
गुरुजींच्या चांगुलपणाची पेरणी...!
संदीप काळे
‘काय दुबई पाहता, एकदा बारामती पाहा,’ असे अनेक वेळा ऐकले होते. परवा दोन दिवस बारामतीला राहिलो. सर्व बारकाईने पहिले आणि थक्क होण्याशिवाय माझ्याकडं दुसरा पर्यायच नव्हता . बारामती म्हणजे विकासाचे साकार झालेले भव्यदिव्य स्वप्न आहे.
बारामती पाहून झाल्यावर एका कार्यक्रमाच्या निमिताने बारामतीमध्ये काही खरेदीसाठी फिरत होतो. मला एकदम लक्ष्मण जगताप यांची आठवण झाली. दर रविवारी भ्रमंतीचा लेख वाचून ते मला फोन करतात, माझ्यासोबत बारामतीमधले सुजित मासाळ नावाचे माझे एक मित्र होते.
सुजितला मी म्हणालो, ‘आपल्याला एका गुरुजींना भेटायचेय’, सुजित म्हणाला, ‘कोणाला भेटायचे?’, मी म्हणालो, ‘लक्ष्मण जगताप नावाचे एक सर आहेत.’ माझं बोलणं संपते न संपते तेवढ्यात सुजित मला म्हणाले, ‘ते ‘पुस्तक्या’ गुरुजी ना?’ मी म्हणालो, ‘म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता का?
’ ते म्हणाले, ‘हो लक्ष्मण जगताप सर ना, म्हणजे ते गुरुजी ना... सगळीकडे पुस्तकं वाटतात, शाळांमध्ये जाऊन व्याख्यान देतात, कट्ट्यावर बसलेल्या माणसांना पुस्तक वाटतात. ते आणि त्यांच्या शिक्षिका असलेल्या पत्नी दोघे जण... तेच गुरुजी ना?’ मी म्हणालो, ‘कदाचित तेच असतील.’ मी जगताप यांना फोन लावला.
मी त्यांना म्हणालो, ‘सर, मी बारामतीमध्ये आहे. आपल्याला भेटायचे आहे.’ ते म्हणाले, ‘कधी वेळ आहे आपल्याला?’, मी म्हणालो, ‘आत्ताच वेळ आहे.’ ते म्हणाले, ‘मला वेळ लागेल.’ मी म्हणालो, ‘किती वेळ लागेल,’ ते म्हणाले, ‘दोन ते तीन तास जातील.’
निराश होऊन मी म्हणालो, ‘मला असं वाटतं, या वेळेस आपली भेट होणार नाही.’ ते म्हणाले, ‘नाही, असं करू नका. मी एका ठिकाणी पुस्तके देण्यासाठी आलोय. ते आटोपले की येतो मी तिकडे.’ मी म्हणालो, ‘तुमचे लोकेशन पाठवा, मी येतो तिकडे.’ जगताप सरांनी सांगितलेल्या ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो.
मुलं प्रश्न विचारत होती. जगताप सरांना मला पाहून एकदम आनंद झाला. ते जोरात त्या मुलींना म्हणाले, ‘ते पाहा संदीपदादा आलेले आहेत.’ सर्व मुले माझ्याकडे बघायला लागली. मला मिठी मारून माझा हात हातात घेत जगताप सर माझ्याशी बोलत होते.
विद्या जगताप या जगताप सर यांच्या पत्नी. त्या मुलींना आपल्या थैलीमधले पुस्तक काढून त्यांच्या हातावर ठेवत होत्या. जगताप सर विद्या प्रतिष्ठानच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत; तर त्यांच्या पत्नी विद्या खडकी जि. प. शाळेत शिक्षिका आहेत.
बराच वेळ बोलणे झाल्यावर मी म्हणालो, ‘सर, आज सुट्टी असताना हे काम कसे काय?’ सर (९४२३२४९९९६) म्हणाले, ‘ही माझी किंवा माझ्या पत्नीची शाळा नाही. मी आणि माझी पत्नी गेल्या दहा वर्षांपासून जिथे रोज किमान दोन ते तीन तास वाचन चळवळीसाठी काम करतो.
राज्यातल्या अनेक शहरांत, अनेक उपक्रमांत अनेक संयोजक आम्हाला बोलवत असतात. अनेक मित्रांच्या नातेवाइकांच्या मदतीने आम्ही आज सातशेपेक्षा जास्त शाळेत जाऊन पोहोचलोय.’ मी जेव्हा जगताप यांच्याकडून हे सर्व ऐकत होतो तेव्हा मला सगळे आश्चर्य वाटत होते. सुटीला बाहेरच्या शहरात आणि रोज आसपासच्या गावात, बारामतीमध्ये काम करायची मोहीम ते हाती घेतात. आम्हाला बोलता बोलता सर पुन्हा त्यांच्या पत्नीच्या मदतीला गेले.
जगताप यांच्यासोबत असणारे शिक्षक आदिनाथ वाघमारे आणि राजेंद्र वाबळे मला सांगत होते, ‘या जोडीचं काम विचारू नका. दोघेही साने गुरुजींचा साक्षात अवतार आहेत.’ मी म्हणालो, ‘पण एवढी पुस्तके यांच्याकडे येतात कुठून?’ ते म्हणाले, ‘यांचे काम अगदी संत गाडगे महाराज यांच्यासारखे आहे.
ज्या गावात, ज्या भागात जातात तिथे अगोदर मुलांच्या माणसांच्या समोर जाऊन वाचन किती महत्त्वाचे आहे यावर भरभरून बोलतात, आणलेली पुस्तकं लोकांना वाटतात. मग त्याच भागात दारोदारी पुस्तकं मागतात. लोकं छान प्रतिसाद देतात. लोकं सुट्टीत मजा करायला महाबळेश्वरला जातात आणि हे दोघे महाबळेश्वरला सुट्टीत जास्त माणसे एकत्रित भेटतील, त्यांना वाचनाचे महत्त्व सांगता येईल या आशेने जातात.
रेल्वेत, बसमध्ये कुठेही गेले की जगताप सर आणि वाहिनी सुरू होतात.’ तेवढ्यात सरआले. ‘घरी जाऊ’ असा आग्रह त्यांनी धरला. आम्ही घराकडे निघालो. जाताना जगताप सर मला बारामतीमध्ये अनेक नव्याने करण्यात आलेल्या प्रोजेक्टविषयी सांगत होते. ते सारे प्रोजेक्ट पाहून मी अवाक् होत होतो.
माझे सहकारी आणि अभ्यासू पत्रकार मिलिंद संगई यांच्याकडून या प्रोजेक्टविषयी अनेक वेळा ‘सकाळ’मध्ये वाचले होते. जगताप सरांनी एक ठिकाण दाखवलं आणि ते त्यांच्याशी संबंधित होतं. कविवर्य मोरोपंत वाचनालय. ते कसे विकसित होणार आहे, तिथे कशी पुस्तकं येणार आहेत, हे त्यांनी मला सांगितलं.
आम्ही सरांच्या यांच्या घरी गेलो. एक तरुण पोत्यामधली आलेली पुस्तकं काढून ती स्वच्छ करत होता. त्याने स्वच्छ केलेली पुस्तके एक आजीबाई दुसऱ्या पोत्यात भरत होत्या. त्या युवकाकडे पाहत सर म्हणाले, ‘हा सुयश. माझाच मुलगा.’ त्या महिलेकडे पाहत सर म्हणाले, ‘ही माझी आई कमल.’ मी आईंना नमस्कार केला.
मी पुढे नजर टाकली. घरांमध्ये सगळीकडे पुस्तकंच पुस्तकं होती. आई माझी आस्थेने विचारपूस करत होत्या. बोलता बोलता आईंना म्हणालो, ‘सरांना पुस्तकांचा खूपच छंद आहे.’ आई थोडा वेळ शांत राहिल्या आणि म्हणाल्या, ‘लहानपणी लक्ष्मणला काहीही मिळालं नाही. दुसऱ्यांची पुस्तकं आणून घरी रात्रभर दिव्याखाली वाचत बसायचा.
शर्टला चार चार ठिगळे असायची. पैसे आले की पहिल्यांदा पुस्तक विकत घ्यायचा. वाचलेले पुस्तक पुन्हा अनेकांना वाचायला द्यायचा. हा त्याचा छंद झाला.’ मी सरांना म्हणालो, ‘तुमचे वडील कुठे आहेत.’ ते म्हणाले, ‘आता वडील नाहीत. ते वारले.’ आई मध्येच म्हणाल्या, ‘हा पुण्यामध्ये जाऊन बसला होता. वडिलांचे शेवटचे तोंड पाहायला पण लक्ष्मणला भेटलं नाही.’
जगताप सर म्हणाले, ‘मी डी.एड.ला पुण्याला शिकायला होतो. मी रोज एका वाचनालयामध्ये जाऊन वाचायला बसलो. वडील गेल्याचा निरोप माझ्या वसतिगृहात फोनद्वारे आला होता. त्या दिवशी मी परत घरी गेलोच नाही.
त्यामुळे तो निरोप मला मिळालाच नाही. दुसऱ्या दिवशी राख सावडायला घेऊन जाण्यासाठी माझा भाऊ काऱ्हांटी या माझ्या गावी घेऊन गेला. माझ्या वडिलांनाही वाचनाची खूप आवड होती. लक्ष्मण माझ्या अंत्यसंस्काराला आला नाही, तो कुठे तरी चांगलं वाचत बसलाय, याचा त्यांनाही आनंद वाटला असेल.’ जगताप सर बोलता बोलता बोलून गेले.
आई पुन्हा म्हणाल्या, ‘छंदात स्वतःला इतकं झोकून नाही द्यायचं की आपल्या आयुष्याकडेच दुर्लक्ष होईल.’ सर त्यावर काहीही बोलले नाहीत. त्यांच्या पत्नी स्मितहास्य करत होत्या. आई आणि सरांच्या पत्नी दोघीही आतमध्ये गेल्या. काय काय दाखवू असं जगताप सरांचं झालं होतं. अनेक शाळा-कॉलेजेमधून त्यांना आलेली पत्रे.
पुस्तक जमा करण्यासंदर्भात त्यांना मदत करणारे त्यांचे अनेक स्वयंसेवक, राज्यभरात त्यांचे पसरलेले नेटवर्क, अनेक व्याख्यानमाला, सामाजिक संस्था या माध्यमातून शाळेत कॉलेजमध्ये आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक कसे पोहोचतील यासाठी पुढाकार घेणारे सर यांचे सगळं काम थक्क करणारे होते.
एका शिक्षकानं ठरवलं तर तो काय करू शकतो, याचे जगताप सर उत्तम उदाहरण होते. त्यांच्या पत्नीही त्यांना साथ देत आहेत. घर, मुलांचे शिक्षण, सासूबाई आणि शाळा एवढं सगळं करूनसुद्धा जगताप सरांच्या खांद्याला खांदा देऊन या वाचन चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलंय.
सरांच्या बँकेतल्या खात्यावर दहा हजार रुपये नसतील, पण दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक पुस्तकं वाटून त्या वाटलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून सातत्याने काही तरी चांगुलपणाची पेरणी करण्यासंदर्भात जगताप पती आणि पत्नीने घेतलेला पुढाकार, त्यांचा आदर्श राज्यातल्या प्रत्येक शिक्षकांनी घ्यायलाच पाहिजे... बरोबर ना...!
एका वसतिगृहामध्ये जगताप सर अनेक महिला, मुली यांच्या समोर जमिनीवर बसून ‘वाचनसंस्कृती’ या विषयावर बोलत होते. त्यांचे बोलणे सातत्याने ऐकावेसे वाटत होते. कधी जगताप सर कधी त्यांच्या पत्नी सातत्याने बोलताना दिसत होत्या. समोर बसलेला प्रत्येक जण त्या दोघांचं अगदी जीव ओतून ऐकत होता.