esakal | खोटा सिक्का
sakal

बोलून बातमी शोधा

Old Coin

खोटा सिक्का

sakal_logo
By
संदीप काळे sandip.kale@esakal.com

मुंबईतल्या ‘छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालया’च्या अगदी समोरच चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांची मुलाखत मी एका शोसाठी घेत होतो. मुलाखत झाली. वस्तुसंग्रहालयाच्या अगदी गेटसमोर एक आजी नाना प्रकारची देशी-विदेशी नाणी विकत होत्या. आजींच्या शेजारी एक मुलगा काहीतरी लिहीत बसला होता. मी आजींशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. नाण्यांच्या दराची चौकशी केल्यावर मी त्यांंना विचारलं : ‘‘आजी, एवढी नाणी तुम्ही गोळा कशी केलीत?’’

‘माझ्या यजमानांना नाणी गोळा करायचा छंद होता, त्यातून ही नाणी जमा झाली,’’ आजी म्हणाल्या.

‘आता यजमान कुठं आहेत?’’ मी विचारलं.

‘अर्धांगवातानं अंथरुणाला खिळलेत,’’ आजी म्हणाल्या.

‘नाणी विकून किती पैसे मिळाले आज?’’

‘तीस रुपये.’’

आजींशी गप्पा सुरू होत्या. या आजींचं नाव शमीन शब्बीर पावसकर (९६१९६४६१२७). सतराव्या वर्षी आजी शब्बीर यांच्या प्रेमात पडल्या. शब्बीर तेव्हा मरीन ड्राइव्हवर पेरू विकत असत. आजींचं माहेरचं नाव गंगूबाई. शब्बीर हे मुस्लिम असल्यामुळे या लग्नाला विरोध होता. दोघांनी पळून जाऊन नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. आजींनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या साठीपर्यंत त्यांचा संसार चारचौघांप्रमाणे झाला; पण साठीनंतर अपत्यांवर आलेले अनेक बिकट प्रसंग, गंभीर आजार यांचा सामना या जोडप्याला करावा लागला. आजींना घरी निघायला उशीर होत होता असं दिसलं. लगबगीनं नाण्यांची आवराआवर करत त्या बरोबरच्या मुलाला - नातू सिद्दिकी याला - म्हणाल्या : ‘‘चल, अभी निकलेंगे बाबा के घर पे.’’

‘कुठं राहता तुम्ही?’’ मी विचारलं.

आजी म्हणाल्या : ‘‘कफ परेडला बस डेपोच्या मागं असलेल्या भाड्याच्या झोपडीत.’’

आजोबांना भेटण्यासाठी मी तुमच्या घरी येऊ का असं मी आजींना विचारल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं.

‘तुम्ही आणि आमच्या घरी? कशासाठी बरं?’’

‘तुम्ही कसं राहता, तुमचं रोजचं जीवन कसं आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे म्हणून.’’

आजी काहीच बोलल्या नाहीत.

त्यांनी नातवाचा हात धरला अन् त्या निघू लागल्या. दोन-चार पावलं पुढं गेल्यावर आजींनी मागं वळून पाहिलं. त्या मला त्यांच्याबरोबर यायला सुचवत होत्या हे माझ्या लक्षात आलं.

मी त्यांच्याबरोबर निघालो. घरी आलो.

दहा बाय दहाची पत्र्याची एक खोली. दरवाजाचा खडखड आवाज आल्यावर, आतमध्ये असणारे आजोबा उठून बसायचा प्रयत्न करत होते. एक महिला भाकरी करत होती. चुलीतली लाकडं ओली होती. त्या महिलेला चूल सारखी सारखी फुंकावी लागत होती आणि त्या महिलेच्या जिद्दीपायी त्या ओल्या लाकडांना जळावंच लागत होतं!

मी बसलो. आजींनी सर्वांशी ओळख करून दिली.

भाकरी करणाऱ्या महिलेकडे हात दाखवत आजी म्हणाल्या : ‘‘ही माझी मुलगी शहनाज. हा तिचा मुलगा सिद्दिकी. हा माझ्याबरोबर रोज येतो. मला दोन मुलगे आणि शहनाज ही मुलगी. पैकी एक मुलगा सिकंदर...सतत आजारी पडून मरण पावला. दुसरा मुलगा सलीम रोजीरोटीसाठी डहाणूला असतो. गेल्या पंधरा वर्षांपासून शहनाज माझ्याकडेच राहते. ती इतरांकडे घरकाम करते. तिच्या पैशावरच आमचं घर चालतं. माझ्या नाणेविक्रीतून कधी तरी चार पैसे मिळतात. अशी आमची चूल पेटते.’’

मी पुन्हा नाण्यांच्या विषयाकडे वळत आजींना विचारलं : ‘‘ही वेगवेगळ्या देशांतली इतकी नाणी तुम्ही गोळा कशी केलीत?’’

आजी सांगू लागल्या : ‘‘माझे यजमान गेट वे ऑफ इंडियावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचं सामान उचलायचे. ते सामान जहाजांमध्ये ठेवायचे. परदेशातून आलेली अनेक माणसं खूश होऊन त्यांना टिप म्हणून नाणी द्यायची. माझ्या यजमानांना त्या नाण्यांचं कौतुक वाटायचं. ती नाणी त्यांनी कधीही विकली नाहीत, कुणाला दिली नाहीत. मग त्यांना देशी-परदेशी नाणी गोळा करायचा छंद लागला.

नंतर ते अर्धांगवातानं आजारी पडले. कर्ता माणूस अंथरुणाला खिळून बसला. दोन वेळचं जेवण मिळणं अवघड झालं. माझ्या यजमानांनी आयुष्यभर छंद म्हणून जोपासलेली ही लोखंडाची नाणी आता तशी कालबाह्य झालेली आहेत. ते ‘खोटे सिक्के’ मी विकायला काढले. अनेक जण त्यांचा छंद जपण्या-जोपासण्यासाठी ही नाणी विकत घेऊ लागले.’’

बाजूला असलेल्या देवघराकडे माझं लक्ष गेलं. तिथं हिंदू-मुस्लिम अशा दोन्ही धर्मांची चित्ररूप प्रतीकं होती. घरात भाकरीचा खमंग वास सुटला होता. वाढलेलं ताट शहनाज यांनी वडिलांसमोर ठेवलं. त्या आजोबांनी लुळा हात माझ्या दिशेनं दाखवण्याचा प्रयत्न केला. ‘यांनाही जेवायला वाढा,’ असं त्यांना म्हणायचं होतं. आजींनी व शहनाज यांनी माझ्याकडे बघितलं. मला विचारण्यात त्यांना संकोच वाटत असल्याचं माझ्या लक्षात आलं. मग मीच म्हणालो, ‘‘वाढा मलाही.’’

भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी...किती चविष्ट होती, विचारू नका. जेवण झाल्यावर मी सिद्दिकीच्या वह्या पाहिल्या. त्याचं अक्षर मोत्यासारखं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या शाळा जबरदस्त आहेत, हे त्याच्या संस्कारातून दिसत होतं. उद्या काय खायचं याची चिंता असतानाही त्या झोपडीतील माणसं समाधानी होती. अर्धांगवातानं चैतन्य गमावलेले आजोबांचे हात मी हातात घेतले. त्यांच्या हातांची थरथर क्षणार्धात थांबली. माझ्या स्पर्शानं त्यांच्या डोळ्यांत एकदम चमक आली.

आजी भावुक होऊन म्हणाल्या : ‘‘कमावता, धीर देणारा माणूस अंथरुणाला खिळून बसला तर मेल्यासारखं होतं हो! सगळं आयुष्य तसं आनंदात गेलं. आता अचानक आलेल्या संकटामुळे मी कोसळून गेले...’’ मुलगी शहनाजही रडू लागली. नऊ वर्षांचा सिद्दिकी आजीची आणि आईची समजूत काढू लागला.

कुणाचाच आधार नाही, सगळं काही संपून गेलेलं असतानाही आजी आणि त्यांची मुलगी ते घर नेटानं पुन्हा कसं उभं राहील यासाठी प्रयत्न करत आहेत...झगडत आहेत.

शहनाज म्हणाली : ‘‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत हाताला काम नव्हतं. माझ्याकडचं मंगळसूत्र विकून आम्ही दिवस काढले. अनेकदा फक्त पाणी पिऊन उपाशीच झोपून जायचो. माझ्या मुलानं मला कधीच भीक मागू दिली नाही. तोसुद्धा कित्येक रात्री पाणी पिऊन झोपायचा.’’

बाहेर रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. मी जाण्यासाठी निघालो. खिशात हात घातला. थोडे पैसे होते. ते आजींच्या हातावर ठेवले. सिद्दिकीला म्हणालो : ‘‘बाळा, चांगलं शिक. मी तुला अधूनमधून भेटायला येत जाईन.’’

आजोबा माझ्याकडे मोठ्या आशेनं पाहत होते. मी त्या झोपडपट्टीतून निघालो. जात असताना एकीकडे आजूबाजूला खूप घाण असल्यानं दुर्गंधी येत होती, दुसरीकडे मी ज्या घरात बसलो होतो त्या घरात स्वप्नं, आत्मविश्वास, प्रेम, स्वाभिमान यांचा सुगंध दरवळत होता. त्या सुगंधाला जर हिमतीचं आणि मदतीचं बळ मिळालं तर त्याचा दरवळ आभाळापर्यंतही जाईल. कुणी सांगावं!

loading image