आतल्या आवाजाची धनी..!

त्या दिवशी मी बारामतीमध्ये होतो. बारामती क्लबमध्ये सकाळी सात वाजता माझ्या रूमची बेल वाजली. मी डोळे पुसत दरवाजा उघडला. बाहेर पाहतो तर काय? कवी लक्ष्मण जगताप सर होते.
Laxman Jagtap Sir
Laxman Jagtap SirSakal

त्या दिवशी मी बारामतीमध्ये होतो. बारामती क्लबमध्ये सकाळी सात वाजता माझ्या रूमची बेल वाजली. मी डोळे पुसत दरवाजा उघडला. बाहेर पाहतो तर काय? कवी लक्ष्मण जगताप सर होते. त्यांचा सगळा ठरलेला दिनक्रम डोळ्यांसमोर आला. बारामतीमध्ये होत असलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही काही ठिकाणी भेट देणार होतो.

त्या अनुषंगाने आमचं सगळं नियोजन सकाळी सात वाजल्यापासून ठरलं होतं. आम्ही बारामतीच्या शासकीय क्रीडा संकुलात भेटणार होतो. तिथून मग आमचा दिनक्रम सुरू होणार होता. मी तयार होऊन जगताप यांच्या सोबत क्रीडा संकुल गाठलं.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खासगी सचिव आणि उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील आमची वाट पाहत होते. सरांनी शासकीय क्रीडा विभागाची जबरदस्त व्यायाम शाळा आम्हाला दाखवली. शहरातले मोठे क्लब, जिम्स बारामतीमधल्या त्या क्रीडा संकुलातील अत्याधुनिक सोयी सुविधांपुढे फिक्या पडतील अशी तिथली परिस्थिती होती. आम्हाला तिथे राहण्याच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने सगळं पाहायचं होतं.

आतापर्यंत बारामतीमध्ये झालेले ऐतिहासिक काम त्यांनी आम्हाला सांगितले. क्रीडा अधिकारी महेश चावले हे कमालीचे उत्साही होते. मागच्या चारपाच वर्षांत जिल्हा क्रीडासंकुलानं केलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल ते मला सांगत होते. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर तिथूनच अनेकांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. बारामतीमध्ये विकास कामाचा आलेख ज्याप्रमाणे उंच होता, त्याचप्रमाणे बारामती क्रीडासंकुलामधल्या यशस्वी होणाऱ्या मुलांची यादीही मोठी आहे.

आम्ही तिथे असणाऱ्या बॅडमिंटन टीमसोबत चहा घेत होतो. अधिकारी, व्यावसायिक, बांधकाम अशा सर्व विभागांतील माणसे तिथं होती. राज गोपने, सचिन तवार ही सारी मंडळी त्यांच्या विनोदी शैलीतून वातावरणात रंगत आणत होते.

आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारी काही मंडळी तिथे थांबणार होती. त्या मंडळींच्या राहण्याची व्यवस्था आम्ही पाहायला गेलो.

भल्या सकाळी एक मुलगी तिथे अभ्यास करत बसली होती. आम्ही जाऊन तिच्या जवळ थांबलो. तरी तिचं लक्ष आमच्याकडे नव्हतं. माझं लक्ष तिच्याकडे होतं. ती इथे काय करत असेल? हा प्रश्न मला पडला होता. आम्ही राहण्याची व्यवस्था पाहून आलो तरी ती मुलगी तिच्या अभ्यासात गर्क होती.

मी तिच्याजवळ जाऊन थांबलो. तिला जोरात हाक मारल्यावर ती एकदम शुद्धीवर आल्यासारखं माझ्याकडे पाहत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, नमस्कार, काय वाचताय? ती माझ्याकडे बघत म्हणाली, काही नाही, माझा कॉलेजमधला अभ्यास आहे. परवा प्रात्यक्षिक परीक्षा आहे. त्याचा अभ्यास करतेय. मग इथं काय करताय ?

ती बोलणार इतक्यात क्रीडा अधिकारी चावले म्हणाले, ही बुलढाण्याची पूनम इंगळे आहे. राज्य कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इथं आली. क्रीडा अधिकारी चावले बाकीच्या मुलींशी बोलत, कुस्तीच्या खेळासंदर्भातल्या तयारीला लागले. प्रांत आणि पाटील सर हेही आपापल्या कामाला लागले. मी मात्र अजून त्या मुलींच्या बाजूलाच बसलो होतो.

ती मुलगी कुठून आली? ती इथपर्यंत कशी पोहोचली? मुलगी असूनही तिने कुस्ती का निवडली? , असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. जे मी तिला विचारत होतो. अभ्यासामुळं तिची माझ्याशी बोलायची खूप इच्छा नव्हती. पण मग थोड्या संवादानंतर ती बोलायला लागली.

नियतीनं कितीही परीक्षा घेतल्या, तरी आपली लढाई सुरू ठेवायची. कितीही अपयश आले तरी पुढं जायचं. या जिद्दीने त्या पंधरा वर्षांच्या मुलीनं स्वतः इतिहास घडवण्याचं काम करत अनेक मुलींना मोठा संदेश दिला होता. मी ज्या मुलीशी बोलत होतो तिचं नाव पूनम इंगळे ( ९३५६३५७३९६). पूनम अकरावीमध्ये शिकते.

कुस्ती आपल्या महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा खेळ, त्या कुस्तीमध्ये आपण प्रावीण्य मिळवत, महाराष्ट्राचे, देशाचे नाव उत्तम व्हावं, या भावनेतून पूनमला कुस्तीचं वेड लागलं. कुस्ती शिकवण्यासाठी तिला ना कोच मिळाला, ना आखाडा, ना खाण्यापिण्याची व्यवस्था, ना साहित्य. पूनमनं यु-ट्यूबच्या माध्यमातून कुस्तीचे डावपेच शिकले. दंगल चित्रपटापासून, ज्यांनी ज्यांनी कुस्तीमध्ये आपलं वेगळं नाव करत देशाचं नाव चमकलं होतं.

त्या सगळ्यांचा इतिहास, भूगोल पूनमला पाठ होता. तू मुलगी आहेस, कुस्ती कशाला खेळतेस ? कुस्ती हा खेळ काय मुलींचा आहे का? असं सारखं पूनमला सगळ्यांकडून ऐकून घ्यावं लागतं. पूनमची मोठी बहीण ज्योती, पुण्यात ड्रायव्हर असलेला भाऊ या दोघांनी पूनमला कुस्तीसाठी प्रोत्साहित करत मदत केली. जिल्हा, विभाग, राज्य अशा ठिकाणी कुस्ती गाजवल्यावर पूनम आता पुढच्या कुस्तीसाठी तयारी करत आहे.

बुलढाणाच्या या एकलव्यामागं अठरा विश्व दारिद्र्य कायम आहे. त्यातच वडिलांची साथ नाही, असे तिच्या बोलण्यामधून जाणवलं. एका मुलीला कुस्तीसारखा छंद जोपासण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतातच आणि तेही कुणाचा आधार नसताना, हे किती अवघड असतं हे पूनम मला सांगत होती. पूनमची आई, आशाबाई यांनी पूनमसह दोन्ही भावंडांचे कष्टाने संगोपन केलं.

दिवसभर काबाडकष्ट करत मिळालेल्या काबाडकष्टाच्या माध्यमातून आपल्या तिन्ही बाळांना मोठे करायचं, अशी जिद्द आशाबाईंची होती. पूनम सांगत होती, वडिलांचे छत्र असूनही ते नेहमी नसल्यासारखेच. माझ्या वडिलांना मी कधी पाहिलं नाही. ते आमच्या बरोबर का राहत नाहीत? आईनेही त्याबद्दल फारसे सांगितलं नाही. वडिलांची कमी कधीही आईने भासू दिली नाही. आपण चांगलं काम केलं पाहिजे.

आपण जिद्द बाळगून चिकाटीने पुढे गेलं पाहिजे, ही शिकवण माझ्या आईने दिली. मला स्वत:साठी, कुटुंबासाठी काहीतरी करावे असे वाटत नाही. मला माझ्या देशासाठी, राज्यासाठी काहीतरी अभिमान निर्माण करावा असं काम करायचे आहे. त्या कामातून मी कुस्ती निवडली, आज कुस्तीच्या माध्यमातून मी सगळ्यांना परिचयाची झाली आहे.

मी पूनमला म्हणालो, तू अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होतेस, बाकी खेळ प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंविषयी तुला काय वाटतं? पूनम म्हणाली, फार कमी मुलांना खेळताना तयारी करताना मी गांभीर्याने पाहिले आहे. त्याचं कारण त्यांच्याकडे पर्याय खूप आहेत. आई-वडील, शिक्षक, शाळा, कॉलेज असे कुणालातरी आवडते म्हणून अनेक खेळाडू खेळायला येतात.

तसे हे खरे आहे ज्यांच्याकडे सारे काही आहे त्याला कशाचीही पर्वा नसते. दंगल पिक्चरमध्ये आमिर खानचे पात्र ज्या भावनेतून आपल्या मुलीच्या पाठीशी उभे राहते, तिला खेळातून देशासाठी प्रोत्साहित करते. आज असे प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. मी पूनमला म्हणालो, दुपारी तुझी स्पर्धा आहे आणि तू आता अभ्यास करतेस ?

पूनम हसली, आणि म्हणाली, ती स्पर्धा मी जिंकणारच आहे. मला त्या स्पर्धेसोबत परवा असणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेबद्दलही तयारी करायची आहे. मी सायन्स घेतलंय. शिक्षणातही मोठे ध्येय मला गाठायचे आहे. मी एक प्रश्न विचारला, की पूनम त्याचे विस्तृतपणे उत्तर देत होती. खूप चांगलं वाचन, सुंदर अक्षर, यापेक्षाही आयुष्याचे डावपेच कशाप्रकारे असतात हेही तिला खूप कमी वयात अनुभवातून शिकायला मिळालं होतं.

मी बाहेर एक नजर टाकली, हनुमंत पाटील, महेश चावले हे सारे जण मी कधी येईल याची वाट पाहत होते. मी पूनमचा निरोप घेत पुढे निघालो. मी ज्या पूनमला अनुभवून आलो होतो. ती पूनम एकटी नव्हती. ती पूनम त्या प्रत्येक मुलींचं प्रतिनिधित्व करणारी होती. ज्या मुलींच्या मागे कुठलीही ताकद नाही. पण त्यांनी स्वतःभोवती आपल्या कष्टातून एक ताकद उभी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com