समुंद्य्रा आणि समुद्र (संदीप काळे)

संदीप काळे Sandip98868@gmail.com
रविवार, 21 एप्रिल 2019

केवळ समुद्राची सोबत असलेला समुंद्य्रा तसा तेव्हाही एकटाच होता आणि आजही तो एकटाच आहे. मला किनाऱ्यावर आणून सोडल्यावर तो त्याच्या घरी निघाला. मी म्हणालो ः ""तुमचं घर दाखवायला नेता का मला?''
त्यानं क्षणाचाही विलंब न लावता ""चला'' असं म्हणून आनंदानं मला त्याच्या घरी नेलं...

केवळ समुद्राची सोबत असलेला समुंद्य्रा तसा तेव्हाही एकटाच होता आणि आजही तो एकटाच आहे. मला किनाऱ्यावर आणून सोडल्यावर तो त्याच्या घरी निघाला. मी म्हणालो ः ""तुमचं घर दाखवायला नेता का मला?''
त्यानं क्षणाचाही विलंब न लावता ""चला'' असं म्हणून आनंदानं मला त्याच्या घरी नेलं...

महाराष्ट्राचा दौरा करून मी गोव्यात पोचलो. महाराष्ट्रातलं राजकारण आणि गोव्यातलं राजकारण व समाजकारण हे दोन्ही एकदम वेगवेगळं. गेल्या दहा-बारा दिवसांपासून निवडणुका, लोकांचे प्रश्न, उमेदवारांच्या भेटी-गाठी या सगळ्यामुळं डोकं अगदी पिकून गेलं होतं. प्रचाराच्या माध्यमातून होत असलेली बजबजपुरी डोकं भंडावून सोडणारी होती. त्यामुळे दुपारनंतर एखाद्या निवांत जागी जाऊन शांतता अनुभवायची, असं त्या दिवशी ठरवलं.

पणजीतल्या एका समुद्राच्या काठावर असलेल्या वस्तीत मी गेलो. तिथले सगळे लोक कोकणी बोलणारे. अंगावर जेमतेम कपडे असलेली विदेशी माणसं रोज रोज पाहून स्थानिकांना त्या माणसांचं अप्रूप राहिलेलं नसावं; पण गोव्यात पर्यटक म्हणून जे नव्यानं येतात त्या महाराष्ट्रातल्या माणसांना त्या विदेशी माणसांचं अप्रूप असतंच. एक छोटीशी समुद्रसफर करावी, असं माझ्या मनात आलं; पण केवळ दोनच बोटी ये-जा करत होत्या.

अंगावर अगदीच जेमतेम कपडे असणारे अनेक विदेशी गोरेपिट्ट पर्यटक दुपारच्या उन्हाची तमा न बाळगता बीचवर एकमेकांशी गप्पा मारण्यात तल्लीन झाले होते. गोवा म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारं सौंदर्यवान बेट. इथल्या लोकांनी ते नीटनेटकं ठेवलंयसुद्धा. बीचवर छोटी-मोठी सामग्री विकणाऱ्या अनेक विक्रेत्यांशी मी बोललो. त्यांच्या बोलण्यात कमालीचं समाधान जाणवलं. गोव्यात छोटे छोटे उद्योग करणारेही कमालीचे समाधानी आहेत. आपल्या इकडं महाराष्ट्रात वातावरण त्याविरुद्ध आहे. काही वेळात बोट आली आणि मी बोटीत चढलो.

बोट चालवणारा कोकणी भाषेत बोलत होता. तिथल्या लोकांशी त्यानं बोलणं आटोपतं घेत सुसाट वेगानं बोट चालवायला सुरवात केली. थोड्या वेळानं मी त्याच्या बाजूला जाऊन बसलो. उतारवयाकडं झुकलेल्या त्या व्यक्तीला मी विचारलं ः ""तुमचं नाव काय?'' तर तो म्हणाला ः ""समुंद्य्रा.''
काहीसं आश्‍चर्यचकित होऊन मी विचारलं ः ""आं...असलं कसलं नाव?''
तो म्हणाला ः ""मला सगळे जण हाच प्रश्न विचारतात, की तुझं नाव असं कसं?''
मी विचारलं ः ""हे नाव आईनं ठेवलंय की बाबांनी?''
तो थोडासा शांत झाला आणि काही न बोलता त्याच्या कामात गढून गेला.
तो अंतर्मुख होत स्वतःत काहीसा हरवून गेल्यासारखा वाटला. तो अगदी आत्ता हसत-खेळत बोलत होता आणि मध्येच का बरं असा नाराज झाला असावा, असा मला प्रश्‍न पडला. - मी त्याला म्हणालो ः"" सॉरी, तुम्ही दुखावला गेलात का? मी तुमच्याशी काही चुकीचं बोललो का?''
अडखळत अडखळत मराठी बोलणारा हा माणूस पुन्हा थोडासा हसला आणि म्हणाला ः ""नाही हो...मी असाच शांत झालो.''

मी त्याला बोलतं करण्यासाठी खुलवण्याचा प्रयत्न करू लागलो; पण तो काही खुलत नव्हता. मध्ये मध्ये त्याला मी माझ्याविषयीही माहिती सांगायला लागलो. अर्धा तास गेल्यावर मग कुठं त्यानं मला प्रतिसाद द्यायला सुरवात केली. मग फक्त तोच बोलत होता आणि मी ऐकत होतो. त्यानं सांगितलेली त्यांची कहाणी जितकी वेदनादायक होती, त्याहूनही अधिक ती प्रेरणादायक होती, असंच म्हटलं पाहिजे. माणसानं खचून न जाता सतत कार्यमग्न राहावं, हे समुंद्य्राकडून मला त्या दिवशी मिळालेलं तत्त्वज्ञान म्हणावं लागेल. तशी प्रत्येक माणसाचीच एक वेगळी कहाणी असते. कधी कधी त्या कहाणीत असे काही चढ-उतार असतात की आपण नकळतपणे त्या कहाणीत गुंतून जातो. समुद्रात नावाडी असलेल्या समुंद्य्राचं जीवन समुद्रातल्या पाण्यासारखंच स्वच्छ होतं...प्रामाणिक होतं.

पंचावन्न वर्षांच्या समुंद्य्रानं अडीच तासात त्याचा जीवनप्रवास माझ्यासमोर मांडला. त्यानं सांगितल्यानुसार त्याची कहाणी अशी होती ः समुंद्य्रा सात-आठ दिवसांचा असेल-नसेल, त्या वेळी याच समुद्राच्या काठावर फेकून दिलेल्या अवस्थेत तो काही नावाड्यांना सापडला. त्या वेळी त्याच्या छातीचे ठोके बंद पडण्याच्याच बेतात होते. सात-आठ दिवसांच्या या अर्भकाला वेगवेगळ्या किड्यांनी रक्तबंबाळ करून सोडलेलं होतं. त्या नावाड्यांपैकी एकानं आपल्या डोक्‍यावरचा रुमाल समुद्राच्या पाण्यात ओला करून बाळाच्या शरीरावरच्या जखमा पुसल्या. बाळ जिवंत आहे की मरण पावलंय हेही त्या नावाड्यांना नीटसं कळत नव्हतं. त्या सगळ्यांनी बाळाला दवाखान्यात नेलं, दोन दिवसांच्या उपचारांनंतर बाळानं डोळे उघडले. "या बाळाला आता पोलिसात देऊन टाका... त्यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवा आणि बाळ ज्यांचं असेल त्यांना ते कसं पोचेल याची व्यवस्था करा...' असा सल्ला नावाड्याच्या इतर सर्व मित्रांनी दिला; पण नावाड्यानं कुणाचंही ऐकलं नाही.

समुंद्य्राला अशा दुसरा जन्म देणाऱ्या त्या नावाड्याचं नाव सिद्राम. सिद्रामला मूल-बाळ नव्हतं. वय उलटून गेल्यामुळे ती शक्‍यता संपलेली होती.
"या बाळाच्या रूपानं गंगामाईनंच मला दिलेला हा प्रसाद आहे आणि तो मी माझ्याकडंच ठेवणार,' या भावनेनं सिद्रामनं ते बाळ स्वतःकडंच ठेवून घेतलं. सिद्रामची पत्नी सरिता हिलाही हा चिमुकला मिळाल्याचा फार आनंद झाला. दोघांनी मिळून बाळाचं नाव समुंद्य्रा असं ठेवलं. मग समुंद्य्रा वाढला, मोठा होत गेला, सिद्रामच्या घरचे सगळे संस्कार तो शिकत गेला. सिद्राम आणि सरिता हे दोघंही अडाणी. सिद्राम दिवसभर लोकांच्या नावेवर काम करायचा आणि सरिता मोठ्या व्यापाऱ्यांकडून मासोळी विकत घेऊन ती गल्लोगल्ली जाऊन विकायची. सहाव्या-सातव्या वर्षापासून समुंद्य्रा आपल्या आई- वडिलांना त्यांच्या कामात मदत करू लागला. दहाव्या वर्षापर्यंत तो कामात चांगला तयार झाला. आई नसेल तेव्हा आईचा व्यवसाय आणि बाबा नसतील तेव्हा बाबांचं काम तो एव्हाना चोखपणे करू लागला होता. बघता बघता वीस वर्षं संपत आली. त्यातच समुंद्य्राची आई मरण पावली. नात्यातल्याच असलेल्या पद्मिनी नावाच्या मुलीशी वडिलांनी समुंद्य्राचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर तीन वर्षांत समुंद्य्राचे बाबाही आजारामुळे समुंद्य्राला सोडून गेले. पाच वर्षांनंतर समुंद्य्राला मुलगा झाला. त्याचं नाव समुंद्य्रानं सिद्राम असं ठेवलं. वडिलांची आठवण म्हणून.

एकीकडं समुंद्य्राच्या संसारात त्याच्या आई-वडिलांची कमतरता होती; पण दुसरीकडं त्याच्या मुलामुळं त्याचं कुटुंब बहरून गेलं होतं. समुंद्य्राची पत्नी पद्मिनी कर्करोगानं आजारी पडली. चार वर्षांनंतर तिचा आजार एवढा वाढला की त्यातच तिचं निधन झालं. समुंद्य्रावर हा खूप मोठा आघात होता. स्वतः समुंद्य्रालाही दम्याचा आजार आहे. वातावरणात बदल झाला की त्याचा हा आजार अधूनमधून डोकं वर काढत राहतो. समुंद्य्राच्या मुलाचं नाव गुड्डू. तो समुंद्य्राची खूप काळजी घ्यायचा. आता तोच समुंद्य्राच्या म्हातारपणाची काठी होता. गुड्डू बारा वर्षांचा झाला. तो घरोघरी जाऊन मासोळीची किरकोळ विक्री करायचा. समुंद्य्रा एके दिवशी रात्री आपलं सगळं काम आटोपून गुड्डू घरी येण्याची वाट पाहत बसला होता. तोच पणजीतल्या पोलिस स्टेशनमधून त्याला अचानक फोन आला ः""गुड्डू तुमचाच मुलगा का?''
समुंद्य्रा म्हणाला ः ""हो''
""मग ताबडतोब पोलिस स्टेशनला या,'' असं त्याला तिकडून सांगण्यात आलं आणि फोन बंद झाला. मासेविक्रीवरून त्या त्या परिसरात छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचे खूप वाद होत असतात, तसाच काहीतरी वाद झाला असेल आणि तो वाद पोलिस स्टेशनपर्यंत गेला असेल, असा समुंद्य्राचा समज झाला. समुंद्य्रा पोलिस स्टेशनमध्ये पोचला आणि बघितलं तर गुड्डू त्याला छिन्न-विच्छिन्न अवस्थेत पाहायला मिळाला.
तारुण्याच्या उंबरठ्यावरचा आपला मुलगा मृत्युमुखी पडलेला पाहून समुंद्य्राच्या पायांतलं त्राणच गेलं. "गुड्डूचा मृत्यू अपघातात झाला' असं समुंद्य्राला सांगण्यात आलं.

रक्तबंबाळ अवस्थेतल्या मुलाचा मृतदेह घरापर्यंत नेतानाचं वर्णन समुंद्य्रा करत असताना माझ्या अंगावरही काटा आला. समुंद्य्रानं वडिलांचाही मृत्यू पाहिला होता, त्या दुःखाहूनही हे अचानक कोसळलेलं दुःख मोठं होतं.
एव्हाना, रात्र बरीच झाली होती. त्या तशा रात्री समुंद्य्रा आणि मरण पावलेला गुड्डू हेच काय ते एकमेकांचे सोबती होते!
सकाळी गुड्डूवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुखवट्यानंतर चौथ्या दिवशी समुंद्य्राला कामावर जावंच लागलं. हातची नोकरी गेली तर पुढं काय खाणार, असा प्रश्नही त्याच्यापुढं होता. तेव्हापासून ते आजपर्यंत समुंद्य्रा आणि त्याचा समुद्र असा दोघांचा प्रवास अविरत सुरू आहे. जेव्हापासून समुंद्य्राची कमाई सुरू झाली होती, तेव्हापासून तो आपल्या कमाईतली आर्धी रक्कम अनाथ मुलांना वाटायचा. त्याचं हे काम आजही सुरू आहे. हे काम तो पूर्वी स्वतःला समाधान वाटावं म्हणून करायचा आणि आता मुलाच्या आणि पत्नीच्या आत्म्याला शांती मिळावी या भावनेतून तो हे काम दर महिन्याला करतो. समुंद्य्रा गातोही छान...त्यानं गायलेले "चल अकेला, चल अकेला, चल अकेला...तेरा मेला पीछे छूटा राही, चल अकेला' हे गाणं आजही माझ्या काना-मनात रुंजी घालत आहे.

समुद्राच्या नितळ पाण्यासारखंच समुंद्य्राचं आयुष्य होतं. आपल्याच वडिलांच्या कामाच्या ठिकाणी समुंद्य्रानं काम सुरू केलं होतं. दिवसाला दहा रुपयांच्या कमाईपासून त्यानं केलेली सुरवात आज कालमानानं हजार रुपयांपर्यंत येऊन पोचली आहे. एवढीच काय ती त्याच्या कामाची किंमत असं लौकिकार्थानं म्हणता येईल...पण त्यानं त्याच्या आयुष्यात मोजलेल्या किमतीचं मोल कुणीच करू शकणार नाही. केवळ समुद्राची सोबत असलेला समुंद्य्रा तसा तेव्हाही एकटाच होता आणि आजही तो एकटाच आहे. मला किनाऱ्यावर आणून सोडल्यावर तो घरी निघाला.

मी म्हणालो ः ""तुमचं घर दाखवायला नेता का मला?''
त्यानं क्षणाचाही विलंब न लावता ""चला'' असं म्हणून आनंदानं मला त्याच्या घरी नेलं. अगदी छोटंसं घर. घरात भांडी कमी आणि हार घातलेले फोटोच अधिक दिसले. समुद्राच्या आतल्या भागात जशी कमालीची शांतता होती, तशीच शांतता समुंद्य्राच्या घरातही होती. एकीकडं माझ्याशी बोलत बोलत तो स्वयंपाकाचीही तयारी करत होता. काही वेळानं तो भात आणि साधं वरण असलेली दोन ताटं घेऊन आला. एक स्वतःला, एक मला. दहा-बारा दिवस मोठ्या हॉटेलातलं खाणं खाऊन उबगून गेलेल्या माझ्या जिभेला मायेनं, प्रेमानं दिलेले हे दोन घास मिळाले. त्या घासांची गोडी काही औरच. आमच्या गप्पा आता थांबल्या होत्या. मी कोण आणि तो कोण असली देवाण-घेवाण आता संपली होती; पण आमचं नातं मात्र संपण्यासारखं नव्हतं. ""पुन्हा कधी येता दादा?'' हे त्यानं त्याच्या शैलीत मला विचारलं. मी म्हणालो ः ""लवकरच येईन... जेव्हा केव्हा येईन तेव्हा तुला भेटल्याशिवाय जाणार नाही,'' असं म्हणून मी समुंद्य्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या पाणावलेल्या डोळ्यातून जणू समुद्रच झरू लागला...समुंद्य्राच्या केवळ डोळ्यांतल्या पाण्यातच नव्हे...तर, तर समुद्राच्या लाटांवरही त्याच्या बायको-पोराचे फोटो हेलकावे खात असलेले मला दिसत होते! मी समुंद्य्राच्या डोळ्यातल्या समुद्रात पार हरवून गेलो होतो...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sandeep kale write goa beach bhramanti live article in saptarang