अन्नदानाची आगळी मोहीम

मी मागच्या आठवड्यात गडचिरोलीला होतो. एका गावाला जाताना एका टेम्पो चालकाला त्या गावाला कसं जायचं असं विचारलं. तेव्हा तो चालक म्हणाला, ‘माझ्या गाडीच्या मागं या, मी त्याच गावात चाललोय.’
rana suryavanshi
rana suryavanshisakal

मी मागच्या आठवड्यात गडचिरोलीला होतो. एका गावाला जाताना एका टेम्पो चालकाला त्या गावाला कसं जायचं असं विचारलं. तेव्हा तो चालक म्हणाला, ‘माझ्या गाडीच्या मागं या, मी त्याच गावात चाललोय.’ टेम्पोवाला पुढं आणि माझी गाडी मागं असा आमचा प्रवास सुरू झाला. थोड्या वेळात आम्ही त्या गावात पोहोचलो.

आम्हाला रस्ता दाखवणारा जो टेम्पो होता, त्या टेम्पोच्या अवतीभवती खूप लोकांची गर्दी झाली. टेम्पोमधला माल जमलेल्या लोकांना वाटायला सुरुवात झाली. मला वाटलं, रेशनच्या वस्तू-माल लोकांसाठी आणल्या असतील, पण तसं नव्हतं. आता त्या टेम्पोमधला सगळा माल संपला होता.

मी त्या टेम्पोचालकाला विचारलं, ‘कुठल्या योजनेमधून आपण हे धान्य लोकांना वाटत आहात.’ तो टेम्पोवाला म्हणाला, ‘हे धान्य कुठल्याही योजनेमधील नाही. इथल्या गरीब, कष्टकरी लोकांसाठी राणा सूर्यवंशी नामक साहेब हे धान्य मोफत वाटत आहेत. दर महिन्याला अनेक गावांमध्ये धान्य देण्याचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. या उपक्रमाला राणा सूर्यवंशी यांच्या टीमनं ‘चूल पेटवा’ असं नाव दिलंय.

त्या चालकाकडून मी राणा सूर्यवंशी यांचा संपर्क नंबर घेतला. कधीतरी राणा यांना फोन करू-भेटू, असा मनात ठेवून त्या गावांतील लोकांशी बोलत फिरत होतो. फिरत असताना तेवढ्या दुपारी अनेक घरांमधून चुलीचा धूर निघत होता. महिला स्वयंपाक करत होत्या. मी काही लोकांना भेटलो, तेव्हा लोक सांगत होते, हे धान्य आल्यामुळंच आमच्या गावात आज दुपारीही चुली पेटत आहेत. त्या गावातलं वातावरण पाहून मी भावनिक झालो.

मी राणा सूर्यवंशी यांना फोन केला. त्यांना मी म्हणालो, ‘सर, तुम्ही फार पुण्याचं काम करीत आहात. मला तुम्हाला भेटायचंय.’

राणा म्हणाले, ‘आपण कधीही भेटू शकतो. तुम्ही ज्या गावात आहात त्या गावाच्या बाजूला असणाऱ्या गावात मी धान्य वाटप करतोय. तेव्हा जमलं तर आज-उद्या भेटू.’ बोलण्यातून माझी आणि त्यांची भेटीची वेळ निश्चित झाली. ते ज्या गावांमध्ये होते, तिथे मी पोहोचलो. ते जे काम करत होते, त्यांचा नेमका उद्देश काय आहे? हे मी राणा सूर्यवंशी यांच्याकडून समजून घेतले. ते मदत करतात ते आम्ही गेलेले एक गाव नव्हते, तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या १३० पेक्षा अधिक गावांमध्ये राणा यांची ‘चूल पेटवा’ ही मोहीम सुरू होती.

बारामतीजवळच्या माळेगावात राणा यांचे वडील दिलीप सूर्यवंशी यांचं पंक्चर काढण्याचं दुकान होते. राणाही लहानपणी त्या दुकानात वडिलांना मदत करायचे. राणा यांचे वडील दिलीप सूर्यवंशी हे कमालीचे सेवाभावी वृत्तीचे आहेत. भुकेल्याला अन्न द्यावं, हा संस्कार राणा यांनी त्यांच्या वडिलांकडून घेतला.

राणा यांनी शिकावं, मोठ्या ठिकाणी नोकरी करावी, असं स्वप्न दिलीप सूर्यवंशी यांचे होते, पण राणा यांना मात्र व्यवसायामध्ये आवड होती. वयाच्या १९ व्या वर्षी राणा व्यवसायाकडे वळले. सुरुवातीला राणा यांना व्यवसायामध्ये प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. राणा यांचे अनेक व्यवसाय डबघाईला आले. या पडतीच्या काळातही राणा यांनी अन्नदानाचा यज्ञ कायम ठेवला.

माझ्या उद्योग करण्याच्या निर्णयामुळं कधीकाळी नाराज असणारे माझे वडील माझ्यासमोर माझं कधी कौतुक करत नाहीत, पण मागं मात्र मी करत असलेल्या सगळ्या कामाबद्दल ते अनेकांना अभिमानानं सांगत असतात, हे मला लोकांकडून कळतं. या गावातून त्या गावांमध्ये, या राज्यातून त्या राज्यात राणा यांचा मजल दरमजलचा प्रवास सुरू होता.

माझ्या आणि राणा (९०६३९९९९९९) यांच्या गप्पा सुरू होत्या. गावातले लोक राणा यांच्याकडं येऊन आभार मानत होते. म्हाताऱ्या महिला राणा यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून कडकड बोटे मोडत होत्या. तिथून मी राणा यांच्या समवेत पुढच्या गावात गेलो. तिथल्या छोट्या-छोट्या मुली राणा सूर्यवंशी यांना ओवाळत होत्या.

गप्पांमध्ये राणा सांगत होते, माझी बहीण माया रामदास झोळ हिनं मला शैक्षणिक दारिद्र्य आपल्या राज्यातून संपवणं किती गरजेचं आहे याचे धडे दिले. तिचा शिक्षणाचा कानमंत्र घेऊन मी राज्यात अनेक आदिवासी भागांमध्ये शाळा कॉलेजेसची निर्मिती केली. राणा थोडे भावुक होऊन मला म्हणाले, ‘आज माझ्या वडिलांना भेटून सहा दिवस झाले.

सकाळी उठल्या उठल्या जेव्हा त्यांच्या पायावर नजर जाते, तेव्हा असं वाटतं पंढरीच्या पांडुरंगाला कडकडून मिठी मारली. वडिलांचा चेहरा पाहिला की अंगात चार हत्तीचं बळ येतं.’ खिशातला रुमाल काढून डोळे पुसत राणा म्हणाले, ‘वडिलांचे छत्र, आशीर्वाद म्हणजे माणसाच्या आयुष्यात मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे.’

राणा त्यांच्या उद्योगांमध्ये केलेल्या प्रगतीचा मोठा आलेख ते मला सांगत होते. कधीकाळी अपयशाच्या प्रचंड खाईमध्ये लोटलेला हा माणूस राज्यातल्या शेकडो युवकांच्या हाताला काम देतोय. हा माणूस आज यशाच्या उंच शिखरावर आहे. कित्येक कंपन्यांचा मालक आहे. तरीही वडील, आजी, आई, बहिणींनी दिलेले संस्कार ते विसरलेले नाहीत, कदाचित हेच संस्कार त्यांची कवचकुंडले असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com