आई-वडील गेल्यानंतर..!

‘सकाळ’च्या ‘यीन’ या प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यात लाखो तरुणांचं नेटवर्क तयार झालंय. ‘यीन’ने घडवलेल्या तरुणांचं जाळं सर्व राजकीय पक्षांतही पाहायला मिळते.
Amekar Family
Amekar FamilySakal

‘सकाळ’च्या ‘यीन’ या प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यात लाखो तरुणांचं नेटवर्क तयार झालंय. ‘यीन’ने घडवलेल्या तरुणांचं जाळं सर्व राजकीय पक्षांतही पाहायला मिळते. जळगावची दिव्या भोसले ही ‘यीन’ने घडवलेली युवती सध्या राष्ट्रवादी युवतीचे काम करते. सकाळी दिव्याचा फोन आला. म्हणाली, राष्ट्रवादी युवती नांदेडची अध्यक्ष प्रियांका कैवारे पाटील माझ्यासोबत आहे. तिला तुम्हाला भेटायचे आहे. ती तुमच्या नांदेडची आहे. मी दिव्याला म्हणालो, मी मुंबईत नाही. मी नांदेडला आलोय. दिव्याने प्रियांकाला फोन दिला. प्रियांका म्हणाली, तुम्ही किती दिवस आहात नांदेडला, मी आज निघते, मी म्हणालो, मी आहे दोन दिवस. तुम्ही या नांदेडला, आपण भेटू.

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत मी प्रियांकाला फोन केला. प्रियांका म्हणाल्या, मी जरा बाहेर आलेय. थोडा वेळ लागेल! चालेल ना? मी म्हणालो, नयन बाराहाते यांच्याकडे शिवाजीनगर भागात आहे, तुम्ही कोणत्या भागात आहात, म्हणजे आपल्याला भेटणे सहज शक्य होईल. त्या म्हणाल्या, मी ब्रह्मपुरी चौफाळा या भागात आहे. कोरोनाच्या आजारात ज्या मुलामुलींचे आई-वडील वारलेत, अशा अनाथ झालेल्या अनेक मुला-मुलींना आधार देण्यासाठी ‘ राष्ट्रवादी जिवलग’ या नावाने आम्ही राज्यभर मोहीम हाती घेतली आहे. त्याच निमिताने मी एका घरी आले आहे. प्रियांका तिकडून हे सारे बोलत असताना मला वाटलं, आपण या मुलामुलींना भेटले पाहिजे. मी प्रियांकांना म्हणालो, मी तिथे आलो तर तुम्हाला आणि त्या मुलांना चालेल का? प्रियांका म्हणाल्या, हो. का नाही चालणार. मी तुम्हाला लोकेशन पाठवते, तुम्ही या. मी माझे कौठा येथील मित्र सुनील काळे, विशाल शर्मा आम्ही तिघे ब्रह्मपुरीला ‘त्या’ घरी पोहचलो.

प्रियांकाची माझी पहिली भेट, तरीही खूप जुनी ओळख असल्याचे दाखवत, त्या घरातल्या सर्व व्यक्तींना आमची ओळख करून दिली. ‘त्या’ घरात मी सगळीकडे नजर फिरवली, कुठेही नजर स्थिर करण्याचा प्रयत्न केला तरी माझी नजर समोर हार घातलेल्या फोटोकडे जात होती. त्या फोटोमधले ‘ते’ दोघेजण एकसारखे माझ्याकडे टक लावून बसले होते. काय माहीत, त्यांना मला काय सांगायचे होते. घरात तीन मुले, एक आजी आम्ही घरी गेल्यावर शांत बसले होते. त्या शांततेची कोंडी फोडत प्रियांका म्हणाल्या, ही वैष्णवी एमेकर, हिची बारावी झालीय. हा आकाश बी. ई. झालाय. हा अनिकेत बी. एस्सी. करतोय. या तिघांचे आई-वडील दमयंती आणि अनिल दोघेजण कोरोनाच्या महासाथीत वारले. अगोदर वडील गेले आणि पुन्हा सहा दिवसांनी आई गेली. बाजूला तोंडाला पदर लावून बसलेली आजी हमसून हमसून रडत म्हणत होती, ‘देवाने काय न्याय केला आहे पाहा!

माज्यासारख्या म्हातारीला नेण्याऐवजी माझ्या मुलीला आणि जावयाला नेले. तिन्ही मुले परदेशी झाली हो!’ बाजूला बसलेली वैष्णवी आजीची समजूत काढत होती. मी वैष्णवीला म्हणालो, आजी तुमच्या आईच्या आई आहेत का? वैष्णवी हो म्हणाली. माझी आजी श्यामल अंबादास रणवीरकर ही मूळची कंधारमध्ये असणाऱ्या बहाद्दरपुरा इथली. ती नगरपालिकेमध्ये सफाई कामगार होती. आई-बाबा गेल्यापासून आता आजी आमच्याकडेच असते. प्रियांका पाटील (९०११६५४६८२) म्हणाली, राज्यभरात आम्ही अशा कोरोनाच्या आघाताने निराधार झालेल्या मुलामुलींना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा आईवडील गेलेल्या मुलांना केंद्र सरकार दहा लाख आणि राज्य सरकार पाच लाख मदत करते. मी मध्येच म्हणालो, यांना मदत मिळाली का? प्रियांका म्हणाली, नाही अजून. आम्ही प्रयत्न करतोय. प्रियांकाच्या बोलण्यावरून ‘दप्तर दिरंगाई’ किती मोठी आहे हे लक्षात येत होते. मी वैष्णवीला मध्येच विचारले, मग आता तुमचा उदरनिर्वाह चालतो कसा? वैष्णवी म्हणाली, दर महिन्याला आजीचे सात हजार रुपये पेन्शन येते, त्यात भागवणे सुरू आहे. मी म्हणालो, घराचे ठीक आहे, पण शिक्षणाचे काय करताय. त्यावर कोणीच काही बोलेना. मीही एकदम शांत झालो होतो. आता सगळेच नेस्तनाबूत झाले आहे, असे भाव आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर होते.

एमेकरसारखी अनेक कुटुंबे या कोरोनामुळे नेस्तनाबूत झाली आहेत. घरातला कमावता माणूस जेव्हा जातो, तेव्हा रोजच्या जीवनाची गती थांबून कुणी तरी आपले जगणे हिरावून घेतले आहे असे वाटते. या महामारीचे संकट कोण्या एका-दुसऱ्यावर नाही आले, त्यामुळे माणुसकीचा ओलावा कुणाकुणाला द्यावा असा प्रश्न आहेच. सरकार नावाची बाब तर पुराण बनून कोणत्या अडगळीला पडली आहे हे विचारू नका.

वैष्णवी (८५५४०१६१६३) मला सांगत होती, बाबा विष्णुपुरी दवाखान्यात वरिष्ठ सहायक म्हणून काम करीत होते. बाबांच्या अंत्यसंस्काराला आईपण जाऊ शकली नाही. ती दवाखान्यात होती. मी बाबाजवळ रात्रभर होते. बाबा त्या रात्री रात्रभर माझ्याकडे पाहत होते, माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते, खूप रडत होते. सकाळी मी त्यांना उठवायला गेले तर ते उठलेच नाहीत. बाबा रोज सकाळी मला चार वाजता अभ्यास करायला उठवायचे. माझ्यासोबत तेही वाचत बसायचे. मी डॉक्टर व्हावे असे बाबांचे स्वप्न होते. बाबा सावलीसारखे माझ्या मागे राहायचे. आता रोज सकाळी चार वाजता जाग आल्यावर आजूबाजूला रोज पाहते, मला माझे बाबा दिसत नाहीत, असे म्हणत वैष्णवी रडायला लागली. प्रियांका वैष्णवीची समजूत काढत होती. वैष्णवीचा भाऊ आकाश मला सांगत होता, मला घरातली सर्व परिस्थिती पाहवत नाही, जे मिळेल ते काम करायला मी तयार आहे, पण काम मिळत नाही. अनुकंपाधारक म्हणून मला घ्यावे यासाठी मी बाबांच्या कार्यालयात अर्जही केला; मात्र तिथेही मला काही प्रतिसाद मिळेना. शासन जी आर्थिक मदत देणार आहे त्यात खूप अटी टाकल्या आहेत.

मी म्हणालो, कुणी नातेवाईक मदत नाही करत का? वैष्णवी म्हणाली छे! आम्ही जिवंत आहोत की नाही हे पाहायलादेखील कुणी आले नाही. आई-बाबा दवाखान्यात असताना आम्ही काही जणांकडून हातउसने पैसे घेतले होते. तेच द्या म्हणून नेहमी मागणे असते. आहे त्या परिस्थितीला आम्ही तोंड देत आहोत, पण सर्व रुळावर आणणे आणि बाबांचे स्वप्न पूर्ण करणे यावरच आता माझे सर्व लक्ष आहे. मी म्हणालो, तू नेमके सध्या काय करतेस? ती म्हणाली, बाबा जसे माझ्याकडून तेरा तास अभ्यास करून घ्यायचे, आता मी पंधरा तास अभ्यास करते, मला डॉक्टर व्हायचे आहे, माझ्या बाबांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. प्रियांका मधेमधे बोलताना वैष्णवीला प्रोत्साहित करीत होती.

आम्ही नयन बाराहाते यांच्याकडून निघताना माझ्यासोबत आलेले सुनील काळे आणि विशाल शर्मा हे दोघेजण एकदम चांगल्या मूडमध्ये होते, ते आता एकदम शांत गंभीर मूडमध्ये होते.

चला, काही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत असे म्हणत आम्ही तिथून निघालो. त्या घरातून बाहेर पडताना मन सुन्न झाले होते, माझे पाय ‘त्या’ एकाकी पडलेल्या माणसांना सोडून जाण्याची हिंमत करत नव्हते.

भरलेल्या घरात सर्व काही ठीक सुरू असताना नियती ‘त्या’ दोघांना घेऊन जाते. ‘ते’ गेल्यावर घरातल्या अनेकांना जगणं नकोसं झालं आहे. समाज थोडा वेळ सहानुभूतीचा ‘चकवा’ दाखवतो. शासन लुळेपांगळे झाले आहे.

प्रियांकासारखी एक शक्ती या कुटुंबाच्या मागे आहे खरी, पण त्या शक्तीला कधी यश येईल काय माहीत ! आपल्या राज्यात अशी अनेक एमेकर कुटुंबं आहेत, ते सर्व कुटुंब डोळ्यात तेल घालून सतत कुणाच्या तरी मदतीची वाट पाहतात. कुणाचे शिक्षण अर्धवट आहे, कुणी तरी येईल, आपल्याला मदत करील, अशी आस त्यांच्या मनात आहे. तुम्हा-आम्हा सर्वांच्या मदतीची या सर्वांना गरज आहे. आपण मदत करूयात हो ना...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com