चकवणारा आंबेउतारा

अभयारण्यात जिप्सीचालक, गाईड यांना प्राण्यांच्या सवयी माहीत असतात. त्या अनुभवावरच ते वाघाविषयी अचूक अंदाज लावतात
sanctuary animal care ambeutara tiger forest department
sanctuary animal care ambeutara tiger forest departmentSakal

अभयारण्यात जिप्सीचालक, गाईड यांना प्राण्यांच्या सवयी माहीत असतात. त्या अनुभवावरच ते वाघाविषयी अचूक अंदाज लावतात. मात्र काही वाघ त्यांचे अंदाज चुकवतात. २०२१च्या जून महिन्यात आगरझरी येथे सफारी करत असताना दोन-तीन जिप्सी चालकांनी नर वाघ बघितल्याचे सांगितले.

तो वाघ पाणी प्यायला येईल, या अंदाजासह आम्ही आमची गाडी या पाणवठ्याजवळ आणली. इतक्यात गाईडला मागच्या पायवाटेने एक वाघ जाताना दिसला. झटकन तो झुडपात शिरला. त्याने आमची गाडी बघून, गुंगारा दिला होता. गाईड व जिप्सीचालकामध्ये चर्चा झाली आणि हा वाघ आता कुठे जाणार, याचे अंदाज बांधत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो, पण तो वाघ आम्हाला चकवतच राहिला. या वाघाचे नाव होते ‘आंबेउतारा’!

- संजय करकरे

जंगलातील प्रत्येक वाघ स्वतःची अशी एक ओळख ठेवून वावरत असतो. काही वाघ जन्मतः घाबरट असतात. माणसांना, पर्यटकांना ते सातत्याने टाळत असतात, अथवा त्यांच्यापासून दूर जात असतात.

काही वाघ धीट, काही चिडके, तर काही बिनधास्त असतात. बिनधास्त असणारे व पर्यटकांना सातत्याने सहज दर्शन देणारे वाघ अधिक लोकप्रिय होतात. जंगलामध्ये पर्यटकांना नियमित घेऊन जाणाऱ्या गाईंडना वाघांची ही स्वभाववैशिष्ट्ये चांगली माहीत असतात.

या स्वभाववैशिष्ट्यांप्रमाणेच या वाघांना त्यांची नावे ही गाईड मंडळी देतात. अनेक वेळा वाघाला तो ज्या परिसरात सर्वप्रथम दिसला, त्या परिसरातील पाणवठा अथवा वैशिष्ट्यपूर्ण जागेवरून नावे मिळतात. आजच्या गोष्टीतील वाघ असाच त्याच्या परिसरातील नावावरून ओळखला जात होता. या देखण्या, पण अत्यंत सावध व कायम पर्यटकांना टाळणाऱ्या नर वाघाचे नाव होते ‘आंबेउतारा’!

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा आणि मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सीमेवर असणाऱ्या ‘आंबेउतारा’ या पाणवठ्याच्या परिसरात हा वाघ सर्वप्रथम दिसल्याने गाईडने त्याला ‘आंबेउतारा’ नाव दिले होते. व्याघ्र प्रकल्पाच्या नोंदीत तो ‘टी-४६’ या नावाने ओळखला जात होता. या वाघाचा जन्म साधारणपणे २००८-०९ च्या सुमारास झाला.

त्याच्या वंशावळीसंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही. आंबेउताराचा परिसर काही काळ पर्यटकांसाठी खुला असल्याने त्याला हे नाव देण्यात आले. या परिसरात आंब्याची अनेक झाडे आहेत. या झाडावरील आंबे जंगलातील स्थानिक ग्रामस्थ काढत असल्याने त्या परिसराला ‘आंबेउतारा’ हे नाव मिळाले असावे. साधारणतः २०१२-१३ नंतर हा परिसर पर्यटकांना बंद झाल्याने या वाघाचा नेमका वावर कुठे होता, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

२०१५ च्या सुमारास या वाघाने मोहर्ली बफर क्षेत्रातील मामला, देवाडा आणि आगरझरी परिसरात धडका मारायला सुरुवात केल्याने तो पर्यटकांना, तसेच गाईंडना माहिती होऊ लागला. मुळातच या वाघाचा स्वभाव अतिशय सावध आणि पर्यटकांच्या गाड्यांच्या आवाजालाही टाळणारा असल्याने त्याचे दर्शन दुर्मिळच होते. साहजिकच मोजक्या पर्यटकांकडेच त्याची छायाचित्रे उपलब्ध आहेत. यानंतर तो जुनोना बफर क्षेत्रात काहीसा स्थिरावला होता.

या सावध असणाऱ्या वाघाची आणि माझी गाठ खूपच अचानकपणे घडली. २०२१ च्या जून महिन्यात आगरझरी येथे महिलांच्या जागृतीचे कार्यक्रम घेत असताना आम्ही एका सकाळी या जंगलात सफारी केली होती.

पावणेसात-सातच्या सुमारास आम्ही या परिसरातील ‘शर्मिली’ वाघिणीला बघितले. तिच्या चार पिल्लांसह ही वाघीण पाणवठ्याजवळ निवांत पहुडलेली होती. यानंतर तिथून बाहेर पडून आम्ही इतरत्र फिरत असताना दोन-तीन जिप्सींनी एक नर वाघ बघितल्याचे आम्हाला सांगितले.

एका पाणवठ्यावरती हा नर वाघ पाणी प्यायला येईल, या अंदाजासह आम्ही आमची गाडी या पाणवठ्याजवळ आणली. साधारणतः ५०-६० फुटांवर दूर असणारा पाणवठा वाळलेल्या गवतांनी काहीसा झाकला होता.

आमची एकच गाडी येथे थांबली होती. इतक्यात गाईडला आमच्या मागच्या बाजूने पायवाट पार करून जाताना एक वाघ दिसला. झटकन तो झुडपात शिरल्यामुळे आम्हाला केवळ त्याची झलक दिसली. या वाघाने आमच्या गाडीला बघून गुंगारा दिला होता.

गाईड व जिप्सी चालकामध्ये चर्चा झाली आणि हा वाघ आता कुठे जाणार, या अनुषंगाने आम्ही आमची गाडी आगरझरीच्या गेटच्या दिशेने वळवली. साधारणतः १२-१३ मिनिटांत आम्ही गेटच्या जवळ. रस्त्याच्या एका कडेला गाडी थांबवून वाघ रस्ता पार करेल या आशेने थांबलो, पण वाघ काही आला नाही.

पुन्हा आम्ही त्याच पाणवठ्याजवळ आमची जिप्सी नेली. आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. वाघ पाण्यात बसला होता. आमची गाडी येथून निघून गेल्यानंतर हे महाशय निवांतपणे पाण्यात आले होते. हा नर वाघ ‘आंबेउतारा’ होता.

सावध असणारा हा नर वाघ आम्हाला बघून झटक्यात आमच्यावर नजर रोखत पाण्याबाहेर पडला आणि वाळलेल्या गवतातून समोरच्या बाजूला चालू लागला. जिप्सीचालक शंकर आत्रामला पटकन लक्षात आले की,

आता हा वाघ कुठे जाणार आहे. आम्ही आमची जिप्सी तलावाच्या बांधावर उभी केली आणि समोरच्या बाजूने हा वाघ डावीकडून उजवीकडे जाईल याची वाट पाहत बसलो, पण पुन्हा या हुशार वाघाने हुलकावणी दिली. वाळलेल्या गवतातून हा आमच्याकडे भेदक नजरेने बघत अचानक गायब झाला. तो कुठे गायब झाला कळलेच नाही. आम्ही परत मागे गाडी वळवली. या वाघाने समोरून न जाता मागच्या बाजूने रस्ता पार केला होता. जाताना त्याने रस्त्यावरच युरिन केली होती.

या युरिनला मोहाच्या सडव्यासारखा तीव्र वास येत होता. या वासाचा हा पहिलाच अनुभव होता. पुस्तकी माहितीनुसार वाघाच्या युरिनला बासमती तांदूळ शिजवल्यानंतर जसा वास येतो, तसे नमूद केले आहे, पण मला तसे काही वाटले नाही. मोहाच्या सडव्याचाच वास अधिक जाणवला.

हा वाघ परत पुढे कुठे निघणार, या विचारात आम्ही गाडी पुन्हा वळवली व पुढे नेली. तेवढ्यात उजव्या बाजूने वानराने जोरदार अलार्म कॉल दिला. आम्ही गाडी थांबवून बघत असतानाच झाडीतून एक बिबट्या बाहेर आला. हे तर भलतेच काहीतरी घडले. वाघ शोधताना बिबट्याने मध्येच एन्ट्री मारली होती. बिबट्या एक कटाक्ष टाकून पटकन झुडपात गायबही झाला. फोटो काढायलाही त्याने वेळ दिला नाही.

आता हा ‘आंबेउतारा’ वाघ रस्ता पार करून धरणाच्या पाण्याच्या दिशेने जाईल, ही अटकळ बांधून आम्ही आगरझरी गेटच्या जवळ गाडी आणून उभी केली व वाघ रस्ता पार करण्याची वाट बघत पुन्हा थांबलो. पुन्हा अंदाज चुकला. 

आमच्या अंदाजानुसार हा वाघ जवळूनच रस्ता पार करेल असे वाटत होते, पण या पठ्ठ्याने खूप दुरून रस्ता पार केला. यावेळेस या वाघाचे बलदंड शरीरसौष्ठव दिसले व जाणवले. आरामात त्याने रस्ता पार केला आणि उजव्या बाजूच्या जंगलात तो शिरला. हा वाघ पुन्हा उजव्या बाजूने रस्ता पार करून काळापाणी या परिसराकडे जाईल, या अंदाजाने आम्ही गाडी एका ठिकाणी उभी केली व त्याची वाट बघत थांबलो.

हे सर्व आम्ही चर्चा करून, अंदाज घेऊन, वाघाच्या सवयीनुसार करत होतो. जिप्सीचालक, गाईड यांना दररोज जंगलात येऊन प्राण्यांच्या सवयी चांगल्या माहीत झालेल्या असतात. खास करून वाघांच्या सवयीचा त्यांना अनुभव असतो आणि या अनुभवाच्या शिदोरीवरच काही गाईड अतिशय व्यवस्थित अंदाज घेत असतात. मी या मार्गदर्शकांचे प्रशिक्षण घेत असल्याने, त्यांनाही माझा चांगला परिचय होता.

आता आमचा अंदाज बरोबर निघाला. सुमारे दहा मिनिटांनंतर उजव्या बाजूच्या जंगलातून, आमच्या गाडीपासून साधारण ३०-३५ फुटांवरून ‘आंबेउतारा’ वाघ आमच्या समोरच्या रंगमंचावर अवतरला. आमच्यावर थेट नजर ठेवत तो आला. त्याचा उजवा कान काहीसा मागे वळलेला होता, हे माझ्या कॅमेराच्या आयपीसमधून लक्षात आले.

त्याच्या नजरेत जरब होती. आमच्यावर नजर रोखतच त्याने समोरचा रस्ता पार केला आणि डावीकडील जंगलात शिरला. पर्यटकांना सतत टाळणाऱ्या व चाणाक्ष वागणाऱ्या या नर वाघाने इतके सुंदर दर्शन दिल्याने आम्ही थरारून गेलो. आमची एकटीच गाडी या साऱ्या घटनेला साक्षीदार होती. डावीकडील जंगलातून चितळ आणि काही वेळानंतर सांबराचे कॉल झाले. आमचे मन प्रसन्न होते, कॅमेराही कदाचित तृप्त झाला असावा. आम्ही आमची गाडी गेटच्या दिशेने वळवली आणि जंगलातून बाहेर पडलो.

या नंतर ताडोबातील आगरझरी बफर जंगलाच्या या परिसरात सातत्याने वेगवेगळ्या नर वाघांची एन्ट्री होत होती. नर वाघांच्या संघर्षाच्या बातम्याही कळत होत्या. याच परिसरातील नर वाघांच्या भांडणाचा फोटोही प्रसिद्ध झाला होता. या साऱ्यांचा ‘आंबेउतारा’ वाघ कमी-अधिक प्रमाणात सामना करत होता, काहीसा बाजूला राहून स्वतःला वाचवतही होता.

मी जंगलात कमी जात असल्याने, मधल्या काळात फारसे अपडेट नव्हते. अचानक या वर्षीच्या सुरुवातीला एक वाघ बफरच्या जंगलात मृत्युमुखी पडल्याची बातमी कानावर आली. या वाघाची ओळख पटली. तो ‘आंबेउतारा’ हा वाघ होता. उतारवयाकडे जाऊ लागलेल्या या वाघाचा मृत्यू झाला होता. नजरेत असणारी या वाघाची जरब आठवली. त्याचे पीळदार शरीरही आठवले अन्‌ मन विषण्ण झाले.

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)sanjay.karkare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com