esakal | स्वाभिमानी लढा...! Success
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Shivaji Belote
स्वाभिमानी लढा...!

स्वाभिमानी लढा...!

sakal_logo
By
संदीप काळे sandip.kale@esakal.com

अण्णा हजारे यांची तब्‍येत बरी नाही असे कळल्यावर मी अण्णांना भेटण्यासाठी राळेगणला निघालो. मुंबईवरून राळेगणला जाताना आम्ही थोडा वेळ निगोज या गावी थांबलो. जेवण झाल्यावर जरा फेरफटका मारून यावा या उदेशाने हॉटेलपासून थोडे चालत पुढे निघालो. थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या एका कडेला एक पोल्ट्री फार्म होता. उंच तुरेदार, गावरान कोंबडे पाहून माझा सहकारी नितीन खरात म्हणाला, सर, आपण आज एवढे शानदार कोंबडे बाजूला असताना भाकरी आणि पिठले खाल्ले. मीही नितीनच्या बोलण्याला प्रतिसाद दिला.

मी कित्येक पोल्ट्री फार्म पाहिले होते, पण या पोल्ट्री फार्ममध्ये नक्की वेगळेपण होते. ते वातावरण पाहून माझी गती थांबवली. माझे पाय त्या पोल्ट्री फार्मकडे वळले. त्या पोल्ट्री फार्मच्या गेटजवळ जाताच कुत्र्यांचा भों-भों आवाज आला. त्या कुत्र्याला आवरत एक व्यक्ती बाहेर आली. त्यांनी आम्हाला विचारले काय हवे आहे, मी म्हणालो, काही नाही. आम्हाला पोल्ट्री फार्म पाहायचा होता. ती व्यक्ती म्हणाली, ठीक आहे, या आतमध्ये. त्या व्यक्तीने आमचे आनंदाने स्वागत केले. त्यांनी हाताला ग्लोव्हज घातले होते. मला वाटले त्याने कोरोनामुळे घातले असावेत, पण चर्चेअंती कळाले ते जनावरांचे डॉक्टर आहेत. तसे ते उत्साहाने छान बोलत होते, पण माझी ओळख निघाल्यावर ते अजून खुलून बोलायला लागले. खूप चर्चा झाल्या आणि त्यातून अनेक विषय पुढे आले. त्या व्यक्तीमध्ये वेगळे रसायन होते. बाजूला त्यांच्या पत्नी व्यवहाराच्या सर्व नोंदी ठेवायचे काम करीत होत्या.

मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो त्यांचे नाव डॉ. शिवाजी नामदेवराव बेलोटे (९६१९४२८८९४) गावात शेतमजुरी, मग मुंबईत खासगी नोकरी, मग जनावरांवर उपचार करण्याचे करण्याचे काम आणि मग आता मुंबईसह राज्यात बेलोटे चिकन नावाने आपला स्वतःचा व्यवसाय. हा सर्व प्रवास करीत असताना शिवाजी यांनी अनेक खस्ता खाल्ल्या, कोरोनात त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. शिवाजी आणि त्यांचे काम, माझ्यासाठी, आपल्या गावातच राहणाऱ्या, नशिबाला दोष देणाऱ्या, आत्महत्या करणाऱ्या प्रत्येकासाठी एक केस स्टडी आहे. तुम्ही ठरवले तर काहीही निर्माण करू शकता, हे शिवाजी यांच्या प्रवासावरून मला दिसत होते.

शिवाजी मला सांगत होते - घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची. माझी आई पार्वती पाच भावांमध्ये एकुलती एक बहीण. तिचे दारिद्र्य तिच्या भावांना पाहवत नसे. मी शिकलो, मोठा झालो तर माझ्या आईसाठी चांगले दिवस येतील या भावनेतून माझे मामा तुकाराम मुळे आणि मामी सिंधू मुळे या दोघांनी मला शिकवले. दुनिया कशी पाहायची याचे बाळकडू मला दिले. गावात काही तरी करून पहिले, पण यश येत नव्हते. मग माझे मित्र संपत तोडकर यांनी मला मुंबईला नेले. तिथे मी फ्रंटलाईन या खासगी कंपनीत हेल्पर म्हणून कामाला लागलो.

भांडुपला सात जणांमध्ये एक भाड्याची रूम घेतली. भाड्यापोटी ऐंशी रुपये माझ्या हिश्श्याला यायचे. तेव्हा मला एकच ड्रेस होता. तोच मी धुऊन घालत असे. कंपनीच्या मालकाला ती गोष्ट खूप खटकली. त्यांनी मला दोन ड्रेस घेऊन दिले. मी जेव्हा गावाकडे गेलो, आईला पगाराच्या पैशांचा सर्व हिशेब दिला.

ते दोन नवे कोरे करकरीत ड्रेस दाखवले तेव्हा तिला एकदम धस्स झाले. तिला वाटले मी काही तरी चुकीचे काम करून हे कपडे मिळवले की काय? मी तिला कपडे मालकाने दिले असे सांगितले. आई म्हणाली, कोणाचे असे घ्यायचे नाही. आपले सन्मानाने, स्वाभिमानाने मिळवायचे. तिने ते कपडे हातात घेतले आणि ती खूप रडायला लागली. मलाही रडणे आवरेना. आईने माझ्यासाठी कधी एकासोबत तीन ड्रेस पहिलेच नव्हते.

मी मध्येच शिवाजी यांना म्हणालो, मग नोकरी सोडून व्यवसाय का निवडला? शिवाजी हसले आणि म्हणाले, नोकर तो नोकरच. कित्येक पिढ्या घरात असलेला वारसा असा पुढे का न्यायचा. त्यामुळे आपले स्वतंत्र अस्तित्वअसले पाहिजे, आपल्याकडे अनेकांनी नोकरी केली पाहिजे हे मुंबईच्या वातावरणाने मला शिकवले आणि ते मी करून दाखवले. मी म्हणालो, तुम्ही शेतकरी कुटुंबातील, मग कोंबडीपालन, अंडेविक्री आणि कोंबडी विक्री हा व्यवसाय का निवडला?

शिवाजी म्हणाले, मुंबईत पाच वर्षांपूर्वी मी ब्रॉयलर कोंबडे खाऊन काही माणसे दगावली अशी बातमी वाचली. बातमीच्या खोलात गेलो तेव्हा कळाले, असे अनेक ठिकाणी अनेक वेळा घडले आहे. मी जनावरांचा डॉक्टर असल्यामुळे या केसचा मी बारकाईने अभ्यास केला. लोकांची खूप मोठी फसवणूक होते हे लक्षात आले. लोकांना चांगले काय आणि ते कसे देता येईल, यातून हा व्यवसाय सुरू झाला. आईच्या विचारांमधली ‘स्वभिमानी लढा’ ही पंचसूत्री व्यवसायात आणली आणि माझा व्यवसाय हिट गेला. लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी, मी माझा स्वाभिमानी लढा अजूनही लढतोय. माझ्यासोबत आज शेकडो तरुण या व्यवसायाशी जोडले गेलेत. माझे घट्ट नाते त्यांच्याशी आहे.

मी म्हणालो, तुमची आई कुठे आहे. मला आईला, बाबांना भेटायचे आहे. त्यावर शिवाजी म्हणाले, येथून जवळच देवी भोयरे नावाचे गाव आहे, तिथे आई-बाबा असतात. मला त्यांना भेटता येईल का? त्यावर शिवाजी म्हणाले, हो! का नाही, चला. आम्ही निघालो. सोबत शिवाजी यांच्या पत्नी स्वप्ना, त्यांची प्रदीप आणि प्रतीक नावाची दोन मुलं होती. ती दोन्ही मुलं आता शिवाजी यांना व्यवसायासाठी पूर्णवेळ मदत करतात. शिवाजी यांच्या पत्नी स्वप्ना अशिक्षित असून व्यवसायाचा पूर्ण जमा-खर्च त्यांच्याकडे आहे. ज्या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे, ती शिवाजी यांच्या सासरवाडीची जागा आहे. शिवाजी यांनी आसपासच्या अनेक पोल्ट्री फार्ममधून माल घेऊन तो अनेक ठिकाणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यात शेकडो जणांच्या हाताला काम मिळाले. अनेक सेवाभावी उपक्रमांत शिवाजी भाग घेतात, ते तर वेगळे लिहावे लागेल. शिवाजी यांनी निगोज गावातील रांजणखळगे, कुंडमाऊलीदेवी ही ठिकाणे मला जाताना दाखवली. इतिहासाच्या पाऊलखुणा त्या गावात मला दिसल्या.

आम्ही गाडीत बसलो तेव्हा शिवाजी यांच्या पत्नी मला सांगत होत्या, मी बेलोटे यांच्या घरी सून म्हणून आल्यावर तिसऱ्या दिवसापासून लोकांच्या शेतात मोलमजुरीसाठी होते. आम्ही गरिबी आहे म्हणून कधी घाबरलो, लाजलो, खचलो नाही; नेटाने जसे काम जमले तसे करत गेलो. कोणताही निर्णय घेताना आमच्या दोघांचे तेव्हाही एकमत होते आणि आताही आहे. बोलत बोलत आम्ही शिवाजी यांच्या गावी कधी पोहचलो हे कळाले देखील नाही. घरी शिवाजी यांची आई पार्वती आणि वडील नामदेव होते. घरात साने गुरुजी यांची खूप सारी पुस्तके होती. मी शिवाजी यांना विचारले, ही पुस्तके कोण वाचते, त्यावर शिवाजी म्हणाले, आम्ही सर्वजण वाचतो. शिवाजी यांची आई आणि शिवाजी यांच्यावर कोणाचे संस्कार आहेत हे मला ती पुस्तके पाहून कळाले. आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो. आईंची जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून त्या खाटेवर झोपल्या होत्या. शिवाजी आईचे पाय चेपत असताना आईला कधी झोप लागली हे कळाले नाही. शिवाजी यांचे बाबा सांगत होते, पार्वतीला दोन दिवसांपासून बरे नाही, तिला झोपच नाही. आता ‘शिवाजी’चा स्पर्श झाला की लागलीच तिला डोळा लागला. मुले कितीही मोठी झाली, त्यांनी कितीही उंच भरारी घेतली तरी मुलांचे आई-वडील हे एका स्पर्शाचे, एका नजरेने डोळे भरून पाहावे याचेच भुकेले असतात. भावुक झालेल्या आजोबांजवळ शिवाजी यांची दोन्ही मुले जाऊन बसली.

घरात सन्मान, गावासह पंचक्रोशीत सन्मान, सर्व स्वप्ने स्वाभिमानाने साकार हे कसे जमले असेल शिवाजी यांना? मुंबईचे बोट पकडून वेगाने ज्यांना धावता येते ते यशाचे धनी होतातच, अशी शिवाजीसारखी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.

आम्ही जायला निघालो, शिवाजी यांनी आईला जागे केले. आई घरात गेली. त्यांनी आम्हाला खायला लाडू आणले. आम्ही ते लाडू खाल्ले आणि निघालो. मी घराच्या बाहेर पडताना शिवाजी यांच्या आई माझा हात हातात घेऊन मला म्हणाल्या, बाबा माझं लेकरू सगळीकडे एकटंच असतं, त्याच्याकडे लक्ष ठेव, असं म्हणत आईने माझा हात आपल्या कपाळाला लावला. भरलेले डोळे आईने आपल्या पदराने पुसले.

मी राळेगणच्या दिशेने निघालो. माझ्या मनात अनेक विचार येत होते. गावातली मुले मोठ्या शहराला का जवळ करीत नाहीत. आपण नोकरीच करावी अशी त्यांची मानसिकता का असते. व्यवसाय जरी निवडला तरी शेजारी आहे म्हणून आपणही किराणा दुकान टाकले पाहिजे यापुढे ते का जात नाहीत. शहरात असणारे अनेक जण शिवाजीसारखे आपल्या गावातून, भागातून अनेक मुले शहरात आणून उभी का करीत नाहीत. आपल्यातला स्वाभिमानी लढा जिवंत ठेवण्यासाठी असे अनेक शिवाजी पुढे आले तर कल्याणकारी राज्य ही संपल्पना प्रत्यक्षात नक्की उतरेल हो ना...?

loading image
go to top