आयुष्य सावरणारी, आधार देणारी...

माझा मित्र सचिन जाधव मुंबई विमानतळावरील पोलिस ठाण्यात नोकरीस आहे. जेव्हा मी विमानतळाकडे जातो, तेव्हा त्याला भेटत असतो. परवा मी त्याला भेटलो.
Life
LifeSakal
Summary

माझा मित्र सचिन जाधव मुंबई विमानतळावरील पोलिस ठाण्यात नोकरीस आहे. जेव्हा मी विमानतळाकडे जातो, तेव्हा त्याला भेटत असतो. परवा मी त्याला भेटलो.

माझा मित्र सचिन जाधव मुंबई विमानतळावरील पोलिस ठाण्यात नोकरीस आहे. जेव्हा मी विमानतळाकडे जातो, तेव्हा त्याला भेटत असतो. परवा मी त्याला भेटलो. गप्पा मारत असताना तिथं एक महिला आली. सर्वजण त्या महिलेला नमस्ते-नमस्ते करत होते. मला एक जाणवलं, सगळे पोलिस तिला नमस्ते करत आहेत, याचा अर्थ ती महिला विशेष कोणीतरी आहे. प्रसन्न चेहरा, कपाळावर मोठं कुंकू यामुळे त्या लक्ष वेधून घेत होत्या. मी सचिनला विचारलं, ‘‘कोण आहे ही महिला?’’

सचिन म्हणाला, ‘समाजसेविका आहेत. अडचणीत सापडलेल्या मुलींना त्या मदत करतात.’ आम्ही ज्या ठिकाणी चहाला बसलो, त्याच ठिकाणी ती महिला आमच्या बाजूला चहा घेत होती. तिच्यासोबत दोन मुली होत्या. त्यांच्या गप्पा सुरू होत्या. त्यातील एक मुलगी त्या महिलेशी बोलताना रडत रडत काहीतरी सांगत होती. सचिन माझ्याशी बोलत होता. त्याच्या बोलण्याकडे माझा एक कान होता, तर दुसरा कान त्या महिलांच्या बोलण्याकडे होता. सचिनने माझ्या आग्रहास्तव त्या महिलेशी माझी ओळख करून दिली. मी ज्या महिलेशी बोलत होतो, त्यांचं नाव विजया दीपक यादव (त्यांचं मूळ नाव बदललेलं आहे.) मूळच्या त्या बिहारमधल्या. त्या धाडसी, अभ्यासू असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवत होतं.

त्यांचा अभ्यास विद्यापीठातून मिळालेल्या पदवीतून झालेला नव्हता, तर त्यांच्या अनुभवांच्या शिदोरीतून आलेला होता, हे कळत होतं.

मुंबईत यायचं, मोठं व्हायचं, चित्रपटामध्ये काम करायचं, सगळ्या दुनियेमध्ये आपलं नाव करायचं, ही भावना मनात ठेवून विजया आपल्या एका टॅक्सी चालवणाऱ्या मित्राच्या सांगण्यावरून मुंबईत आल्या. मुंबईत चार दिवस काढल्यावर, मित्रानेच आपला सौदा कुण्या तिसऱ्या माणसासोबतच केला, हे त्यांच्या लक्षात आलं. मुंबईचं ते सगळं नवीन वातावरण. घरी बोलायला, तोंड दाखवायला जागा नव्हती. त्या सगळ्या वातावरणातून बाहेर निघणं शक्य नव्हतं. असं तब्बल तीन वर्षं चाललं. या दलदलीतून आपल्याला कधी बाहेर पडता येईल, या संधीची त्या वाट पाहत होत्या. रोज इच्छा नसतानाही त्यांच्यावर होणारे अत्याचार अंगवळणी पडले होते. त्यांच्यावर झालेले अत्याचार त्या मला सांगत होत्या. त्यांचे अनुभव ऐकून माझ्या अंगावर शहारे येत होते. गप्पा मारत मारत आम्ही ते पोलिस स्टेशन सोडलं.

पार्ल्याच्या कॉर्नरवर असणाऱ्या पिझ्झा सेंटरमध्ये आम्ही चौघेजण बसलो. मी विजया यांना विचारलं, ‘या दोन मुली कोण आहेत?’ विजया म्हणाल्या, ‘या दोन्ही मुली उत्तर प्रदेशातून आल्या आहेत. मुंबईत नोकरीला लावतो, तुझ्यासोबत लग्न करतो, असं सांगून या दोन्ही मुलींना मुंबईत आणण्यात आलं. मागच्या महिन्यामध्ये त्या दोन्ही मुलींना जबरदस्तीने अन्य प्रदेशात नेलं जाऊ लागलं. या मुलींच्या मैत्रिणींना याची कुणकुण लागली. त्यांनी याबाबत मला हे सांगितलं.

मग मी विमानतळावरच त्या मुलींना गाठलं. तिथल्या पोलिसांनी मला मदत केली. आज त्याविषयी पोलिस स्टेशनमध्ये विचारणा होती. म्हणून मी या दोन्ही मुलींना इकडं घेऊन आले.’’ त्यांचं बोलणं ऐकून मला एकदम धक्का बसला. भाजीपाल्याची विक्री करावी, तसा इथं मुलींचा व्यवहार होतो, हे ऐकून कुणालाही खरं वाटणार नाही; पण ते सत्य होतं.

विजया यांच्या अर्धवट कहाणीकडे आम्ही पुन्हा वळलो. त्या म्हणाल्या, ‘मुंबईत येऊन दहा वर्षांचा काळ लोटला. नंतर ही मुंबई ओळखीची झाली. इथली माणसं, त्यांचं वागणं, जगणं, इथं लागणारा पैसा, या सगळ्यांची घट्ट ओळख होऊन गेली. पोलिस, राजकारणी, चोर, दरोडेखोर या सगळ्यांचा संबंध येत गेला. मी माझ्या आई-वडिलांना खोटं सांगितलं. स्वतःच्या मनाची फसवणूक केली. आता काहीतरी चांगलं केलं पाहिजे, ही भावना सतत मनात येऊ लागली. सेवाभावी कार्यामध्ये रुची असणाऱ्या अनेकांशी माझा संबंध यायला लागला. त्यांचा चांगुलपणा मनात घर करून जायचा. एके दिवशी माझ्या मैत्रिणीचा गावाकडून फोन आला. म्हणाली, माझ्या भावाची मुलगी मुंबईला पळून गेली आहे. त्या मुलीचा चार महिन्यांनंतर फोन आला. म्हणाली, मी खूप अडचणीमध्ये आहे. मी त्या मुलीचा नंबर घेतला. तिचा शोध घेत, तिला तिथल्या अडचणींमधून बाहेर काढलं. तिला ज्याने फसवलं होतं, त्याच्या दोन थोबाडीत मारून त्याला पोलिसांच्या हवाली केलं.’ विजया अजून बोलण्याच्या मूडमध्ये होत्या. मी त्यांना थांबवलं व विचारलं, ‘ती मुलगी आता कुठं आहे?’ त्या म्हणाल्या, ‘अंधेरीला एका दवाखान्यात नर्स म्हणून ती काम करते. पुढचं शिक्षण ती आता घेत आहे.’ विजया अनेक विषय मला सांगत होत्या. माझे प्रश्न, त्यांची उत्तरं, असं आमचं सुरू होतं. त्या ठिकाणी बसण्यासाठी पिझ्झा घेणं वाजवी होतं. पिझ्झा आला, तो संपला, मात्र आमचं बोलणं काही संपत नव्हतं.

विजया म्हणाल्या, ‘त्या मुलीनंतर मी अशा अनेक मुलींना अडचणीतून बाहेर काढू लागले. मागच्या दहा वर्षांमध्ये किमान एक ते दीड हजार मुलींचं आयुष्य बरबाद होण्यापासून मी वाचवलं असेल. देहविक्रयाच्या व्यवसायात आल्यावर परत माघारी फिरता येत नाही, असं अनेकींच्या मनावर कोरून ठेवलं गेलं आहे, जे साफ खोटं आहे. आपण चूक केली, ती चूक सुधारण्यासाठी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. या माध्यमातून आपल्या मनामध्ये असणाऱ्या चांगल्या महिलांना आपण जागं केलं पाहिजे. तसं ‘नसलेल्या आयुष्यात पुसलेली ओळख’ घेऊन जगणं सोपं नसतं.’

विजया यांना मी त्यांच्या घराबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या, ‘‘मी देहविक्रीचा व्यवसाय करायला लागले, तेव्हा बापाने आत्महत्या केली. त्यानंतर काही दिवसांत आईचंही निधन झालं. भावाने माझ्याशी केव्हाच नातं तोडलं होतं. आई व वडिलांच्या निधनानंतर मला त्यांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही. भावाला, भावाच्या बायकोला, मी अनेक वेळा त्या वेळेस फोन केले; पण त्यांचं वाक्य एकच होतं, ‘तू आमच्यासाठी मेलीस’.

घरच्यांच्या आठवणीत मी तासन् तास रडून काढले. आता रडून-रडून डोळ्यांतलं पाणी संपलंय. गावाकडं दारिद्र्याने मला संपवून टाकलं होतं, इकडं मुंबईत लालसेनं हरवून टाकलं होतं. माणसं स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू समजून तिचा उपभोग घेतात, बाकी काहीच नाही. या अनुभवातून मी अनेक पुरुषांना चांगलाच धडा शिकवला. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला माझ्या मैत्रिणीची नातेवाईक मुलगी कारणीभूत ठरली. त्यानंतर ठरवलं, त्या मार्गाला कधी जायचं नाही. मिळेल तिथं चांगलं काम करायचं. चार मुलींच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी सदैव कार्यरत राहायचं.’’

विजया माझ्याशी बोलत असताना माझी गाडी आली. मी त्याच गाडीमध्ये तुम्हाला सोडतो, अशी विनंती विजया यांना केली. आम्ही त्यांच्या घरी गोरेगावला गेलो. एखाद्या माहेरच्या माणसाला बोलावतात, तसं विजया यांनी मला घरामध्ये बोलावलं. घरात पाच मुली, दोन महिला होत्या. कोणी अभ्यास करत होतं, कोणी शिवणकाम करत होतं, तर कोणी जेवण बनवत होतं. त्या घरात गेल्यावर मी सगळ्यांना त्यांचं काम आणि नावं विचारली. प्रत्येक जण कुठं ना कुठंतरी काम करत होतं. या सगळ्या जणींना विजया यांनी सोडवून आणलं होतं. अशा अडचणीत असणाऱ्या मुली, महिला विजया यांच्याकडं येतात. चांगलं काम सुरू करेपर्यंत विजया यांच्याकडं राहतात. पुन्हा विजया यांचा निरोप घेऊन आपापल्या गावी निघून जातात. विजया यांची आठवण ठेवत सन्मानाचं पुढचं आयुष्य जगतात. तिथं असणाऱ्या सर्व मुली, महिला विजया आमची आई आहे, असं म्हणत होत्या. त्या प्रत्येकीची कहाणी एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशीच.

त्या घरातल्या देवघरामध्ये भगवद्‍गीतेची प्रत ठेवली होती, त्याची पूजा केली जात होती. त्यातील कर्म आणि कर्तव्य याच्या सूत्राची सांगड मला विजया यांच्या कामात दिसत होती. विजया यांचं काम तसं साधंसुधं नव्हतंच. त्यांना आज कुणीतरी आपणास चांगलं म्हणण्याची गरज वाटत नाही, किंबहुना त्यांच्या मनानं ठरवलंय, की आपण काहीतरी चांगलं काम करायचं.

मी विजया यांचा निरोप घेऊन माझ्या घराच्या दिशेने निघालो. मुंबईसारख्या महानगरांमध्ये विजयासारख्या मुलींची, महिलांची पावलोपावली फसवणूक होत असेल. पण, अशा महिला सावरतात, पुढं जातात. फार कमी महिला, मुली इतरांचं आयुष्य सुधारण्यासाठी पुढाकार घेत असतील! अशा चांगल्या भावनेतून काम करणाऱ्या विजयासारख्या साक्षात्कार झालेल्या अनेक महिला, मुलींना भगवद्‍गीतेचं खरं दर्शन त्यांच्या कामांमधून होत असेल, बरोबर ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com