उमेद माणुसकीची (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

रोठा. वर्ध्यापासून सात-आठ किलोमीटरवरचं गाव. पारधी समाजातल्या अनाथ मुलांसाठी इथं चालवलं जातं "संकल्प वसतिगृह'. मंगेशी पुसाटे-मून यांना एका रेल्वेप्रवासात ही मुलं भीक मागत असलेली दिसली आणि त्यानंतर सुरू झाला या अनाथांना सनाथ करण्यासाठीचा प्रवास.

मुंबईहून वर्ध्याला निघालो...आरक्षणाचा डबा असूनही डब्यातली गर्दी काही विचारू नका. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही भागांत रेल्वेनं प्रवास करायचा म्हणजे बऱ्याच असुविधांना सामोरं जावं लागतं. आरक्षण असूनही खूप त्रास होतो. अनेक वेळा या दोन्ही भागांत प्रवास करत असताना कुणाला तरी बसण्यासाठी जागा द्यावीच लागते. बरं, केवळ जागा देऊन भागत नाही, तर त्या व्यक्तीच्या मोठेपणाचे किस्सेही वर ऐकून घ्यावे लागतात...कधी कधी तर टीसी आपली जागा कुणाला तरी विकतो आणि हक्कानं आपल्या अर्ध्या जागेवर कब्जा करतो, असाही अनुभव येतो. असे खूप किस्से सांगता येतील. असो.

...तर त्या दिवशी रेल्वेच्या डब्यात माझ्यासमोरच्या आसनावर खादीचे कपडे घातलेली एक महिला सात-आठ मुलांसह बसली होती.
दादर सुटलं तशी मुलांची चुळबूळ वाढायला लागली. कदाचित त्यांना भूक लागली असावी. कल्याणला चार मुलं गाडीत चढली. सर्व प्रवाशांच्या पायाखालची घाण अंगावरच्या कपड्यांनी ती मुलं साफ करत होती. माझ्यासमोर बसलेल्या मुलांची आणि साफ करणाऱ्या मुलांची नजरानजर झाली. त्यांनी एकमेकांना प्रेमानं मिठी मारली. दोन जिवलग खूप वर्षांनी भेटावेत, तशी ही कडकडून झालेली भेट. दुसऱ्या डब्यात असणाऱ्या आणखी काही मुलांना त्या साफ करणाऱ्या मुलांनी बोलावून घेतलं. या सर्वांचा आनंदोत्सव सुरू झाला. मुलांच्या गप्पाटप्पांमध्ये इगतपुरी कधी आलं कळलंच नाही. ही मुलं कोण आहेत? यांना एकमेकांना भेटून एवढा आनंद का झाला? सोबत असणाऱ्या महिलेची ओळख "ही माझी आई' म्हणून सगळी मुलं आपल्या मित्रांना का करून देत होती? यांसारखे अनेक प्रश्न मला पडले. साफसफाई करणारी ही सर्व मुलं मुंबईकडं परतण्यासाठी इगतपुरीला खाली उतरली. भरल्या डोळ्यांनी ती एकमेकांना निरोप देत होती. आता मला कळलं की मुंबईहून गाडी निघाल्यावर या मुलांची चुळबूळ का वाढली होती ते. त्यांना मुंबईतून बाहेर पडणं जरा अवघड जात होतं, म्हणून त्यांची चुळबूळ वाढली होती.

मला राहवलं नाही. मी समोर बसलेल्या महिलेला विचारलं ः ""कोण होती ती मुलं? आणि ही मुलं कोण आहेत?'' भावुक झालेली ती महिला स्वतःला काहीशी सावरत म्हणाली ः ""ही मुलं आणि ती खाली उतरलेली मुलं मिळून रेल्वेत भीक मागायची. मुंबईत अनेक ठिकाणी सामूहिक चोऱ्या करायची. मला एकदा ही मुलं अशीच रेल्वेत भेटली. त्यांना मी विश्वासात घेतलं. त्यांची ही अवस्था का झाली, याची सर्व कहाणी मी त्या मुलांकडून ऐकली. या मुलांनी काहीतरी शिकावं या उद्देशानं मी त्यांना माझ्या गावी वर्ध्याला घेऊन आले. सर्वप्रथम मला तिथं त्यांच्यावर माणुसकीचे संस्कार करावे लागले आणि पुन्हा शिक्षण...'' ती महिला जे काही सांगत होती, ते एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे होतं. ती महिला उच्चशिक्षित, स्वतः नोकरदार, पती शासकीय नोकरीत, वडील देवराव पुसाटे हे सधन शेतकरी, सासरी आणि माहेरी कशाचीही कमतरता नव्हती. दोन वर्षांपूर्वी प्रवास करताना या महिलेला भीक मागणारी काही मुलं दिसली. त्यांची दर्दभरी कहाणी तिनं जाणून घेतली... त्या मुलांशी बोलताना तिला खूप वाईट वाटलं. कुणीतरी विदर्भातून या मुलांना विकत घेऊन मुंबईत भीक मागायच्या कामाला लावलं होतं...हे सगळं ऐकून तिच्या मनात या मुलांविषयी कणव निर्माण झाली. तिनं मनाशी काही आराखडा तयार केला. तिनं मुंबईची नोकरी सोडली आणि परत आपल्या माहेरी आली. त्या सर्व मुलांना सोबत घेतलं. वर्ध्याला येऊन तिनं तिथं भटक्‍यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केलं. ती सांगत होती आणि मी ऐकत होतो...

या महिलेचं नाव मंगेशी पुसाटे-मून. रात्री उशिरापर्यंत आमच्या गप्पा झाल्या. मंगेशी यांची सर्व कहाणी ऐकल्यावर मीही त्या कहाणीचा एक भाग होऊन गेलो. झोपताना मंगेशी म्हणाल्या ः ""दादा, उद्या चला आमच्याबरोबर आम्ही काय काम करतो ते पाहण्यासाठी.''
-मी म्हणालो ः ""मी तुमच्या निमंत्रणाची वाटच पाहत होतो.''
या माझ्या उत्तरावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला.
मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो; पण मन मात्र अजून जागंच होतं. ती मुलं एकमेकांपासून दूर जाताना त्यांच्या डोळ्यात एकमेकांविषयी जे प्रेम मला दिसलं, ते प्रेम हल्लीच्या टेक्‍नॉलॉजीच्या दुनियेत आम्ही पार विसरत चाललो आहोत. जिकडं पाहावं तिकडं मोबाईलमध्ये तोंड खुपसून प्रत्येक जण आपल्या एकट्याच्या जगात जगतोय...झोपेची वाट पाहत माझ्या मनात असे विचार येत राहिले...
***

सकाळी गाडी वर्ध्याला थांबली. मंगेशी यांचा "संकल्प प्रकल्प' ज्या छोट्याशा रोठा या गावात होता, ते गाव वर्ध्यापासून सात किलोमीटरवर आहे. विदर्भात जशी माणसं मनानं स्वच्छ आणि निर्मळ आहेत ना तसाच निसर्गही स्वच्छतेची चादर पांघरल्यासारखा एकदम निखळ, निर्मळ. स्वच्छ निळं आकाश आणि कोवळ्या उन्हाचा लखलखता साज. वातावरणात लोणावळ्यासारखा गारठा होता. एकणूच, रमणीय सकाळ होती ती. गाडी थांबली. "आई आली, आई आली', असं म्हणत सगळ्या मुलांनी मंगेशी यांना गराडा घातला...शांत स्वभावाच्या मंगेशी अत्यंत भावनिक आणि धैर्यवानसुद्धा. सहा दिवसांनी त्या मुलांना भेटत होत्या. छोटी मुलं त्यांना भेटून भावनिक होऊन रडत होती. मंगेशी यांनाही अश्रू आवरत नव्हते. हे डोळे पाणावणं आतून आलेलं होतं. मंगेशी आपल्या वडिलांच्या अतिशय लाडक्‍या. वडील त्यांचे सर्व लाड पुरवायचे. आपल्या मुलीनं अनाथ मुलांना सोबत घेण्याबाबतचं काम स्वीकारू नये, असं त्यांचं मत होतं. मात्र, मंगेशीच्या हट्टापुढं त्यांचं काही चाललं नाही. मग वडिलांनी कामासाठी मंगेश यांना परवानगीच तर दिलीच; शिवाय आपली जमीनही या मुलांसाठीच्या प्रकल्पाकरिता मंगेशी यांना दिली. आपल्या पश्‍चात मंगेशी यांना त्रास होऊ नये, या हेतूनं त्यांनी हे पाऊल उचललं होतं..."ही पारधी समाजाची मुलं म्हणजे माणुसकीला कलंकच जणू' अशा दृष्टिकोनातूनच सुरवातीला या मुलांकडं पाहिलं जात असे. मोबदला देऊ केला तरी कुणी मदतीला येत नसे. त्यामुळे सगळं काही मंगेशी यांनाच करावं लागत असे. वडील गेले तो दिवस मंगेशी यांच्यासाठी पोरकेपणाचा पहिला दिवस होता. एकीकडं वडिलांच्या अंत्यसंस्काराची घाई; तर दुसरीकडं मुलांच्या रोजच्या व्यवस्थेसाठीची लगबग. या दोन्ही प्रसंगांना मंगेशी अत्यंत हिमतीनं सामोऱ्या गेल्या. मुलांचं सर्व आटोपून त्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी घरी गेल्या आणि पुढं स्मशानभूमीपर्यंतही गेल्या. रात्री झोपण्यासाठी आपल्या आईकडं अथवा कुटुंबीयांसमवेत न राहता मुलांसमवेत राहणं त्यांनी पसंत केलं. त्या रात्री जशी मंगेशी यांना वडिलांच्या आठवणींनी अश्रू अनावर होत राहिले. सर्व मुलंही जागीच राहिली. अशा अनेक प्रसंगांतून मंगेशी आणि मुलं यांच्यातले ऋणानुबंध दृढ होत गेले.
***

मंगेशी यांच्याकडं असणारी जवळजवळ सगळी मुलं ही पारधी समाजाची. ही मुलं म्हणजे अनेक महिलांना लग्नाच्या अगोदर झालेली मुलं. जन्मदात्रीकडून एक तर ही मुलं विकून टाकली जायची किंवा जन्मतःच त्यांचा त्याग केला जायचा. त्यानंतरच त्या "आई'ला पुन्हा समाजात घेतलं जात असे. एकट्या वर्ध्यामध्ये अठ्ठावन्न ठिकाणी पारध्यांच्या वस्त्या आहेत. मराठवाड्यापाठोपाठ आख्ख्या विदर्भात उर्वरित अकरा जिल्ह्यांत ही संख्या खूप मोठी आहे. या मुलांची मुंबईत होणारी तस्करी मंगेशी यांनी खूप जवळून पाहिली आणि त्यातून त्यांच्या ममतेला पान्हा फुटला...वडिलांच्या नंतर मंगेशी यांचे दोन्ही भाऊ - मिलिंद आणि मनीष- त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे मंगेशी यांची चिंता जरा कमी झाली. मधल्या काळात मुलांच्या संगोपनात सर्व पुंजी संपली होती. मंगेशी यांनी आपले सर्व दागिने विकले. मुंबईत असलेलं घर गहाण ठेवलं आणि ममतेचं व्रत अखंडपणे पुढं सुरू ठेवलं. आता दर महिन्याला, दर वर्षी मुलांची संख्या वाढत आहे. त्यांचा खर्च कसा करायचा, हा प्रश्न मंगेशी आणि त्यांच्या दोन्ही भावांसमोर आहेच आहे. कुणाकडं पैसे मागता येत नाहीत आणि मुलांना उपाशी ठेवता येत नाही अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मंगेशी यांनी एक नामी शक्कल लढवली. जे अकरा एकर शेत त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलं होतं, त्यातून फक्त दोन एकरांवर वसतिगृहासाठी त्यांनी काम केलं. बाकी नऊ एकर जमीन तशीच होती. त्या जमिनीतून मंगेश यांनी सोनं पिकवायला सुरवात केली. खाण्यासाठी लागणारं सर्व धान्य व भाजीपाला याच ठिकाणी पिकवला जाऊ लागला. विशेष म्हणजे, या प्रयोगामुळे वसतिगृहातल्या अनेक चिमुकल्यांना घामाचा अर्थ कळला...आजूबाजूला पडीक असणारी शेती शेतकरी नव्यानं कसू लागले. कारण, मंगेशी यांनी शेतात केलेल्या प्रयोगांतून या शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत गेली. कुठलीही शासकीय मदत नाही, कुणाचा चार पैशांचा आधार नाही की चांगलं काम करत असल्याबद्दलची कुणाकडून शाबासकी नाही. बळ फक्त एकाच आशेतून मिळायचं व ते म्हणजे चोरी करणाऱ्या, भीक मागणाऱ्या हातात पाटी आणि पुस्तक दिसायचं. आजही इथली परिस्थिती "मुलांना उद्या खाण्यासाठी काय द्यायचं,' अशीच आहे. मंगेशी यांच्या खूप मोठ्या कुटुंबाला आज तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातभाराची गरज आहे.

- मंगेशी म्हणाल्या ः ""सुरवातीच्या काळात तर आजूबाजूचे लोक खूप शिव्याशाप द्यायचे. "ही चोरटी मुलं इकडं कशाला आणली? आमच्या मुलांवर काही परिणाम झाला तर त्याला जबाबदार कोण?' असंही ऐकून घ्यावं लागलं. मात्र, इथं काहीतरी चांगलं काम सुरू आहे, असं आता तेच लोक मान्य करू लागले आहेत. या मुलांची आयुष्यं उभी करणं आणि त्यांच्यावर संस्कार करणं हा मी घेतलेला वसा आहे. आता कुणाची मदत येवो अथवा न येवो, मी हा वसा सोडणार नाही.''
मंगेशी यांचं आणखी एक रूप मी पाहिलं. मंगेशी यांना पारध्यांच्या आणि भटक्‍यांच्या या मुलांविषयी खूप आस्था आहे, आत्मीयता आहे. त्या मुलांच्या बाबतीत त्या खूपच हळव्या आहेत. मात्र, हाच हळवेपणा स्वतःच्या मुलांविषयी जातो कुठं, हा प्रश्‍न मला पडला. मंगेशी यांना दोन मुलं आहेत. मुलगा ऋतुज अकरावीत आहे आणि मुलगी ऋत्विजा आठवीत आहे. दोन्ही मुलं राजस्थानात शिक्षण घेत आहेत. ती सुटीत गावाकडं येतात, आईच्या कामाला हातभार लावतात आणि राजस्थानला परत जातात. मंगेशी कधीही या मुलांना भेटण्यासाठी राजस्थानला जात नाहीत. स्वतःच्या मुलांबाबत हा कसला निष्ठूरपणा, असाही प्रश्न माझ्या मनात होता...या प्रश्नांची उत्तर मंगेशीच्या आई कमल पुसाटे यांनी दिली. त्या म्हणाल्या ः ""आपल्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मंगेशीनं तिची दोन्ही मुलं बाहेरच्या राज्यात ठेवली आहेत. आपल्याच राज्यात जर ही मुलं ठेवली असती तर ती परत परत भेटायला आली असती म्हणून तिनं दोन्ही मुलं दूर राजस्थानात ठेवली आहेत...''
-मंगेशी ज्याप्रमाणे या अनाथ मुलांविषयी आपली आईची भूमिका पार पाडतात, त्याच प्रमाणे मंगेशीच्या आईही या मुलांच्या आजीची भूमिका पार पाडतात.
कुणाची मुलगी पळून गेली...कुणावर आत्याचार झाले...कुणाच्या घरी चोरी झाली...अशा सगळ्या वेळी विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागांतल्या भटक्‍यांमधले अनेक जातींचे पीडित आपल्या न्यायासाठी मंगेशी यांच्याकडं येतात. याचं कारण, ज्यांना न्याय हवा असतो त्यांची मुलं; तसेच त्यांच्या नातेवाइकांची मुलंही मंगेशी यांच्या "संकल्प वसतिगृहा'त राहतात; त्यामुळे ते निःसंकोचपणे मंगेशी यांच्याकडं न्यायासाठी येतात. भटक्‍या समाजातल्या अनेकांचा पोलिसांकडून केवळ संशयातून छळ होण्याची उदाहरणं आहेत. त्यातून बालगुन्हेगारी वाढते. अशी अनेक प्रकरणं मंगेशी यांच्याकडून ऐकायला मिळाली.

कुटुंबासारखं वातावरण, गुरुकुलला लाजवेल अशी शिस्त "संकल्प वसतिगृहा'त असते. या "संकल्प'सारखंच वातावरण घराघरात, शाळाशाळांमध्ये असतं तर किती चांगलं झालं असतं!
घामाचा अर्थ आणि ममतेचे संस्कार ही मुलांची आयुष्यभराची शिदोरी असते. आयुष्यभर पुरणारी ही शिदोरी बांधून देणारी उत्तम जागा पाहायची असेल तर एकदा रोठ्याला भेट द्यायलाच पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com