esakal | ‘विवेकी’ चिकित्सा!

बोलून बातमी शोधा

Panini Lawyer

‘विवेकी’ चिकित्सा!

sakal_logo
By
संदीप काळे sandip.kale@esakal.com

मी अंधेरीच्या स्टेशनवर लोकलची वाट बघत होतो. काही माणसं काही लोकांना उचलून गाडीत बसवत होती.

माझ्या शेजारीच हा प्रकार सुरू होता. दृश्य लक्षवेधक होतं. मी थोडं पुढं जाऊन पाहिलं, तर भिकारी आणि वेडसर लोकांना त्या गाडीतून नेलं जात होतं. भिकाऱ्यांना गाडीत बसवणाऱ्‍यांपैकी एका व्यक्तीला मी विचारलं : ‘‘कुठं नेताय या लोकांना?

ती व्यक्ती म्हणाली : ‘‘दवाखान्यात.’’

‘महापालिकेच्या का?’’ मी विचारलं.

‘नाही, खासगी दवाखान्यात.’’

त्या लोकांना कुठं नेलं जात आहे, नेणारी माणसं कोण आहेत याविषयीची माहिती गप्पांच्या ओघात मला मिळाली. त्या लोकांना घेऊन जाणारी गाडी पुढं गेली. माझ्याशी बोलणाऱ्या व्यक्तीबरोबर मी त्या खासगी दवाखान्याच्या दिशेनं निघालो. अंधेरी स्टेशनजवळ तो दवाखाना होता. मी ज्या व्यक्तीबरोबर दवाखान्यापर्यंत आलो होतो त्या व्यक्तीचं नाव पाणिनी वकील. एका खासगी कंपनीत काम करणारे पाणिनी यांना सेवाभावी कामातही रुची आहे.

पाणिनी म्हणाले : ‘‘मधुमेहानं मला वीस वर्षांपासून अक्षरशः खाऊन टाकलं होतं. माझे पाय नासून गेले होते. माझी बायको आणि मुलगी रोज माझ्या पायातला गळणारा पांढरा स्राव पुसून काढायच्या. असं वाटायचं, आपलं आयुष्य संपलं आता. पाय कापून टाकण्याचा सल्ला अनेक मोठ्या डॉक्टरांनी दिला होता. जवळ पुरेसा पैसा नव्हता. अशातच एका मित्राच्या सल्ल्यानं मी डॉ. विवेक यांच्याकडे गेलो. त्यांनी ‘प्राकृतिक चिकित्से’च्या माध्यमातून मला बरं केलं.

माझ्याकडून एकही पैसा घेतला नाही.’’

पाणिनी यांची कहाणी ऐकून आणि त्यांच्या मोबाईलमधील त्यांच्या पायाचे जुने फोटो पाहून

त्यांना सोसाव्या लागलेल्या गंभीर परिस्थितीची मला कल्पना आली.

पाणिनी पुढं सांगू लागले : ‘‘विवेक यांच्या अनेक सेवाभावी उपक्रमांशी मी जोडला गेलो आहे. आठवड्यातून दोन दिवस मुंबईतल्या अनेक भागांतून भिकारी, वेडे यांना दवाखान्यात आणायचं...त्यांच्यावर इलाज करायचा...त्यांना परत त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी पोहोचवायचं...हे सुरूच आहे.’’

आम्ही दवाखान्यात पोहोचलो. पाणिनी यांनी माझी डॉ. विवेक मुरलीधर बेंडाळे (९३२४५४४३९२) यांच्याशी ओळख करून दिली. विवेक एका रुग्णाला तपासण्याच्या, त्याची ‘चिकित्सा’ करण्याच्या कामाला लागले.

दरम्यान, मी तिथल्या काही फाईल पाहू लागलो. मी पाहत असलेल्या फाईल या केवळ फाईल नव्हत्या; तर ‘प्राकृतिक चिकित्से’चा (नॅचरोपॅथी) तो दस्तावेजच होता. ‘तुम्ही आता आयुष्यभर निकामी झालात,’ अशा आशयाचा शिक्का ज्यांच्यावर औषधोपचारांनंतरही आधीच्या डॉक्टरांकडून मारला गेला होता अशा किती तरी रुग्णांना डॉ. विवेक यांनी बरं केल्याचं त्या फायलींमधून कळत होतं. लकव्यामुळे कुणाचा हात गेला आहे...मधुमेहामुळे कुणाचा पाय गेला आहे...

हे रुग्ण अमेरिकेपासून ते गडचिरोलीपर्यंतचे होते.

रक्तपुरवठा खंडित होऊन शरीराचे अनेक भाग व निकामी झालेले अवयव आपल्या चिकित्सेच्या माध्यमातून विवेक यांनी दुरुस्त केले असल्याचं समजलं. तिथं असणाऱ्या अनेक रुग्णांकडून विवेक यांच्या कामाचं कौतुक ऐकलं. समीरण राघव हे त्यांपैकी एक. समीरण म्हणाले : ‘‘मुलगा आणि सून डॉक्टर असतानाही माझ्या जगण्याचा मार्ग खुंटल्यासारखं झालं होतं. दहा वर्षांपासून मी एका जागी पडून होतो. आता चालतोय...फिरतोय...’’

तिथं असणाऱ्या इतरही रुग्णांनी मला या उपचारांबद्दल काही ना काही नवीन माहिती दिली.

‘मी गरीब असल्यामुळे माझा इलाज मोफत केला गेला. घरी जाण्यासाठी मला पैसेही देण्यात आले,’ असं सांगणारेही काही रुग्ण त्यांत होते.

विवेक हे मूळचे धुळ्याचे. वडील मुंबईत ‘श्रीराम मिल’मध्ये गिरणीकामगार होते. विवेक यांचं शिक्षण अभियांत्रिकीत झालं आहे! सतत दुखणाऱ्या हाता-पायांना बाहेरून लावण्यात येणारं विशिष्ट प्रकारचं साहित्य तयार करणं आणि ते बसवणं अशा प्रकारचं काम विवेक यांनी सुरू केलं. त्यानंतर या साहित्याऐवजी असे दुखणारे हात-पाय चिकित्सेच्या माध्यमातून कायमचे बरे होऊ शकतात, असा अनुभव आल्यानंतर विवेक ते काम करू लागले. त्यात त्यांना चांगलं यश मिळू लागलं.

जपानमध्ये सिआसू, अमेरिकेत कॉरो फॅक्टर, चीनमध्ये ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर अशा थेरपी ते शिकले.

विवेक म्हणाले : ‘‘या तिन्हींपैकी केवळ एकच थेरपी केली तर माणूस बरा होत नाही. तिन्ही थेरपी कराव्या लागतात, असं अनेक रुग्णांवर केलेल्या थेरपींवरून माझ्या लक्षात आलं. मी या तिन्ही थेरपी एकत्रित करून माझी

‘डी टक’ ही थेरपी विकसित केली. या विषयात उच्च पदवी तर घेतलीच. शिवाय, दोन वर्षं थायलंडच्या विद्यापीठात संशोधन करून डॉक्टर झालो. गँगरिन, न्यूरोपथी, व्हेरिकोज् व्हेन्स यांविषयी मी अनेक प्रयोग केले आहेत. खरं तर, ज्यांच्यावर उपचारही नाहीत असे दीडशहून अधिक आजार आहेत. मात्र ‘प्राकृतिक चिकित्साशास्त्रा’च्या माध्यमातून अनेक व्याधींवर इलाज होऊ शकतो.’’

विवेक म्हणाले : ‘‘माझी आई कमल हिनं मला एक शिकवण दिली होती. ती म्हणायची, ‘तू लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायला पाहिजेस.’ बरे झालेले अनेक रुग्ण आज जेव्हा देव समजून माझ्या पाया पडू पाहतात तेव्हा तेव्हा मला माझ्या आईचा चेहरा आठवतो. आई-बाबा आज हे पाहायला हवे होते.’’

दवाखान्याच्या शेजारीच विवेक यांचं घर आहे. आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो. विवेक यांची पत्नी संध्या, मुलगा निमेश, मुली मंदिरा, काश्मिरा, भाऊ राकेश...सर्वांनी स्वागत केलं. जेवायचा आग्रह झाला. जेवतानाही गप्पा झाल्या.

दवाखाना उभारताना आलेल्या अडी-अडचणी संध्या यांनी सांगितल्या.

विवेक यांची तिन्ही मुलं नॅचरोपॅथीमध्ये करिअर करणार आहेत. भाऊ राकेश विवेक यांच्यासोबतच काम करतात.

संध्या घरीच औषधी तयार करण्याचं काम करतात. असं सगळं कुटुंब पीडित माणसांना उभं करण्याच्या कामाला लागलेलं आहे. विवेक यांना रुग्णांवर उपचार करण्यात जेवढी रुची होती, त्यापेक्षा जास्त रुची त्यांना सामाजिक उपक्रम राबवण्यात होती. येणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्याचा त्यांनी जणू विडाच उचलला होता.

विवेक बोलताना सहज म्हणाले : ‘‘मला शहरापासून दूर एक मोठं नॅचरोपॅथी सेंटर उभारायचं आहे. त्या सेंटरच्या माध्यमातून मी अनेक पीडितांची सेवा करू शकेन; पण खूप आर्थिक अडचणी आहेत.’’ त्यावर विवेक यांच्या दोन्ही मुली भावनिक होऊन म्हणाल्या : ‘‘बाबा, नका काळजी करू; आपण लवकरच ते सेंटर सुरू करू.’’

विवेक यांच्या ‘विवेकी चिकित्सा’नं केलेले प्रयोग सामाजिक स्वास्थ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं.