सुन्या सुन्या मैफलीत... (संदीप काळे)

संदीप काळे Sandip98868@gmail.com
Sunday, 10 February 2019

"कुणी मला पागल म्हणतं, कुणी सायको; तर कुणी वेडी प्रेमिका. मी अनेक वेळा अधिकाऱ्यांनाही भेटले. त्यांना माझी कैफियत सांगितली; पण संतोषला भेटू देण्यासंदर्भात त्यांनी कायदेशीर अडचणी दाखवल्या. आज ना उद्या तो बाहेर येईल, मला भेटेल, या आशेनं मी त्याची वाट पाहत आहे...''

"कुणी मला पागल म्हणतं, कुणी सायको; तर कुणी वेडी प्रेमिका. मी अनेक वेळा अधिकाऱ्यांनाही भेटले. त्यांना माझी कैफियत सांगितली; पण संतोषला भेटू देण्यासंदर्भात त्यांनी कायदेशीर अडचणी दाखवल्या. आज ना उद्या तो बाहेर येईल, मला भेटेल, या आशेनं मी त्याची वाट पाहत आहे...''

नवी मुंबईतल्या खारघरच्या सेक्‍टर - 36 चा भाग. "स्वप्नपूर्ती', "व्हॅलीशिल्प' असे निवासी प्रकल्प इथं आहेत. या ठिकाणचं वातावरण जणू काही लोणावळ्या-खंडाळ्यासारखंच. रोज सकाळी फिरायला जाण्याची मजा काही औरच. सकाळी माझे मित्र विनोद राऊत यांचा फोन आला ः "चला, निघू या' आणि आम्ही निघालो. सकाळचं धुकं एवढं होतं की समोरून येणाऱ्याचा चेहरा लवकर ओळखू येत नव्हता. रोजच्या वाटेनं आम्ही निघालो. "स्वप्नपूर्ती'च्या डाव्या बाजूला तळोजा जेल आहे. तळोजा जेलच्या कमानीला टेकू देऊन कुणीतरी पडलं होतं. आम्हाला वाटलं, असाच कुणीतरी व्यसनी माणूस असावा. तरी म्हटलं काय झालंय, नक्की कोण असेल, हे जवळ जाऊन पाहावं. जवळ गेलो आणि पाहतो तर काय; लांब केसांवरून लक्षात आलं की कुणीतरी बाईमाणूस आहे.

-मी त्या बाईला विचारलं ः ""तुम्ही कोण आहात? इथं काय करताय? काही अडचण आहे का?''
ती बाई दचकून उठली. तिच्यासोबत सामानाच्या मोठमोठ्या दोन पिशव्या होत्या. गळ्यात चार मणी, मोठं कुंकू, अंगावर मळलेले कपडे आणि बाजूला पडलेली फाटकी चप्पल.
ती बाई प्रत्युत्तरादाखल म्हणाली ः ""काही नाही, असंच झोपले इथं.''
ठिगळाला ठिगळ जोडलेली तिची गोधडी फाटकीच होती. या गोधडीनं थंडीचा बचाव कसा करत असावी ती...मनात प्रश्‍न आला.
आम्ही तिला पुन्हा विचारलं ः ""अहो, घरच्यांशी काही भांडण झालं आहे का तुमचं? तुम्ही रस्त्यावर का झोपला आहात अशा?'' ती थरथरत्या आवाजात म्हणाली ः ""ही माझी रोजचीच जागा आहे आणि मी माझ्या मर्जीनं इथं झोपलेय.'' तिचा करारी बाणा पाहून आम्ही तिथून पुढं निघालो. तळोजा जेलच्या एका बाजूनं छोटासा डोंगर आहे. त्या डोंगरावर जाणं हा आमचा नित्यक्रम. आज तो डोंगर चढत असताना त्या बाईचा विषय माझा पाठलाग करत होता. विनोद मला म्हणाले ः ""चल बाबा आता मुकाट्यानं. तुझ्यातला पत्रकार कधीही जागा होतो.'' मुंबईतल्या कॉमन मॅनसारखीच विनोद यांची प्रतिक्रिया होती. कारण, मुंबईत रस्त्यावर कुणी मरून जरी पडलं तरी त्याच्याकडं बघायला कुणाला फुरसत नसते. माझी अस्वस्थता वाढतच चालली होती, हे पाहून विनोद म्हणाले ः ""आपण खाली जाऊ आणि पुन्हा त्या बाईला भेटू या.'' आम्ही जाईपर्यंत ती बाई तिथून गायबही झाली होती. आम्ही त्या महिलेचा शोध घेत थोडंसं पुढं गेलो. जवळच असलेल्या स्मशानभूमीसमोर चहावाल्याची हातगाडी होती. त्याला विचारलं ः ""एक बाई इथून जाताना पाहिली का?''
तो म्हणाला ः ""ती वेडी? ती काय आत शेकत बसलीय...''
रात्री उशिरा कुणाला तरी अग्नी दिला होता; त्याच्या राखेभोवती असलेल्या उबेनं ती बाई आपली थंडी घालवण्याचा प्रयत्न करत होती. सरणाच्या धगीवर तिला ऊब घेताना पाहून माझ्या मनाची घालमेल झाली. आम्ही आतमध्ये आल्याचं पाहताच ती पुन्हा जेलच्या दिशेनं निघाली. एका नीटनेटक्‍या दगडावर ती बसली. आम्ही तिच्या एकदम मागं. तेव्हा तिनं आमच्याकडं दचकून पुन्हा पाहिलं. मी पुन्हा तिला विचारलं ः ""अहो, तुम्ही पुन्हा इथं का बसलात?''
आता मात्र तिला आमच्याबद्दल काही तरी शंका यायला लागली. ती म्हणाली ः ""तुम्ही का माझ्या मागं मागं येताय? काय हवंय तुम्हाला?''
तिचा चढलेला आवाज ऐकून आम्ही जरा दचकलो. चहावाला सांगत होता त्यानुसार ती तशी वेडी वगैरे काही वाटली नाही. अतिशय हुशार होती ती आणि स्वाभिमानीही. स्वाभिमान तिच्या डोळ्यांत दिसत होता. तिनं ज्या पद्धतीनं आम्हाला उत्तर दिलं, त्याच सुरात मी तिला म्हणालो ः ""हे पाहा, तुम्ही एक बाईमाणूस आहात आणि इतक्‍या सुनसान ठिकाणी एकट्या बसल्या आहात, काही अडचणीत आहात का, हे विचारण्यासाठी आम्ही तुमच्याकडं आलो आहोत. माणुसकीच्या नात्यानं...'' तिला मदत करण्याच्या हेतूनं आणि चांगुलपणानं आम्ही तिची चौकशी करत आहोत, हे तिच्या आता लक्षात आलं.
ती शांत स्वरात म्हणाली ः ""मला कुणाला तरी भेटायचं आहे आणि ज्याला भेटायचं आहे तो जेलमध्ये आहे.''
मी मध्येच म्हणालो ः ""अहो, पण अशा रस्त्यावर का राहताय तुम्ही? कुण्या नातेवाइकाकडं किंवा हॉटेलमध्ये का नाही उतरलात?''
त्यावर ती म्हणाली ः "नातेवाइकांकडं किती दिवस राहणार? गेल्या पाच वर्षांपासून मी या परिसरात आहे. इकडून तिकडं भटकते. "माझ्या नवऱ्याला मला भेटू द्या' अशी विनंती करते; पण मला कुणीही त्याला भेटू देत नाही.''
""तुमचा नवरा?'' मी आश्‍चर्यानं विचारलं.
""हो, माझा नवरा. तो जेलमध्ये आहे. शिक्षा भोगतोय.''
""कसली शिक्षा?''
आणि मग तिनं आपली कहाणी सांगायला सुरवात केली.
प्रेमप्रकरणाच्या अनेक वास्तव कहाण्या आपण अनेकदा वाचलेल्या असतात, पाहिलेल्या असतात; पण या बाईची स्टोरी काही औरच होती.
तिचं नाव आहे संगीता जाधव.

तिनं सांगितलेल्या कहाणीनुसार, ती मूळची सांगलीची. वडील एसटीत कामाला. आई शिक्षिका. बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना तिचं संतोष कांबळे नावाच्या मुलावर प्रेम जडलं. जेव्हा हे घरी कळलं, तेव्हा बरीच ओरड झाली. संगीताच्या दोन्ही भावांनी आपल्या मित्रांना घेऊन संतोषला खूप मारहाण केली. त्यात तो अनेक दिवस दवाखान्यात होता. संतोष आणि संगीता या दोघांना जितका विरोध होत गेला, तितकं त्यांचं नातं आणखीच घट्ट होत गेलं. एक दिवस दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि दोघंही मुंबईला जाण्याच्या हेतूनं सांगलीच्या बसस्टॅंडवर आले. रात्रीची वेळ होती. हे दोघं स्टॅंडवर येऊन गाडीची वाट पाहत होते. इकडं घरी संगीताच्या आईला कळलं की संगीता घरात नाही. मग सर्वांनी मिळून संतोषचं घर गाठलं. पाहिलं तर संतोषही घरी नव्हता. सांगलीतली बरीचशी ठिकाणं, हॉटेलं त्यांनी पालथी घातली. शेवटी ते बसस्टॅंडवर आढळले. तेव्हाही संतोषला खूप मार खावा लागला. संगीताचं हे सगळं प्रकरण बघून घरचे कमालीचे हताश होऊन गेले होते. पोरीनं आपलं नाक कापलं या भावनेतून घरातला प्रत्येक जण तिच्याकडं पाहत होता. हे आता थांबणार नाही, आपण आपलं गाव सोडलं पाहिजे, या भावनेतून संगीताच्या आई-वडिलांनी मुंबई गाठली. मुंबईला संगीताचे काका राहत होते. त्या आधारावर त्यांनी मुंबईला आपलंसं केलं. संतोषही मुंबईला आला. त्यानं संगीताचा शोध घेतला आणि एक दिवस संगीता त्याला भेटलीही. वर्षानंतर झालेली भेट पुन्हा त्या दोघांसाठी आनंददायी ठरली. संगीताची एकदम बदललेली लाईफ स्टाईल तिच्या घरच्यांच्या लक्षात आली आणि त्यामागची कारणं शोधायला त्यांनी सुरवात केली. एक दिवस संतोष आणि संगीता एकत्र असल्याचं तिच्या छोट्या भावाला कळलं. छोट्या भावानं मोठ्या भावाला आणि घरच्यांना तसं सांगितलं. संगीताला आणि संतोषला एकत्रित पकडायचं आणि संपवून टाकायचं म्हणजे ही कटकट कायमची मिटेल, अशा भावनेतून योग्य त्या वेळेची वाट संगीताचे कुटुंबीय पाहत राहिले. "मुंबई दर्शन'च्या निमित्तानं संगीताच्या घरचे सगळे एक दिवस बाहेर गेले. आपल्या घरच्यांनी आपल्यासाठी हा "प्लॅन' केलाय, हे संगीताला माहीत नव्हतं. तासाभरानंतर घरातली सगळी मंडळी परत आली आणि संतोष आणि संगीताला त्यांनी रंगे हाथ पकडलं. आज संगीताच्या घरच्यांच्या हातून संतोष मरणार, हे नक्की झालं होतं. सगळ्यांनी संतोषवर हल्ला केला. तो ओरडायला लागला. सगळी गल्ली जमा झाली. लोकही ओरडायला लागले. संतोष रक्तानं माखलेला होता.

संगीता पुढं सांगू लागली ः ""घरचे जेव्हा मला मारायला लागले, तेव्हा संतोष रागानं आणखी लाल झाला. बाजूला असलेली लोखंडी सळी त्यानं मला मारणाऱ्या मोठ्या भावाच्या डोक्‍यात घातली आणि भाऊ जागेवरच आडवा पडला. संतोष तिथून निसटणार, तेवढ्यात गल्लीतल्या लोकांनी त्याला पकडलं. खूप वेळानंतर पोलिस आले आणि रक्तानं माखलेल्या संतोषला तिथून घेऊन गेले. मग पोलिस स्टेशन, तारखा हे चालत राहिलं. संतोषला दहा वर्षांची शिक्षा झाली. ज्या दिवशी त्याला शिक्षा झाली, त्या दिवशी माझे सगळे नातेवाईक कोर्टात हजर होते. खरं तर या प्रकरणाला जातीय रंग दिल्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळलं होतं. त्यातून मला येणाऱ्या वेगवेगळ्या धमक्‍या होत्याच. मी सुनावणीच्या दिवशी कोर्टात येऊ नये यासाठी घरच्यांनी खूप आटापिटा केला; पण माझा हट्ट कायम होता. राजनंदिनी पालवे नावाची माझी मैत्रीण होती. तिला मी घरून निघतानाच फोन करून मंगळसूत्र आणायला सांगितलं होतं. संतोषला शिक्षा सुनावल्यावर त्याला बाहेर नेताना मी त्याच्या समोर गेले. मंगळसूत्र त्याच्या हातावर ठेवलं आणि ते माझ्या गळ्यात घालण्याची विनंती त्याला केली. माझ्या घरचे आणि इतर नातेवाईक विस्फारलेल्या नजरेनं ते सगळं पाहत होते; पण पोलिसांचा फौजफाटा पाहून समोर यायची कुणाची हिंमत झाली नाही. संतोषनं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं आणि जमलेल्या सगळ्या पोलिसांनी टाळ्या वाजवल्या. त्या घटनेला आज पाच वर्षं पूर्ण झाली. ज्या दिवशी संतोषनं माझ्या गळ्यात काळे मणी घातले, त्याच दिवशी तो माझा नवरा झाला होता. मी घरच्यांना मेले होते. तेव्हापासून आजपर्यंत अनेक वेळा संतोषची भेटही झाली. काही काम करण्याच्या निमित्तानं तो जेलच्या बाहेर येईल आणि त्याला बघता येईल यासाठी जेलच्या भोवती मी सारखी इकडून तिकडं फिरत असते. कुणी मला पागल म्हणतं, कुणी सायको; तर कुणी वेडी प्रेमिका. मी अनेक वेळा अधिकाऱ्यांनाही भेटले. त्यांना माझी कैफियत सांगितली; पण संतोषला भेटू देण्यासंदर्भात त्यांनी कायदेशीर अडचणी दाखवल्या. आज ना उद्या तो बाहेर येईल, मला भेटेल, या आशेनं मी त्याची वाट पाहत आहे. संगीताचे पाणावलेले डोळे दोघांच्या नात्यातली ओढ दाखवत होते...आपलं बाईपण, एकटेपण, भोवतीचा समाज आणि उघड्यावरती राहावं लागणं या कशाचीही तमा न बाळगता संगीता फक्त संतोषची वाट पाहत होती. ओशोंनी केलेली प्रेमाची व्याख्या मला आठवली ः "प्रेम म्हणजे दोन व्यक्तींमध्ये असंभव असं काही घडून जाणं...'

संगीता संतोषला भेटण्यासाठी आसुसलेली होती. मी जेलच्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांच्या मदतीनं संतोषलाही भेटलो. त्याच्याशी बोललो. दोघांची एकदा भेट घडवून आणली. एकमेकांना पाहून दोघंही खूप रडले. काही प्रसंग असे असतात की त्यांचं वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. त्यांना रडताना पाहून माझं तसंच झालं. आम्ही जेलच्या बाहेर आलो. संगीता धन्यवाद न मानता तिथून निघून गेली. आम्ही दोघं जण मात्र शांतपणे सगळी कहाणी डोळ्यासमोर आणत होतो. या सगळ्या प्रकरणानं संगीताचं मानसिक संतुलन काहीसं बिघडलं आहे, हे तेवढंच खरं. त्याचं कारण म्हणजे, सामाजिक रूढी-परंपरा. तिचं मन अजूनही शाबूत आहे. त्याचं कारण, त्याच्याभोवती तिची असलेली प्रेमाची गुंफण.

संगीताच्या वाट्याला आलेल्या या "सुन्या सुन्या मैफली'ला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न माझ्या मनाला पडतो. सामाजिक रूढी-परंपरा असतील तर प्रेमापोटी वेड्या झालेल्या संगीताला ठीकठाक करायला, हा समाज गेला तरी कुठं, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

शिक्षा भोगल्यावर संगीता आणि संतोष हे एकत्रित येतील की नाही हे माहीत नाही. मात्र, आज एकमेकांपासून खूप दूर असतानाही ते एकमेकांशी इतके समरस झाले आहेत की कायदा-जात-धर्म-समाज या गोष्टींनी फक्त लौकिकार्थानं त्यांना लांब ठेवलं आहे..त्या अलौकिक नात्याला सलाम करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यापुढं नव्हता..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sandeep kale write wardha bramanti live article in saptarang