फुलबागेमागच्या वेदना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flower Garden

मी गडचिरोलीचा कार्यक्रम आटोपून नागपूरच्या दिशेने निघालो. गडचिरोलीपासून काही अंतरावर एक फुलांची बाग मी पाहिली.

फुलबागेमागच्या वेदना...

मी गडचिरोलीचा कार्यक्रम आटोपून नागपूरच्या दिशेने निघालो. गडचिरोलीपासून काही अंतरावर एक फुलांची बाग मी पाहिली. आजूबाजूला सगळी पडीक जमीन; पण एवढ्याशा छोट्या तुकड्यावर मात्र सुंदर अशी बाग कशी काय फुलली, हा प्रश्न मला पडला होता. आम्ही गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. मी त्या बागेच्या दिशेने जरा पुढे गेलो. त्या बागेतील मोगऱ्याच्या सुगंधाने मन प्रसन्न झालं. कुणाचीही परवानगी न घेता मी एक फूल तोडणार, इतक्यात दुरून आवाज आला, ‘ए, खबरदार! बागेतली फुलं चोरली तर?’ एक लहान आठ-दहा वर्षांचा मुलगा खांद्यावर कुऱ्हाड घेऊन उभा होता. मी त्या लहान मुलाला म्हणालो, ‘मी फुलं चोरत नाही, एक फूल सुगंधासाठी घेत होतो सहज.’ ‘सहज म्हणजे काय? कोसावरून डोक्यावर पाणी आणून टाकावं लागतं, तेव्हा येतात ही फुलं.’ तो मुलगा अजून मला काहीतरी बोलणार, इतक्यात एक महिला मागून जोरदारपणे ओरडली, ‘अरे शांत बस, मोठ्या माणसाला असं बोलतोस का? तुला कळत नाही?’ तो मुलगा शांत झाला; पण त्याची रागीट नजर कायम होती. त्या बाईंनी विचारलं, ‘काय हवंय दादा.’ मी नम्रपणे म्हणालो, ‘काही नाही ताई, तुमची बाग दिसली, फुलांचा सुगंध आला, वाटलं दोन फुलं घ्यावीत, कुणी बाग लावली याची माहिती घ्यावी आणि पुढे जावं.’ त्या बाईच्या चेहऱ्यावर एकदम चमक आली.

तिने पटापटा फुलं तोडली आणि माझ्या हातात आणून दिली. त्या लहान मुलाने आपली कुऱ्हाड खांद्यावरून खाली घेतली. त्या बाई म्हणाल्या, ‘साहेब, तुम्ही शेती अधिकारी आहात का? आमचं अनुदान आलं का? मागे दोन वर्षं शेतात काहीच पिकलं नाही, म्हणून लिहून नेलं, पण काहीच मिळालं नाही.’ मी लगेच म्हणालो, ‘नाही हो, मी अधिकारी नाही.’ मी माझा परिचय दिला, कुठून कुठे जातोय, हे सांगितलं. माझं बोलणं ऐकून त्या बाईंच्या चेहऱ्यावरची चमक एकदम उतरली. मी पुन्हा म्हणालो, ‘ही बाग तुम्ही लावली का?’ त्यांनी होकाराची मान हलवली. मी पुन्हा म्हणालो, ‘इथे काय भाव आहे फुलांचा?’ त्यांनी भाव सांगितला. मी म्हणालो, ‘आमच्या मुंबईत तर फुलं खूप महाग आहेत.’ तुमचं गाव कुठे आहे? घरी कोण? किती शेती? असं आमचं बोलणं सुरू झालं. त्या बाईंनी ‘घागरी’मध्ये आणलेलं पाणी तो लहान मुलगा त्या फुलांच्या वेलींना टाकत होता. ती बाग, त्या बाई आणि तो मुलगा... सारं काही वेगळं होतं. काय आयुष्य असतं एखाद्याचं, बापरे!

त्या शेतापासून अगदी जवळच एक छोटंसं ‘वाडी’ नावाचं गाव आहे. त्या गावात राहणारी ही महिला अंजना सीताराम करटुले! तिच्यासोबत असणारा तिचा मुलगा राजू आणि तिचे सासू-सासरे असे चौघेजण तिथे राहतात. अंजनाचे यजमान सीताराम गेल्या नऊ वर्षांपासून बेपत्ता आहेत; कुठे गेले? जिवंत आहेत की नाहीत ? माहिती नाही. सीतारामची एक एकर शेती आहे. बाजूच्या नाल्यावरचं पाणी डोक्यावरून आणून अंजनाने फुलांची बाग फुलवली. लोकांची रोजीरोटी करत ती तिच्या मुलाला, बागेला वाढवते. सीतारामविषयी मी अंजनाला खूप खोदून-खोदून विचारल्यावर तिने थोडंबहुत मला सांगितलं, ‘‘सीताराम अनेक दिवस बाहेर राहायचे, ते कुठं जायचे, कोणासोबत राहायचे, हे सीतारामने कधीही कुणाला सांगितलं नाही. शेवटच्या वेळेला तो गेला, ते परत आलेच नाहीत. कोणी म्हणतं, तो नक्षलवादी झाला असेल... कुणी म्हणतं, जेलमध्ये असेल... कुणी म्हणतं, पोलिसांच्या गोळीने मेला असेल... तो आता जिवंत नसेल... रोज कित्येक लोकांचं वेगवेगळं बोलणं ऐकून मी त्रस्त झाले.’

सीतारामची वाट पाहणं, हाच अंजनाच्या आयुष्याचा एकच उद्देश आहे. अंजना म्हणाल्या, ‘सीताराम असंच बॅगमध्ये सामान घेऊन यायचे, त्यांना आम्हा सर्वांविषयी प्रचंड ‘आस्था’ होती.’ आई-वडील, मुलगा, बायको यांचं तोंड पाहावं असं त्यांना वाटत नसेल का, असं म्हणत अंजना रडत होत्या. राजू आणि आजोबा दोघंही अंजनाची समजूत काढत होते; पण अंजनाचे हुंदके काही थांबेनात. काय आयुष्य बिचारीचं, या कुटुंबासाठी आपण काय करू शकतो, कोणामार्फत करू शकतो, असा विचार माझ्या डोक्यात येऊ लागला. मी स्त्रीविकास विषयाच्या अभ्यासक असणाऱ्या रेणुका कड (७७७४९८२३२१) यांना फोन लावला. त्यांनी अर्धविधवा महिलांची अवस्था किती वाईट आहे, त्यांची प्रचंड असलेली संख्या मला सांगितली. मला फार वाईट वाटलं. अवघ्या राज्यातलं हे धक्कादायक चित्र होतं. राज्यातल्या प्रत्येक गावात दोन-तीन अशा केसेस आहेत. शहरात तर खूप जास्त केसेस आहेत. रेणुकाही अंजनाशी बोलल्या, त्यांनी त्यांना आधार दिला.

‘काय मदत हवी ते नक्की सांगा’, असं सांगितलं. अंजनाचे सासरे मला म्हणाले, ‘अंजनाची मानसिक अवस्था मी समजू शकतो; पण मी काय करू, मी मजबूर आहे. आज तिचं लग्न केलं आणि उद्या मुलगा परत आला, तर मी त्याला काय उत्तर देऊ? राजूला शिकायचं नाही, त्याला आपल्या वडिलांची तुकडाभर असलेली जमीन कसायची आहे.’ राजूच्या आजोबांनाही वाटतं, शिकलेल्या माणसात माणुसकी शिल्लक राहत नाही. सूर्य डोक्यावर आला होता. मी रस्त्याच्या दिशेने एक नजर टाकली. लिंबाच्या झाडाखाली माझी गाडी उभी होती. बाजूला जमिनीवर रुमाल टाकून ड्रायव्हर झोपला होता. सावलीच्या आधाराने त्याची झोप एका गोडीच्या टोकाला गेली होती. या लिंबाच्या झाडाप्रमाणे जर थोडी जरी सामाजिक सावली अंजनावर असती, तर किती बरं झालं असतं, असं मला वाटत होतं.

मी आता निघतो, असं म्हणताच अंजनाने अजून फुलं तोडली. अंजनाच्या ओंजळीने माझ्या ओंजळीत आलेल्या फुलांना अंजनाच्या कष्टाचा गंध लागला होता. अंजनाने जाताना माझ्याकडे पाहिलं, तिच्या नजरेला नजर द्यायची माझी हिंमत होत नव्हती. काय माहिती तिला काय सांगायचं होतं. राजू आपली कुऱ्हाड बागेमध्ये ठेवून आजोबांसोबत मला सोडण्यासाठी आला होता. ‘विधवा’पणाचं पांघरूण घालून बसलेल्या अंजनाच्या भविष्याचं काय होईल, याचं उत्तर जसं कुणाकडेही नव्हतं, तसंच ते माझ्याकडेही नव्हतं. अशा शेकडो अंजना आज आपल्याभोवती आहेत, त्यांना किमान जगण्याचं बळ देण्यासाठी जरी आपण पुढाकार घेतला, तरी ते खूप मोठं ‘पुण्या’चं काम होईल.