esakal | आई, बाई आणि ‘ती’...
sakal

बोलून बातमी शोधा

Renuka Kad

आई, बाई आणि ‘ती’...

sakal_logo
By
संदीप काळे sandip.kale@esakal.com

ज्येष्ठ चित्रकार नयन बाराहाते यांचा मुक्काम मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयातून दुसरीकडे हलवणं आता गरजेचं झालं होतं. नयन यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काही दिवसांपूर्वी श्रीपाद जोशी, प्रज्ञा दया पवार, दत्ता भगत, अतुल पेठे यांचे फोन मला येऊन गेले.

‘नयन यांच्या प्रकृतीची काळजी घ्या. आम्ही तुमच्याबरोबर आहोतच,’’ असं या सगळ्यांनी सांगितलं.

नयन यांच्यावरील उपचारांसाठी पुढचा पर्याय काय याविषयी माझा शोध सुरू झाला. पॅरलाईज्ड् लोकांसाठी काम करणाऱ्या ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट’विषयी मी खूप ऐकून होतो. रेणुका कड (९४२१९६२८७१) या संस्थेचं काम पाहतात. रेणुका यांना भेटण्यासाठी मी औरंगाबादला चिखलठाण्याला त्यांच्या घरी गेलो.

रेणुका यांच्या आईनं - लीलाताईंनी - दरवाजा उघडला.

‘रेणुका आहेत का?’’ मी विचारलं.

रेणुका काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. तितक्‍यात त्यांच्या लीलाताईंचा मोबाईल वाजला.

फोनवर बोलून झाल्यावर त्या म्हणाल्या : ‘‘ ती येईलच एवढ्यात. तुम्ही बसा.’’

मी बसलो. लीलाताईंनी प्यायला पाणी दिलं.

घरात भरपूर पुस्तक आणि पुरस्कारही दिसत होते. पुस्तकं आणि पुरस्कार या विषयानंच आमच्या गप्पांना सुरुवात झाली. रेणुका यांच्या कर्तृत्वाविषयी सांगताना लीलाताई भरभरून बोलत होत्या.

त्या म्हणाल्या : ‘‘रेणुकानं आयुष्यभर माझ्यासाठी, अडचणीत सापडलेल्या कित्येक महिलांसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलंं. आपलं कर्तव्य पार पाडत असताना स्वतःचं आयुष्य, संसार यांचा तिनं कधीही विचार केला नाही.’’

रेणुका आल्या. मी नयन यांचा विषय काढत रेणुकांच्या प्रवासाविषयीही त्यांच्याकडून जाणून घेतलं.

रेणुका यांना आलेली महिलांची काही पत्रं त्यांनी मला वाचायला दिली.

‘ताई, माझा संसार वाचला...’

‘रेणू, कुणीही सोबत नसताना केवळ तुझ्यामुळे मी उभा राहिलो...’

‘तू होतीस म्हणून माझी आत्महत्या टळली...’

‘माझ्या नवऱ्याचा जीव, रेणुकाताई, तुझ्यामुळे वाचला...’

अशा वेगवेगळ्या आशयांची ती पत्रं होती.

रेणुका समाजकार्यात तत्पर. उच्चशिक्षित.

‘कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट’, ‘विकास अध्ययन केंद्र’ या दोन संस्थांचं काम त्या पाहतात.

मीही अशाच एका कामासंदर्भात रेणुका यांना भेटायला आलो होतो.

आपल्या कामाविषयी सांगताना त्या म्हणाल्या : ‘कम्युनिटी’च्या माध्यमातून गरिबांच्या आरोग्यासंदर्भात श्रीरामपूर, राहता, वैजापूर इथं काम चालतं. या सेंटरवर असंख्य सामाजिक कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करतात. ‘विकास’च्या माध्यमातून भारतात अनेक ठिकाणी काम सुरू आहे. गुजरातमध्ये मालिया, मियाना इथलं काम, तसंच मीनाबाजारसारखे उपक्रम ‘विकास’चेच आहेत.

उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं कुंभमेळा भरतो, तिथं तृतीयपंथीयांविषयी खूप मोठं काम सुरू आहे. मराठवाड्यात ‘एकल महिला फोरम’च्या माध्यमातून असंख्य महिलांना उभं करण्याचं काम झालं. ते काम अजून वाढत आहे.’’

त्या पुढं म्हणाल्या : ‘‘एका स्त्रीचा चहूकडून छळ होतो. पुरुष बेजबाबदार वागतात. स्त्रीनं कमावलेलं असतं, त्यातूनच व्यसनं करतात. बायकोवर संशय घेतात. मुलांची जबाबदारी स्वीकारत नाहीत.’’

ही सगळी माहिती घेत असतानाच लीलाताईंनी गप्पांच्या ओघात काही कौटुंबिक माहितीही दिली. लीलाताईंचं माहेरचं आडनाव खोसे. माहेर पैठण. सासर गोसेगाव. लहान वयातच त्याचं लग्न झालं. लीलाताईंच्या पतीचं एका घटनेत निधन झालं. मग थोरली रश्मी, रेणुका आणि भाऊ गणेश यांचं संगोपन लीलाताईंनी एकटीनंच केलं. रश्‍मी दुबईत दूतावासात,तर गणेश विद्यापीठात काम करतात.

मी रेणुका यांना सहज विचारलं : ‘‘वडिलांच्या पश्र्चात झालेल्या तुमच्या आईच्या हाल-अपेष्टा, तुमच्याकडे रोज येणाऱ्या अनेक दुःखी महिला...हे सगळं पाहून तुम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतलात का?’’

काहीशा गंभीर होत रेणुका म्हणाल्या : ‘‘तसंही कदाचित असेल. मला पीडित महिलांसाठी खूप मोठं काम उभं करायचं होते. आज मी देशभर फिरते. अनेक महिलांना उभं करते. अनेक विषयांचं संशोधन करते...रिसर्च करते. त्यांविषयीचे अहवाल सादर करते. सिंधुदुर्गमधला मच्छीमारवाद...राज्यात तृतीयपंथीयांच्या विकासकामासाठी मिळालेला सात कोटी रुपयांचा विकासनिधी...असे किती तरी विषय माझ्या रिसर्चमुळे मार्गी लागले. मी विवाहित असते तर हे विषय मला मार्गी लावता आलेच असते असं कशावरून?’

मुलीचं बोलणं लीलाताई कौतुकानं ऐकत होत्या.

रेणुका म्हणाल्या : ‘‘आता कोरोनाच्या या काळात तर महिला आणि आरोग्य, सरकारदरबारी करून द्यायचं नियोजन याविषयीचं काम खूप वाढलं आहे. महिलांवरच्या अत्याचारांतही वाढ होत आहे. या काळातही सगळीकडचे दौरे करत, मी तीस वेगवेगळ्या सेंटरना प्रशिक्षण देण्याचं काम करते. तालुकापातळीवरचं नेटवर्क यानिमित्तानं विस्तारलं आहे.’’

रेणुका आणि लीलाताई यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या. जेवण झालं. आता मला निघायला हवं होतं. मी निघायची तयारी करू लागलो. लीलाताईंनी खास मराठवाड्याच्या चवीचे मेथीचे लाडू सोबत बांधून दिले. नयन बाराहाते यांच्यासंदर्भात पुढं काय करायचं हे मी समजून घेतलं. ते कसं करायचं हेही ठरलं.

रेणुका यांनी आपल्या आईसाठी, समाजात एकट्या असणाऱ्या, अडचणीत असणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी जे काही उभं केलं आहे ते नक्कीच नोंद घेण्यासारखं आहे.

निघताना मला लीलाताईंचं वाक्य आठवलं. त्या गप्पांच्या ओघात म्हणाल्या होत्या : ‘‘ समाजातल्या ‘ती’साठी, म्हणजे महिलांसाठी, रेणुका खूप काही करते. मात्र, तिला तिच्यातल्या ‘ती’साठी फार काही करता आलं नाही.’’

माझ्या मनात विचार आला...रेणुका एवढं काम उभं करू शकतात...त्यांंचा हा आदर्श चार पुरुषांनीही घेतला तर?