आर यू इन्ट्रेस्टेड फॉर 'लिव्ह इन' 

Marriage relationship
Marriage relationship

'लिव्ह इन रिलेशनशिप' या विषया बाबत आजही आपल्याकडे काही पालक भुवया उंच करून प्रतिक्रिया देताना दिसतात. तिकडे, पलीकडे असले प्रकार चालत असतील. इथल्या संस्कृती, चाली-रीती, नियम वेगळेत.पण काय होतं, किती वेगानं बदलतंय सगळं, कोण रोखणार, काय होणार असे असंख्य प्रश्‍न आहेत. ही पध्दत म्हणजे गाजराच्या पुंगीसारखी आहे का? 'शादी के लड्डू' खाऊ का? की ही बर्फी...? 
 

पाश्‍चात्य देशात चालणारे हे प्रकार आहेत असे काल पर्यंत म्हणणाऱ्यांच्या समाजात आज अनेक जोड्या शेजारी भाडेकरू म्हणून लिव्ह इन मध्ये राहताना दिसतात. 
तू सलाम नमस्ते पाहिलात का? प्रीती आणि सैफचा? दुसरा प्रश्‍न दिपिका आणि सैफचा कॉकटेल? अग यांत नाही का? ते दोघेच राहात असतात अगदी फ्री बर्ड सारखे असे संवाद हल्ली ऐकू येतात. 

कॉकटेलमध्ये या स्वरुपाचे नाते थोड्या प्रमाणात दिसते. सलाम नमस्ते या चित्रपटाचा विषय'लिव्ह इन रिलेशनशीपचा.' लग्नाशिवाय दोघांनी एकत्र राहण्याचा. हा विषय आपल्यासाठी नवीन नसला, तरीही तो एका स्वतंत्र बेटावर चालणाऱ्या प्रश्‍नासारखे आपण त्याकडे बघतो. चित्रपट, मालिका, वृत्तपत्रे अशा माध्यमातूनच या प्रकारच्या सहजीवनाबद्दल वाचायला मिळते. परंतु आपल्याकडे नाही असं काही होत, याच भ्रमात आपण अजूनही आपण आहोत; परंतु जग जवळ येत चाललं, की कुठंही काहीही नवीन, वेगळं घडण्याचा अवकाश, की त्याचे पडसाद आपल्याकडे नक्की उमटतात. मग ती एखादी फॅशन असू देत नाही तर सिनेमाची स्टोरी... 

त्यामुळेच लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजेच लग्नाशिवाय सहजीवन ही फक्त पाश्‍चात्त्य जीवनपद्धती राहिलेली नाही, तर हा सहजीवनाचा प्रकार आज आपल्या शेजारच्या घरातही असू शकतो, मात्र ते सो कॉल्ड उच्चभ्रू, सुशिक्षित समाजाला रुचत नाहीये. 'शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात,'अशी मानसिकता असलेले 'लिव्ह इन'मध्ये असावे पण दुसऱ्याच्या मुलाने/मुलीने असे चित्र दिसते. चित्रपट हा समाजाचा आरसा मानला जातो. मेट्रोसिटीजमध्ये आज हे चित्र काही प्रमाणात दिसते. उच्चशिक्षित मुले-मुली, परदेशात शिकून आलेल्या मुला-मुलींना आई-वडीलांच्या इच्छेखातर स्थळे बघण्यास सुरवात करतात,मात्र मुळात लग्नाच्या बंधनात अडकण्याची त्यांची इच्छा नसते. अशावेळी समोर आलेल्या स्थळाशी मनमोकळेपणाने बोलताना लिव्ह इन मध्ये राहण्याच्या पर्यायाविषयी विचारणा केली जाते. यामध्ये आता मराठी मुला-मुलींचे प्रमाणही दिसत आहे. 

मुंबई-पुणे, बंगलोर,दिल्ली अशा मेट्रोसिटीजमध्ये राहणारी मुले-मुली करिअरच्या एका टप्प्यावर असताना लग्नाची जबाबदारी नको असते म्हणून, आपले स्वातंत्र्य हरवून जाईल या भावनेतून लिव्ह इन मध्ये राहण्याचा विचार करतात. नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहताना जागे अभावी एकत्र राहावे लागते. 

काही महिन्यांपूर्वी एका पाहणीनुसार पुण्या-मुंबईत अशी एकत्र राहणारी अनेक जोडपी आहेत. अन्य राज्यांतून आलेले हे विद्यार्थी-विद्यार्थिनी थोड्याशा ओळखीनंतर एकत्र राहायला लागतात. दूर राहणाऱ्या पालकांना या गोष्टीची पुसटशी कल्पनाही नसते आणि जर घरमालकानं अथवा सोसायटीतील इतर लोकांनी याला विरोध केला, तर ही मंडळी वेगवेगळे फ्लॅट घेऊन राहू शकतात. मग ते फ्लॅट एकाच बिल्डिंगमध्ये असू शकतात किंवा वेगवेगळ्या; परंतु त्यांचे एकमेकांकडे येणं जाणं कोणी थांबवू तर शकत नाही ना! त्यामुळे या मंडळींच्या बंद दरवाजाआड काय चाललंय हे आपल्याला कसं कळणार? मग हे एक प्रकारचं लिव्ह इन रिलेशनशिपच झालं ना? परंतु, हे लिव्ह इन रिलेशनशिप अथवा लग्नाशिवाय सहजीवन नक्की काय आहे? कोणतंही बंधन न पाळता मौजमजा करण्यासाठी पटतंय, वाटतंय तोपर्यंत एकत्र राहणं आणि नाही पटलं, की वेगळं होणं म्हणजे लीव्ह इन रिलेशनशिप का? गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, असा अर्थ घ्यायचा का? म्हणजे संस्काराची, समाजाची, कायद्याची कोणतीच बंधनं या नात्यात नसतात का? खरंच नक्की काय असतं हे लिव्ह इन रिलेशनशिप? अगदी उघड उघड नसलं, तरी या प्रकाराबद्दल आजच्या तरुण पिढीला आकर्षण वाटायला लागलंय! 'काय हरकत आहे?' असा प्रतिप्रश्‍न करण्यापर्यंत त्यांच्या मनाची तयारी झाली आहे. कदाचित ही संकल्पना लग्नानंतर होणाऱ्या अडचणीतूनच तर निर्माण झाली असेल... 

आजही जुन्या पिढीतील लोकं समाजात उघडपणे लग्नाशिवाय सहजीवनाची कल्पना स्वीकारत नसलं तरीही ती काही दिवसांत ही आपल्या समाजाचा भाग बनणार हे अगदी नक्की आहे. तेव्हा या नात्याबरोबरच येणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांना सामोरं जाण्याची आपली तयारी असायला हवी. बऱ्याचदा असं होतं, की लग्नाअगोदर एखाद्या व्यक्तीबद्दल, त्याच्या स्वभावाबद्दल, त्याच्या कुटुंबीयांबद्दल आपल्या वेगळ्या कल्पना असतात आणि त्याच व्यक्तीबरोबर लग्न केल्यानंतर मात्र आपली कुठंतरी चूक झाली आहे, याची जाणीव व्हायला लागते. हा प्रश्‍न फक्त महिलांचाच नाही. पुरुषांनाही आपण जोडीदार निवडण्यात चूक केली आहे, असं वाटायला लागतं. मग त्यातून रोजचे वाद, भांडण यांचा जन्म होतो. ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम केलं ती हीच व्यक्ती का, असा प्रश्‍न स्वतःलाच पडतो. त्याच वेळी लग्न केलं असल्यामुळे अनेक सामाजिक, न्यायिक बेड्या आपल्या पायात पडलेल्या असतात. एकमेकांपासून वेगळं होणं त्यामुळे अवघड होतं. अशा वेळी दोनच पर्याय समोर असतात. एक तर एकमेकांची बंधनं पाळत कुढत आयुष्य काढणं अथवा घटस्फोट घेणं; परंतु दोन्ही पर्याय त्रासदायकच; कारण एकमेकांचं कोणत्याही मुद्द्यावर पटत नसताना एकत्र आयुष्य काढणं किंवा एकमेकांना दूषणं देत वेगळं होण्याची वाट पाहणं, या सगळ्यात मानसिक त्रास किती होऊ शकतो, याचा नुसता विचारच केलेला बरा. 

त्याऐवजी लिव्ह इन रिलेशनशिप हा या सर्वच समस्यांवर (निदान) प्रथमदर्शनी दिसणारा एक योग्य तोडगा आहे; कारण येथे भावनिक गुंतागुंत फार कमी असते; तसंच येथे कोणतीच बंधनं नसतात. त्यामुळे कोणतीच जबाबदारीही नसते. लग्नव्यवस्थेमध्ये साधारणपणे सध्या दोघांनी कमावणं घर-संसार सांभाळणं हे मस्ट आहे. जरी दोघंही कमावत असले, तरीही घरातील जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. तशी येथे कोणतीही खास जबाबदारी नसते; कारण या प्रकारच्या सहजीवनामध्ये हॉस्टेलवर राहणाऱ्या रूम पार्टनरप्रमाणेच साधारणतः संबंध असतात. एकत्र असूनही दोघांचं अस्तित्व वेगवेगळं असतं. कुणीही कुणावर अवलंबून नसतं. त्यामुळे जो तो आपापल्या पद्धतीनं जगायला मोकळा असतो, तरीही ती दोघं एकाच छताखाली राहत असतात. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोघंही साथीदार एकत्र राहायचं ठरवतात, तेव्हाच दोघांमध्ये ही गोष्ट स्पष्ट असते, की दोघांपैकी कुणीही त्याला वाटेल तेव्हा ही रिलेशनशिप तोडू शकतो. त्यामुळे अशा सहजीवनामध्ये कुणीही आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून राहू शकत नाही. म्हणूनच जेव्हा दोघंही एकत्र राहण्याचा निर्णय घेतात, तेव्हा दोघंही आर्थिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र व सक्षम असतात. येथे भावनांचा व एकमेकांसाठी तोशीस सहन करण्याचा फारसा प्रश्‍न नसतो. येथे सर्वच मामला खुल्लमखुल्ला, व्यावहारिक पातळीवर सांभाळला जातो. 

जर एवढा रुक्ष आणि कौटुंबिक सुखापासून दूर राहणारा हा सहजीवनाचा प्रकार असेल, तर मग हे लोक एकत्र राहतातच का, असा प्रश्‍न पडणं साहजिक आहे; परंतु अशा रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अथवा राहू इच्छिणाऱ्या लोकांचा जर आपण विचार केला, तर एक गोष्ट लक्षात येईल, की ही मंडळी प्रचंड करिअरिस्टिक असतात. त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये अत्युच्च शिखर गाठायचं असतं, किंवा काहींच्या बाबतीत असं काही नसेलही, तरीही कुटुंब, त्याबरोबर येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांसारख्या गोष्टी करिअरच्या वाटेमध्ये 'काटे' असणारी बंधनं त्यांना नको असतात. त्यामुळे एकटं जगणं, स्वतःला हवं तसं जगणं आणि त्याच वेळी स्वतःच्या करिअरला पूर्ण वेळ देता येणं त्यांना खूप महत्त्वाचं वाटतं. आपल्यात कोणी अडकणारं अथवा आपल्याला अडकवून ठेवणारं त्यांना नको असतं. परंतु, स्वतःचं करिअर, प्रचंड यश, या जशा बुद्धीच्या, मनाच्या गरजा आहेत, तशा शरीराच्याही स्वतःच्या काही गरजा आहेत. फक्त अन्न, वस्त्र, निवाऱ्यातून त्या पूर्ण होत नाहीत. त्यासाठी जोडीदाराची गरज भासते. अशा वेळी जोडीदार तर हवा; परंतु त्याची जबाबदारी आणि बंधनं नकोत असा पेच निर्माण होतो. मग याला एकच पर्याय राहतो. लिव्ह इन रिलेशनशिप- लग्नाशिवाय सहजीवन. 

हे सगळे वाचून किती छान रिलेशनशिप आहे ही! किती सुटसुटीत आणि मस्त! स्वप्नवत वाटतंय सगळं; परंतु या पद्धतीच्या सहजीवनामध्ये सर्व काही आलबेल आणि छान छान आनंददायी आहे, असं काही तरुण समजत असतील, तर त्यांना यातील धोक्‍यांची कल्पना असणेही आवश्‍यक आहे. जर एकत्र राहणारे दोघंही पार्टनर अथवा जोडीदार प्रगल्भ विचारांचे असतील, स्वतःची मतं वेळीच स्पष्ट करणारे असतील आणि त्याप्रमाणे वागणारे असतील तर गोष्ट वेगळी आहे. आपण का असं एकत्र राहतो आहोत आणि त्यासाठी आपण काय करायला हवं याची पूर्ण कल्पना त्यांना असायलाच हवी. 

एकमेकांमध्ये भावनिक गुंतवणूक किती ठेवायची हे पहिल्यापासून स्पष्ट असायला हवं. नाहीतर एक जोडीदार भावनिकदृष्ट्या दुसऱ्यामध्ये गुंतत चाललाय; परंतु दुसऱ्याला ते अजिबात नको, असा बाका प्रसंग उभा राहू शकतो. अशा वेळी दुसरा जोडीदार जर पहिल्याला सोडून गेला, तर त्याला बांधून ठेवण्यासाठी कोणतीही सामाजिक अथवा कायदेशीर बंधनं येथे फारशी नसतात. पुरुष आणि स्त्री यांच्याबाबतीत आपण वेगवेगळा विचार केला, तर आपल्या लक्षात काही समस्या येतील. 
पुरुषांना सुरवातीला जरी ही कल्पना छान वाटली, कोणतीही जबाबदारी न स्वीकारता, कोणत्याही प्रश्‍नाला उत्तर देण्याचं बंधन न घालणारा जोडीदार त्यांना मिळणार असेल, तर तो त्यांना हवाच आहे आणि विशेष म्हणजे वाटलंच तर जोडीदार बदलण्याचं स्वातंत्र्यही त्यांना आहे, असा विचार ते करतील; परंतु पुरुषांना कौटुंबिक सुख नको असतं, असं म्हणणं आश्‍चर्यच ठरेल. मग जर त्या पुरुषाला मूल हवं असेल आणि त्याची स्त्री जोडीदार त्याला तयार नसेल तर? हा तिच्यामध्ये गुंतत जात असतानाच ती याला सोडून गेली तर? त्या पुरुषाचं मानसिक संतुलन बिघडविण्यास एवढी घटना कदाचित पुरी होईल. 

भारतातील पुरुषी समाजव्यवस्थेखाली अक्षरशः भरडून निघालेल्या स्त्रियांनाही ही व्यवस्था सुरवातीला नक्कीच आवडेल. आपल्यावर कोणत्याही बाबतीत बळजबरी न करणाऱ्या, कोणत्याच बंधनात जखडून न ठेवणाऱ्या आणि पदोपदी जबाबदाऱ्यांची आठवण करून न देणाऱ्या जोडीदाराबरोबर राहणं सुरवातीला नक्कीच सुखावह वाटेल; परंतु त्याच्यातील पुरुषी अहंकार कधीच जागा होणार नाही, याची गॅरंटी देता येणार आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर त्या पुरुषापासून झालेल्या मुलाला स्वीकारण्यासच तो तयार नसेल तर? अथवा त्या अनौरस बाळाला जन्म देऊन या विचित्र रूढी-परंपरेच्या समाजव्यवस्थेत त्या बाळाबरोबर कुमारीमाता म्हणून आयुष्य जगण्याचा खंबीरपणा प्रत्येक स्त्रीमध्ये आहे का? 
सहजीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे वृद्धापकाळ. या काळामध्ये जोडीदाराची सर्वांत जास्त गरज भासते. आयुष्यभर कितीही 'तू तू मै मै' असेल, तरीही आयुष्याच्या संध्याकाळी दोघांचीच एकमेकांना खंबीर साथ असते; परंतु हे जोडीदारच शेवटपर्यंत एकत्र राहणार नसतील तर? अनाथालयांबरोबरच वृद्धाश्रमांचीही संख्या वाढवावी लागेल. म्हणजे फक्त तरुणांच्या त्यांच्या तरुणपणातील बंधनं, जबाबदाऱ्यां नसलेली मौजेमजेसाठी ही सहजीवनपद्धती आपण स्वीकारायची का, हा विचार आपण सर्वप्रथम करायला हवा. 
तेव्हा लिव्ह इन रिलेशनशिप ही वरवर जरी खूप सुखावह आणि विनाकटकटीची जीवनशैली वाटत असली, तरीही यातील धोके, प्रश्‍न समजून घेऊनच पुढचं पाऊल उचलायला हवं. 

'लिव्ह इन रिलेशनशिप'च्या पुरस्कर्त्यांनी त्याच्या जमेच्या बाजू सांगितल्या आहेत.

जमेच्या बाजू :

  • भारतात अजूनही विवाह ठरवताना कुंडल्या पाहिल्या जातात, ठराविक गुण जमल्याशिवाय विवाहाचा विचार केला जात नाही. विवाहोच्छुक तरुण-तरुणींना कडक मंगल असेल तर त्यांच्याशी विवाह करायला सर्वजण कचरतात. 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये असल्या खुळचट कल्पनांना मुळीच थारा नाही. 
  • विवाह ठरवताना वधू आणि वराची, त्यांच्या खानदानाची प्रतिष्ठा, लौकिक, शिक्षण, वळण, सांपत्तिक स्थिती या कसोट्या कसून तपासल्या जातात. त्यामुळे कमी शिक्षित, अप्रतिष्ठित, कनिष्ठ मध्यमवर्गीय तरुण-तरुणींचे विवाह जमणे अतिशय अवघड जाते. 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा पायाच प्रेम, आपुलकी असल्याने या गोष्टींना इथे मुळेच महत्त्व नाही. 
  • भारतीय विवाहात कायद्याने हुंडाबळी केली असली तरी येनकेन प्रकारेन येनकेण रूपेन अजूनही वधू पक्षाकडून भरभक्‍कम वसुली केली जाते. फर्निचर,फ्रीज, टीव्ही सेट,महागडे फोन, दुचाकी, कार, फ्लॅट..... यांची मागणी होतच राहते. 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये तसे काहीच नाही. 
  • हुंडा कमी दिलेल्या किंवा न दिलेल्या सुनेचा, सासरच्या मंडळींकडून आणि पत्नीकडूनही छळ केला जातो. कित्येक नववधू, हुंडाबळीच्या शिकारही होतात. 
  • भारतीय विवाह कायद्याच्या चौकटीत बसवल्याने अयशस्वी विवाहातील पती-पत्नींना विवाहबंधनातून मुक्‍तता हवी असल्यास परत कायद्याच्या वेळखाऊ क्‍लिष्ट चौकटीतून जावे लागते. आरोपींना तोंड द्यावे लागते. इथे तसं नाही, ज्या क्षणी आपल्या सहचराशी आपले पटू शकत नाही आणि त्याच्याबरोबरच सहजीवन अशक्‍य होईल, याची मनोमन खात्री होईल, त्याक्षणी विभक्‍त होण्याचा मार्ग अवलंबिता येईल. 
  • विवाह संस्थेकडे कायद्याच्या कसोटीतून पाहिल्यामुळे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, त्याग, माया याकडे पुरुषांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. स्त्रीला हाउसकीपर, केअरटेकर, स्वयंपाकी, घरगडी याच दृष्टीने पाहिले जाते. तसे इथे होणार नाही. 'रिलेशनशिप' टिकविण्यासाठी दोघांनाही एकमेकांच्या भावनांना, मतांना, विचारांना, आवडीनिवडींना तेवढचे महत्त्व द्यावे लागेल. विसंवाद टाळण्यासाठी आणि सुसंवाद टिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 
  • भारतीय कुटुंबात बरेचदा पुरुष अर्थार्जन करतो आणि स्त्री गृहिणीपद सांभाळते. म्हणूनच पुरुषाचे पारड जड असते. तो श्रेष्ठ ठरतो. इथे दोघंही अर्थार्जन करत असल्याने उच्च-नीचतेचा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही. 

वास्तव :

  • वरवर पाहता, या जमेच्या बाजू कितीही पटल्या आणि सत्य वाटल्या तरी या रिलेशनशिपला समाजमान्यता अजूनही तितकी मिळत नाही. परदेशात शिकलेल्या तसेच उच्चशिक्षित मुली-मुले आज अरेंज मॅरेज करण्यापूर्वी 'लिव्ह इन'विषयी विचारणा करतात. 
  • पारंपरिक विवाह संस्थेत स्त्रीला मिळणारी आर्थिक, नैतिक सुरक्षितता; मुलांना मिळणारे संरक्षण, पतीने पत्नीची, मुलांची घेतलेली; स्वीकारलेली पूर्ण जबाबदारी, सामाजिक प्रतिष्ठा, मानमरातब या सर्वांपासून या रिलेशनमधली स्त्री, मुले वंचित राहतील. 
  • व्यक्‍तिस्वातंत्र्याच्या भ्रामक कल्पनेमुळे आचारविचारांबरोबर बंधने, वचक राहणार नाही. कुठल्याही क्षुल्लक कारणांवरून स्त्री-पुरुष विभक्‍त होतील. त्यामुळे आज इथे तर उद्या तिथे अशी स्थिती येईल.
  • या संबंधातील मुलांना सिंगल पेरेंटशिप स्वीकारावी लागेल. आई-वडील अशा दोघांच्या नैराशाच्या गर्तेत जातील अथवा व्यसनाधीन होतील, भयानक रोगांना बळी पडतील. 
  • भारताची पारंपरिक वैभवशाली संस्कृती अबाधित राखायला देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने, अग्नीभोवती सात फेरे मारून, गळ्यात मंगळसूत्र बांधून केलेले विवाह आणि त्यातून निर्माण झालेली कुटुंब संस्थाच उपयोगी पडेल आणि भारतात या दोन्हीचा मेळ साधणारे नवीन 'लिव्ह इन रिलेशनशिप'चे थंड स्वागत होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com