नर्मदेच्या कुशीत... (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

भक्तिभावानं परिक्रमा करणारे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी नर्मदेच्या तीरावर परिक्रमा करणारे या दोघांच्या पारड्यात नर्मदा कसं पुण्य टाकते, हे काही सांगता येणार नाही; पण नर्मदेच्या तीरावर असणारं प्रत्येक लेकरू हे माता नर्मदेला आपलं लेकरू वाटत असावं आणि त्याच वात्सल्यातून ती आपल्या लेकरांना कुरवाळत असावी.

मध्य प्रदेशाच्या कुणीही प्रेमात पडावं, असंच तिथलं सौंदर्य आहे. मनमोहक सौंदर्य. उज्जैन, इंदूर आणि ओंकारेश्वर ही त्या राज्यातली तीन सौंदर्याची बेटंच जणू. इतिहासाच्या पाऊलखुणा इथंच अधिक दिसतात. मोठमोठे राजवाडे, सराफा बाजारातलं रात्रीचं खानपान, अहिल्याबाई होळकर यांची दूरदृष्टी असलेले प्रकल्प...इथला नजारा जगण्यात अधिकचा उत्साह भरतो. उज्जैन, इंदूर करून मी ओंकारेश्वरला आलो. नर्मदा नदीच्या अपार सौंदर्याचं दर्शन इथं ओंकारेश्वरीच घडतं. ध्रुव भट यांनी लिहिलेल्या "तत्त्वमसि' या कांदबरीतले नर्मदापरिक्रमेचे संदर्भ भारावून टाकणारे आहेत. गरीब आदिवासींकडं केवळ मिठाच्या खड्यावर भूक भागवणारा फकीर काय...वाघाच्या पिलांना सोडून देणारा बितूबंगा काय किंवा सुपेरिया काय...अशी असंख्य व्यक्तिचित्रं या प्रवासात जागजागी भेटतील असं वाटत होतं...सगळं सोडून भणंग होऊन वेगळ्या अर्थानं समृद्ध करणारी ही परिक्रमा जगण्याचे अन्वयार्थ बदलून टाकणारी अशीच. आज नर्मदेच्या पाण्याकडं आणि तिथल्या अमर्याद निसर्गाकडं पाहून मी अगदी भारावून गेलो. नर्मदेच्या काळ्याभोर अथांग पाण्याचा थांग कुणालाही लागणार नाही; तसंच इथल्या निसर्गाच्या अद्भुत लीलाही कुणाच्या शब्दांत न सामावणाऱ्याच...

माझी परिक्रमा सुरू झाली. हाताशी वेळ कमी असल्यानं "शॉर्टकट परिक्रमा' हा एकच पर्याय माझ्याकडं होता. ओंकारेश्वराच्या भोवती बोटीद्वारे प्रदक्षिणा घालायचा निर्णय मी घेतला. आठ वर्षांचा मुलगा बोट चालवत होता. संतू नेमाणे असं त्याचं नाव. परिक्रमा करताना लोकांची ने-आण करण्यासाठीच्या तीन छोट्या छोट्या बोटी या मुलाच्या आहेत, असं त्याच्याशी बोलल्यानंतर कळलं. एका बोटीवर वडील काम करतात, दुसऱ्या बोटीवर भाऊ आणि तिसऱ्या बोटीवर संतू. संतू अत्यंत शांत मुलगा. मी जेवढे प्रश्‍न विचारीन तेवढ्याच प्रश्नांना तो मोजकीच उत्तरं द्यायचा. एका बाजूला उंच टेकडीवर ओंकारेश्वराचं मंदिर आणि दुसऱ्या बाजूला टेकडीवर असलेलं गाव आणि त्याच्यामधून चाललेली आमची नाव...अत्यंत शांतपणे आमचा जलप्रवास सुरू होता. काही अंतरावर गेल्यावर दिसलं की गोदावरीचा आणि नर्मदेचा संगम त्या ठिकाणी झालेला आहे. विशाल पात्र आणि अत्यंत मनमोहक निसर्गसौंदर्य!
नर्मदेवर इतकं भरभरून का लिहिलं गेलं आहे हे कळलं.
***
मी बोटीतून उतरलो आणि जंगलाच्या दिशेनं चालायला लागलो. एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला जंगल...बेडाघाट, कान्हाचं जंगल. अफाट सौंदर्य...काही वेळानंतर एक साधूबाबा दिसले. तापमान 46 डिग्रीइतकं आणि अशा जळत्या उन्हात जवळपास निर्वस्त्रावस्थेतले हे साधूबाबा स्वतःभोवती अग्नी प्रज्वलित करून जप करत बसले होते. कुणीही अवाक्‌ व्हावं असं ते दृश्‍य.
साधूबाबांना ध्यानमग्नतेतून जागं करावं का? त्यांच्याशी बोलावं का? ते कुठले आहेत हे त्यांना विचारावं का? हिंमत होईना. ध्यानभंग झाल्यामुळे संतप्त वगैरे झाले तर? पुराणातल्या काही शापकथा आठवल्या!
मात्र, या साधूबाबांशी नंतर बोलायचंच अशी खूणगाठ मनाशी बांधली.

संतूला या साधूबाबांविषयी विचारलं; पण त्याला फार काही माहीत नव्हतं. मग मी निघालो, थोडा पुढं गेलो. नर्मदेच्या कडेला काही महिला दगड वेचत होत्या. गुळगुळीत, छान छान आकारांचे - फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये केलेल्या सजावटीतून ज्यांचं दर्शन होतं - आकर्षक दगड इथं अवतीभवती पाहायला मिळत होते. त्यातले अधिक आकर्षक दगड त्या महिला वेचून पिशवीत टाकत होत्या. त्यांच्याशी बोलावं या उद्देशानं मी त्यांच्याजवळ गेलो. आसपास माणसांची अजिबातच चाहूल नाही...अशा निर्मनुष्य वातावरणात त्या महिला निर्भयपणे दगड वेचत होत्या...ते ओझं घेऊन फिरत होत्या.
सानिका आणि राधिका या दोन बहिणी. त्या हे दगड विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. इथं येणाऱ्या भक्तांविषयी, वातावरणाविषयी दोघी बहिणी मोकळेपणानं बोलल्या. त्या साधूबाबांविषयीही मी त्या दोघींना विचारलं. त्यांनी सांगितल्यानुसार, सूर्य उगवताना ते साधूबाबा तिथं तपाला सुरवात करतात आणि सूर्य मावळताना त्यांचं तप थांबतं. हे असं अनेक दिवसांपासून चालत असल्याचीही माहिती त्या दोघींनी दिली. मी पुढं निघालो. साधूबाबांशी बोलण्याची आस माझ्या मनात कायम होती. वेगवेगळे दगड, शिंपले, अधूनमधून वेगवेगळ्या पक्ष्यांची ऐकू येणारी मधुर किलबिल, नर्मदेच्या पाण्यात तरंगणारे अनेक जलचर, वेगानं वाहणारा वारा...एक वेगळंच वातावरण यानिमित्तानं अनुभवायला मिळत होतं. पुढं गेल्यावर काही वेळानं पन्नाशीचं एक जोडपं भेटलं. हे पती-पत्नी उत्तर प्रदेशातून आलेले होते. आपल्या मुलासाठी बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी नर्मदास्नान करण्यासाठी ते आले होते, हे त्यांच्याशी बोलल्यावर कळलं. स्नानाबरोबरच ते तिथं पूजाही करणार होते. ती पूजा करणारी माणसं, पूजेची तयारी करणारी वेगळी माणसं असं सगळं वातावरण तिथं पाहायला मिळालं. नर्मदेनं जसं आपलं सौंदर्य कायम ठेवलंय, तसंच तिथल्या लोकांच्या हातांना मोठ्या प्रमाणात कामही दिलंय. इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी असते. जवळजवळ सर्वच पर्यटक दर्शनासाठी, नवस पूर्ण करण्यासाठी, परिक्रमेसाठी येत असतात. इथं केवळ सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या तुलनेनं फारच कमी असावी.

मी जसजसा पुढं जात होतो तसतशी, रहस्यकथांत भेटतात अशी, अनेक पात्रं मला भेटत गेली. झाडावर तप करणारे साधू, एका पायावर तप करणारे साधू, नदीच्या पाण्यामध्ये बसून तप करणारे साधू...असे अनेक साधूबाबा मला या प्रवासादरम्यान दिसले; पण दोन दिवस कुणाशीही बोलता आलं नाही. एके दिवशी एका साधूबाबांशी बोलणं झालं. सच्चिदानंद असं त्यांचं नाव.
तेजस्वी डोळे आणि वागण्या-बोलण्यात कमालीचा उत्साह असलेले हे साधूबाबा सहा वर्षांपासून महादेवाची भक्ती करत नर्मदेच्या काठावर बसलेले आहेत. आपल्या पदरात लोक जेवढं टाकतील तेवढंच खायचं आणि देवाचं नामस्मरण करत बसायचं ही त्यांची दिनचर्या.
""सध्या ध्यानावस्थेत आणि स्वप्नात भेटणारा देव मला एक ना एक दिवस प्रत्यक्षातही भेटेल अशी माझी श्रद्धा आहे,'' साधूबाबांनी मला सांगितलं.
हे साधूबाबा कुठले? इकडं का आले? अशा प्रश्‍नांची सविस्तर उत्तरं त्यांनी मला दिली नाहीत. मात्र,"तुम्हीसुद्धा या मोह-मायेपासून दूर राहा' असं ते मला बोलता बोलता अधूनमधून सारखं सांगत राहिले.
""मोहमाया म्हणजे काय?'' मी साधूबाबांना विचारलं.
साधूबाबा सांगू लागले ः ""हा सगळा संसार म्हणजे मोहमाया आहे. माझ्याकडं काय आहे? तर अंगावरचे हे दोन छोटे छोटे कपडे, एवढीच माझी "संपत्ती' आहे. मला कुणी नातलग नाहीत की मित्रही नाहीत. तो "जगाचा तारणहार' हाच माझ्यासाठी सर्वस्व आहे.''
साधूबाबांच्या या बोलण्यावर माझा विश्वास बसत नव्हता; पण त्यांच्या चेहऱ्यावर मधूनच झळकणारं स्मित, त्यांच्या डोळ्यातलं तेज, त्यांचा मनस्वीपणा, मोकळेपणा या सगळ्यांवरून वाटतं होतं, की ते जे काही सांगत आहेत ते नक्की खरं असणार! असो.
""तुम्ही इथं कसे आलात?'' मी विचारल्यावर अनेक कारणं त्यांनी मला सांगितली. त्यातलं मूळं कारण सांगताना साधूबाबा म्हणाले ः ""इथं आल्यावर मोक्ष कसा मिळतो, हे अनेक साधूबाबांकडून मी ऐकलं होतं. वयाच्या चौदाव्या वर्षी मी नर्मदेच्या कुशीत आलो. तेव्हापासून भक्ती, नामस्मरण, जप हेच माझं आयुष्य बनून गेलं आहे.''
याआधी कधी ऐकण्यात न आलेले अनेक अभंग, श्‍लोक मला त्यांनी ऐकवले. त्यातून त्यांची ईश्वरभक्ती, ईश्वरप्रेम याविषयीची तीव्रता जाणवत होती. हे साधूबाबा म्हणजे कर्नाटकातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याचा मुलगा. ""आयुष्याचं शेवटचं गणित काय आहे, तर माणूस जसा आला तसाच तो जाणारही आहे. माणसाला इकडं पाठवलं ते ईश्वरानं आणि तो जाणारही आहे ईश्वराकडंच, तर मग ईश्वराची भक्ती का करायची नाही?'' असा सवाल विचारून साधूबाबांनी जीवनाचं तत्त्वज्ञान माझ्यापुढं मांडलं. त्यांच्या ईश्‍वरभक्तीविषयी जाणून घेण्यात मला तसा रस नव्हता. मला रस होता तो त्यांच्या भूतकाळाविषयी आणि वर्तमानकाळात ते रोज कसं जगत आहेत हे जाणून घेण्याविषयी...पण त्याविषयी फार काही बोलायला ते तयार नव्हते. चिंतनाशी एकरूप झालेली माणसं फार बोलत नाहीत, याचं हे साधूबाबा म्हणजे उत्तम उदाहरण होतं, असं म्हणता येईल.
***

काही दिवसांत नर्मदेवर जे काही अनुभवलं, त्याला माझ्या आयुष्यात वेगळं स्थान आहे. सहजासहजी विस्मरणात जावेत असे हे अनुभव नसतात. नर्मदेविषयीची कृतज्ञता, तिच्या अथांगतेवर, तिच्या सौंदर्यावर जडलेलं प्रेम मी तिच्यापुढं नतमस्तक होऊन व्यक्त केलं. तीन महिन्यांच्या परिक्रमेनं माणसाला आयुष्याचा सूर गवसतो, असं पुराणात लिहिलेलं असल्याचं सांगतात. मात्र, जी माणसं आयुष्यभर या ना त्या स्वरूपात परिक्रमा करत असतील, त्यांचं आयुष्य या अनुभवातून किती बदलून गेलं असेल, भारावून गेलं असेल हे काही नव्यानं सांगायला नको. भक्तिभावानं परिक्रमा करणारे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी नर्मदेच्या तीरावर परिक्रमा करणारे या दोघांच्या पारड्यात नर्मदा कसं पुण्य टाकते, हे काही सांगता येणार नाही; पण नर्मदेच्या तीरावर असणारं प्रत्येक लेकरू हे माता नर्मदेला आपलं लेकरू वाटत असावं आणि त्याच वात्सल्यातून ती आपल्या लेकरांना कुरवाळत असावी.

नर्मदेच्या भोवती फिरणारी सगळी पात्रं माणसाला मोहित केल्याशिवाय राहत नाहीत. पुराणात ऐकलेल्या अनेक रहस्यकथांचा साक्षात्कार इथं होऊ लागल्यासारखं भासतं. इथं भेटलेल्या माणसांमध्ये, इथं आलेल्या अनुभवांमध्ये, इथल्या सृष्टीच्या अद्भुत सौंदर्यामध्ये मला एक वेगळाच आपलेपणा जाणवत राहिला. या नर्मदापरिक्रमेतून काय मिळालं असं जर कुणी विचारलं, तर मी म्हणेन की माझ्या अनुभवाला एक "धार' मिळाली आहे! माझ्यातला "मी' जरा परिपक्व झाला आहे असं मला वाटू लागलंय. ज्याप्रमाणे खूप रियाज केला की गाणं चांगलं जमून येतं, त्याचप्रमाणे असं म्हणता येईल की अशी वेगळी अनुभूती घेतली तर जगणं अधिक चांगलं जमेल!
नर्मदेच्या तीरावर उभा राहून मी तिच्यापुढं नतमस्तक झालो आणि तिचा निरोप घेतला. परिक्रमेच्या माध्यमातून भेटलेली सगळी माणसं आणि त्यांचं निरागस
प्रेम मला सतत सोबत करत राहील. या परिक्रमेदरम्यान जी ठिकाणं पाहिली, तिथं विज्ञानाचं, आधुनिकतेचं वारं जराही नसल्यामुळे तिथलं सौंदर्य शेकडो वर्षं अबाधित राहिलेलं आहे. परिक्रमेतून मिळणाऱ्या पुण्यापेक्षा मिळणारी अनुभूती जास्त महत्त्वाची. परिक्रमेहून नेहमीच्या धावपळीच्या आयुष्यात मी परतलो खरा; पण तिथल्या मधुर आठवणी मनात सतत तरळतच राहतील.

आयुष्यात एकदा तरी संपूर्ण परिक्रमा करायलाच हवी, ही खूणगाठ यानिमित्तानं मनाशी बांधली गेली...अन्‌ या परिक्रमेच्या विचारापासून लवकर मुक्ती मिळणार नाही, ही खूणगाठही...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com