घाणीत अडकल्या मानवी पिढ्या

मी ऑफिसमध्ये बसलो होतो. पाय मोकळे करण्याच्या उद्देशानं मी बाहेर पडलो. ऑफिसपासून बऱ्याच अंतरावर गेल्यावर गटाराच्या उघड्या झाकणाकडं माझं लक्ष गेलं.
Human generations stuck in the dirt
Human generations stuck in the dirtsakal

मी ऑफिसमध्ये बसलो होतो. पाय मोकळे करण्याच्या उद्देशानं मी बाहेर पडलो. ऑफिसपासून बऱ्याच अंतरावर गेल्यावर गटाराच्या उघड्या झाकणाकडं माझं लक्ष गेलं. मी जाऊन पाहिलं तर एक माणूस आत काम करत होता. त्याला किड्यांनी घेरलं होतं. तेवढ्या घाणीत, किड्यांमध्ये तो कसं काम करत असेल, असा प्रश्न मला पडला. तो दोरीला धरून वर आला. तेव्हा घाणीनं पूर्ण भरला होता. बाजूच्या नळावर तो गेला.

अंगावरील कपडे त्यानं त्या नळाखाली धुतले. त्यानं स्वतःला कितीही धुतलं तरी त्याच्या अंगावरची घाण निघत नव्हती. मी त्याच्या जवळ गेलो. जसा मला त्या गटारातील घाणीचा वास येत होता, तसा वास त्या माणसाच्या अंगाचा येत होता. मी त्याच्या जवळ जाऊन थांबलो, याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. मी त्याला म्हणालो, ‘अहो, त्या गटारामधून तुम्हाला बाहेर येताना पाहून मलाच धस्स झालं.’

तो हसला आणि म्हणाला, ‘त्यात काय साहेब, हे रोजचं काम आहे.’ तो ज्या गटारामधून बाहेर आला त्यामधून अजून चार जण बाहेर आले. जसे ते वर आले, ते त्या नळाखाली बसले. एखाद्याला कितीही पैसे दिले तरी तो हे काम करणार नाही, असं असताना ही माणसं हे काम का करीत होती, हे मला कळत नव्हतं.

अगोदर आलेल्या माणसाला मी म्हणालो, ‘ही माणसं मध्ये कुठं होती?’ तो म्हणाला, ‘ही तिकडच्या कडेला गेली होती. दोन गटारांचं झाकण आतमधून घट्ट झालं होतं, ते काढण्यासाठी ते गेले होते.’

मी ज्याच्याशी बोलत होतो, त्याचं नाव गोरख भातमे. आमचं बोलणं सुरू असताना तो मध्येच म्हणाला, ‘चला साहेब, निघतो मी, घरी जेवण करून परत येतो.’ मी म्हणालो, ‘राहता कुठं आपण? ’ तो म्हणाला, ‘इथंच जवळ झोपडपट्टी आहे, तिकडं राहतो.’ मी म्हणालो, ‘चला, मला त्याच दिशेला जायचं आहे, मीपण येतो.’ गोरखच्या घरी त्याची आई, मुलगी होती. लोकांनी केलेली घाण साफ करता करता पिढ्यांपिढ्या आख्खं कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं याची ही करुण कहाणी.

गोरखची आई यमुना, गोरखची मुलगी अवंतिका मला सांगत होती. पिढ्यांपिढ्या गटार साफ करायचं, हेच त्यांचं काम. काळाप्रमाणे गटारी साफ करण्याच्या पद्धती बदलल्या, तरी काहींच्या नशिबी हेच काम आहे. गटाराच्या समोरून जाताना आपण नाकावर रुमाल धरतो, त्याच गटारामध्ये ही माणसे बारा-बारा तास काम कसे करीत असतील, हा प्रश्न कुणालाही पडत असेल.

गोरखच्या मागच्या पिढ्यांमधले पुरुष आणि स्त्रिया कुणीही साठ वर्षांच्या वर जिवंत राहिले नाहीत, असा इतिहास आहे. प्रत्येकाच्या मरणाचा दर्द भरा इतिहास होता. कुणी कुठल्या गटारामध्ये गुदमरून मेले, तर कुणाला इतर आजार होऊन मरण आलं. गोरखची आई भांडी घासत होती. गोरखची मुलगी लिहीत बसली होती. मी गोरखच्या मुलीला म्हणालो, ‘काय लिहितेस?’, ती म्हणाली, ‘उद्या शाळेतल्या बाईंनी मला निबंध लिहून आणायला सांगितला आहे.’

मी म्हणालो, ‘काय विषय आहे?’ ती म्हणाली, ‘स्वच्छता आयुष्यात का महत्त्वाची आहे?’ मी तिचा निबंध पाहिला. त्या निबंधामध्ये तिने स्वच्छता का महत्त्वाची आहे हे सांगत, महात्मा गांधी यांच्यापासून ते गाडगेबाबा यांच्यापर्यंत सारी उदाहरणे लिहिली होती. मी त्या मुलीला म्हणालो, ‘शाळेत हा विषय तुलाच सांगितला की सर्वांना सांगितला?’ त्यावर गोरखची मुलगी अवंतिका म्हणाली, ‘मी परवा सफाई करून तशीच तिकडे शाळेत गेली.

शाळेत माझ्या अंगाचा वास येत होता. सर्व मुले मला त्यावरून चिडवत होती. त्यावर बाईंनी एकूण परिस्थिती, गरिबी, सेवा, स्वच्छतेचे महत्त्व आम्हा सर्वांना सांगितले. त्यानंतर कुठे सारा वर्ग शांत झाला. मग हाच विषय बाईंनी लिहून आणा, असे सांगितले.’ अवंतिकाने जे काही सांगितले ते ऐकून माझे मन एकदम सुन्न झाले.

गोरखची आई सहा मुलांची माता, आता एकटा गोरखच जिवंत आहे. तोही दारूच्या आहारी गेलाय. अवंतिका आणि आई या दोघींना सर्व संसाराची काळजी आहे. त्या गल्लीत जाताना सारेच तिथे सफाई काम करणारे होते. प्रत्येकाचं घर अस्वच्छ होते. तिथे ते कसं राहत असतील हाच विचार मी करत होतो.

मी चालताना गोरखला म्हणालो, ‘गोरखदादा, तुम्ही दारू सोडा, आईचे आयुष्य चार वर्षे वाढेल.’ त्यावर गोरखचे डोळे भरून आले. थोडा वेळ शांत बसून गोरख म्हणाले, ‘काय करू, खूप विचार केला, पण मन तयार होत नाही. दारू घेतल्याशिवाय मला गटारामध्ये उतरायची हिंमत मिळत नाही. त्या वासानं जगणं नाहीसं होतं. दारूच्या नशेत वास येत नाही.’ गोरखचं बोलणे ऐकून मी एकदम शांत झालो. गोरख एका गटाराच्या झाकणाजवळ जाऊन थांबला आणि म्हणाला, ‘चला आता, मी कामाला लागतो,’ असं म्हणत तो, गटारामध्ये उतरला. मी माझ्या वाटेला लागलो.

मी चालता चालता विचार करीत होतो. एखादा समूह, विशिष्ट काम करणारा कास्तकारी यांचे आयुष्य किती धक्कादायक असते. दुसऱ्याच्या आयुष्यातील दुर्गंधी साफ करीत करीत त्यांचे आयुष्य घाणीचे, मरणाचे साम्राज्य होऊन बसते. हे कधी तरी थांबणार आहे की नाही. का असेच पिढी दर पिढी यांची वाताहत सुरूच असेल. तुम्हाला, आम्हाला या जमातीला एक भक्कम आधार द्यावा लागेल. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल, बरोबर ना..?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com