उपाशीपोटी लढाई... (संदीप काळे)

संदीप काळे Sandip98868@gmail.com
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात...

स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात...

शिवाजीनगर इथल्या आमच्या ऑफिसमधलं काम आटोपून सायंकाळी जरा पाय मोकळे करायला बाहेर पडलो. पुण्याचं वातावरण आणि मुंबईचं वातावरण यांत फरक काय असेल, तर पुणं आपलं रुटिन कधी बदलू देत नाही आणि मुंबईचं रुटिन कायम राहूनही ठराविक टप्प्यांवर सातत्यानं बदलतच राहतं. पुण्याच्या जगण्यात कायमचा गोडवा आहे, मुंबईचा गोडवा कायम राहीलच याची शाश्वती नसते. काही अंतरावर गेल्यावर मला एक गणपतीचं मंदिर दिसलं. मंदिरासमोरची गर्दी पाहून माझ्या लक्षात आलं, की इथं अशी गर्दी रोज होत असावी. मंदिरासमोर खूप मोठी रांग होती. रांगेत उभ्या असलेल्या पहिल्या व्यक्तीपासून प्रसादवाटपाला सुरवात करण्यात आली होती. प्रसादामुळे भक्तांचं पोट तर भरतंच; पण भुकेलेल्यांचंही पोट भरतं, ही जाणीवही मोप समाधान देऊन गेली. प्रसाद भरपेट होता. प्रसाद कसला, जेवणच ते! माझ्या लक्षात आलं, की हे सगळं जेवण गरिबांसाठी, भिकाऱ्यांसाठी आहे आणि प्रसाद हा आतमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ठेवलेला आहे; पण त्या भिकाऱ्यांच्या रांगेत मला काही तरणीताठी मुलंही दिसत होती. मोबाईलवर खेळत, चांगल्या क्वालिटीचं दप्तर पाठीवर अडकवलेली आणि चांगल्या क्वालिटीच्या मोबाईलवर खेळत असलेली ही सगळी मुलं तरुण होती. मला प्रश्न पडला, भिकाऱ्यांच्या रांगेत ही मुलं काय करत असावीत? मी त्या रांगेत उभा राहिलो. माझ्यासमोर आलेलं गरम गरम अन्न मी फस्त केलं. तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन मुली माझ्यासमोर समोर आल्या. त्यांनी ते अन्न घेतलं आणि दूर जाऊन ते त्या खाऊ लागल्या. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. तेवढ्यात त्या तिथून लगबगीनं निघून जाऊ लागल्या. त्या अशा लगबगीनं निघून का जात आहेत, हे माझ्या लक्षात येईना. - मी मागं वळून बघितलं, तर त्यांच्या ओळखीची काही मुलं दर्शनासाठी आली होती म्हणून त्या दोघींनी तिथून काढता पाय घेतला होता. एव्हाना, समोरची रांग लांबच लांब वाढत चालली होती. वाढणाऱ्या रांगेत तरुणवर्गाची भर पडतच होती. त्या रांगेत उभ्या असलेल्या एका मुलाला आणि मुलीला मी गाठलं. त्यांना त्यांची नावं विचारली, त्यांचं गाव विचारलं आणि काय करता, असंही विचारलं. ते माझ्याशी बोललेही. संजय पाटोळे आणि उमा पाटोळे हे दोघं बहीण-भाऊ. हिंगोली जिल्ह्यातल्या शेनगावचे. आई-वडील दोघंही मोलमजुरी करणारे. मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी दीड एकर जमीन विकली होती. आता या दोघांसाठी आई-वडील रात्रंदिवस काबाडकष्ट करून महिन्याकाठी काही पैसे पाठवण्याची व्यवस्था करतात. संजय आणि उमा हे दोघंही पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. दिवसभर अभ्यास करायचा आणि रात्री एटीएमसमोर वॉचमनची नोकरी करायची. आई-वडिलांकडून येणारा थोडासा पैसा आणि नोकरीतून येणारा थोडासा पैसा यातून राहण्याचा खर्च, ग्रंथालयाचा खर्च, पुस्तकं, खाणं, क्‍लासची फी, कपडे आणि अधूनमधून घरी येण्या-जाण्यासाठी लागणारे पैसे यांची तरतूद करणं...ही तारेवरची कसरत गेल्या तीन वर्षांपासून हे दोघंही करत आहेत. उपलब्ध पैसे आणि असणाऱ्या गरजा यांचा ताळमेळ अनेक वेळा बसत नाही. मग पोटाला चिमटा घेत कुठं तरी मिळालेलं फुकटचं अन्न खायचं आणि दिवस काढायचा...असे दिवस चाललेले असतात.

"मीही मराठवाड्यातलाच आहे, तुमच्यासारखा स्ट्रगल मीही केला,' असं म्हणत मी त्यांच्यासोबत हातावर अन्न घेऊन खात खात त्यांच्याशी बोलल्यामुळे दोघंही माझ्याशी मोकळेपणानं बोलले. उमा म्हणाली ः ""गेल्या तीन वर्षांपासून आम्ही घरी गेलेलो नाही. त्याचं कारण, दिवाळीच्या काळात प्रवासाचं तिकीट तीनपट झालेलं असतं. ते आमच्या खिशाला परवडणारं नसतं. अनेक वेळा गावाकडं दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आई-बाबांच्या हाताला कामच नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून काही मदत येईल अशी अपेक्षा नाही.'' आम्ही बोलत असताना मध्येच उमाची मैत्रीण मीनल पाईकराव आली. तिनंही प्रसाद घेतला. वाशिमच्या बसस्थानकात मीनलचे वडील हमालीचं काम करतात. वर्षभरापूर्वी एका अपघातात ते वारले. मीनलला स्पर्धा परीक्षा द्यायची होती. तिनं आईचे दागिने गहाण ठेवून पुणं गाठलं. ती तेव्हापासून इथंच आहे. शिक्षण घेण्याबरोबरच ती सोन्या-चांदीच्या एका दुकानात ती अर्ध वेळ नोकरी करते. तिलाही पोटाची खळगी भरण्यासाठी जिथं फुकटात खाणं मिळतं तिथं जावंच लागतं.

पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. इथं महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांतली मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात. प्रत्येकाला काहीतरी बनायचं आहे...पण काय? तर आयपीएस-आयएएस असं उच्च अधिकारीच बनायचंय प्रत्येकाला! तहसीलदार किंवा पीएसआय बनण्यासाठी आलेले फार कमीजण आहेत.

उच्च अधिकारी बनणं सहज शक्‍य आहे का? कारण, एकूण सगळा इतिहास पाहिला तर स्पर्धा परीक्षेला बसणारे आणि ती पास होणारे यांचा ताळमेळ जरा धक्कादायकच आहे. याचा शोध घेत मी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे काही अहवाल तपासले. ता. 26 जानेवारी 1950 ते 31 मार्च 1951 या कालावधीत 42 हजार 727 जणांनी परीक्षा दिली होती. तीत 3783 जणांची पात्र म्हणून शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर ही संख्या बऱ्यापैकी वाढत गेली. अलीकडचा ताजा आकडा पाहायचा तर सन 2015-16 च्या आकडेवारीनुसार, 34,05,927 जण या परीक्षेसाठी बसले होते. त्यामधून केवळ 7016 जण पात्र ठरले. अशी ही सगळी परिस्थिती आहे. शहरनिहाय आकडेवारी काढायला गेलो तर आणखी परिस्थिती बिकट असल्याचं दिसून येतं. म्हणजे तीन टक्के, चार टक्के एवढाही हा निकाल नाही आणि प्रत्येकाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. अशा सगळ्या परिस्थितीमुळं मानसिक खच्चीकरणाचं प्रमाणही खूप वाढलं आहे. आत्महत्येसारख्या बातम्याही ऐकायला-वाचायला मिळतात. अलीकडं तीन जून 2018 ला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी नागरी सेवा पूर्वपरीक्षेला पुण्यात जवळजवळ 30 हजार विद्यार्थी बसणार होते; परंतू 12 हजारांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिले. कारण, तयारी होऊनही परीक्षेला सामोरं जाण्याची अनेकांची हिंमतच होत नव्हती. तेच तेच अपयश दरवर्षी पदरी पडत होतं. ही 30 हजारांची आकडेवारी एकट्या पुण्याची आहे, हे ऐकून तसा धक्का बसायला नको. मराठवाडा, विदर्भ घ्या वा उत्तर महाराष्ट्र घ्या, सगळ्यांना पुण्यातच येऊन परीक्षा द्यायची आहे. त्यात श्रीमंतांच्या मुलांचं तस बरं आहे; पण तरीही आयुष्यात काही तरी करायची उमेदीची दोन-चार वर्षं परीक्षा देण्यातच संपतात आणि मग पुढं काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. मराठवाडा, विदर्भात शेतीत काम करायला माणूस उरलं नाही. शेतीसाठी मजूर मिळत नाहीत म्हणून शंभर एकर जमिनीचा मालक असलेला शेतकरीही आज हैराण आहे. मुलगा पुण्याला शिकायला गेला...त्यातून गावात रोजमजुरी करणारे आई-वडील पुण्यात रोजमजुरी करू लागले...शेतात दिवसभर राब राब राबून अंगमेहनतीची कामं करण्यापेक्षा कुठंही वॉचमन म्हणून काम केलं की चांगला पैसा मिळतो, या धारणेतून खेड्यांचं स्थलांतर शहरांकडं होतं आहे. याला मुलांची स्पर्धा परीक्षेची मानसिकताही बरीचशी कारणीभूत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या मानसिकतेचा विचार केला तर मुलं एकतर छोट्या छोट्या उद्योगांकडं वळतात नाहीतर मिळेल ती खासगी किंवा सरकारी नोकरी करतात. अशा खेड्यांकडच्या तरुणाईनं पुण्यातली सदाशिव पेठ, अप्पा बळवंत चौक ही ठिकाणं फुलून गेली आहेत. स्पर्धा परीक्षांचे क्‍सास घेणाऱ्यांची तर बारा महिने दिवाळीच असते. एमपीएससीच्या क्‍लाससाठी 50 हजार रुपये आणि यूपीएससीच्या क्‍लाससाठी 70 हजार रुपये मोजावे लागतात. एवढे पैसे मोजूनही क्‍लासवाल्यांच्या शिकवणीवर भरवसा नाही. कारण, किती वर्षं क्‍लास केला तरी यश नाहीच, असं सांगणाऱ्यांची संख्या कित्येक हजारांमध्ये आहे. आपला व्यवसाय जोरात चालावा यासाठी क्‍सासचालकांनी अनेक फंडे सुरू केले आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा फंडा म्हणजे शंभरांमधला जो कुणी एकजण पास होईल, त्याला ग्रामीण भागात घेऊन जायचं आणि छानपैकी भाषण ठोकायला लावायचं. मग त्याचं भाषण ऐकून उपस्थितांतली अनेक मुलं "इन्स्पायर' होतात आणि स्पर्धा परीक्षांच्या क्‍लासमध्ये नावं नोंदवतात. ही मुलं आली, क्‍लासमध्ये प्रवेश घेतला एवढ्यावरच इथलं अर्थकारण थांबत नाही. तर त्यांचं राहणं, त्यांचं खाणं-पिणं, त्यांच्या दैनंदिन गरजा यावर शहराचं अर्थकारण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. याचा फायदा नेमका होतो कुणाला हे सांगणं जरा कठीण आहे. बरं, ज्या भागांत ही मुलं राहतात, तिथंच नेमकं सगळं महाग आहे. केळी 100 रुपये डझन! महाराष्ट्रात सगळ्यात महागडा भाव इथंच. केळी सर्वात महाग का आहेत, याचा जरासा शोध घेतला तर लक्षात आलं, की अनेक मुलं सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा दोन दोन केळी खाऊन दिवस काढतात. उपाशीपोटी लढाई कशी लढणार, असा प्रश्न दाणापाणी जवळ नसलेल्या सैनिकांनाही अनेक लढायांमध्ये पडला होता. तोच प्रश्न इथं या मुलांना पुण्यात पडलाय. मग जिथं कुठं अन्नदान केलं जातं, तिथं गरिबांच्या आणि भिकाऱ्यांच्या रांगेत आपण जाऊन बसायचं, हे चित्र पुण्यातल्या काही ठराविक ठिकाणी नित्याचं झालं आहे. या ठिकाणांमध्ये सातारा रस्त्यावरचा शंकरमहाराजांचा मठ, मंडईचा मंडई मठ, दगडूशेठ गणपतीच्या मागं असणारा स्वामींचा मठ, शिवाजीनगरचं साईबाबांचं मंदिर, गोगावले मठ, नवाकार भैरवनाथ मंदिर हे कसबा पेठमधलं ठिकाण, सारसबागेजवळच्या वारकरी समाजाचं मंदिर...अशा अनेक ठिकाणी अन्नदानाची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. काहींचे ठराविक दिवस आहेत. या मुलांसाठी ही संजीवनी ठरते.

पुण्यात माझा भाचा सुजित घोरबांड आणि माझ्या मामाची मुलगी शीतल निरगुडे हे दोघंही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. या दोघांनाही मी जेव्हा भेटलो, तेव्हा या स्पर्धा परीक्षेसाठी मुलांची किती तयारी असते, किती मेहनत घेऊन स्वतःला पुढं न्यावं लागतं, याचे अनेक दाखले त्यांनी मला दिले. ते सगळं ऐकून मी थक्क झालो.
माझे दोन्ही नातेवाईक सधन घरचे आहेत. तरीही त्यांच्या मते, पुण्यात राहून स्पर्धा परीक्षा देणं, त्यासाठीची पूर्वतयारी करणं ही तारेवरची कसरत आहे. एकीकडं असं चित्र, तर दुसरीकडं संजय, उमा आणि मीनल यांची प्रत्यक्षातली कसरतही मला पाहायला मिळाली. मात्र, या सगळ्यांना कमालीचा आत्मविश्वास आहे. त्यांना यशही येईलही; पण यांच्यापैकी कुणीही आयुष्यासंदर्भातला "प्लॅन बी' तयार केला नसल्याचं मला जाणवलं. स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बहीण-भावाकडं नाही. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sandeep kale write bhramanti live article in saptarang