पुण्याचं काम... (संदीप काळे)

संदीप काळे Sandip98868@gmail.com
रविवार, 19 मे 2019

प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना वाटण्याचा मार्ग...

प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना वाटण्याचा मार्ग...

कोल्हापूरमधला प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपून मी पुण्यात मुक्कामाला आलो होतो. पुण्यात दिवसभर कार्यालयीन कामं आटोपून मुंबईला जाण्यासाठी पुणे स्टेशनकडं मी पायी पायी निघालो. सगळा रस्ता माणसांच्या वर्दळीत हरवलेला. रिक्षाचालकांनी पूर्णपणे व्यापून गेलेला. शाळा-कॉलेजला सुट्या असल्यानं चालता येण्याजोगी तरी स्थिती होती. जेव्हा शाळा-कॉलेजं सुरू असतील तेव्हा इथले हाल कसे असतील हे विचारायलाच नको. पुणे स्टेशनजवळ एक भलीमोठी रांग लागली होती. तिथं अनेक जण हातात अन्न घेऊन खात असलेले मला दिसले. बरं, हे अन्न घेणारे कोण? तर भिकारी, झोपडपट्टीवासी. ही खूप गरीब माणसं असावीत, असं त्यांच्या कपड्यांवरून वाटत होतं.

समोर जेवायला वाढणारी तरुण मुलंही मला दिसत होती. मी आसपासचा सगळा कानोसा घेतला आणि या अन्न वाढणाऱ्या मुलांशी बोलायचा प्रयत्न केला; पण ती मुलं आपल्या कामात इतकी व्यग्र होती, की त्यांच्या कामात मी व्यत्यय तर आणत नाही ना, असं मला वाटलं. जेवणासाठी जी रांग लागली होती, त्या रांगेत मी बाजूला जाऊन बसलो. जे जेवण करत होते, त्यांच्याशी बोलावं असा माझा विचार होता; पण जेवणारेही वाढणाऱ्यांइतकेच खाण्यात दंग होते. एक तरणाबांड पोरगा पाय लांब करून मस्तपैकी चवीनं जेवत होता. त्याच्याकडं मी सारखं पाहत होतो. त्यामुळे त्याला वाटलं, की मलाही भूक असावी; पण मी लाजेपोटी खात नसणार.
तो म्हणाला : ""अहो, भूक लागली आहे ना? मग लाजता कशाला? घ्या ना, खा.''
मी म्हणालो : ""नाही, मला नाही जेवायचं. मला तुमच्याशी बोलायचं आहे.''
त्याला वाटलं असेल, समोर एवढा चांगला मेनू असताना खायचं सोडून याला एवढं बोलायचं काय पडलंय? मात्र, खाण्यापेक्षा माझी बोलण्याची भूक अधिक आहे, हे त्याला कसं सांगणार!

संतोष मिरसे हा वर्ध्याचा तरुण. पुण्यात असतो. इथं रिक्षा चालवून गावाकडं आपल्या आई-वडिलांना आर्थिक मदत तो करतो.
दिवसभर काबाडकष्ट करायचे, धर्मशाळेत राहायचं आणि जिथं मिळेल तिथं आनंदी वृत्तीनं खायचं असा त्याचा दिनक्रम.
संतोष म्हणाला : ""कधीमधी याच भागात असं मिष्टान्न खायला मिळतं.''
संतोषच्या हातातल्या प्लास्टिकच्या प्लेटमध्ये दोन-तीन भाज्या, एक गोड पदार्थ, वरण-भात होता. "हे लोक इथं का अन्न वाटतात?' असं संतोषला विचारल्यावर तो म्हणाला : ""पुण्यात नवीन आहात का हो, तुम्ही? पुण्यात तुम्ही दुपारच्या वेळी कधीही या, तुम्हाला चांगलं जेवण मिळेल, तेही फुकटात.''
फुकटात जेवण असल्याचं ऐकून मला जरा धक्काच बसला. संतोषच्या आजूबाजूला सगळी काबाडकष्ट करणारी, हातावर पोट असलेली माणसं होती. या मुलांनी दिलेल्या अन्नाचा, "अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणून ती अगदी मनापासून आस्वाद घेत होती.

ती मुलं अन्न वाढत होती, त्यांनी मोठमोठी भांडी इथं भरून आणली होती. त्या भांड्यांमधलं अन्न आता संपत आलं होतं. एक मुलगी आणि चार-पाच मुलं हे अन्न वाटण्याचं काम करत होती. मी त्या मुलीकडं गेलो आणि तिला विचारलं : ""आता मी आपल्याशी बोलू शकतो का?''
ती अगदी नम्रपणे म्हणाली : ""हो. बोला.''
""रोज हे अन्न का वाटता? कुठून आणता? हे अन्न मिळतं कुठून?'' असे अनेक प्रश्न मी तिला विचारले. तिनं माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्यातून त्या मुलीची नम्रता दिसत होती. तिची उच्च असलेली कौटुंबिक परिस्थिती ऐकूनही मी चक्रावून गेलो.
या मुलीचं नाव आहे भावना रांका. ती डेक्कन परिसरात राहते.
अन्न एकत्रित करून ते गरजूंना वाटणाऱ्या "रॉबिनहूड आर्मी' या संस्थेविषयी भावनानं वर्षभरापूर्वी फेसबुकवर वाचलं होतं, ऐकलं होतं. त्या संस्थेची सगळी माहिती घेऊन भावनानं अन्न वाटणाऱ्या पुण्याच्या या चळवळीत सहभागी व्हायचं ठरवलं. आठवड्यातून किमान पाच दिवस दोन ते तीन तास भुकेलेल्यांना अन्न देण्याची भूमिका भावनाची असते आणि ती प्रत्यक्षातही येते.

भुकेलेल्या लोकांना अन्न वाटणाऱ्या चळवळीची व्याप्ती किती मोठी आहे, हे जेव्हा मला भावनानं सांगितलं तेव्हा मी अवाक्‌ झालो. सन 2014 मध्ये "नलघोष' या नावाच्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीनं "रॉबिनहूड'ची दिल्लीत सुरवात केली. दिल्लीत असलेला हा प्रकल्प जगातल्या तेरा देशांत चालतो आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांतही गरजू लोकांपर्यंत अन्न पोचवण्याचा हा उपक्रम सुरू असून, त्यात तरुणांचा सहभाग सर्वाधिक आहे.

एकट्या पुण्यात 600 ते 700 तरुण सगळ्या भागांत या चळवळीचं काम करतात. व्हॉट्‌सऍप आणि सोशल मीडियावरून हे काम चालतं. ज्या भागात अन्न शिल्लक राहतं, त्या भागातला चळवळीमधला तरुण शिल्लक राहिलेलं अन्न गरजू लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पुढाकार घेतो. पुण्यात वाकड,
पिंपरी-चिंचवड, बाणेर, बावधन, खराडी, औंध, सांगवी, हिंजवडी आदी तेरा ठिकाणी हे काम चालतं. आवनी आणि भावनी या दोघी अन्नदान करणाऱ्या चळवळीचं नेतृत्व करतात. गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून त्या या चळवळीला खूप मोठा हातभार लावत आहेत. जिथं जिथं अन्न शिल्लक राहतं, तिथं तिथं "रॉबिनहूड'शी संबंधित असलेल्या तरुणाईची आठवण लोकांना येते. मग त्या भागातले लोकप्रतिनिधी, पोलिस ठाणे, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून "रॉबिनहूड'च्या इथल्या तरुण-तरुणींचा संपर्कक्रमांक मिळवायचा आणि त्यांना "अन्न शिल्लक आहे, घेऊन जा' असा निरोप द्यायचा. हा निरोप मिळाल्यावर अर्ध्या तासात ही टीम येते आणि अन्न घेऊन जाते. अलीकडं "जस्ट डायल'मुळे हे खूप सोपं झालं आहे.

भावना म्हणाली : ""मीच नाही; तर माझ्यासारख्या शेकडो जणांचे हात गरिबांची भूक भागवण्यासाठी पुढं येत आहेत. पुण्याचं काम म्हणजे काय? तर हेच ते काम आहे, असं मला वाटतं. हल्ली माझ्या मित्रांनी आपला वाढदिवस केक कापून साजरा करायचं सोडून दिलंय. ते अशा गरीब लोकांना आपल्या वाढदिवसाच्या पैशांमधून अन्नाचे चार घास कसे खाऊ घालता येतील, याचा विचार करत असतात.''

या चळवळीत सहभागी असलेल्या काही तरुणांनी मला सांगितल्यानुसार, "दुपारी हॉटेलांमध्ये उरलेलं अन्न, रात्री उरलेलं अन्न, समारंभाच्या कार्यक्रमांत उरलेलं अन्न वाया जाऊ नये यासाठी लोकांचे फोन येत असतात आणि अलीकडं लोकांमध्ये अन्न वाया जाऊ नये यासाठी खूप जागरूकता झाली आहे. एकट्या पुण्यात एका आठवड्यात किमान 15 ते 20 हजार लोकांना अन्नवाटप करण्यात आलं आहे.'
एकीकडं म्हटलं जातं, की तरुणाई वाया गेली आहे; तर दुसरीकडं मात्र हीच तरुणाई गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करत आहे, याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. खर्च करणं आणि वेळ देणं; तेही गरिबांसाठी आणि भुकेलेल्यांसाठी; याला कदाचित संस्कारही कारणीभूत असतील. प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे मात्र माहीत नसतं. पुण्यात अनेक तरुण छंद म्हणून या चळवळीत सहभागी झाले आहेत. ज्यांना इच्छा आहे या चळवळीमध्ये काम करायची, त्यांच्यासाठीसुद्धा अत्यंत सोपा मार्ग आहे. मी या भागातल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये फिरलो. तिथं अशी अनेक मुलं अन्न घेऊन येताना दिसत होती. मला पहिल्यांदा अन्न वाटताना भेटलेली मुलं सगळी पुण्याच्या बाहेरची होती. पुण्यात कुणी शिकायला आलंय, कुणी जॉब करतंय, तर कुणी शिक्षण पूर्ण करून जॉब लागण्याच्या प्रतीक्षेत आहे, कुणी वडिलांचा बिझनेस करतंय, तर कुणी नोकरीनिमित्त काही दिवसांसाठी परदेशात जाणार आहे. अशी सगळी वेगवेगळ्या प्रकारची, गरीब, श्रीमंत, वेगवेगळ्या धर्मांची तरुण मुलं या चळवळीत सहभागी झाल्याचं मला दिसलं. जिथं जिथं अन्न वाटलं जातंय, तिथल्या तिथल्या अशा अनेक ठिकाणी मी फेरफटका मारला. एका हातानं लोक अन्न खात होते आणि दुसऱ्या हातानं आशीर्वाद देत होते!

भावना रांकासोबत असलेला शुभम परमार मला म्हणाला : ""एखाद्या भुकेल्या माणसाला जर आपण अन्न दिलं तर तो किती आनंदानं खातो...त्याच्या डोळ्यांत आनंदाचे भाव दिसतात, आशीर्वादाचे भाव दिसतात. यापेक्षा अधिकचं सुख काय असू शकतं? मी गेल्या अनेक दिवसांपासून या ग्रुपमध्ये सहभागी आहे. माझ्यामुळे अनेक मुलं इथं जोडली गेली, हे काम वाढलं पाहिजे ही आमची भूमिका आहे.''
"रॉबिनहूड' ही संस्था कुणी स्थापन केली, त्याच्या मुळापर्यंत मी गेलो नाही. कारण, त्याच्या मुळापर्यंत जाऊन सगळी स्टोरी मिळवून लिहायची तर शब्द अपुरे पडतील! मात्र, अलीकडं ज्या चळवळी आहेत, जी चांगली कामं होत आहेत, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम म्हणून या तरुण मुलांची पाठ जेवढी थोपटावी तेवढी कमीच.
हा तरुणवर्ग खूप मनापासून हे काम करत आहे
स्वत:चा पैसा आणि वेळ खर्च करून आत्मिक आनंदासाठी झटणाऱ्या या तरुणाईला सलाम केलाच पाहिजे...

या चळवळीतली मुलं केवळ हेच काम करत नाहीत; तर दात्या लोकांकडून धान्य गोळा करून गरीब वस्तीत ते वाटणं, गरीब-अनाथ मुलांना शिकवणं अशा अनेक कामांत या तरुणाईचा सहभाग असतो. आपल्या भागातल्या गरजूंना मदत करणं हीच खरी समाजसेवा हे या तरुण मुलांनी दाखवून दिलं आहे. त्यांचं पुण्यातलं हे सर्व काम पाहताना रात्रीचे 11
कधी वाजले ते कळलंच नाही. आता भावना, शुभम आणि सर्व मित्रांचा निरोप घेण्याची वेळ आली होती. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यासमोर पुन:पुन्हा येत होता.
श्रीमंत असलेलं पुणं किती गरीब आहे, हेही यानिमित्तानं अनुभवायला मिळालं...

पाप आणि पुण्य यांचं मूल्यमापन कसं होतं, हे पुराणात वाचलं आहे. जर पुण्याची परिभाषा कुणाचं हित करणं ही असेल, तर ही तरुण मुलं जे काम करतात त्यांना आणि या चळवळीचं नेतृत्व जे कुणी करतात त्यांनाच ही पुण्याची पावती द्यावी लागेल. मला या मुलांच्या धडपडीत उद्याचा सामाजिक देश दिसत होता...!

भूखे बच्चों की तसल्ली के लिए
मॉं ने फिर पानी पकाया देर तक....
अशी वेळ आता कुणावरही येऊ नये यासाठीची तरुणाईची ही धडपड काळजात घर करून राहते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sandeep kale write pune bhramanti live article in saptarang