गाई आणि माई...

‘सकाळ’मधील माझा जुना सहकारी नरेश हाळणोर यांचा सकाळी सकाळी फोन आला. ते म्हणाले, दादा काल रात्री लवकर झोपल्यामुळे तुमचा फोन घेतला नाही.
Cow
CowSakal

‘सकाळ’मधील माझा जुना सहकारी नरेश हाळणोर यांचा सकाळी सकाळी फोन आला. ते म्हणाले, दादा काल रात्री लवकर झोपल्यामुळे तुमचा फोन घेतला नाही. आता मी चुंचाळे शिवार भागात असणाऱ्या ` श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ’ या गाईसाठी चालवल्या जात असलेल्या प्रोजेक्टवर चाललोय. दुपारी आल्यावर भेटू.

मी म्हणालो, कुठे आहे हा प्रोजेक्ट? ते म्हणाले, तुम्ही ज्या पाथर्डी फाट्यावर राहता तिथून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. मी म्हणालो, मी येऊ का? नरेश म्हणाले, चला, त्यात काय?

नरेश आणि त्यांच्यासोबत गौरव क्षेत्रीय नावाचा एक प्राणीमित्रही होता. आम्ही त्या प्रोजेक्टवर पोहचलो. नाशिकमधल्या पांजरापोळ येथे १८७८ मध्ये प्रागजी मावजी जव्हेरी यांनी जवळपास पंधराशे एकरमध्ये गाईंसाठी प्रचंड मोठे काम सुरू केले. ते काम अजूनही त्याच पद्धतीनं प्रागजी यांची तिसरी पिढी एक ध्यास घेतल्यासारखं गाईंचे पालकत्व स्वीकारून सेवा करत आहे. केवळ गाय हा विषय नाही, तर पर्यावरणासाठी उपयुक्त असे अनेक प्रयोग येथे राबवले जातात. त्या प्रोजेक्टचे व्यवस्थापक विठ्ठल जगन्नाथ आगळे (९५२७७०४०४८) आणि तिथे सेवा म्हणून काम करणारे पशू अधिकारी प्रकाश झांबरे (९४२२७६७५१२) कृषी अधिकारी जिभाऊ सिरसाट हे तिघेही जण आमच्या स्वागतासाठी भरपावसात उभे होते.

चहापान झाल्यावर आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसून तो सगळा परिसर पाहिला. मोरांचे कळपच्या कळप आमच्या जवळून जात होते. पाण्याच्या नियोजनासाठी केलेले तलाव, तिथं असणारी बदक, जागोजागी असलेल्या नर्सरी, अनेक छोटे-छोटे शेतीप्रयोग, बापरे बाप... काय काय सांगावे... राज्यातल्या खऱ्याखुऱ्या नैसर्गिक सौंदर्याने येथे चार चाँद लावले होते.

आम्ही एका गेटजवळ आलो. तिथे शेकडो गाई होत्या. एक जण आपल्या गाई सोडण्यासाठी तिथे आला होता. मी त्याच्याजवळ जाऊन त्यांना विचारले, आजोबा, गाई का आणून सोडताय. आजोबा म्हणाले, काय सांगू बाबा... या गाईने लई जीव लावला. तिचे दूध पिऊन हत्तीचे बळ अंगात आले. तिला कसायाला विकले तर माझ्या माईला विकल्यासारखे होईल, म्हणून इथे सोडायला आलो. मी म्हणालो, मग तुम्ही तुमच्या माईला असे सोडून का जाता.

गाईच्या पाठीवर हात ठेवत, काही न बोलता ते शेतकरी आजोबा भावूक होऊन आपले अश्रू पुसत होते. ते आजोबा जात होते, गाय त्या आजोबांच्या पाठीकडे बघत जोरदार हंबरडा फोडत होती. तो प्रोजेक्ट गाईचा वृद्धाश्रम होता. ट्रॅक्टरने दोन अडीच-तास आतमध्ये फिरल्यावर आगळे म्हणाले, आता कुठे आपण अर्धा भाग पाहिला.

मी आगळे यांना म्हणालो, बापरे, किती मोठे काम आहे हे. या प्रोजेक्टचे मुख्य पालनकर्ता जे कुणी आहेत, त्यांच्याशी मला एकदा बोलायचे आहे. आगळे यांनी लगेच हितेश रामजी जव्हेरी (गोपालभाई) यांना फोन लावला. तब्बल अर्धा तास आमचे फोनवर बोलणे झाले. ते अत्यंत ऊर्जावान आणि उत्साही व्यक्ती असल्याचं त्यांच्याबरोबरच्या बोलण्यावरून वाटत होते. गोपालभाई म्हणाले, मला दोन मुली आहेत आणि हा गाईचा प्रोजेक्ट माझे तिसरे अपत्य आहे. माझ्या तीन पिढ्यांनी आपल्या आयुष्याचा वेळ या प्रोजेक्टच्या संगोपनासाठी, विकासासाठी दिला आहे. गाय, संस्कृती, उत्तम शेती, पर्यावरणाचे प्रेम यासाठी हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टला अनेक जण गाईंचा वृद्धाश्रम म्हणतात; पण आम्ही गाईंचे माहेर म्हणतो. अनेक शेतकरी आपल्या गाईची सेवा करावी म्हणून गाय आम्हाला देतात. आम्ही माय म्हणून गाईची सेवा करतो. गोपालभाई फोनवर माझ्याशी मोकळेपणाने संवाद साधत होते. असं वाटत होतं, त्यांचं बोलणं ऐकत राहावं.

आमचा फोन झाल्या- झाल्या लगेच माझ्यासोबत असणारे प्राणीमित्र क्षेत्रीय म्हणाले, अहो ही जागा नाशिकला अगदी लागून आहे. त्यामुळे अनेकांचा या जागेवर डोळा आहे. आम्हाला थोडीशी एकदा अशी कुणकुण लागलीही होती. आम्ही तसे काहीही होऊ देणार नाही. इथे संस्कृतीचे, गाईंविषयीच्या मातृप्रेमाचे, माणुसकीचे कोणाला काही देणे-घेणे नाही. गाईच्या कत्तलीबाबत आमच्या राज्यात वेगळे कायदे आहेत, आणि दुसऱ्या राज्यात वेगळे कायदे आहेत. त्यामुळे गाईची तस्करी करणाऱ्याला कशाची भीती उरलेली नाहीये. बोलता-बोलता तो प्राणीमित्र बरेच काही बोलून गेला.

आमच्यासोबत असणारे डॉ. झांबरे म्हणाले, माझ्यासारखी अनेक माणसे सेवा म्हणून इथे काम करतात. हे काम करत असताना पहिल्यांदा आपण सेवाभाव म्हणून काहीतरी करतोय, याचा अभिमान वाटतोय. मी ज्या माणसांशी बोलत होतो त्यांच्याकडून तिथल्या वेगवेगळ्या विषयांसंबधीची माहिती ते मला सांगत होते. तिथे असणारे पक्षी म्हणजे मोर, वेगवेगळ्या प्रकारची फळांची झाडे, गाईंसाठी विस्तृत क्षेत्रावर लावलेला चारा, प्रत्येक गोष्ट माझे लक्ष वेधून घेत होते. माझ्यासोबत असणारे व्यवस्थापक आगळे यांचीसुद्धा तिसरी पिढीही इथे काम करते. व्यवस्थापकांचा मुलगा सागर आगळे इथे उच्च शिक्षण घेऊन व्यवस्थापनाचे काम करतोय.

व्यवस्थापकांनी सांगितले, इथे असणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम मिळते. शहराला शुद्ध हवा देणारा हा प्रोजेक्ट आहे, अशी पावती अनेकांनी दिली आहे. हंबरडा फोडणाऱ्या गाई पाहून असे वाटत होते, त्या कुणी तरी येणार असल्याची वाट पाहत होत्या. थोडाही गेटचा आवाज कानी आला, की गाईंची नजर त्या गेटकडे जात होती. एकीकडे प्रचंड सोय आणि दुसरीकडे प्रचंड हुरहूर, अशा दुहेरी वातावरणात जगणाऱ्या त्या गोकुळाचे कौतुक करावे तेव्हढे कमीच होते. शांत वाहणाऱ्या या वाऱ्याला कुणाची वाईट नजर लागू नये, इथला निसर्ग आणि गोमातेवरील प्रेम कायम राहावे, अशी मनोमन अशा ठेवून मी निघायच्या तयारीला लागलो.

सतत हंबरडा फोडणाऱ्या गाईंच्या पाठीवरून मी हात फिरवता क्षणी ती हंबरडा फोडणारी गाय एकदम शांत झाली. माणसासारखी प्राण्यालाही स्पर्शाची भाषा कळते, हे मला त्याच क्षणी वाटले. मी निघताना हा प्रोजेक्ट माझा आहे, अशी भावना माझ्या मनात झाली. शेकडो माणसांच्या आणि गाईंच्या तोंडचा घास हिरावू पाहणाऱ्यांनी एकदा तिथे असणाऱ्या गाईंच्या डोळ्यात आपल्या माईचे रूप पाहिले, तर त्यांचे सिमेंटचे जंगल बनवण्याचे स्वप्न हवेत विरेल, नाही का? आपल्या गाईसाठी- आपल्या माईसाठी- तुम्ही-आम्हीसुद्धा नक्की काही तरी करू, हो ना...?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com