कुंकू वाचवणारं देवालय..!

तिथल्या व्यसनात बुडालेल्या त्या प्रत्येक माणसाला इथे आणावं असं मला वाटत होतं.
sandip kale writes about Addiction Treatment Center  campign latur
sandip kale writes about Addiction Treatment Center campign latur sakal
Summary

तिथल्या व्यसनात बुडालेल्या त्या प्रत्येक माणसाला इथे आणावं असं मला वाटत होतं.

सोलापूरवरून मी लातूरला पोहोचलो.अंबाजोगाई रोडला सोमवंशीनगर या भागातून मी जात होतो. समोर असणाऱ्या इमारतीच्या समोर जे काही घडत होतं ते अजब होतं. तोंडाला फेस आलेली माणसं, डोळ्यांत अश्रू आलेल्या महिला आणि आनंदी चेहरा घेऊन काहीतरी सांगायला आलेल्या महिला, असं तीन प्रकारचं चित्र तिथे होतं.

मी तिथल्या माहिती फलकावर नजर टाकली आणि मला साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. व्यसन सोडून पूर्णतः बरं होणाऱ्यांचा तो आकडा पाहून मी एकदम चक्रावून गेलो. मी मोठ्या शहरापासून ते गावकुसात सर्व ठिकाणी फिरतो.

तिथल्या व्यसनात बुडालेल्या त्या प्रत्येक माणसाला इथे आणावं असं मला वाटत होतं. ‘जीवनरेखा प्रतिष्ठान’ संचालित ‘जीवनरेखा व्यसनमुक्ती उपचार केंद्र’ १९९९ मध्ये इथं सुरू झालं. व्यसनात बुडालेल्यांकडून इथे एक रुपयाही न घेता मोफत इलाज करणाऱ्या या व्यसनमुक्ती केंद्राने आजपर्यंत हजारो लोकांना व्यसनांतून मुक्त केलं होतं. ते सारं वाचून, अनुभवून, डेटा पाहून, तिथलं वातावरण पाहून मी चक्रावून गेलो.

त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येणारा प्रत्येक जण, त्याच्या मागे लागलेली व्यसनाची साडेसाती सोडवण्यासाठी तिथे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. तो तरुण तिथे असणाऱ्या प्रत्येकाशी आस्थेवाईकपणे बोलत होता; जेवण झालं का, काही अडचण आहे का, औषधं घेतलीत का, असं विचारत होता.

केवळ ती एक महिलाच नव्हे, तर अनेक जण त्या तरुणाचे आभार मानत होते. मी त्या महिलेकडे गेलो, तिला बोलतं केलं. त्या महिलेचं नाव गयाबाई शिंदे. त्या तुळजापूरच्या होत्या. त्या मला सांगत होत्या, ‘‘माझ्या यजमानाने सारी संपत्ती दारू, जुगारावर लावली.

साठ एकर जमिनीमधील सहा एकर जमिनीचा तुकडा, तोही सावकाराकडे गहाण असल्यामुळे शिल्लक राहिला. जमीन गेली, आयुष्य वादावादीमध्ये, भांडण-तंट्यात गेलं. माझ्या यजमानांना अनेक आजारांनी ग्रासलं.

लातूरला दारू सुटते अशी माहिती मिळाल्यावर मी यांना इथं घेऊन आले. माझे यजमान संतोष यांचं दारूचं व्यसन सुटलं. योगा, व्यायाम करणं, गाणं म्हणणं, वाचन करणं अशा अनेक कला त्या २८ दिवसांमध्ये संतोष यांनी शिकल्या होत्या.’’

संतोष यांनी सेंटरमधून घरी गेल्यावर दोन महिने उलटून गेल्यानंतरही दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना खात्री पटली, की आता संतोष दारूमुक्त झाले आहेत. अंगावर ठिगळांचं लुगडं असलेल्या अनेक गयाबाई आपल्या आयुष्याची दारूमुळे झालेली कैफियत मी विचारल्यामुळे मला सांगत होत्या.

हे सेंटर म्हणजे आमचं ‘कुंकू वाचवलेलं देवालय’ आहे, आमचं माहेर आहे, असं त्या महिला म्हणत होत्या. मी त्या व्यसनमुक्ती केंद्रात अनेकांशी बोललो. अनेकांच्या कथा धक्कादायक होत्या.

मी सर्वांत शेवटी त्या युवकाला भेटलो आणि मला समजलं की, औषध आणि बाकी सर्व ठीक; पण ही प्रचंड व्यसनात बुडालेली माणसं या उच्चशिक्षित तरुणाच्या वाणीतून निघालेल्या प्रत्येक शब्दामुळे व्यसन सोडत आहेत.

मी त्या तरुणाला भेटलो, त्याच्याकडून त्या केंद्राचं सर्व काम समजून घेतलं. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून तिथे येणारी माणसं प्रचंड दुःख आपल्या वाट्याला आहे, असं सांगून केंद्रामध्ये प्रवेश करतात. २८ दिवसांनंतर ही मंडळी सगळं दुःख इथेच ठेवून नव्याने आयुष्य सुरू करतात.

मी ज्या युवकाशी बोलत होतो, त्यांचं नाव कृष्णा यादव (९८९०७५९५१२). कृष्णा उच्चशिक्षित आहेत. पुण्यामध्ये कृष्णानं एमबीए केलं. देशात आणि परदेशांत कृष्णाला नोकरीसाठी ‘ऑफर’ आल्या; पण त्यातील एकही ‘ऑफर’ कृष्णाने स्वीकारली नाही.

कृष्णाने ठरवलं होतं, आजोबा आणि वडिलांचा सामाजिक वारसा पुढे चालवायचा आहे. सेवाभावी वारसा पुढे चालवण्यात जो आनंद आहे, तो आनंद परदेशात जाऊन नोकरी करण्यात नाही, असं कृष्णाला वाटतं. कृष्णाचे वडील आणि आजोबा दोन्ही प्रचंड दानशूर व्यक्तिमत्त्वं आहेत, असंही कृष्णा सांगत होते.

कृष्णा मला म्हणाले, ‘‘नोकरी करण्यासंदर्भातल्या चांगल्या ऑफरकडे पाहताना मला माझ्या वडिलांचा आणि आजोबांचा चेहरा आठवत होता. त्यांनी माझ्यावर घालून दिलेले संस्कार मला दिसत होते.

आपण लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं, त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे, हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो होतो.’’ आमच्या गप्पा खूप वेळ चालल्या. लोक अपयशाचं खापर दारूवर कसं फोडतात याचे अनेक किस्से मी ऐकले.

मी त्या व्यसनमुक्ती केंद्रामधल्या अनेकांच्या भेटी घेतल्या. शेवटी कृष्णाचा निरोप घेऊन मी निघालो. तरुण व्यसनाधीन होत आहेत, आपल्या आई-वडिलांचं ऐकत नाहीत, असा सूर अलीकडे अनेक ठिकाणी ऐकायला मिळतो.

कदाचित संगत, संस्कारहीनता अशी अनेक कारणं त्याला असतील. लोकांच्या आयुष्यात व्यसनांमुळे झालेलं महाभारत थांबवायचं असेल म्हणूनच कदाचित लातूरमध्ये कृष्णा यादवचा जन्म झाला असेल. कृष्णासारखे अनेक तरुण पुढे आले आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या संस्कारांचा वारसा पुढे चालवला, तर समाजातील वाईट वृत्तींचा नायनाट नक्कीच होईल. वाढणारी व्यसनाधीनता पाहून तुम्हा-आम्हाला सर्वांना कृष्णा बनावं लागेल.

भलामोठा हार घेऊन मोठं कुंकू लावलेली एक महिला तिच्या यजमानांसोबत कुणाची तरी वाट पाहत होती. थोड्या वेळात एक तरुण गाडीतून उतरला आणि त्या महिलेने तो हार त्या तरुणाला घातला. तो तरुणही संस्कारी दिसत होता, त्याने वाकून त्या महिलेचं दर्शन घेतलं.

त्या तरुणाला भेटायला आलेले अनेक जण हार-तुरे देत त्याचं स्वागत करत होते. मी अनोळखी माणसासारखं त्यांच्यामध्ये शिरलो, आतमध्ये गेलो. बाहेरून बंदिशाळा वाटणारी ती वास्तू आतमध्ये असणाऱ्या व्यवस्था पाहून एखाद्या सुंदर, आखीव-रेखीव घरासारखी वाटत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com