आणि जिवाला घातक काय, याचं आकलन होईपर्यंत लाखो माणसं विषारी फळं, पानं खाऊन मृत्युमुखी पडली असतील. याच प्रवासात मानवी मेंदू उत्क्रांत होत खाण्यासाठीची योग्य आणि घातक फळं, पानं, झाडांचं वर्गीकरण करत राहिला. अणकुचीदार दगड शोधून त्याद्वारे शिकार करणं हे झालं पहिलं तंत्रज्ञान. निसर्गापासून शिकून शेती करायला लागणं हे त्यानंतरचं प्रमुख तंत्रज्ञान. दोन पायांनी चालण्यापेक्षा-धावण्यापेक्षा गतिशील वर्तुळाकार चाक हे आणखी एक महत्त्वाचं तंत्रज्ञान. या प्रत्येक तंत्रज्ञानानं माणूस एक पाऊल पुढं गेला आणि त्याबरोबरच समाजही.
अक्षरजुळणी शोधणारा गटेनबर्ग, जेम्स वॅटचं वाफेचं इंजिन, संदेशवहनातली अलेक्झांडर ग्रॅहम बेलची प्रगती, प्रकाश पाडणारा थॉमस अल्वा एडिसन या साऱ्या तंत्रज्ञानाच्या टप्प्यांवर माणूस आणि समाज विकासाच्या पुढच्या टप्प्यावर गेले. विसाव्या शतकात कॉम्प्युटर आणि इंटरनेटनं तंत्रज्ञानातल्या टप्प्यांचा वेग झपाट्यानं वाढवला. एकविसाव्या शतकात हा वेग मोबाइलनं आपल्या हाती घेतला. कॉम्प्युटिंग, इंटरनेट आणि मोबाईल या तिन्ही तंत्रज्ञानांचा मिलाफ गेल्या दोन दशकांत घडून आला. रोज आणि क्षणोक्षणी तंत्रज्ञानात झपाट्यानं बदल होत जाण्याच्या आजच्या काळापर्यंत समाज येऊन पोहोचला आहे. अशा विलक्षण काळाला सुसंगत अशी तंत्रज्ञानाची नवी क्रांती गेल्या आठवड्यापासून घडू पाहतेय. ती आहे यंत्राद्वारे संवादाची.
चॅटबॉट वापराची सुरुवात
यंत्रांनी माणसांशी माणसांसारखा संवाद साधण्यासाठीचे प्रयत्न नवे नाहीत. विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी उगवलेल्या याहू चॅटपासून ते ई-मेलला संक्षिप्त उत्तर यंत्रानं सुचवण्यापर्यंतचे प्रयोग होतच आहेत. या साऱ्या प्रयोगांचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं, ते माणसाला उपयोगी पडेल असा माणसासारखा संवाद यंत्रानं करणं. असं घडण्यासाठी यंत्राला माणसाचा संवाद सतत शिकवत राहणं आवश्यक होतं. यंत्र जसजसं शिकत जाईल, तसतसं त्याला माणसाच्या गरजा, अपेक्षा, भावनांचा अंदाज यायला लागेल आणि यंत्र अधिक बिनचूक संवाद साधेल. उदाहरणार्थ : गेल्या पाच वर्षांत अनेक बँकांनी यांत्रिक संवाद सुरू केला. तांत्रिक परिभाषेत चॅटबॉट असं नाव असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या मूलभूत प्रश्नांना यंत्रांनी उत्तरं द्यायला सुरुवात केली. May I help you असं विचारत आपल्याशी संवाद साधणारी व्यक्ती नसून प्रोग्रॅमिंग केलेलं सॉफ्टवेअर आहे, हे आता ग्राहकांनाही माहीत असतं.
बँकिंगसारख्या व्यवसायातले प्रश्न मर्यादित असतात, ते विशिष्ट विषयांभोवतीच असतात. प्रश्न विशिष्ट विषयांभोवती असणाऱ्या व्यवसायांमध्ये चॅटबॉट आजही विस्तारत आहे. पर्यटनव्यवसाय, हॉटेल-बुकिंग, विमान तिकिटांचं बुकिंग इथंपासून ते डीमॅट अकाउंटमधील व्यवहारापर्यंत अनेक ठिकाणी चॅटबॉट वापरात आहेत. चॅटबॉट उपयुक्त असले तरी ते सर्वच ठिकाणी वापरता येत नाहीत. शिवाय, निव्वळ ठोकळेबाज माहिती नको असेल तर चॅटबॉटचा उपयोगही नाही. निर्मितिक्षम (क्रिएटिव्ह) क्षेत्रात अथवा तपशीलवार माहितीच्या क्षेत्रात विद्यमान चॅटबॉट निष्प्रभ ठरत आहेत.
‘अनुभवी’ संवादाची निर्मिती
चॅटबॉटच्या मर्यादा ओलांडणाऱ्या विलक्षण क्रांतिकारी तंत्रज्ञानानं ३० नोव्हेंबरला काम सुरू केलं. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून बनवलेल्या या क्रांतिकारी चॅटबॉटचं नाव आहे चॅटजीपीटी - ChatGPT. यातील जीपीटीचा अर्थ आहे जनरेटिव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर. ‘जनरेटिव्ह’चा अर्थ आहे पुनर्निमितिक्षम. त्यानंतरचा शब्द आहे प्री-ट्रेंड ट्रान्स्फॉर्मर, आधी शिकवलेल्यानुसार रूपांतरण करणारा. चॅटजीपीटी म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं, तर आधी शिकवल्यानुसार बदल करून पुन्हा निर्मिती करणारं सॉफ्टवेअर.
यामध्ये शिकवणं आणि त्यानुसार बदल करून निर्मिती करणं या दोहोंमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सहभाग आहे. मानवी मेंदू अनुभवाचा वापर करून संवाद साधतो. उदाहरणार्थ : तुम्हाला विचारलं की, तुमच्या आयुष्यातली पहिली सहल कशी होती, तर वयाच्या दहाव्या-विसाव्या-पन्नासाव्या-सत्तराव्या वर्षी येणाऱ्या उत्तराच्या तपशिलात फरक असेल. काही मुद्दे जरूर समान असतील. तथापि, सहल या वैशिष्ट्याचा अनुभव अनेकदा येत गेल्यानंतर पहिल्या सहलीच्या तपशिलाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होत जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा संगणकीय बुद्धिमत्ता विकसित करू पाहणारे संशोधक, अभियंते संगणकाला - एका यंत्राला- सर्व प्रकारचे ‘अनुभव’ देऊ पाहत आहेत. ‘मशिन लर्निंग’ असं या विद्या-उपशाखेचं नाव. या मशिन लर्निंगवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विकसित होत आहे. चॅटजीपीटी ही त्याची आजच्या उपलब्ध सर्व तंत्रज्ञानाच्या पुढं जाणारी घडामोड म्हणून तिचं महत्त्व.
सामूहिक निर्मितीतून साकारलेलं एआय
एकविसाव्या शतकातल्या तंत्रज्ञान विकासात सामूहिक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. भौगोलिक सीमा ओलांडून ज्ञानाची देवाण-घेवाण करणारे संशोधक, अभियंते, शास्त्रज्ञ यांच्यामुळे अगदी काल-परवा कोरोनाच्या विषाणूवर लशीची निर्मिती होताना आपण पाहिलं आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासात तर सामूहिक आणि त्यातही नफेखोरीमुक्त प्रयत्नांना विशेष महत्त्व आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारखं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान कुणा एका व्यक्तीची, प्रदेशाची, देशाची अथवा कंपनीची मक्तेदारी राहू नये, यासाठी ओपनएआय प्रकल्प व्यावसायिकरीत्या राबवला जातो. चॅटजीपीटी प्रयोग हा ओपनएआय प्रकल्पाचं यश आहे. चॅटजीपीटी ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची बाल्यावस्था आहे, असं मानलं जातं आहे. बाल्यावस्थेत या प्रकल्पानं गेल्या आठ दिवसांत निर्माण केलेलं वादळ पाहता येत्या वर्ष-दोन वर्षांत संवादाच्या परिभाषांमध्ये अपूर्व बदल अपेक्षित आहेत.
सर्वात मुख्य बदल म्हणजे आशयाच्या (कंटेन्ट) निर्मितीत थेट यंत्रानं घेतलेला सहभाग. कवी वर्डस्वर्थ असो किंवा विंदा करंदीकर, या प्रतिभासंपन्न साहित्यिकांनी त्यांच्या प्रगल्भ विचारशक्तीनं साहित्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजीमहाराजांवर लिहिलेला निबंध असो किंवा जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल लिहिलेला शोधनिबंध असो, हा सारा मानवी डोळ्यांनी वाचून, मानवी मेंदूनं विचार करून, अनुभव वापरून निर्माण केलेला आशय आहे. चॅटजीपीटी तंत्रज्ञान हे इंटरनेटवर खुल्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या माहितीतून नेमकं निवडून क्षणात वापरकर्त्यासमोर आशय सादर करणारं तंत्रज्ञान आहे. आता प्रश्न पडेल की मग गुगल सर्च इंजिन वेगळं काय करतं...! आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची मेख इथंच आहे. गुगल वापरकर्त्याला अनेक पर्यायांची ओळख करून देतं आणि चॅटजीपीटी उपलब्ध खुल्या इंटरनेटवरील सर्व माहिती गोळा करून त्यातील वेचून (म्हणजे ‘अनुभव’ वापरून) पूर्णतः फेरनिर्मिती (नवनिर्मिती हा शब्द अजून तरी अयोग्य आहे) करून वापरकर्त्यासमोर सादर करतं. या साऱ्या क्रियेला काही सेकंदांचा अवधी लागतो. गणिती सिद्धान्तांवर जशी चॅटजीपीटी क्षणात माहिती सादर करतं, तशीच काल्पनिक घटनांवरही. वापरकर्त्यानं प्रश्न विचारले की, चॅटजीपीटी ते प्रश्न ‘समजून’ घेऊन, ‘सुसंगतवार अर्थ लावून’, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या ‘अनुभवा’चा वापर करून आशयाची ‘फेरनिर्मिती’ करतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर चॅटजीपीटीला समजलं नाही तर ते उपलब्ध नसल्याचं यंत्रच सांगून टाकतं.
अनुत्तरित प्रश्न, कल्पनातीत शक्यता
चॅटबॉट ही कोशातली अवस्था मानणारे चॅटजीपीटी ही फुलपाखरात रूपांतकाची प्रक्रिया मानत आहेत. मात्र, हे सारं वरवर दिसतं तसं साधं-सोपं नाही. तंत्रज्ञान दुधारी असतं. अणुऊर्जा वीजनिर्मिती करू शकते आणि हिरोशिमा-नागासाकीमधला विध्वंसही. तंत्रज्ञानाला भावना नसतात. समाजाचं भलं-बुरं तंत्रज्ञान ठरवत नाही. ते वापरकर्ते ठरवतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून तयार होऊ पाहणाऱ्या चॅटजीपीटी तंत्रज्ञानाला हाच नियम लागू आहे. गेल्या आठवड्याभरात चॅटजीपीटीवर विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य आणि उत्तम आहे असं नाही. तथापि, मशिन लर्निंगमध्ये योग्य उत्तर सापडण्याइतकंच महत्त्व अयोग्य उत्तरं कोणती याचा ‘अनुभव’ यंत्राला देण्याचंही आहे. त्यामुळे, विचारलेल्या प्रत्येक प्रश्नातून उद्याचा ॲल्गरिदम अधिकाधिक सक्षमपणे विकसित होणार आहे.
नोकरीच्या अर्जासाठी उत्तम कव्हरिंग लेटर लिहून देण्यापासून कठीण प्रमेयं, किचकट विषयांचे निबंध लिहिण्यापर्यंत कोणताही विषय चॅटजीपीला वर्ज्य नाही. अशा तंत्रज्ञानानं आणि आपल्यासारख्या माणसांनी निर्माण केलेला आशय यातला फरक कळणं अशक्य आहे, अशी आजचीच परिस्थिती आहे. परिणामी, आशयाच्या जबाबदारीचा प्रश्न नजीकच्या भविष्यात निर्माण होणार आहे. आशय हा संवादाचा गाभा. तोच यंत्राद्वारे जसजसा निर्माण होईल तसतसे मानवी वर्तनावर, समाजावर परिणाम अटळ आहेत. ते कोणत्या स्वरूपात होतील, ते सकारात्मकच असतील की नकारात्मकही याबद्दलची चर्चा आत्ताशी कुठं सुरू झाली आहे. मोबाइल फोनच्या उदयापर्यंत ‘अतिवापराचे मानसिक दुष्परिणाम’ कुणाला ठाऊक होते? मित्र-मैत्रिणींशी संवादासाठी निर्माण झालेल्या सोशल मीडियावरच्या पोस्ट दंगली भडकवतील हे कुणाला ठाऊक होतं? वापरातून आणि गैरवापरातून जसा मोबाइल, सोशल मीडिया विकसित होतोय तसं त्यातले दोषही समोर येताहेत. मोबाइल किंवा सोशल मीडिया स्वतः आशय तयार करणारं उपकरण किंवा तंत्रज्ञान नव्हतं. चॅटजीपीटी आणि आजपर्यंतच्या तंत्रज्ञानात हा मूलभूत फरक आहे. त्यामुळेच, चॅटजीपीटीच्या ‘अनुभवा’तून मानवी समुदायाला येणारा अनुभवही स्वतंत्र असेल, असं किमान प्रारंभीच्या टप्प्यात दिसतं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.