मी वाडा बोलतोय... (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

देशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय..."मी असा कसा पोरका झालो? माझं वय ते काय? का माझ्यावर अन्याय झालाय?' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय.

दुष्काळाच्या निमित्तानं मी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. निवडणुका हेही एक कारण असलं तरी मुख्य कारण लोकांच्या भावना दुष्काळात कशा होरपळून निघतात आणि त्याला कारणीभूत कोण, याचा शोध घेणं हाच या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश आहे. "दुष्काळ आवडे सर्वांना' या आपल्या पुस्तकात पत्रकार पी. साईनाथ यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळाचं जे गंभीर चित्र रेखाटलेलं आहे, त्या चित्रापेक्षाही कठीण परिस्थिती राज्यात आहे. हा संपूर्ण महिना आणि पुढचे दोन महिने 75 टक्‍क्‍यांहून निम्म्या महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा थेंबही मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. If a single drop of water is less in this universe, whole universe will feel thirsty...हा विचार
सर्वांना माहीत आहे. खेड्यापाड्यांची आजची अवस्था पाहिली की लोक "सिंगल ड्रॉप'लाही मोताद असल्याचं चित्र आहे.

जसजसा सूर्य अधिक कोपेल-तापेल, तसतशी दुष्काळाची दाहकता आणि तीव्रता अधिक जाणवू लागेल. ""जिथं माणसाला पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी मरावं लागणार अशी परिस्थिती आहे, तिथं जनावरांच्या पाण्याचं काय घेऊन बसायचं?'' असा हतबल; पण तितकाच जळजळीत प्रश्‍न जालन्यातल्या संतोष जावडे यानं उपस्थित केला. संतोष याच्याकडं पंधरा जनावरं आहेत. जालना शहर जिथं सुरू होतं, तिथंच संतोष याची थोडी-बहुत शेती आहे. संतोषच्या जनावरांचा गोठाही तिथंच. जनावरांना पाणी आणि चाराही नाही म्हणून संतोषनं आपली सगळी जनावरं बाजारात विकून टाकली. संतोषच्या जनावरांना कवडीमोलाचा भाव आला. ज्या ठिकाणी संतोष आपली गुरं बांधत असे, त्याच ठिकाणी तो खाट टाकून बसला होता. साहजिकच, त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख, नाराजी लपत नव्हती.
शेतकरी आणि त्यांची जनावरं यांच्यात एक वेगळ्याच प्रकारचा लगाव, एक वेगळ्याच प्रकारचा अनुबंध असतो. कालपर्यंत गोठ्यात असलेली जनावरं आज आपल्यात राहिलेली नाहीत, याचं संतोषला एकीकडं दु:ख आहे; तर ही जनावरं आपल्याकडं पाय खोडून मरण्यापेक्षा कुठंतरी आनंदानं राहतील, याचा दुसरीकडं दिलासाही आहे.
***

आम्ही एकेक तालुका, एकेक जिल्हा करत पुढं निघालो. कुठं जनावरांचा तुडुंब भरलेला बाजार; तर कुठं चाऱ्याचा भाव गगनाला भिडलेला. मंठ्याच्या बाजारात माणसांपेक्षा जनावरांची गर्दी जास्त दिसत होती. आपल्या काळजाचा तुकडा असलेली बैलजोडी मागेल त्या किमतीला देऊन कसाबाच्या दावणीला बांधण्यासाठी आज कुणीही मागं-पुढं पाहत नव्हतं. नांदगाव इथून आलेला सचिन लोहकरे हा बाजारात आणलेल्या आपल्या बैलांची शेवटची पूजा करत होता. उन्हाची तीव्रता इतकी होती की त्याच्या साध्या मोबाईलमधून काढलेला बैलांसोबतचा फोटो दिसतही नव्हता. बाजूला बैल विकत घेणारा व्यापारी "बैल गाडी में घालने का है।' असं म्हणत निघण्यासाठी गडबड करत होता. ही बैलजोडी म्हणजे सचिनच्या वडिलांची शेवटची आठवण होती. दोन वर्षांपूर्वी सचिन आपल्या गावी परत आला होता. सचिन याचे वडील परशुराम यांनी आत्महत्या केली होती. आपल्या आईसह औरंगाबादला राहून छोटीशी नोकरी करत असलेल्या सचिननं गावाकडं स्थायिक होऊन आपल्या वडिलांचा शेतीचा वारसा पुढं नेण्याचं काम अविरतपणे सुरू ठेवलं होतं. वडिलांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला असावा, हे वडिलांच्या पश्‍चात दोन वर्षांनंतर सचिनच्या लक्षात आलं होतं.
आता सचिननं आपलं सगळं विकून पुन्हा औरंगाबादला जायचा निर्णय घेतला होता. कारण, दुष्काळाशी चार हात करण्याची त्याची हिंमत नव्हती. तो खचला नव्हता; परंतु स्वत:ला सावरता सावरता तो कमालीचा दमला होता. त्यातूनच त्यानं शेत विकलं, घर विकलं आणि वडिलांचा जीव असणारी बैलजोडीही विकली. अर्थात सचिनच्या आईच्या मनाविरुद्ध हे सगळं घडत होतं. असे कितीतरी "सचिन' या बाजारात स्वत:चा स्वाभिमान विकताना मी पाहिले. या सचिनची दाहकता, या बाजारात स्वाभिमान विकणाऱ्यांची करुण कहाणी दोन ओळीत तरी माध्यमांमध्ये यावी, असंही कुणाला वाटत नसेल का? कारण, जसा राज्यकर्त्यांच्या संपूर्ण यंत्रणेनं आपला मोर्चा निवडणुकीकडं वळवला, तसाच माध्यमांनीही. यातही ती मागं कशी राहतील? गावोगावी असणारी अस्वस्थता मन हेलावून सोडणारी होती. कुठल्या निवडणुका आणि कुणाचा पक्ष? ज्यांच्या पोटाला एक वेळचं जेवण मिळत नाही, त्यांना याच्याशी काही देणं-घेणं नाही. ज्यांच्याकडं जातीचं, पैशाचं आणि पक्षाचं भांडवल आहे अशाच भांडवलदारांची ही निवडणूक.
***
जालन्यानंतर आम्ही परभणीत शिरलो. परभणीमध्ये जांब फाट्यावर एका तरुणानं छोटंसं फडकं लावून एक हॉटेल सुरू केलं होतं. हॉटेलमध्ये खिचडी, भजी, चहा आणि लिंबू-सरबत असे चार पदार्थ तयार होते. पदार्थांना मायेची चव होती. मी आणि माझा सहकारी विकास जाधव त्या छोट्याशा हॉटेलमध्ये बसलो. हॉटेल सुरू केलेल्या तरुणाचं नाव होतं सचिन जाधव. घरी एकरभर शेती, तीही पडीक. गावात एक रुपयाचं काम मिळत नाही म्हणून सचिननं परभणी-हिंगोली रोडवर आपला हा छोटासा व्यवसाय सुरू केला. मात्र, दिवसभरात केवळ 50-60 रुपये इतकाच नफा सचिनला मिळत होता. त्यामुळे आपले आई-वडील आणि मुलं यांचं काय करावं, असा प्रश्न चिंतेनं ग्रासलेल्या सचिनला पडला होता. सचिनशी बोलल्यावर मला दुसरी बाजूही कळली. सचिनच्या वयाची सगळी तरुण मुलं नोकरी-व्यवसायाच्या नावाखाली शहरात गेली. त्या मुलांसोबत बहुतांश कुटुंबांचंही शहराकडं स्थलांतर झालं. सचिन कमी शिकलेला; त्यामुळे त्याला आपलं गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरात जाण्याची भीती वाटत होती. सचिनची कहाणी आणि त्याचे पाणावलेले डोळे आजही माझ्या मनात घर करून आहेत.
***
परभणीहून मी हिंगोलीला निघालो. हिंगोलीत कळमनुरीला काही वेळ थांबून तिथल्या मुस्लिम व्यापाऱ्यांशी बोललो. रस्त्यावर एका कोपऱ्यात कळमनुरी बसस्टॅंडसमोर चॉंद पाशा या युवकानं फळविक्रीचं
छोटंसं दुकान उभारलं आहे. या दुकानात त्यानं सर्व पक्षांचे झेंडे लावले आहेत. सर्व पक्षांच्या नेत्यांचे फोटोही त्याच्या दुकानात आहेत. "आपल्याला निवडणुकांशी काही देणं-घेणं नाही,' असं तोच सांगत होता, तरीही त्यानं हे सगळे फोटो आणि झेंडे का लावले आहेत, हे ऐकून घेण्याची उत्सुकता मला नक्कीच होती. मी त्याला बोलतं केलं. तो म्हणाला ः ""माझं दुकान रस्त्यावर. कुणी एखादा यायचा आणि "आमच्या पक्षाचा झेंडा का लावला नाही?' असं म्हणून मला धमकावत बसायचा. माझं पोट रोजच्या व्यवसायावर चालणारं. आज चार पैशांचा धंदा झाला तरच मी माझ्या लेकरा-बाळांचं पोट भरू शकेन. या रोजच्या किरकिरीमुळे मी वैतागलो आणि ते सर्व झेंडे आणि फोटो लावण्याचा निर्णय घेतला.'' चॉंदचं सर्वात शेवटचं वाक्‍य मी कधीच विसरू शकणार नाही. तो म्हणाला ः ""इथल्या राजकीय दलालांना माणुसकीपेक्षा पक्षांचे झेंडे महत्त्वाचे आहेत. हे झेंडे जोपर्यंत आहेत तोपर्यंत इथं माणुसकी दिसणार नाही.'' आमचं मनापासून स्वागत करून चॉंदनं त्याच्यातल्या माणुसकीचं दर्शन आम्हाला घडवलं होतं.
***

घरं आणि वाडे बंद होऊन शहरं कशी भरली गेली हे आम्ही पुढं अनुभवलं... मी कळमनुरीहून सांडस या गावी पोचलो. गावाच्या सुरवातीलाच एक भलामोठा वाडा पाहिला. वाड्यात शिरलो. एक वयस्कर गृहस्थ खाटेवर शांतपणे झोपलेले होते. मी त्यांना हाक मारताच ते खडबडून जागे झाले. मी त्यांच्या ओळखीचा चेहरा आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. "एवढ्या मोठ्या वाड्यात दोन-तीन महिला आणि तुम्ही एकटेच कसे काय?' असं मी त्यांना विचारलं. श्‍यामराव निरगुडे असं या आजोबांचं नाव. ते माझ्याशी बोलू लागले...म्हणाले ः ""सगळ्या भावंडांपैकी-चुलतभावंडांपैकी माझ्या वयाचं कुणीही शिल्लक राहिलं नाही. माझ्या भावांची मुलं, त्यांची मुलं असे सगळे जण जिकडं तिकडं आपापल्या कामात गुंतलेले आहेत. जवळ जवळ सगळेच जण शहरांत स्थायिक आहेत. अनेकांना वर्षातून एकदाही यायला वेळ नसतो. बिचारे सुखात राहोत सगळे जण...'' आजोबा बोलायचे मध्येच थांबले. त्याच वाड्याच पांडुरंग निरगुडे यांची भेट झाली. ते या वाड्याच्या वैभवाविषयी बोलले. म्हणाले ः ""पाच-सहा सख्खे, चुलतभाऊ, त्यांची पाच-पंचवीस मुलं आणि शंभरपेक्षा अधिक नातलगांचा मोठ्ठा वेलू! सगळे अगदी गुण्यागोविंदानं या वाड्यात राहायचे. दसरा, दिवाळी, सणवार, उत्सव या सगळ्यात वाड्याचं वैभव इतकं उजळून निघायचं की काही विचारू नका. या वाड्याला कुणाची नजर लागू नये, असं सतत वाटायचं. जसजसा काळ पुढं गेला, तसतसं वाड्याचं माणसाळलेपण संपुष्टात आलं. दोनशे आणि तीनशे संख्या असलेल्या वाड्यात आता बोटावर मोजण्याइतकीच माणसं आहेत. बाकी सगळी माणसं शिक्षण, व्यवसाय, नोकरी यानिमित्तानं शहरात गेली.''
"कुणीतरी माझ्या परिवारातला सहकारी मला भेटायला येईल का,'
अशी वाट हा चिरेबंदी, नक्षीदार वाडा शांतपणे पाहत बसलाय जणू...
या गावातल्या कित्येक वाड्यांचं वैभव शहरीकरणामुळे असंच संपलंय.
***

मी सांडसहून थेट नांदेड जिल्ह्यात पोचलो. रस्त्याची वाईट अवस्था, पिण्याला पाणी नाही, नोटाबंदीमुळे छोटे व्यवसाय संपलेले...अशी कितीतरी उदाहरणं पाहत-अनुभवत मी रस्ता कापत होतो. लोक जे सांगत होते ते सारं अचंबित करणारं होतं. मी पाटनूर या गावी पोचलो. पाटनूरमध्ये असलेल्या बापूराव देशमुखांच्या वाड्याची महती अशीच ऐकलेली-अनुभवलेली होती. देशमुखांच्या वाड्यात मी शिरलो...केवढा मोठा तो वाडा...बाप रे. आतमध्ये गेलो तर बाहेर कसं यावं असा प्रश्न! देशमुखांच्या घरातले दुसऱ्या पिढीतले हनुमंतराव देशमुख हे पाडव्यानिमित्त वाड्याच्या बाहेर गुढी उभारत होते.
ते आत्ताच वाडा उघडून घरात आले आहेत, हे त्यांच्या पायांच्या ठशांवरून जाणवत होतं. त्यांनी गुढी उभारली. गुढीची पूजा केली. थोड्या वेळानं त्यांनी माझ्याशी बोलायला सुरवात केली. या वाड्याचं वैभव, या वाड्यात चालणारं गावातलं राजकारण, किती तरी माणसांचा या वाड्यात सतत असलेला वावर...अशी सारी हकीकत त्यांनी माझ्यापुढं मांडली. ते म्हणाले ः ""आजच्या पिढीला, नव्या मुलांना खेड्यात राहायला आवडत नाही. इथल्या वैभवात त्यांचं मन रमत नाही. त्यामुळे आमच्या वाड्याला जसं कुलूप लागलंय, तसेच कितीतरी वाडे ओस पडले आहेत. कुणी नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेलंय, कुणी शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर गेलंय, तर गावात रोजगार नाही म्हणून आपल्या छोट्याशा घरालाही कुलूप लावून अनेकांनी शहराचा रस्ता धरलाय.''
देशमुखांच्या वाड्याकडं पाहिल्यावर मनात विचार येतो की एवढ्या मोठ्या वैभवाला कुणाची नजर लागली असेल? देशमुखांचं वैभव कमी झालंय का? तर अजिबात नाही. ते कितीतरी पटींनी वाढलंय; पण देशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय..."मी असा कसा पोरका झालो? माझं वय ते काय? का माझ्यावर अन्याय झालाय?' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय.
ज्याचं नातं त्या वाड्याशी आहे, त्याला त्याची भाषा कळतही असावी.
***

दुष्काळाची दाहकता कमी नाही. तो वरपासून खालपर्यंत सर्वत्र आहे. दुष्काळ म्हणजे केवळ पाणी, रस्ते, वीज एवढंच मर्यादित नाही, तर दुष्काळ म्हणजे चांगल्या शिक्षणाचा अभाव, चांगल्या यंत्रणेचा अभाव आणि दुष्काळ म्हणजे चांगल्या व्यवस्थेचाही अभाव. सरकारनं हे केलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा मानसिक दुष्काळ आहे, हे मला सातत्यानं या दौऱ्याच्या माध्यमातून जाणवत राहिलं. सरकारच्या माध्यमातून आलेल्या दुष्काळाशी एकवेळ सामना करता येईलही, तो हटवता येईलही; पण मानवनिर्मित दुष्काळाचं काय, याचं उत्तर मात्र मला मिळत नव्हतं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com