ऐतिहासिक मित्रमंडळ...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada Mitra Mandal
ऐतिहासिक मित्रमंडळ...!

ऐतिहासिक मित्रमंडळ...!

sakal_logo
By
संदीप काळे sandip.kale@esakal.com

भ्रमंती वाचून फोन, मेल करणारे अनेक जण आहेत. काही निवडक लोकांच्या फोनची प्रतीक्षा मलाही असते. त्यात पुण्याच्या मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजचे उपप्राचार्य रमेश पंडित यांचा समावेश असतो. ते फोन करून नेहमी सांगायचे, तुमच्या लेखानंतर आम्ही त्या व्यक्तीला, संस्थेला मदत केली. पंडित सर यांचा फोन म्हणजे माझ्या कामाची पावती असते. ते फोन ठेवताना नेहमी म्हणायचे, आमच्या संस्थेचे प्रमुख, प्राचार्य भाऊसाहेब जाधव (९८५००९५७५२) हे आपल्याला भेटू इच्छितात, आपण कधी येताय. त्या दिवशी मी पुण्यात होतो. मी ठरवले. आज जाधव सरांची भेट घ्यायचीच.

मी, अनिकेत मोरे, नितीन खरात आम्ही पुण्यातल्या डेक्कन जिमखाना भागातील मराठवाडा मित्रमंडळ संस्थेमध्ये जाऊन पोहोचलो. जाधव सरांची मीटिंग सुरू होती. त्यांना भेटण्यासाठी अनेक जण आले होते. त्यामध्ये एक तरुण माझे लक्ष वेधून घेत होता. मी सोबत असलेल्या पंडित सरांना म्हणालो, सर ही सगळी मंडळी कशासाठी आली आहेत. पंडित सर म्हणाले, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे ही संस्थेची परंपरा आहे. त्याची पावती म्हणून हे सर्व जण जाधव सरांना भेटायला आले आहेत. माझ्यासमोर हार, पेढ्यांचा बॉक्स घेऊन एक तरुण बसला होता. मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तो खुलत नव्हता. पंडित सर (९९२२२६२३१७) त्या युवकाला म्हणाले, ‘‘अरे राजा तू मोकळेपणाने बोल, ते आपल्या परिवारातले आहेत.’’ त्यानंतर माझे आणि त्या युवकाचे बोलणे सुरू झाले. आमचा संवाद झाल्यावर आजूबाजूचे अनेक जण म्हणत होते, आम्ही देखील जाधव सरांचे आभार मानायला आलोय.

मी ज्या युवकाशी बोलत होतो, त्याचे नाव आशिष बसवराज औटी. आता तो मुरूम (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे राहतो. त्याचे मूळ गाव आष्टा कासार, (ता. लोहार, उस्मानाबाद) आहे. आशिष सांगत होता, अगोदर आई आणि मग बाबा दोघेही आम्हाला सोडून गेले. आम्ही दोन भाऊ आणि एक बहीण असे तिघे जण. बहीणही आजाराने आम्हाला सोडून गेली. मी लहान असल्यामुळे माझ्या आईच्या आई वडिलांकडं मुरूमला राहायला गेलो. माझा भाऊ गावीच आजी-आजोबांकडे होता. भाऊ छोटे-छोटे काम करीत पुण्यात चालक म्हणून काम करतोय. माझ्या आजी-आजोबांनी पोटाला चिमटा देत मला बारावीपर्यंत शिकवले. बाकी उच्च शिक्षण घेण्याचा काहीही संबंध नव्हता. अनिता साखरे या माझ्या मावशीने मला मराठवाडा मित्रमंडळ या संस्थेविषयी सांगितले. मी शोध घेतला. जाधव सरांची भेट घेऊन मी माझी सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. मला त्यांनी जवळ घेऊन माझ्या पाठीवर हात फिरवला. मला विचारले, काय बनायचे आहे तुला. मी त्यांना म्हणालो, मला इंजिनिअर व्हायचे आहे. त्यांनी पाठीवरून हात फिरवल्यावर असे वाटले दहा हत्तीचे बळ अंगात संचारले. त्यांनी एका व्यक्तीला बोलावले आणि त्यांना सांगितले ‘माझा इंजिनिअरिंगला प्रवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत व्यवस्था तातडीने करून द्यावी.’ ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी मला सांगितले, तुला कधी वाटले माझी मदत घ्यावी, तर थेट माझ्याकडे ये.

परवा माझा पहिल्या वर्षाचा निकाल लागला. मी प्रथम श्रेणीमध्ये पास झालो. पहिला फोन सरांना केला. सर म्हणाले, तू माझे स्वप्न साकार केलेस. उद्या कार्यालयात भेटायला ये आणि मी आज आलो. आमचा संवाद सुरू असताना आशिष अनेक वेळा भावुक झाला होता. तेवढ्यात सर आले. तिथे असणाऱ्यांपैकी अनेकजण जाधव सरांना मिठी मारत होते, कुणी त्यांचे आशीर्वाद घेत होते. अनेक जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

पंडित सरांनी माझी सरांशी ओळख करून दिली. आशिष माझा निरोप घेऊन वसतिगृहाकडे निघाला आणि आमच्या निवांतपणे गप्पा सुरू झाल्या. सरांच्यासोबत असणारे संस्थेचे दुसरे पदाधिकारी टी. पी. निवळीकर सांगत होते. आमच्या संस्थेची १९८३ पासूनची परंपरा आहे. जे अनाथ आहेत, ज्यांना कुणी नाही, ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, आमच्या संस्थेत पहिलीपासून पूर्ण शिक्षण होईपर्यंत, नोकरी लागेपर्यंत या संस्थेत असतात. माजी मंत्री व मराठवाड्याचे नेते दिवंगत शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून गरीब, ज्यांना कुणीच नाही विशेषतः मराठवाड्यातल्या मुलांसाठी ‘मराठवाडा मित्र मंडळ’ या संस्थेची स्थापना झाली. ‘येथे बहुतांचे हित’ हा विचार घेऊन या संस्थेने काम उभे केले. दरवर्षी किमान दीड हजार युवकांना शिक्षणाच्या प्रवाहात तेही मोफत हे क्वचितच कुठे घडत असेल.

जाधव सर म्हणाले, मी याच संस्थेत २२ वर्षे प्राचार्य होतो. संस्थेने मला सांगितले, तुम्ही सेवानिवृत्तीनंतर कुठे जायचे नाही, सेवा अशीच सुरू ठेवायची. माझे गाव लातूर जिल्ह्यामध्ये सेलू जवळगा. घरी जेमतेम परिस्थिती एका गरीब शेतकऱ्याची आपल्या मुलाबद्दल असलेली स्वप्नं काय असतात? आणि ती कशी पूर्ण होत नाहीत, हे अनुभवले आहे. म्हणून मला, माझ्या संस्थेला गरीब मुलांविषयी कळवळा आहे. कितीही गरजू मुले असतील त्यांचे पालकत्व आम्ही स्वीकारू. त्यांची सर्व मोफत व्यवस्था करू असे जाधव सर सांगत होते. आम्ही घरी जेवायला येतो, असा निरोप सरांनी त्यांच्या पत्नी डॉ. रंजना जाधव यांना दिला. रंजना यासुद्धा याच कॉलेजमध्ये ग्रंथपाल होत्या.

सरांनी शाळा, कॉलेज, वसतिगृह मला फिरून दाखवले. डॉ. कीर्ती देशमुख, डॉ. उज्ज्वला पळसुले, डॉ. सुनील देशपांडे, डॉ. चंद्रशेखर तलाठी हे सर्व विभागांचे प्राचार्य आमच्या सोबत होते. इंजिनिअरिंग, लॉ, कॉमर्स असे अनेक प्रकारचे पदवी अभासक्रम येथे चालतात. परिसरात सर्व पाहत असताना माझी नजर मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या शैक्षणिक साहित्यावर पडली. मी सरांना विचारले, हे साहित्य कशाचे आहे. सर म्हणाले, कोकणामध्ये अतिवृष्टीमुळे अडचणीत असणाऱ्या तीन तालुक्यांतल्या शाळांना आम्ही शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. उद्या वाटपासाठी ट्रक जाणार आहेत. माझ्या लक्षात आले, ही संस्था केवळ मराठवाड्यासाठी काम करीत नाही, तर राज्यातल्या सर्व भागांसाठी काम करते. कर्वेनगर, लोहगाव, काळेवाडी या भागातही आम्ही संस्थेचे सुरू असलेले काम पहिले.

आम्ही सरांच्या घरी गेलो. काकूंनी केलेल्या जेवणाची मराठवाडी चव आणि वागण्यात मराठवाडी माया दोन्ही होते. सरांना आसावरी, धनश्री आणि शरवू अशा तीन मुली आहेत. सेवाभावी काम करणाऱ्या अनेक व्यक्ती घराकडे दुर्लक्ष करतात, पण सरांनी घर आणि सेवाभाव दोन्ही ठिकाणी न्याय दिल्याचे पाहायला मिळत होते.

सर आणि काकू यांच्या पायावर डोके ठेवत, त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. मनात एकच विचार होता, आजही अनेक माणसे, अनेक संस्था शाहू महाराज यांचा शिक्षणाचा वारसा खूप नेटाने चालवतात. तुम्ही-आम्ही सर्वांनी मिळून जे गरजू आहेत, ज्यांना कुणीच नाही अशांना या ‘दानत’ असलेल्या व्यक्तीपर्यंत, संस्थेपर्यंत घेऊन जाऊन इतिहासाच्या पानाचे, ऐतिहासिक मित्रमंडळाच्या कामाचे साक्षीदार होऊ! बरोबर ना...?

loading image
go to top