वंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

गावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे गावच्या माळरानावर "स्नेहग्राम' ही निवासी शाळा ते चालवतात. महेश आणि विनया यांची कहाणी विलक्षण आहे आणि त्यांचं कामही विलक्षण आहे. स्वतः किती तरी कष्ट सोसत, अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या, त्यांच्या जीवनात शिक्षणाचा सुगंध भरणाऱ्या या दांपत्याच्या कामाविषयी...

सोलापूरहून लातूरकडं निघाल्यावर मध्ये लातूरफाटा नावाचं छोटंसं ठिकाण आहे. दोन्हीकडून ये-जा करणारी सर्व वाहनं इथं थांबतात. इथं मिळणारे साधे मुरमुरे, बासुंदी आणि चहा यांना कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणार नाही, अशी चव. आयुष्य कमी-कमी व्हावं यासाठीच तयार केलेले रस्ते, अशी राज्यातल्या ग्रामीण भागाची ओळख. त्याला पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना जोडणारा रस्ता अपवाद कसा असेल? गाडीच्या खाली उतरलं, की किमान दहा मिनिटं रस्त्यावर चालल्यावर सुन्न पडलेल्या हाडांमध्ये पुन्हा जिवंतपणा येतो. मी फोनवर बोलत बोलत मुख्य रस्त्यावर न चालता गाववस्तीकडं जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेनं चालायला लागलो. थोडा वेळ पुढं गेल्यावर कानांवर लहान मुलांच्या सामूहिक वाचनाचा आवाज येत होता. आवाजाच्या ठिकाणी गेलो, तर एक व्यक्ती पन्नास ते साठ लहान मुलांना शिकवायचं काम करत होती. शांतपणे मुलांच्या पाठीमागं जाऊन बसलो. एकीकडं मी त्या शिकवणीमध्ये तल्लीन होत असताना दुसरीकडं विचारांतही बुडालो होतो. शांतपणे सारी परिस्थिती मनानं हेरली. एकीकडं खूप समाधान होतं, तर दुसरीकडं खूप सारे प्रश्नही होते. त्या प्रश्नांची उत्तरं शोधल्यावर लक्षात आलं, की जे काम इथं सुरू आहे, त्यापेक्षा चांगलं काम कुठंच असू शकत नाही. भटक्‍या समाजाच्या मुलांना एकत्रित करून त्यांना शिकण्याच्या प्रवाहात आणण्याचं काम महेश निंबाळकर नावाचा तरुण इथं करत होता.

रस्त्याच्या कडेला छोटी-छोटी पालं टाकून आपल्या रोजच्या भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी तारेवरची कसरत करणाऱ्या या समाजातल्या मुलांचा प्रश्नही खूप गंभीर आहे. दिवसभर भीक मागणं आणि रात्री आपल्या बापाच्या व्यसनाची संगत, असं या मुलांचं आयुष्य. शाळा, शिक्षणाचा गंधही त्यांच्या वाट्याला नाही. या मुलांना शिकवलं पाहिजे, हे मनात घेऊन महेश आपलं काम करतोय. पारधी, शिकलकरी, भटके डवरी गोसावी, शिकार करणारे पारधी, ऊसतोड कामगार, राजस्थानमधून उंट-मेंढ्या घेऊन आलेले कामगार, कोल्हाटी असे अनेक समाज एका ठिकाणी कधीच राहत नाहीत. चार-सहा महिने त्या-त्या ठिकाणच्या सीझनपर्यंत थांबायचं आणि पाठीवर संसार घेऊन पुढचा रस्ता धरायचा, असं त्यांचं जीवन. पोटाची खळगी भरण्यासाठी मजल-दरमजल प्रवास करणारे हे समूह. या प्रवासादरम्यान त्यांच्या मुलांची होणारी हेळसांड, त्यांच्यावर नसलेले संस्कार, बाकी सर्व गोष्टी विचारू नका...
महेशच्या या रस्त्यावरच्या शाळेत हीच सर्व मुलं जमली होती. शाळा सुटली आणि मुलं आपापल्या पालाकडं धावत सुटली. दोन लहान मुलांना गोंजारत महेश त्यांना आपुलकीनं सांगत होता ः ""कल जरूर आना हां.'' सगळी मुलं घरी गेली. महेश आणि माझ्या गप्पा सुरू झाल्या. याच ठिकाणी पालामध्ये राहणाऱ्या अनेक मुलांना महेशनं भीक मागताना, चोऱ्यामाऱ्या करताना पाहिलं होतं. तो त्या वस्तीत असणाऱ्या अनेकांना भेटला. त्या मुलांना शाळेत पाठवा, असं सांगितलं; पण त्याच्या बोलण्याकडं कुणी लक्ष देत नव्हतं. मुलांना शाळेत पाठवलं, तर आपल्याला मुलांकडून होणारी मदत मिळणार कशी, हा त्या पालकांना पडलेला प्रश्न होता. मुलांना कुठं पाठवायला पालक तयार नव्हते; पण ""तिथं येऊन शिकवतो. तुम्ही मुलांना पाठवा,'' असं सांगितल्यावर पालक तयार झाले. नवल म्हणजे ""आम्हाला त्याचे काही पैसे मिळणार काय?'' हा प्रश्न पालकांनी महेशला केला. त्या पालकांची समजूत काढून त्याच ठिकाणी जाऊन महेश शिकवायला लागला. त्या भागातली अशी सर्व मुलं त्यानं एकत्र केली आणि तिथं जाऊन तो शिकवत होता. महेश आणि त्याची पत्नी विनया दोघंही या कामात खूप गुंतले.

महेश माढा इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक होता. त्याची पत्नी विनया हीसुद्धा पारंडा इथं शिक्षिका होती. आपली शाळा करून पालावर मुलांना शिकवायला जायचं म्हणजे कठीणच काम, म्हणून या दोघांनीही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. हे जोडपं पूर्णवेळ कामाला लागलं. सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या भागांत असणाऱ्या अनेक पालांवरच्या वस्त्या त्यांनी शोधल्या. त्या मुलांना आठवड्यातून एकदा का होईना, या पालावरच्या शाळेचा, पुस्तकाचा गंध मिळत होता. आपल्या पिढीमध्ये कुणाला तरी नाव काढायला येतं, म्हणजे तो खूप मोठा विद्वान, असा समज या पालकांचा झाला. मुलांची शिक्षणाची गोडी त्या पालकांना आनंद देत होती. त्यातून काही पालक आपली मुलं महेश-विनया यांच्यासोबत पाठवायला तयारही झाले. ही मुलं महेशनं एकत्र केली. ""तुमचं काम कुठं चालतं,'' असं मी उत्सुकतेनं महेशला विचारत होतो. तो म्हणाला ः ""चला आमच्याकडं. आम्ही या मुलांना घेऊन एक उपक्रम हाती घेतलाय.'' मी क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो ः ""चला मग.'' नांदेडच्या दिशेनं जाणारी गाडी बार्शीकडं वळली. भटक्‍या समाजातली जी मुलं येतील, त्यांना सोबत घेऊन बार्शी तालुक्‍यात कोरफळे गावच्या माळरानावर एक छोटीशी निवासी शाळा सुरू झालीय. या समाजातली सदैव हसणारी मुलं इथं राहतात आणि शिक्षण घेतात. या सर्व मुलांना केवळ शिक्षणच नाही; तर पालकत्व देण्याचं कामही या दोघांनी मिळून केलं आहे. इथं विनयाचं योगदान लाखमोलाचं आहे. स्वयंपाक बनवण्यापासून ते सर्व मुलांच्या पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकवण्याचं काम ती करते. ही मुलं गावातलं वातावरण बिघडवणार नाहीत ना, याची भीती सुरवातीला गावात होती. मात्र, आता याच शाळेमुळं गावाची वेगळी ओळख तयार झाली आहे, याचा गावकऱ्यांना आभिमान वाटतो. आता हेच गावकरी या शाळेसाठी वेळप्रसंगी मदतीला धावून येतात. या सर्व मुलांना जवळ केलं, "नोकरी सोडून नसते उद्योग केले,' म्हणून महेश आणि विनयापासून त्यांचे नातेवाईक दूर गेले. आता या दोघांचं गाव, कुटुंब, नातेवाईक म्हणजे हे स्नेहग्राम आणि तिथं असणारी मुलंच. त्यांनी सुरू केलेल्या कामात दोघांनाही समाधान आहेच, म्हणून या कामात कमालीचा उत्साह आहे. महाराष्ट्रातली बहुधा ही पहिली शाळा आहे, जिथं विनया वर्गांना आपण तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार शिकवते. यातून गुणवत्तेवर कोणताच विपरीत परिणाम होत नाही. "माणुसकी' शिकवणारा हा अभ्यासक्रम. या शाळेचं एक वैशिष्ट्य मला खूप आवडलं. पुस्तकाएवढीच इथल्या मुलांना माणसं वाचायला शिकवली जातात. अनेक टीव्ही अँकरच्या नकला मला इथल्या मुलांनी करून दाखवल्या. बालसंसद, बालसभा, निवडणुका, विद्यार्थी बचत बॅंक, मुलांनी स्वयंपाक बनवणं, शाळा कचरा-प्लास्टिक-तंबाखूमुक्त असणं, कुणी व्हरांड्यात चप्पल घालून आलं किंवा परिसरात धूम्रपान केलं तर मुलांनीच त्याला दंड आकारणं असे उपक्रम खूप वेगळे आहेत. दोनशे-अडीचशे रुपयांचा हॅंडवॉश एका बाटलीत सर्व मुलांचे हात धुवू शकतो, त्यामुळं पाण्याची बचत इथं झालीय. शाळेच्या समोर सातशे झाडं लावली आहेत. या झाडांखाली मुलं नियमित आंघोळ करतात. स्नेहग्राममध्ये कोणतंही मूल पाणी फेकून देत नाही. आजवर क्षेत्रभेटीमध्ये बॅंक, पोस्ट, पोलिस स्टेशन, कोर्ट, दूध डेअरी, स्मशानभूमी आदी ठिकाणी ही मुलं जाऊन आली आहेत, प्रत्यक्ष खरेदीचा अनुभवही त्यांनी घेतलाय. इथं पाचवीत शिकणारा रामा बावरी सांगत होता ः ""प्रकल्पात साप निघायचे, तेव्हा आम्ही मुलं साप निघाले म्हणून भीतीनं घाबरायचो.'' बार्शीतले सर्पमित्र प्रतीक तलवाड यांनी मुलांना साप पकडायला शिकवलं. आता रामा स्वतः साप धरतो आणि परिसराबाहेर लांब सोडून देतो. हरणांसाठी मुलांनी पाणवठे बनवले आहेत. लायब्ररी, स्काइप स्कूल, टॅब स्कूल आणि बायोमॅट्रिक हजेरीही "स्नेहग्राम'मध्ये आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे "स्नेहग्राम'मध्ये सध्या पारधी-मराठी शब्दकोशाचं कामही सुरू आहे. एकदा भेट द्यावी अशीच ही शाळा आहे. इथं जे काही केलं, ते मुलांनीच केलं आहे. आपली शाळा जेव्हा "घर' असते, तेव्हा तिथं होणारा प्रत्येक संस्कार थेट मनावर पेरला जात असेल. बरोबर ना? "स्नेहग्राम'च्या शाळेला आणि प्रेमाला आता एक परिपक्व रूप आलं आहे. या प्रेमाला कुठंही बाधा येऊ नये यासाठी विनयानं शाळा सुरू करताना आपली सृजन आणि स्पंदन ही दोन्ही मुलं आपल्या आई-वडिलांकडं नेऊन ठेवली. वर्षातून कधीतरी या दोघांची तिकडं चक्कर होते.

हळूहळू शाळेचा आवाका वाढत गेला. मुलांची संख्या वाढत गेली. स्थलांतरित; सिग्नलवर भीक मागणारी शाळाबाह्य मुलं, अनाथ, निराधार, वंचित, संघर्षग्रस्त मुलं, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची मुलं, लैंगिक शोषणाला बळी पडलेली मुलं, दुर्लक्षित जाती-जमातींची, एकच पालक असणारी मुलं अशा किती तरी मुलांनाही "स्नेहग्राम'नं आपलंसं केलं आहे. ना शासनाचा आधार; ना कुण्या संस्थेचा आधार. हा सगळा दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रपंच चालवायचा कसा, असा गंभीर प्रश्न निंबाळकर पती-पत्नीसमोर उभा आहे. आपल्याजवळचं जे काही होतं-नव्हतं, ते विकून त्यांनी माळरानावर तीन एकर जागा घेतली. पत्र्याची शेड टाकून राहण्याची कशीबशी व्यवस्था केली; पण त्यापुढं काहीही होत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. महेश सांगत होता ः ""या प्रकल्पाजवळ लोकवस्ती नाही. गाव दूर. त्यामुळं "स्नेहग्राम'मध्ये मुलं आणि आम्ही दोघंच. शाळेला कंपाउंड नाही, त्यामुळं रात्री जनावरांची भीती. पाण्याची मुबलक प्रमाणात सोय नाही, वर्गखोल्या नाहीत, स्वतंत्र वसतिगृह नाही, मनुष्यबळ नाही.'' फक्त दोघंच काम करताहेत, अशी महाराष्ट्रातली ही पहिलीच शाळा असावी. त्यामुळं इमारतीसह माणसांची खूप गरज आहे. विहीर आणि कंपाउंडची गरज आहे.

विनया जेवढी हळवी; तेवढीच कठोरही आहे. एखादा मुलगा आजारी पडला, तर रात्र-रात्र झोपत नाही. मुलं झोपली असताना दोन वेळा घरात साप निघाले. त्यानंतर मुलं रात्री झोपायला घाबरत होती. विनयानं त्या मुलांची समजूत काढली आणि ती स्वतः दरवाजात आडवी झोपली, तेव्हा मुलं शांतपणे झोपली. तिनं माझ्याशी बोलताना एकाच ओळीत सांगितलं ः ""या सर्वांची आई व्हायला मला फार आवडते.'' तिच्या त्या एका ओळीत प्रेमाचं संपूर्ण सार जाणवत होतं.

एके काळी भीक मागणारी आणि इतर वाईट गोष्टी करणारी ही मुलं. त्यांना आता इंग्लिशमध्ये बोलताना ऐकलं नि वाटलं ः माणुसकीचे अच्छे दिन इथं आले आहेत. जे हात भीक मागत होते, त्या हातांना पुस्तकाचा गंध लागला आहे. ही मुलं खूप मोठी होणार, देशाच्या विकासात यांचाच सिहांचा वाटा असणार. कारण, यांनी खूप भोगलं आहे. अजून कुणाला हा त्रास होऊ नये, यासाठी त्यांच्यात पेरणी करण्याचे काम स्नेहग्रामवासीय करत आहेत. पाहूया आपल्या सगळ्यांनी मिळून यांना काय मदत करता येते ते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com