अहंकारानं तुटलेले संसार?

माझ्या पाटनूर गावच्या पंचक्रोशीतील दोन तरुण, पुण्याच्या कोर्टात अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांना भेटण्यासाठी मी त्या दिवशी गेलो होतो.
court decision
court decisionsakal

माझ्या पाटनूर गावच्या पंचक्रोशीतील दोन तरुण, पुण्याच्या कोर्टात अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांना भेटण्यासाठी मी त्या दिवशी गेलो होतो. दोघे कामात होते. दोघांनीही थांबा थोडा वेळ, असा इशारा केला. मी कोर्टाच्या बाहेर आलो.

बाहेर येणारे- जाणारे कैदी, भेटायला येणारे नातेवाईक, पोलिस, त्या कोर्टातली गर्दी किती मोठी... बापरे! रागाच्या आणि इगोच्या, अहंकाराच्या भरात कायदा हाती घेणाऱ्या त्या प्रत्येकाला वाईट वाटत असेल; पण वेळ निघून गेल्यावर काही होणारे नव्हते. कैद्याचे, सतत कोर्टाच्या पायऱ्या चढून सुकलेले डोळे आता वेळ निघून गेली, असेच सांगत होते. ते वातावरण कोर्टाची पायरी कुणीही चढू नये, असेच सांगत होते.

कोर्टात मागच्या बाजूला माझी नजर गेली. एक लहान मुलगी एका मुलाला राखी बांधत होती. माझ्या मनात विचार आला आता जवळपासही राखी पोर्णिमा नाही; तरीही ही मुलगी राखी का बांधत असेल? बाजूला एक चहावाला ते सारे दृश्य पाहून खांद्यावर टाकलेल्या रुमालाने, स्वतःचे डोळे पुसत होता.

मी अजून बारकाईने पाहिले. एका बाजूने एक माणूस आणि दुसऱ्या बाजूला एक महिला दोघेजण बसले होते. मी त्या चहावाल्याला विचारले का रडताय तुम्ही? काय झाले. तो म्हणाला काय व्हायचे आहे साहेब, आम्ही दिवसभर कोर्टात असतो ना आम्हाला पावलोपावली कलियुगाचे दर्शन होते. तुम्ही ज्या मुलांकडे बघून रडताय ती कोण आहेत?

चहावाला म्हणाला, ते बाजूला एकमेकांच्या तोंडाकडे न पाहणारे नवरा-बायको आहेत ना, त्यांची ही मुले आहेत. यांच्या भांडणापायी या मुलांचा त्रास पाहवत नाही. माझ्याशी एवढे बोलून चहावाला आपल्या कामात गुंतला. त्या मुलांकडे बघून मलाही खूप वाईट वाटत होते. ती महिला उठली आणि चहा घ्यायला मी जिथे थांबलो होतो तिथे आली.

तिने चहा घेतला आणि तिथूनच मुलाला चल आता निघायचे, असा आवाज देत होती. त्या महिलेने त्या चहावाल्याकडे पहिले आणि त्याला म्हणाली, ‘कारे चहा चांगला करता येत नाही का’? फुकट पैसे घेतोस का? त्या बाईचे बोलणे ऐकून त्या चहावाल्याचा चेहरा एकदम पडला. मलाही त्या बाईला काहीतरी बोलायचे होते; पण हिंमत होईना.

त्या बाईसोबत एक म्हातारी बाई होती. जेव्हा ती बाई फोनवर होती तेव्हा मी त्या म्हाताऱ्या बाईला म्हणालो, आजी, तुम्ही त्या ताईच्या आई का? त्या ‘हो’ म्हणाल्या. हळूहळू मी तिला बोलते केले. तो मुलगा, मुलगी आजीकडे आले. आजीने मुलीच्या पाठीवरून हात फिरवत जा म्हणत निरोप दिला. आता तो मुलगा, जाणार इतक्यात मी त्या चहावाल्याच्या बरणीतले दोन चॉकलेट बाहेर काढले आणि त्या मुलांच्या हातात ठेवले. मुलगी नम्र होती. मुलगा जरा बेशिस्त होता.

कोर्टात त्या दोघांनाही पुकारा झाला, त्या मुलांचे आईवडील दोघेही कोर्टात गेले. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही होते. ते गेल्याचे पाहताच मी, त्या आजी, ती दोन मुले, मध्येमध्ये तो चहावाला, असे आम्ही बोलत होतो. देव देतो आणि कर्म नेते, अशी कहाणी या कुटुंबाची होती. त्या आजी सांगत होत्या आणि आम्ही ऐकत होतो.

डॉ. मीरा देशमुख, डॉ. रमेश कांबळे (दोघांची नावे बदलली आहेत.) या दोघांनी कॉलेजला असताना पळून जाऊन लग्न केले. लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा प्रचंड विरोध होता. दोन मुले झाली तोपर्यंत यांचे चांगले होते; पण पुढे छोट्या छोट्या कारणावरून भांडणे व्हायला लागली. ही भांडणे जीव घेण्यापर्यंत गेल्यावर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

विभक्त झाल्यावर पोटगी देण्यावरून खूप वादंग झाले, ते आजही कोर्टात सुरू आहेत. मुलगी सरिता बापाकडे राहते आणि मुलगा सचिन आईकडे. त्या आजीने बोलता बोलता अगदी थोडक्यात सारी कहाणी सांगितली. ती आजी माझ्याशी बोलत असताना ती मुले एकमेकांशी बोलत होती. मुलगी म्हणाली, ‘दादा तू मला घरी भेटायला येशील ना? मुलगा ‘मी नाही सांगू शकत, मम्मी काय म्हणेल, सुट्टी मिळेल का नाही, माहिती नाही’.

बिचारी मुलगी त्या मुलाचा नकारार्थी सूर ऐकून एकदम नाराज झाली. तो मुलगा जाग्यावरून उठला, त्या मुलीजवळ जाऊन म्हणाला, अग तायडे नाराज नको होऊ. मी येण्याचा प्रयत्न करीन ना? मुलगी पुन्हा म्हणाली, मागेतर वर्षभर आला नाहीस ना? त्या दोघांचा तो भावनिक संवाद आणि संवादाशेवटी एकमेकाला मिठी मारत रडलेला तो क्षण पाहून आता काळजाचे ठोके बंद पडतात की काय, असे वाटत होते. ती मुले, आणि आम्ही सारे अक्षरशः रडत होतो.

ती आजी म्हणाली, या कोर्टाच्या चकरा मारून खूप कंटाळा येतो. अगोदर माझी मुलगी आणि जावई या दोघांच्याही पाया पडून सांगितले होते, लग्न करू नका. आता यांनी केले, तर ते निभावून तरी दाखवावे ना..! यांची रोज होणारी भांडणे, पाहून मुले पोटाला येऊच नाही, असे वाटते. मुलीने दुसऱ्या जातीचा नवरा केला म्हणून आमचे नाक कापले, दोन मुले झाली आता दुसरे लग्न करायचे आहे, असे दोघेही म्हणतात, पहिल्या लग्नाला न्याय देता आला नाही, दुसऱ्याला काय देणार.

आम्ही अडाणी माणसे. लग्नाच्या वेळी एकमेकांना पहिलेदेखील नव्हते. ही जेवढी शिकलेली आहेत, तेव्हढी ही माणसे वेड्यासारखी वागतात. लग्नामध्ये विधीच केल्या नाहीत, संस्कृती परंपरा पाळल्या नाहीत, यांचे लग्न टिकणार कसे? आजी अगदी पोटतिडकीने सांगत होत्या. कोर्टात गेलेले ते दोघेजण पडलेला चेहरा घेऊन बाहेर येताना दिसताच त्या दोन्ही लहान मुलांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले. आता आपण एकमेकांना सोडून जाणार, याची खात्री त्यांना झाली.

ते दोघे जण एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ते दोघे जसे त्या मुलाजवळ येतात, तसे ती महिला त्या मुलाला आणि त्या माणसाने त्या मुलीला धरून ओढले. त्या दोन्ही मुलांची ती ताटातूट पाहवणारी नव्हतीच. ते दृश्य पाहून चहावाला मामा पुन्हा रडताना मला दिसला. त्या लहान मुलाला घेऊन ती महिला तिच्या आईला म्हणाली, माझे पैसे वेळेवर दे नाहीतर जेलमध्ये जावे लागेल, असे न्यायालयाने खडसावले त्याला, असे डोळ्यात अहंकाराचे आव आणून ती सांगत होती.

त्या छोट्या मुलाला घेऊन असलेला तो माणूस त्या तावातावाने बोलणाऱ्या बाईकडे रागारागाने पाहत होता. ती बाई, तिची आई आणि तिचा मुलगा तिथून गेला. तो माणूस आपल्या मुलीला घेऊन त्या चहावाल्याकडे आला त्याने चहा मागितला. तो माणूस एका हाताने चहा पीत होता आणि त्यांच्या दुसऱ्या हातात त्यांची असलेली मुलगी अजून तिचा भाऊ परत येईल, या आशेने तो गेलेल्या त्या वाटेकडे पाहत होती.

मी त्या माणसाला म्हणालो, मुलांचे फार प्रेम आहे एकमेकांवर. मी बोलताच त्या माणसाने माझ्याकडे पाहिले. तो काहीही बोलला नाही, एकदम शांत बसला. मी आणि तो चहावाला एकमेकांशी बोलत होतो. तो चहावाला त्या माणसाकडे बघत म्हणाला, याच्या पत्नी जेव्हा जेव्हा येतात तेव्हा खूप गोंधळ घालतात आणि हे नेहमी शांत बसलेले असतात.

तो माणूस अगदी शांतपणे म्हणाला, एक दोन वेळा बोललो होतो. त्यामुळे एवढी स्थिती निर्माण झाली. माझ्या बायकोला काही सांगायचे म्हणजे कठीणच आहे. आमचे भांडण जातीवरून व्हायचे. लग्नाच्या आधी एकमेकांची जात काढायची नाही, असे ठरवले होते; पण छोट्या छोट्या भांडणामध्ये जात निघायची आणि हेच भांडण पुढे वाढत गेले.

मी म्हणालो आज न्यायालयात काय झाले साहेब, ते व्यक्ती म्हणाली, न्यायालयाने पोटगी वेळेत द्या, ठरलेली रक्कम का देत नाही, नाही दिली तर शिक्षेला सामोरे जा, असे सांगितले. मी पुन्हा म्हणालो, मग तुम्ही काय म्हणालात, मी काय म्हणणार त्यांना, देण्याचा प्रयत्न करणार एवढे म्हणालो, त्या व्यक्तीने मला प्रतिप्रश्न केला. अहो माझ्याकडे नाहीच तर मी देऊ कसे? जे काही होते ते सर्व बायकोच्या नावे होते. मी हे खूप ओरडून सांगितले, पण माझे ऐकले गेले नाही.

पोटगीच्या नावाने मला खूप मोठी रक्कम द्या, असे सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून माझी मुलगी आजारी आहे. तिची शाळा, या सगळ्या कामात मी कामच केले नाही, तर पैसे येणार कुठून? माझी बायको मोठी डॉक्टर असून मलाच तिला पैसे द्या, असे सांगण्यात आले. सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत. त्या व्यक्तीचे बोलणे एकूण मी एकदम शांत होतो. तो चहावाला एकदम म्हणाला, रोज येथे असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. सगळ्यांच्या इगो इथे दिसतो? बाकी काही नाही?

ती लेक आणि बाप हळुवार पावलांनी तिथून गेले. त्या मुलीच्या डोळ्यात भाऊ आणि आईविषयी प्रचंड प्रेम दिसत होते. मी ज्या मित्राची वाट पाहत होतो, ते आपाराव आणि संजय एक एक करून दोघेही आले. चहाचा एक एक घोट घेत आज कोर्टात काय झाले, ते सांगत होते. पहिला म्हणाला, आज पोटगीच्या चार केस आल्या होत्या, कुठे महिलांचा द्वेष; तर कुठे पुरुष. सर्वांचे एकच असते ते म्हणजे मीच खरा आहे. तिथे माणसे बोलतच नव्हते, त्यांचा इगो बोलत होता.

कोर्टातले ते सर्व वातावरण अत्यंत क्लेशदायक होते. दुसरा म्हणाला, सर्व माणसे उच्च शिक्षित होती, कोणी नम्रपणे बोलायला तयार नाही. नवरा मुलगा कितीही गरीब असू द्या त्याची परिस्थिती असो की नसो, पोटगीची रक्कम घेताना त्याची कुणाला दया येतच नाही. आज दोन प्रकरणे तर अशी होती, अनेक वेळा समन्स पाठवूनही महिलेला पैसे दिले जात नाहीत.

इतकी वर्षे सोबत राहून एकमेकांची तोंडे पाहणारच नाही, अशी भूमिका माणसे कशी काय घेऊ शकतात? मी दोन दिवसांपूर्वी राज्याचा रेषो पाहिला आणि हैराण झालो. पोटगी आणि घटस्फोट हा विषय सर्वच ठिकाणी गंभीर होऊन बसला आहे. चहावाला म्हणतो, या कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रत्येक माणसाने मागच्या जन्मी अहंकारातून मोठे पाप केले असणार. पोटगीसंदर्भात जे काही वातावरण आणि किस्से होते, त्याने मी हादरून गेलो होतो.

काय ती माणसे आणि काय त्यांचे जीवन! सर्व काही ईगोच्या रोगाने त्रासून गेलेले होते. आम्ही कोर्टातला तो विषय कट करून बाकी विषयावर बोलत होतो, पण माझे सर्व लक्ष पोटगी या विषयाकडे लागले होते. आम्ही कोर्टातून बाहेर पडलो, ज्याच्या त्याच्या कामाला लागलो. कामात खूप व्यस्त झालो, तरी ती इगोवाली माणसे आणि त्या लहानग्याचा रडका चेहरा काही डोळ्यासमोरून काही जात नव्हता. कधी थांबणार हे कायमस्वरूपी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com