भिकाऱ्यांचे तारणहार... (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी...

या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. नाइलाजास्तव भीक मागणाऱ्यांसाठी काय करावं, याविषयीची अनेक सूचना अनेकांनी केल्या. त्यात पुणे धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांची सूचना खूप महत्त्वाची होती. ते म्हणाले ः "पुण्यात अशा सगळ्या भिकाऱ्यांसाठी एका डॉक्‍टर कुटुंबीयानं खूप मोठं योगदान दिलं आहे.' "आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेत हे डॉक्‍टर दांपत्य काम करत आहे. देशमुख यांच्याकडून त्या डॉक्‍टर दांपत्याचं काम समजून घेतलं आणि त्यांना भेटायचं ठरवलं. एके दिवशी सकाळी सकाळी डॉक्‍टरांच्या पाषाण इथल्या घरी पोचलो. मी येणार असल्याचं त्यांना अगोदर कळवलं होतं. काही फायली, फोटोंचे अल्बम त्यांनी माझ्यासमोर ठेवले. आपण यांच्या कामाविषयी जो अंदाज बांधला होता, त्या अंदाजापेक्षाही या दांपत्याचं काम खूप मोठं आहे, हे माझ्या लक्षात त्या फायली, फोटो वगैरे पाहताना येत गेलं.
डॉ. अभिजित सोनवणे आणि डॉ. मनीषा सोनवणे हे ते दांपत्य.
माझ्याशी बोलताना त्यांनी त्यांचा इत्थंभूत प्रवास सांगितला. ""तुम्ही जिथं काम करत आहात, तिथं आपण जाऊ या'' असं मी त्यांना सुचवलं आणि आम्ही त्या ठिकाणी जायला निघालो. आता आम्ही पुण्याच्या लष्कर (कॅम्प) भागातल्या एका कबरस्तानाजवळ आलो होतो.

कुणाचं तरी निधन झालेलं होतं. अंत्यविधीनंतर कबरस्तानातून बाहेर येणारे लोक तिथल्या भिकाऱ्यांना सढळ हातानं दान करताना दिसत होते. त्या भिकाऱ्यांमध्ये काही धडधाकटही होते; तर काही म्हातारी माणसंही होती. डॉक्‍टरांनी त्यांच्या टीमला अगोदरच त्या कबरस्तानाजवळ यायला सांगितलं होतं. त्यानुसार टीम आली आणि त्या सगळ्या लोकांना एकेक करून गाडीत बसवण्यात आलं. भीक मागणारी आणखी माणसं कुठं असतील याची कल्पना डॉक्‍टरांना होती. त्या दिशेनं आम्ही निघालो. वाटेत मला डॉक्‍टरांनी एकूण वारांचा हिशेब सांगितला. सोमवारी शंकराचं मंदिर, मंगळवारी देवीचं मंदिर, बुधवारी गणपतीचं मंदिर, गुरुवारी साईबाबांचं मंदिर आणि स्वामी समर्थांचा मठ, शुक्रवारी मशीद...अशी ती यादी होती. जिथं अधिक भक्त जमतात, तिथं भिकाऱ्यांची संख्या अधिक असते, असा डॉक्‍टरांचा अनुभव. पुणे शहरात शंकराचं मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, पाषाणमधलं मारुतीचं मंदिर...शहरातल्या अशा एकूण 47 मोठ्या मंदिरांबाहेर हे भिकारी मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं, अशी माहिती डॉक्‍टरांनी दिली. डॉक्‍टरांच्या निरीक्षणानुसार, यातले 30 टक्के भिकारी हे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी नाइलाजास्तव भीक मागत असतात, तर 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भिकारी हे "केवळ फुकट मिळतंय, काम करायला नको' म्हणून भीक मागत असतात. काहीजण वर्षानुवर्षं वेड्यासारखं वागून केवळ देह जगवण्यासाठी भीक मागत असतात; तर उर्वरितांमध्ये अनेक म्हातारी जोडपी आहेत. ही जोडपी महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातून आल्याचं पाहायला मिळतं. ज्या दुष्काळी भागात त्यांची मुलं त्यांना सांभाळू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे तो भाग कुठला, ती शहरं कुठली याविषयीची सगळी माहिती मिळाली. अशा सगळ्या पीडितांचे कैवारी म्हणून हे डॉक्‍टर दांपत्य सन 2015 पासून पूर्ण वेळ हे काम करत आहे. भीक मागणाऱ्या लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून किंवा त्यांना खाऊ घालणं एवढंच केवळ हे काम नाही; तर त्यांना स्वत:च्या पायावर उभं करायचंही मोठं काम हे दांपत्य करत आहे हे उल्लेखनीय. "हे दांपत्य भिकाऱ्यांच्या केवळ आजारांचं निदान करतं,' एवढीच माहिती मला आधी मिळाली होती. मात्र, या माहितीच्याही पलीकडचे अनेक पैलू मला प्रत्यक्षात पाहायला मिळाले. ते काही औरच होते.

त्या रुग्णांना आपल्याकडं आणणं...त्यांना नीटनेटकं करणं...त्यांच्या गंभीर आजारावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करणं...कुणाला वृद्धाश्रमामध्ये प्रवेश मिळवून देणं...त्यांच्या कुटुंबीयांना खुशाली कळवणं...अनेक भिकाऱ्यांना व्यवसाय उभा करून देणं...अनेक भिकाऱ्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांना शिकवणं...अशा कितीतरी गोष्टी हे दांपत्य करत असल्याचं समजलं. खरंतर त्यांचं हे मोठं काम शब्दांतून मांडण्यापलीकडचं आहे, असं म्हटलं तरी चालेल. अशा सगळ्या मदत केलेल्या भिकाऱ्यांच्या नावांनी डॉक्‍टरांकडचं रजिस्टर भरून गेलंय.

डॉक्‍टरांनी पुण्याच्या टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं. तिथं त्यांना मनीषा भेटल्या आणि दोघांचे विचार जुळले. विवाह झाला. सन 1999 ला दोघांनी प्रॅक्‍टिस सुरू केली. दिवसभर गावोगावी आणि दारोदारी फिरून त्यांना त्या वेळी फक्त 30-40 रुपये मिळायचे. परिश्रमांच्या तुलनेत ही रक्कम तशी काहीच नव्हती. या स्थितीमुळं दोघांचाही आत्मविश्वास गमावल्यासारखं झालं होतं. असेच एकदा रस्त्यानं जात असताना एका झाडाखाली त्यांना भीक मागणारं जोडपं दिसलं. त्यांच्याजवळ असलेलं अन्न त्यांनी डॉक्‍टरांनाही दिलं. त्या काळात दिशाहीन झालेल्या डॉक्‍टरांना पुढच्या कार्याची जणू दिशाच त्या जोडप्यानं दाखवली. आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा संदर्भ देत, आयुष्य म्हणजे नेमकं काय, हेही त्यांनी डॉक्‍टरांना सांगितलं आणि जमेल तशी आपल्या परीनं डॉक्‍टरांची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला...या संवादामुळं डॉक्‍टरांची त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. त्या मैत्रीतून आणि सल्ल्यातून डॉक्‍टर पुन्हा उभे राहिले. आपला प्रवास सांगताना डॉक्‍टर म्हणाले ः ""चुकूनमाकून मला मेडिकलला प्रवेश मिळाला. तिथं अंजनाळकर सरांनी मला घडवलं आणि या भेटलेल्या दोन आजी-आजोबांनी मला दिशा दाखवली.'' डॉक्‍टरांनी बारावीपर्यंतचं आयुष्य कधीच गांभीर्यानं घेतलं नव्हतं. मेडिकलला प्रवेश
मिळाल्यानंतरही त्यांचा हाच स्वभाव कायम राहिला होता. अंजनाळकर नावाच्या एका शिक्षकानं या विद्यार्थ्याला बोट धरून काठावर आणलं...आणि तिथून सुरू झाला प्रवास...एका डॉक्‍टरचाही आणि त्यांच्यातला माणसाचाही...! या सर्व प्रवासात योग्य वाटेवर आणण्याचं श्रेय डॉक्‍टर आपल्या आई-वडिलांनाही आवर्जून देतात आणि सांगतात ः ""प्रत्येक भिकाऱ्यात मला ते मार्गदर्शक दिसतात...आणि आई-वडीलही...''
एखाद्या भिकाऱ्याला भिकारी असं संबोधणंही डॉक्‍टरांना आवडत नाही. त्याचं कारण म्हणजे, ते एका अगतिकतेतून भीक मागत असतात. त्यामुळे "भिक्षेकरी' असा शब्द त्यांच्यासाठी डॉक्‍टर वापरतात.
***

बराच लांबचा पल्ला गाठून आम्ही शहरातल्या एका शनिमंदिराजवळ येऊन थांबलो. एक आजी डॉक्‍टर मनीषा यांना बघून खूप खूश झाल्या. डॉक्‍टर मनीषा जवळ येताच आजींनी त्यांना मिठी मारली. डॉक्‍टर अभिजित यांच्या तोंडावरून हात फिरवत "माझं लेकरू गं माय' असे शब्द आजींच्या तोंडून सहज बाहेर पडले.
डॉक्‍टर मला म्हणाले ः ""तुम्ही आजींशी बोला. आम्ही या लोकांना भेटून येतो.'' मग डॉक्‍टर दांपत्यानं त्या भिकाऱ्यांना रस्त्यावरच तपासत आपलं "क्‍लिनिक' सुरू केलं. कुणाची नाडी तपासणं, कुणाचे डोळे तपासणं, कुणाचं ड्रेसिंग करणं, कुणाचं बीपी तपासणं, रस्त्यावरच गोळ्या-औषधं देणं अशा कामाला ते दोघंही लागले. त्यांच्या या सगळ्या कामाचं निरीक्षण मी करू लागलो.
तेवढ्यात आजी माझ्याकडं बघत म्हणाल्या ः ""तुम्हीपण डाक्‍टर हाव काय?'' -मी म्हणालो ः ""नाही. मी त्यांचा मित्र आहे.'' - मला जे हवं होतं, ते आजींना विचारायला मी सुरवात केली. मात्र, आजींनी पहिल्यापासूनची त्यांची सगळी कहाणी मला सांगितली. डॉक्‍टरांना भेटल्यापासून मी या चौथ्या व्यक्तीला भेटत होतो. प्रत्येकजण जणू काही स्वतंत्र कादंबरीचाच विषय. कुणाला घरातून बाहेर काढण्यात आलं होतं... कुणाचा नवरा वारलेला...कुणाचं कुटुंब पुरात वाहून गेलेलं...अशा वेगवेगळ्या कथा-व्यथा असणारी एकापेक्षा एक खरीखुरी माणसं!
या आजीबाईची कहाणी तर भन्नाटच होती.
मुलं वारलेली, नवरा गेलेला, सख्ख्यांनी साथ सोडलेली, समाजानं "वेडी' ठरवलेलं...केवळ नातवंडांना जगवण्यासाठी म्हणून भीक मागणं सुरू केलं म्हणून मुलांनी घराबाहेर काढलं आणि अशा या माउलीला आणि तिच्या नातवंडांनाही या डॉक्‍टर पती-पत्नीनं आपलंसं केलं. आपली आई मानलं. या डॉक्‍टरांनी अशी कितीतरी नाती निर्माण केली आहेत. डॉक्‍टर म्हणतात ः ""माझं एक कुटुंब घरात चार भिंतींत राहतं...पण रस्त्यावर तयार झालेलं आमचं हे दुसरं कुटुंब रस्त्यावरच, आभाळाच्या सावलीखाली राहतं...आणि त्याचीच मला खंत आहे.''
पुण्याच्या अनेक देवस्थानांच्या बाहेर कित्येक जण डॉक्‍टरांची वाट पाहताना दिसत होते. एरवी भीक मागणाऱ्या हातांची अपेक्षा हातात काहीतरी पडावं एवढीच असते. मात्र, हेच भीक मागणारे हात डॉक्‍टरांना स्पर्श करण्यासाठी पुढं येतात. मरणपंथाला लागलेल्या अनेक भिकाऱ्यांची सोय आपले माय-बाप समजून डॉक्‍टर वृद्धाश्रमामध्ये करतात. नाव आणि गाव नसलेल्या या लोकांना स्वतःचं नाव देतात...डॉक्‍टर त्यांना तिथं प्रवेश मिळवून देतात. डॉक्‍टरांचं हे काम सतत सुरू असतं.

रविवारी सुटीच्या दिवशी डॉक्‍टरांच्या टीममध्ये आणखी एक मेंबर दाखल होतोय, तो त्यांचा मुलगा सोहम. सोहम सध्या पंधरा वर्षांचा आहे. त्यालाही आपल्या आई-वडिलांच्या कामात खूप रुची आहे. लोक आपल्या माघारी मुलाच्या नावे धनदौलत ठेवतात...या दांपत्यानं आपल्या माघारी हे सर्व भिकारी या मुलाच्या नावे करायचं ठरवलं आहे! आपल्या टीमसोबत या दोन डॉक्‍टरांनी फक्त पुणे शहरात हे काम सुरू केलं. त्यांना हे काम वाढवायचंय, भिकाऱ्यांसाठी हक्काचं घर, पुनर्वसनकेंद्र काढायचंय; पण आर्थिक अडचणीतून मार्ग सापडत नाही, अशी स्थिती आहे. भिकाऱ्यांचं पालकत्व पूर्ण वेळ स्वीकारण्यासाठी डॉक्‍टरांनी तर आंतरराष्ट्रीय कंपनीत असलेली त्यांची नोकरी सोडली. डॉ. मनीषा या सध्या ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये एके ठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतात. सकाळी पाच वाजल्यापासून त्या योगाचे क्‍लास घेतात आणि डॉक्‍टरांच्या पूर्ण वेळ उपक्रमात त्यांनी स्वतःला झोकून दिलं आहे. डॉक्‍टर मनीषा यांच्या पगारावर आणि लोकांच्या थोड्या मदतीवर डॉक्‍टरांचे हे सारे उपक्रम चालतात. डॉक्‍टरांच्या या पूर्ण वेळ कामासाठी चार पैसे जमा होतील आणि लोकांचा हातभार लागेल यासाठी डॉक्‍टरांनी "सोहम' या नावानं एक ट्रस्ट उभारला आहे. त्या ट्रस्टच्या माध्यमातून लोकांची आलेली मदत डॉक्‍टरांच्या कामी येते; पण आलेली मदत एकदम तुटपुंजी आहे, असं एकूण संस्थेचं कामकाज पाहिल्यावर समजतं.

डॉ. मनीषा म्हणाल्या ः ""लोकांना मदत करण्याचं काम हा माझा आवडता विषय. डॉक्‍टरांसारखं मलाही वाटायचं की जॉब सोडून यातच पूर्ण वेळ काम करावं; पण प्रपंच चालवायला, या लोकांची सेवा करायला आणि त्यांच्या
औषधपाण्याला, दवाखान्याच्या इतर खर्चाला, पुनर्वसनासाठी लागणाऱ्या वस्तूंना, कपड्यालत्त्याला पैसे आणायचे कुठून हा प्रश्न होता. त्यामुळे मी माझं काम सुरू ठेवलं. पाहता पाहता छोटंसं काम आज खूप मोठं झालंय.''
भुकेलेल्याला अन्न, आजारी असलेल्याला औषधपाणी आणि परक्‍या माणसाला आपलेपणा देत कितीतरी मायेची नाती या डॉक्‍टरांनी निर्माण केली आहेत. आता या दोघांचं काम पाहिलं की मनात एक प्रश्‍न येतो व तो म्हणजे, खरी नाती कोणती? रक्ताची की प्रेमाची?
आपली ओळख काय, आपण आलो कुठून याचं भान घरापासून तुटलेल्या या माणसांना अनेकदा नसतं. त्यातूनच त्यांच्याविषयी "भिकारी', "वेडा' असे शब्दप्रयोग करत समाज त्यांच्याकडं काणाडोळा करतो. या लोकांना माणुसकीच्या प्रवाहात आणण्याचं काम पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असेल, हे कुणाला माहीतही नसेल. माझा त्यांच्यासोबत गेलेला दिवसभरातला अनुभव थक्क करणारा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com