अपरिहार्य यांत्रिकता आणि मानवी चेहरा

भांबावलेला नायक जिम प्रिस्टन अवकाशयानात शोधाशोध करत अखेरीस मद्यालयात थडकतो. साऱ्या अवकाशयानात सन्नाटा. यंत्रांचा आवाजही नाही.
Technology
TechnologySakal

भांबावलेला नायक जिम प्रिस्टन अवकाशयानात शोधाशोध करत अखेरीस मद्यालयात थडकतो. साऱ्या अवकाशयानात सन्नाटा. यंत्रांचा आवाजही नाही. अवकाशयानाचा आकार इतका अचाट की, एका टोकाला सुरूवात केली तर दुसऱ्या टोकाला पोहोचेपर्यंत दम लागावा. जिथं पाहावं तिथं यंत्र.

काही यंत्रांवरचे संदेश वाचता येण्याजोगे; काही नुसतेच आकडे दर्शवणारे. स्वच्छतेपासून अन्न-पाणी पुरवण्यापर्यंत सगळीकडे यंत्रं. सगळीकडे एकप्रकारची यांत्रिक शांतता. अशा वातावरणात प्रिस्टनला मद्यालयात आर्थर भेटतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ''माणूस'' भेटल्याचा अपार आनंद प्रकटतो. काही क्षणांपुरताच.

आर्थर यंत्रमानव असल्याचं समजल्यावर तो आनंद निवळून जातो... 'पॅसेंजर' या हॉलिवूडपटातलं हे दृश्य. 'द मार्शियन', 'अवतार', 'इंटरस्टेलर' अशी यादीच देता येईल, जिथं माणूस आणि यंत्र यांच्यातलं नातं कुठल्या तरी टप्प्यावर उलगडलं जातं. दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या दर्जानुसार या उलगडण्याचा प्रभाव ठरतो. काल्पनिकतेच्या भराऱ्या कधी कधी वर्तमानालाही स्पर्शतात, हे लक्षात घेतलं तर माणसाच्या यंत्रासोबतच्या संवादाला मर्यादा येऊ शकते याचा इशारा अशा चित्रपटांमधून मिळतो.

अॅल्गरिदमचा वेढा

यंत्रं वाढवत नेऊन सारेच प्रश्न सुटतात असंही नाही. यंत्रांचा आवश्यकतेनुसार वापर केला तर आणि तरच त्यांची उपयुक्तता पूर्णपणानं वापरता येते; अन्यथा मानवी चेहरा हरवलेली यांत्रिकता अनुभवाला येते. भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात यंत्र हे सर्व प्रश्नांवरचं उत्तर ठरवलं तर रोजगाराची परिस्थिती आणखी गंभीर होईल, ही सार्थ भीती आहे.

एकीकडे तंत्रज्ञानाचा, यंत्रसाधनेचा वाढता वापर सुरू आहे. या स्पर्धेत आपण मागं राहिलो तर उद्योग-व्यवसाय, सेवा अडचणीत येणार नाहीत का, अशी विचारणा होत राहते आहे. अशा कात्रीत तंत्रज्ञानाकडे, यंत्रांकडे पाहायचं कोणत्या भूमिकेतून यावर सातत्यानं खल होतो आहे.

विशेषतः आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग आणि क्लाऊड कॉम्प्युटिंगचा विस्तार होत असलेल्या आजच्या जगात मानवी जीवनावर होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या परिणामाकडे अधिक तपशिलानं पाहिलं जात आहे. यांत्रिकीकरणानं माणसाचं जगणं व्यापण्याची प्रक्रिया औद्योगिक क्रांतीत सुरू झाली.

अॅल्गरिदमनं जगण्याला वेढा द्यायला सुरुवात करून पाचेक वर्षंच होत आहेत. आगामी काळात यंत्रं, तंत्रज्ञानानं जगण्याला एकत्रितच विळखा देण्याचा काळ दूर नाही हे दिसू लागलं आहे. त्यामुळे, परिणामांच्या चर्चेला खोली येऊ लागली आहे.

संभाव्य धोक्यांवर विचार

संभाव्य भविष्यात माणसांसमोर उभे ठाकणारे प्रश्न नवे असणार आहेत. त्यामुळे, त्यांवर उत्तरं शोधण्याचे मार्गही नवेच असावे लागणार आहेत हा या चर्चेचा सारांश आहे. उदाहरणार्थः इंटरनेटद्वारे संवाद साधणं हे अधिक सुलभ तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानाच्या पायावर समाजमाध्यमांची रचना झाली.

समाजमाध्यमांमध्ये संवाद हा साऱ्या रचनेचा कणा. तंत्रज्ञान जसजसं आणखी विकसित होत गेलं, तसतशी संवादाची जागा विसंवादानं घेतली, माहितीच्या जागी अपमाहिती आली. मानसिक ताणापासून ते आत्महत्यांपर्यंत आणि शाब्दिक वादावादीपासून ते दंग्यांपर्यंत अनेक विघातक घटनांमध्ये समाजमाध्यमांच्या रचनेकडे दोष आला.

तीच बाब गुन्हेगारीची. इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहार सोपे झाले. खिशातल्या पाकिटाच्या जागी मोबाईलमधलं ई-वॉलेट आलं. तथापि, त्यासोबतच सायबर गुन्हेगारीचा नवाच प्रकार समोर आला.

समाजमाध्यमांची रचना करताना किंवा ई-वॉलेटच्या तंत्रज्ञानाच्या विकासात संभाव्य प्रश्नांपेक्षा सुलभता अधिक विचारात घेतली गेली. त्याचे फटके आजच्या समाजाला बसत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करताना संभाव्य धोक्यांवर आधीच विचार आणि कृती व्हायला हवी हा संदेश गेल्या दशकानं दिला आहे.

क्लिष्टता वाढण्याची शक्यता

आजचा समाज भविष्यातल्या तंत्रज्ञानासाठी तयार आहे का, या प्रश्नाच्या शोधात गेल्यास मिळणारं उत्तर फारसं उत्साहवर्धक नाही. बाजारपेठेचा सातत्यानं अभ्यास करणाऱ्या मॅकेन्झी कंपनीनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातलं निरीक्षण महत्त्वाचं आहे. भविष्यात येऊ घातलेल्या प्रश्नांचा अभ्यास या अहवालात आहे.

त्यात ते म्हणतात : नव्या विश्वासार्ह तंत्रज्ञानाच्या क्षमता आणि गरजा वेगळ्या असणार आहेत. डेटा प्रायव्हसी, डेटाचं स्थायित्व (कायम राहणारा डेटा) आणि इतर मुद्द्यांबाबत भूतकाळातले नियम भविष्यातल्या तंत्रज्ञानाशी जुळवण्याचं काम नियामक कसं करणार? तंत्रज्ञानाच्या सातत्याच्या विकासातून निर्माण होणाऱ्या धोक्याला आणि एकूणच या क्षेत्रातल्या क्लिष्टतेला नियामक सक्रिय प्रतिसाद कसा देणार?

आधुनिक जगातला समाज स्वतःच निर्माण केलेल्या ‘सरकार’ नावाच्या यंत्रणेकडे अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहत असतो. या यंत्रणेनं भविष्यातल्या प्रश्नांचा विचार करून ठेवावा, त्यांची उत्तरंही शोधून ठेवावीत अशी अपेक्षा व्यक्त होत राहते. भविष्यातल्या प्रश्नांची क्लिष्टता वाढत जाणार असेल तर त्यादृष्टीनं आजच्या यंत्रणांची तयारी समाजालाच सातत्यानं तपासावी लागेल, असा इशारा अशा स्वरूपाचे अहवाल देत आहेत.

अनुभवातून शिक्षण महत्त्वाचं

भारतात सुमारे पाचशे शहरांमध्ये मोबाईलचं ५जी तंत्रज्ञान उपलब्ध होतं आहे. किमान आजच्या घडीला ‘मनोरंजन’ या प्रमुख दृष्टिकोनातून ५जी तंत्रज्ञानाकडं पाहिलं जात आहे.

गेल्या पाच वर्षांतलं सारं संशोधन सांगतं की, ५जी अनेक क्षेत्रांमधला संवाद वेगवान करू शकतं. वैद्यकीय, उत्पादन-उद्योग, सेवा-उद्योग, शिक्षण अशा कित्येक क्षेत्रांमध्ये माहितीच्या देवाण-घेवाणीची गती क्रांतिकारक वेगानं होईल असं दिसतं आहे.

तथापि, त्यातून निर्माण होणाऱ्या क्लिष्ट प्रश्नांचा विचार किमान सध्यातरी दिसत नाही. प्रश्न समोर आले की शोधू उत्तरं, ही भावना आहे. समाजमाध्यमांच्या भविष्याचा अंदाज न आल्यानं समाज आज वारंवार संकटात सापडतो आहे. या अनुभवातून शिकून पुढचं तंत्रज्ञान वापरण्यासाठी सज्ज होण्याची ही वेळ आहे.

तंत्रज्ञान वापरण्याची अपरिहार्यता

तंत्रज्ञानक्षेत्रात काम करणाऱ्या साऱ्यांनाच नव्या शक्यतांची मांडणी करता येते असा एक गैरसमज सर्वत्र असतो. उदाहरणार्थ : आयटी-क्षेत्रात एखादी व्यक्ती काम करते, म्हणजे त्या व्यक्तीला त्या क्षेत्राची सर्वांगीण माहिती आहे असं समजलं जातं. अगदी नजीकच्या भूतकाळात डोकावलं तर अशा समजामागं तत्कालीन समाजाचा अनुभव होता हे लक्षात येतं.

माहिती तंत्रज्ञानक्षेत्राचा विकास होत होता तेव्हा अभियंता बनलेल्या व्यक्तीला त्या क्षेत्रातल्या, तेव्हा उपलब्ध असलेल्या, परिघाची पुरेशी कल्पना होती. दोन दशकांत जग बदललं. आयटीचा परीघ इतका विस्तारला...त्याच्या इतक्या शाखा बनल्या की, सर्वसाधारण माहिती अपुरी ठरल्याचा अनुभव पावलोपावली येऊ लागला. वैद्यकीय क्षेत्राचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी म्हणजे डॉक्टर.

तथापि, वैद्यकीय क्षेत्राचा कित्येक शाखांमध्ये विस्तार झाल्यानंतर ''विशिष्ट अवयवाचा, आजाराचा तज्ज्ञ डॉक्टर'' अशी नवी संकल्पना उदयाला आली. तसंच आता माहिती तंत्रज्ञान आणि एकूण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही होऊ पाहतं आहे. भविष्यातल्या शिक्षणाचा, रोजगाराचा विस्तार हा अधिकाधिक क्लिष्ट आणि विषयातल्या एखाद्याच धाग्याच्या परिपूर्ण ज्ञानाकडे होतो आहे.

तंत्रज्ञान हा असे अनेक धागे जोडणारा समान घटक असणार आहे. हा बदल होत असताना व्यवहारात यांत्रिकता आणि तंत्रज्ञान अपरिहार्य आहे. त्यातून मानवी चेहरा, मानवी संवाद हरवू नये, यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com