Ganesh Honrao
Ganesh HonraoSakal

घेतलं उच्च शिक्षण तरीही...

उदगीरला परवा एका साहित्य संमेलनाला गेलो होतो. मराठवाड्याच्या माणसांची साहित्यामध्येही कमालीची ‘दानत’ आहे हे तिथे कळाले.

उदगीरला परवा एका साहित्य संमेलनाला गेलो होतो. मराठवाड्याच्या माणसांची साहित्यामध्येही कमालीची ‘दानत’ आहे हे तिथे कळाले. छात्रभारतीमध्ये काम करीत असताना ना. य. डोळे सर यांच्याकडे उदगीरला नेहमी येणे व्हायचे. त्यामुळे उदगीर परिचयाचे होते. संमेलनातून उसंत मिळाल्यावर मी बाहेर पडलो. शाहू चौकात आल्यावर चहाचा सुगंध दरवळत होता. माझ्यासोबत शिवराज पाटील आणि सुरेश शिंदे होते, ते म्हणाले, चहा घेऊ. मी म्हणालो, चला. मी चहाच्या सुगंधाच्या दिशेने पाहिले, समोर एक बोर्ड लागला होता, नंदिनी मसाला चहा असा. माझ्या सोबतचे दोघेजण खूप आनंदाने चहा पीत होते, वा काय चहाची टेस्ट आहे, असे कौतुक ते करत होते. काही जणांनी उधारीवर चहा घेतला. त्याची नोंद ठेवताना त्या व्यक्तीने एकदम इंग्लिशमध्ये त्या नोंदी डायरीमध्ये केल्या. मी त्या व्यक्तीला विचारले, तुमचे शिक्षण किती झाले, त्यावर ते काहीही बोलले नाहीत. मी त्यांचे शिक्षण विचारल्यावर त्यांचा चेहरा एकदम पडला.

टपरी बाहेर जाताना एक युवक त्या व्यक्तीला म्हणाला, सर मी निघतो आता, येतो पुन्हा. मी त्या युवकाना विचारले, सर कसे काय म्हणताय,? तो युवक म्हणाला, ते माझे सर होते. त्यांनी मला बीएला इतिहास शिकवला. मला एकदम धक्का बसला. चहाचे रिकामे कप धूत रफीच्या गाण्याचा आनंद घेणाऱ्या त्या व्यक्तीला मी बोलते करण्याचा, खुलवायचा प्रयत्न केला.

काही वेळाने ते सर नुसते बोलले नाहीत, तर त्यांनी आपला खाच-खळग्यांचा सर्व प्रवास माझ्या समोर मांडला. यातना दु:ख आणि अपयश असले तरी त्यांनी यशासाठी आपले प्रयत्न सोडले नाहीत.

माझ्यासोबत असणारे हे दोघेजण भावुक होऊन, तो सर्व प्रवास ऐकत होते. आजूबाजूला असलेली सामाजिक, राजकीय, प्रशासकीय परिस्थिती वाईट वातावरणाला अजून पोषक बनवते, हे गणेशच्या बोलण्यातून दिसत होते. मी ज्या व्यक्तीसोबत बोलत होतो, त्याचे नाव गणेश काशीनाथ होनराव. वय चाळीस, एम. ए. इतिहास, एमफील, पीएचडी. अनेक पुस्तके, अनेक शोधनिबंध लिहिलेल्या गणेश यांनी आज ना उद्या प्राध्यापक होण्याची संधी मिळेल, या आशेने अनेक महाविद्यालयांत तासिका तत्त्वावर काम केले. तिथे मिळणाऱ्या पगारावर ना घरची डाळ शिजली, ना आयुष्याची. गणेश यांनी अनेक संस्थाचालकांना विनंत्या केल्या, पण गणेश यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न अपुरेच राहिलेच. एकीकडे आतमधून तुटून गेलेल्या गणेशला आपले कुटुंब ही शाबूत ठेवायचे होते, दुसरीकडे घराचा संसार, मुलगी दिव्या, बायको जयश्री, आई अनूसया, बाबा काशीनाथ या सर्वाना घेऊन संसाराचा गाडा हाकायचा होता. म्हणून तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची असलेली नोकरी सोडून गणेश यांनी चहाची टपरी काढली.

गणेश (९४०३२५०६९९) सांगत होते, उच्च शिक्षण घेऊन चुकलेच. पस्तीस वर्षें शिक्षणात गेली. वडिलांनी काबाडकष्ट करून शिकवले. मला शिकवण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य पणाला लावले. आईला वाटायचे, आज ना उद्या आपला मुलगा प्राध्यापक होईल आणि अंगावर असलेले कर्ज चुकते करेल, पण तसे काही झाले नाही. २०२० मध्ये आई गेली आणि वर्षभरात बाबा गेले. गरिबीच्या ओझ्याखाली आई-बाबांचे बरेच कर्तव्य मला पार पाडता आले नाही. असे म्हणत गणेश यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. माझ्या सोबतच्याचे दोन- दोन चहा झाले होते. मी गणेश यांना म्हणालो, आता रोज किती पैसे मिळतात आणि तासिका तत्त्ववर काम करताना किती पैसे मिळायचे. गणेश म्हणाले, महाविद्यालयात तेव्हा प्रतिदिवस किमान दीड हजार रुपये मिळायचे. आता टपरीवर तीन हजार रुपये मिळतात.

शिवाय चार लोकांच्या चुली पेटतात. पैसे दिल्याशिवाय अनेक संस्थांमध्ये संधी मिळत नाही, वशिल्याशिवाय काहीही होत नाही. त्यामुळे अजून थोडे कर्ज काढले आणि ही चहाची टपरी टाकली.

Shivaji Rathod
Shivaji RathodSakal

माझ्यासोबत असलेला शिवराज पाटील यांचा पीएच.डी. नेटसेट युवकाबाबत चांगला अभ्यास होता. शिवराज सांगत होते, पीएच. डी. नेटसेट पात्र असूनही ज्यांना नोकरी नाही अशांची संख्या राज्यात सत्तर हजारांच्या घरात आहे. पवित्र पोर्टलनुसार प्राध्यापकांची रखडलेली भरती केली तर सध्या राज्यात रिक्त असलेल्या वीस हजार प्राध्यापकांच्या जागा भरता येतील. दरवर्षी निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवले जाते. बाकी काही होत नाही. एकाच कॉलेजमध्ये तीन प्रकारचे प्राध्यापक असतात. ज्यांचे शिक्षण समान आहे. पण पगार वेगवेगळे आहेत. एकजण तासिका तत्वावरचा, ज्याला पंधरा ते वीस हजार रुपये दरमाह मिळतात. दुसरा ज्याला ८५ हजार पगार आहे. तिसरा ज्याला थोडा अधिकचा अनुभव आहे, त्याला एक लाख ८० हजार पगार आहे. आणि विद्यापीठात असणाऱ्या प्रोफेसरला दोन लाखांच्यावर पगार असतो. बघा कशी ही तफावत आहे.

गणेश म्हणाले, एकट्या उदगीरमध्ये तुम्हाला शंभराहून अधिक जण भेटतील. अगदी माझ्यासारखे. या रस्त्यावर तुम्ही थोडे पुढे गेलात तर भाजीवाला भेटल, थोडे पुढे गेलात तर भंगारवाला भेटेल. असे अनेक जण आहेत. मी गणेश यांना म्हणालो, चला ना आपण भाजीवाल्या सरांकडे जाऊ. गणेश म्हणाले, का नाही, चला. उदगीरच्या त्या रस्त्याने आम्ही गप्पा मारत निघालो. देगलूर रोडवर आप्पाराव चौकात आलो. गणेश यांनी मला शिवाजी राठोड यांची ओळख करून दिली. एम. ए. सेट, पीएच. डी. असणाऱ्या राठोड यांनी लोकप्रशासनात कमालीचे प्रावीण्य मिळवले खरे, पण राठोड यांना काळाने पुस्तकात, विद्यार्थांच्या दुनियेत कधी रमू दिले नाही. ते रमले भाजीपाल्याच्या दुनियेत. सकाळी शेतकऱ्यांकडून येणारा माल विकत घ्यायचा. तो दिवसभर लोकांना विकायचा आणि त्यातून आपला प्रपंच चालवायचा, असा राठोड यांचा दिनक्रम ठरलेला. अनेक महाविद्यालयांत राठोड यांनी तासिका तत्त्वावर काम केले. तिथे मिळणाऱ्या पैशांपेक्षा इकडे जास्त पैसे स्वाभिमानासह मिळतात, हे राठोड यांच्या लक्षात आले. त्या स्वाभिमानामुळे उदगीरच्या त्या शाहू चौकात नंदिनी चहाचा सुगंध अत्तरासारखा दरवळत होता.

राठोड (८४०८८३६२९४) म्हणाले, एखाद्या महाविद्यालयात प्राध्यापक होण्याचे अगोदर निश्चित केले जाते. पुन्हा शासकीय नियमावली सोईप्रमाणे भरली जाते. आपली ना कुठे ओळख, आहे ना वशिला. माझ्या संपर्कात असणाऱ्या अनेकांनी आत्महत्या केल्या. मी हरणाऱ्यामधला नव्हतो म्हणून मी भाजीपाला विकण्याचे काम आनंदाने स्वीकारले. माझे वडील नचीराम मला नेहमी म्हणायचे, कोणतेही काम हलके नसते, त्यात आनंद मिळाला पाहिजे, आज ते माझे काम बघायला असते तर त्यांना आनंद झाला असता, असे म्हणत राठोड भावुक झाले.

मी राठोड यांना म्हणालो, तुमच्या घरी कोण कोण असते. ते म्हणाले, माझी बायको उषा, आराध्या आणि अनुष्का या दोन मुली. राठोड यांना जास्त शिकल्यामुळे किती अडचणी निर्माण झाल्या हे सांगत होते. त्या भाजीपाल्याच्या दुकानात शिवाजी यांनी प्रचंड नीटनेटकेपणा ठेवला होता. ते प्राध्यापक झाले असते तर अनेक युवकांच्या आयुष्याचे तेच झाले असते. गणेश आणि शिवाजी या दोन्ही उच्च शिक्षितांची अवस्था सारखीच आहे. किंबहुना राज्यातल्या ‘त्या’ सत्तर हजारांची अवस्था देखील सारखीच आहे. त्यात अनुदानितवाले वेगळे, विनानुदानितवाले वेगळे भरडले जातात.

आम्ही राठोड यांच्याकडून नियोजित ठिकाणी निघालो. गणेश यांचाही निरोप घेतला. माझ्या सोबत असणारे शिवराज, सुरेश सरकारला, नशिबाला, खाजगी व्यवस्थेला दोष देत होते. माझ्या डोक्यात मात्र वेगळे विचार येत होते. गणेश आणि शिवाजी यांनी सुरुवातीपासून आपला प्लॅन बी, प्लॅन सी का तयार ठेवला नाही,? आपल्या वडिलांचा व्यवसाय दोघांनी का शिकला नाही,? जयश्री किंवा उषा या त्यांच्या बायकांना नोकरी किंवा व्यवसाय का सुरू करून दिला नाही.? जशी एमपीएससीची तयारी करण्याऱ्या युवकांची अवस्था आहे, तशीच अवस्था या पीएचडी नेटसेट पात्र असणाऱ्यांची झाली आहे. एमपीएससीला स्पर्धा नावाचा बागुलबुवा उभा आहे. पीएचडी नेटसेट यांना सरकार, संस्थाचालक नावाच्या सिस्टीमने जाणीवपूर्वक गिळून टाकले आहे. पीडितांविषयी संघर्ष करणारे शांत आहेत. प्रतिभावंतांचा ‘प्रकोप’ झाला तर काय होऊ शकते? हे मी न सांगितलेले बरे. बरोबर ना..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com