दवाखान्याचा असाही 'नांदेड पॅटर्न' (संदीप काळे)

संदीप काळे Sandip98868@gmail.com
रविवार, 16 जून 2019

आपल्या गावासाठी काहीतरी करायचं, या हेतूनं ते सहा डॉक्‍टर-मित्र पहिल्यांदा एकत्र आले. त्यांनी छोटंसं रुग्णालय उभारलं आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आता ते रुग्णालय पंचक्रोशीत नावारूपाला आलं आहे. रुग्णसेवेच्या या "नांदेड पॅटर्न'विषयी...

आपल्या गावासाठी काहीतरी करायचं, या हेतूनं ते सहा डॉक्‍टर-मित्र पहिल्यांदा एकत्र आले. त्यांनी छोटंसं रुग्णालय उभारलं आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आता ते रुग्णालय पंचक्रोशीत नावारूपाला आलं आहे. रुग्णसेवेच्या या "नांदेड पॅटर्न'विषयी...

गेल्या रविवारी पाटनूरला माझ्या गावाकडं गेलो होतो. गावाकडं "घरोघरी रुग्ण' अशी अवस्था. अशुद्ध पाणी आणि सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असावी. त्यातच मोठे आजार असणाऱ्या लोकांचंही प्रमाण खूपच. आमच्या घरीच माझ्या काकूंचं मोठं ऑपरेशन झालं होतं. सहज बोलता बोलता मी काकांना विचारलं : 'ऑपरेशनला किती खर्च आला?'' त्यावर काका हसून म्हणाले : ' एकही रुपयाचा खर्च आला नाही.''
काका गंमत करत असावेत, असं मला वाटलं; पण काकांनी संपूर्ण तपशील सांगितला तेव्हा मलाही आश्‍चर्याचा धक्का बसला. दोन-अडीच लाख रुपये खर्च येणाऱ्या ऑपरेशनला एक रुपयाचाही खर्च आला नव्हता, हे वास्तव होतं. हे कसं घडलं याच्या मुळाशी मी जेव्हा गेलो तेव्हा मला कौतुक वाटलं...अभिमान वाटला.

नांदेड शहरातल्या दवाखान्यांचे अनेक किस्से कांदबरीचा विषय ठरतील असे आहेत. रुग्णांना कसं लुटलं जातं याची कितीतरी उदाहरणं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत. नांदेडच्या "डॉक्‍टर लाईन'ला आपण गेलो तर आणि तिथं असलेलं एकूण वातावरण पाहिलं तर "शहाण्या माणसानं दवाखान्याची पायरी चढू नये,' असं नक्कीच म्हणावंसं वाटेल.

ऑपरेशन मोफत कसं होऊ शकलं हे काकांनी सांगितलेल्या एकूण तपशिलावरून मला कळलं होतं; पण मला सविस्तर ऐकायची उत्सुकता लागली होती. माझ्या गावात माझा वर्गमित्र असलेला डॉक्‍टर बाळासाहेब बिऱ्हाडे आहे. वैद्यकीय क्षेत्रातली उच्च पदवी घेतल्यानंतर त्यानं नांदेडमध्ये मोठं खासगी रुग्णालय सुरू केलं आहे. आपल्या गावातला कुठलाही रुग्ण आला तरी रुग्णालयाच्या माध्यमातून त्या रुग्णावर तो सर्व खर्चानिशी मोफत उपचार करतो. बाहेरून लागणाऱ्या औषधांचा जो काही खर्च असेल तेवढाच खर्च रुग्णाला करावा लागतो. गेल्या जानेवारीपासून हा उपक्रम त्यानं सुरू केला आहे. मला माझ्या मित्राला अर्थात डॉक्‍टर बाळासाहेबांना भेटायची उत्सुकता लागली. घरातल्या भेटी-गाठी आटोपून मी नांदेडकडं निघालो.

नांदेडमध्ये शिवाजीनगर भागात "व्हिजन मल्टिस्पेशालिटी' नावाचा एक छोटासा बोर्ड लागलेला आहे. हा दवाखाना बाळासाहेबांनी सुरू केला आहे. एकाच गावातले म्हणून, आम्ही सोबत शिकलो म्हणून, एकत्र वाढलो म्हणून मला आणि बाळासाहेबांना एकमेकांविषयी खूप अभिमान आहे. त्या अभिमानापोटी आणि दवाखान्यात प्रथमच गेल्यामुळे बाळासाहेबांनी माझं छान स्वागत केलं. अधिकचा वेळ न घेता मी थेट मोफत उपचार करण्यासंदर्भातली विचारणा बाळासाहेबांकडं केली. ते जसजसं सांगू लागले, तसतसा हा विषय खूप मोठा आहे, असं मला जाणवलं.
डॉक्‍टर बाळासाहेब यांच्यासमवेत त्यांचे आणखी पाच डॉक्‍टर-मित्र आहेत. डॉ. सचिन सरोदे (यांनी आपलं येळेगाव नावाचं गाव पूर्णपणे रुग्णसेवेसाठी दत्तक घेतलं आहे), डॉ. रजनीश सुन्नप (खांडेगाव), डॉ. अजय लोकडे (वडगाव), डॉ. प्रमोद अंबाळकर (कावलगाव), डॉ. दयानंद मोर्या (अष्टूर) अशी त्यांची नावं आहेत. स्वत: बाळासाहेबांनी आपलं पाटनूर हे गाव रुग्णसेवेसाठी दत्तक घेतलं असल्याची माहिती मला देण्यात आली.

जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या उपक्रमाला भरभरून प्रतिसादासोबतच भरभरून आशीर्वादही मिळाले आहेत. पाटनूरमधला आमचा दुसरा मित्र प्रभाकर बिऱ्हाडे आणि रवी मोरे हे या सगळ्या टीमच्या नियोजनात गुंतलेले आहेत. या सहाही डॉक्‍टरांनी आपापल्या गावाचं ऋण फेडण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. बाळासाहेबांशी बोलताना काही रुग्ण आले. मी रुग्णालयाच्या बाहेर आलो. बाहेर उभ्या असलेल्या दोन-तीन रुग्णांना भेटलो. त्यात प्रामुख्यानं मोठ्या आजाराची समस्या असलेले रुग्ण होते. साईनाथ गायकवाड नावाचा रुग्ण मला म्हणाला : 'गेल्या 15 दिवसांपासून माझी बायको किडनीच्या आजारानं त्रस्त आहे. हा आजार टोकाला गेला होता. उपचार करून घ्यायची आमची ऐपत नव्हती. तिच्यावर इथं मोफत उपचार सुरू आहेत म्हणून ती वाचली आहे. इथं आमच्या गावचे डॉक्‍टर आहेत आणि गावातला कुठलाही रुग्ण आला तर ते मोफत उपचार करतात.''
गयाबाई जाधव ही महिला काविळीच्या आजारानं त्रस्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून ती या रुग्णालयात उपचार घेत आहे.
गयाबाई मला म्हणाल्या : 'आमच्या पाहुण्यांमुळे मी मोफत उपचारांची संधी घेऊ शकले. दुसऱ्या दवाखान्यात गेले असते तर खूप खर्च आला असता व तो माझ्या आवाक्‍यापलीकडचा होता.''

"पाहुण्यांमुळे उपचारांची संधी घेऊ शकले,' या गयाबाईंच्या वाक्‍याचा अर्थ मला काही कळला नाही. दवाखान्याच्या बिलिंगच्या डायरीपेक्षा दत्तक घेतलेल्या गावांची डायरी मी तपासत होतो. संपूर्ण जानेवारी महिन्यापासून प्रत्येक गावातल्या किमान 50 ते 60 रुग्णांच्या वेगवेगळ्या आजारांची तिथं नोंद करून ठेवली होती. अशीच एक अजून डायरी होती. तिच्यात गावांचा उल्लेख होता आणि त्या गावांच्या रुग्णांकडूनसुद्धा काहीही पैसे घेण्यात आलेले नव्हते. रुग्णाचं नाव, गाव, आजार असा सर्व तपशील त्यात होता. "पाहुण्यांमुळे मला संधी मिळाली' आणि "या गावांची यादी' हे दोन्ही प्रश्न माझ्या मनात होते. बाळासाहेबांची केबिन रिकामी होती. मी आतमध्ये जाऊन चर्चेला पुन्हा सुरवात केली. "गावांचं मेन्टेन केलेलं रजिस्टर' आणि "मला पाहुण्यांमुळे संधी मिळाली' हे दोन प्रश्न मी बाळासाहेबांपुढं ठेवले. बाळासाहेब म्हणाले : 'आम्ही सात मित्रांनी मोफत उपचारासाठी दत्तक घेतलेली सात गावं, त्या गावांतून येणारे लोक अत्यंत काबाडकष्ट करणारे आणि खूप गरीब. नांदेडसारख्या शहरात साध्या बेडचा खर्च एका दिवसासाठी हजार-दीड हजाराच्या घरात जातो. एका रुग्णाला साधा आजार जरी असेल तरी त्याचं निदान समजून घेण्यासाठी दोन-तीन दिवस दवाखान्यात राहावं लागतं. हातावर पोट असणारे लोक चार-पाच हजारांएवढी रक्कम - तीही दोन-तीन दिवस तपासणी करून रोगाचं निदान करण्यासाठी - कुठून आणणार? आपल्या गावातून अनेक व्यक्ती इतर गावांतल्या व्यक्ती आमच्याकडं पाठवायच्या. "तुम्ही व्हिजन हॉस्पिटलमध्ये जा, तिथं कमी खर्चात इलाज करून देण्यासाठी आम्ही सांगतो', असा त्यांचा त्यांना सांगावा असायचा. या गावातल्या सांगण्यावरून येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. आम्हा सहाही डॉक्‍टरांच्या सहाही गावांच्या सांगाव्यातून हे रुग्ण यायचे. मग आम्ही एक निकष ठरवला. आम्ही दत्तक घेतलेल्या सात गावांमधून ज्या कुण्या व्यक्तीचा संदर्भ देऊन नातेवाईक दवाखान्यात उपचारासाठी येतील, त्या रुग्णाच्या बिलामधून 50 टक्के सूट देण्याचा निर्णय आम्ही घेतला. अशी गावं आता "50 टक्के सूट'ची सेवा घेत आहेत. येत्या जुलैअखेरपर्यंत हाच आकडा शंभरापर्यंत जावा, या अपेक्षेतून आम्ही एक वेगळं स्वप्न यानिमित्तानं जपलं आहे. लोकांची सेवा घडावी, हा यामागचा हेतू आहे.''

संध्याकाळी मी उर्वरित पाचही डॉक्‍टरांना भेटलो. आमच्या गावचे प्रभाकर बिऱ्हाडे आणि मोरे हेही समवेत होते. सगळ्यांशी गप्पाटप्पा केल्यावर एक बाब लक्षात आली की, या सगळ्यांना आपल्या गावासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्या तळमळीतून त्यांनी उभारलेलं काम हे नांदेडमध्ये समाजसेवेचा वेगळा पॅटर्न उभा करत आहे.
त्यांनी सुरू केलेलं काम हे साधं नाही, हे त्यांच्या ध्यानी-मनीही नाही. ते आपलं काम सातत्यानं रोज करत आहेत, तेही निखळ आनंद, समाधान मिळवण्यासाठी. दवाखान्याच्या क्षेत्रात बदनाम झालेली नांदेडची प्रतिमा सुधारण्यासाठी हे सहा डॉक्‍टर-युवक खारीचा वाटा नक्कीच उचलत आहेत. हे सहाही जण सर्वसामान्य घरातून आलेले. कुणी मजुराचा मुलगा, तर कुणी शेतकऱ्याचा मुलगा. कुणी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेलं...

आपलं गावं सोडून आणि काहीतरी बनून आपल्या गावाची सेवा करण्याचं एक वेगळं धाडस यानिमित्तानं हे सहाही जण करत आहेत. आरोग्य हा सगळ्यात गंभीर प्रश्न. आरोग्यासंदर्भातले ग्रामीण भागात निर्माण होणारे प्रश्न खूप धक्कादायक आहेत. हे प्रश्‍न सोडवता सोडवता अनेक कुटुंबं उद्‌ध्वस्त होण्याच्या बेतात आलेली असतात, हे नव्यानं सांगायला नको. या सहा तरुणांसारखे डॉक्‍टर जर गावागावात निर्माण झाले तर आरोग्याचे गावातले प्रश्न नक्कीच सुटतील.

आपल्या गावासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या प्रत्येक युवकासाठी या सहा जणांची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. माणूस कुठंही असला तरी त्याला आपल्या गावाविषयी ओढ, आपुलकी, आदर नक्कीच असतो. त्या आपुलकीतून सतत काहीतरी करत राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं. काहींना ते शक्‍य होतं आणि काहींना ते शक्‍य होत नाही. या सहाही डॉक्‍टरांनी एक वेगळा "नांदेड पॅटर्न' यानिमित्तानं राज्यातल्या युवकांपुढं ठेवला आहे. नांदेडच्या इतिहासात याची नक्कीच नोंद होईल.
"समाजसेवा म्हणजे काय; तर आपल्या आसपास असणाऱ्या किमान चार लोकांची आपण गरज बनून ती पूर्ण करणं,' हे महात्मा गांधी यांचं वाक्‍य बहुतेकांना माहीत आहे. मात्र, ही समाजसेवा जर समूहाच्या माध्यमातून झाली तर त्याचा सुपरिणाम चिरंतन टिकणारा असतो. इतिहासात नोंद होण्यासारखा असतो. हेच चिरंतन टिकणारं काम या युवकांनी घडवलं आहे. आपल्या गावासाठी काहीतरी करायचं आहे, या हेतूनं हे सहा मित्र पहिल्यांदा एकत्र आले. त्यांनी एक छोटंसं रुग्णालय उभारलं आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आता ते रुग्णालय पंचक्रोशीत नावारूपाला आलं आहे.
नांदेडमध्ये असंख्य रुग्णालयं आहेत. रुग्णालयांच्या या गर्दीत या सहा डॉक्‍टरांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या दोन युवकांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून उभं केलेलं रुग्णालय सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. या सर्वांना मनापासून शुभेच्छा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sandeep kale write nanded pattern bhramanti live article in saptarang