esakal | आठवणीतले सानेगुरुजी....!
sakal

बोलून बातमी शोधा

आठवणीतले सानेगुरुजी....!

आठवणीतले सानेगुरुजी....!

sakal_logo
By
संदीप काळे

" खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे...", " बलसागर भारत हो वो " ही दोन्ही साने गुरुजींची गीते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही विद्यार्थ्यांला येत नसेल असा क्वचितच एखादा विद्यार्थी आढळेल. साने गुरुजींचे 'श्यामची आई' पुस्तक तर जणू काही आपणच त्यात साने गुरुजी आहोत असे वाटते." स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी " असे म्हणणार्‍या साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेतला तर फार कमी वयात त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले.

पांडुरंग सदाशिव साने 'साने गुरुजी' नावाने प्रसिद्ध होते. स्वातंत्र सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि मराठी साहित्यिक अशी त्यांची ख्याती होती. साधी, सरळ भाषा अशी त्यांच्या लेखनाची शैली होती. साने गुरुजींनी 100 पेक्षा जास्त पुस्तके लिहिलीत. बंगाली, तामिळ मधील साहित्य त्यांनी मराठीत आणले. साने गुरुजींनी सुरू केलेले 'साधना' साप्ताहिक आजही सुरू आहे. 'क्रांती' साठी पोषक असे काव्य सुद्धा त्यांनी केले. दुष्काळग्रस्त भागात असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जे माफ व्हावी म्हणून त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. याच दरम्यान त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. काँग्रेसच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी 'काँग्रेस' नावाचे साप्ताहिक सुद्धा सुरू केले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना (दलित) प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी उपोषण धरले आणि हरिजनांना (दलित) प्रवेश मिळवून देण्यात ते यशस्वी ठरलेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून समाजवादी पक्षाचे कामकाज पाहण्याचे काम सुरू केले.

हेही वाचा: साने गुरुजी स्मृतीदिन: गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दर्शवणारे दुर्मिळ फोटो

साने गुरुजींना त्यांच्या शेवटच्या आयुष्यात फार खंत वाटू लागली होती. गांधीजींचा मोठा प्रभाव साने गुरुजींच्या आयुष्यावर होता. गांधीजींची हत्या झाल्यावर साने गुरुजी फार अवस्थ झाले होते, त्यांच्या मनावर याचा फार खोलवर परिणाम झाला होता. त्या कालावधीत त्यांनी 21 दिवसांचे उपोषण धरले होते.

" देश स्वतंत्र झाल्यावर सर्व देश एक होईल, देशात अनेक गट निर्माण झालेत ते नाहीसे होतील, लोक एकत्र राहू लागतील, सर्वांना रोजगार मिळेल, देशातील सर्व गरीब लोकांना अन्न मिळेल." अशी आशा साने गुरुजींना वाटत होती. परंतु, स्वातंत्र्य प्राप्ती नंतर यामधील साने गुरुजींना एकही गोष्ट घडताना दिसली नाही.

आयुष्याच्या पन्नास वर्षातील शेवटची पंचवीस वर्ष साने गुरुजी राबराब राबले. शंभरहून अधिक पुस्तके लिहिलीत. परंतु, साने गुरुजींना त्यातून काहीच निष्पन्न होताना दिसले नाही.

हेही वाचा: स्मृतीदिन: 'श्यामच्या आई'पलिकडचे 'हे' साने गुरुजी तुम्हाला माहिती आहेत का?

साने गुरुजींच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक दुःख पाहिलीत. विचारांच्या आणि आचरणाच्या कुठल्याही पातळीवर त्यांना तडजोड करायला आवडत नसे. आपल्या विचारांवर ते कायम ठाम असत. आई-वडील दोघांच्याही मृत्यूनंतर सावरत नाहीत तर त्यांना भाऊ, भावजय आणि पुतण्या सगळ्यांचा मृत्यू त्यांना पहावा लागला.

साने गुरुजींच्या आईची फार इच्छा होती की, साने गुरुजींनी लग्न करायला पाहिजे. परंतु आईवर इतके प्रेम करणारे साने गुरुजींनी मात्र आईंची इच्छा अधुरीच ठेवली. खूप, दुःख सोसत असताना आयुष्याच्या शेवटी त्यांच्या सोबत कुणीही उरले नाही. त्यातच महात्मा गांधींच्या मृत्यूने त्यांच्यावर आघात केला, एक मराठी माणूस गांधीजींची हत्या कसे शकतो? या प्रश्नांचा विचार करून त्यांना खूप दुःख झाले. गांधीजींच्या मृत्यूनंतर खूप प्रश्नांनी त्यांना विचलित केले. 21 दिवस निरंतर उपोषण केले. त्यातच त्यांनी झोपेच्या गोळ्यांचे आतिसेवन करून आत्महत्या केली.

साने गुरुजींच्या आयुष्यातील मृत्यूचे पान वाचल्यानंतर फार अस्वस्थ व्हायला लागते. का केली असावी आत्महत्या? पन्नास वर्षाच्या आयुष्यात त्यांनी समाजासाठी इतके काही केले, आणखी जीवन जगले असते तर, खूप काही वेगळे चित्र बघायला मिळाले असते.

खूप वेळ विचार केला तरी, माझ्यासमोर नेहमीच अनुत्तरीत राहणारा प्रश्न म्हणजे साने गुरुजींनी का आत्महत्या केली असावी?

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित

तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे |

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती

तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे |

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा

अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे |

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल

तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे |

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे

समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे |

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी

कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे |

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या

सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे |

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात

सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे |

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे

परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे |

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा

त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे... |

~ साने गुरुजी

आजच्या दिवशी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.