विळखा सावकारी कर्जाचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विळखा सावकारी कर्जाचा...

उस्मानाबादमधील काम आटोपून मी दिवाळीसाठी नांदेडकडे निघालो. उस्मानाबाद संपल्यावर मी अशा एका हॉटेलच्या शोधात होतो, जिथं शांतपणे जेवता येईल.

विळखा सावकारी कर्जाचा...

उस्मानाबादमधील काम आटोपून मी दिवाळीसाठी नांदेडकडे निघालो. उस्मानाबाद संपल्यावर मी अशा एका हॉटेलच्या शोधात होतो, जिथं शांतपणे जेवता येईल. असं एक हॉटेल मिळालं. आम्ही तिथं पिठलं-भाकरीवर ताव मारला. उस्मानाबादच्या ज्वारीच्या भाकरीसारखी चव अख्ख्या राज्यात कुठे नसेल, अशी ती चव होती. दिवाळी संपली तरी पावसाची अधूनमधून हजेरी लावणे काही संपत नव्हते. सकाळी खूप थंडी, दुपारी ऊन आणि कधीमधी पाऊस असा निसर्गाचा अजब खेळ मराठवाड्यात सुरूच होता. जेवण करून मी हात धुण्यासाठी त्या हॉटेलमधील मागच्या बाजूला गेलो. त्या झोपडीवजा हॉटेलच्या मागे कुणी तरी गाणे गुणगुणत होते.

मी हॉटेलच्या मालकाला विचारले, ‘‘मागे गाणे कोण गातेय?... त्यांचा आवाज फार गोड दिसतोय.’’ चेहऱ्यावर हास्य असणाऱ्या त्या मालकाच्या चेहऱ्यावर एकदम गंभीरता आली. थोडं थांबून ते हॉटेलमालक म्हणाले, ‘‘म्हातारा बिचारा एकटा आहे हो...! त्याच्यामागे कुणी नाही; तरीही ताठ मनाने जगतो.’’ मी हॉटेलमालकाला म्हणालो, ‘‘काय झाले?’’ ते म्हणाले, ‘‘काय होणार? जे कर्माला मंजूर आहे ते झाले. मागे-पुढे अपघाताने घरातले सगळे गेले. उरले-सुरले आजारपणात गेले. बिचारा म्हातारा आता एकटा आहे.’’ मी त्या हॉटेलमालकाला म्हणालो, ‘‘चला ना, आपण त्यांच्याशी बोलू या.’’ ते म्हणाले, ‘‘नको. ते जुन्या आठवणी काढल्या की भावुक होऊन रडतात.’’ मलाही क्षणभर वाटले की, जाऊ द्या. सणासुदीचे दिवस, आपण त्यांना कशाला जुन्या आठवणी काढून दुखवायचे.

मी बिल देऊन निघणार, तेवढ्यात त्या हॉटेलमालकाला काय वाटले कुणास ठाऊक? ते म्हणाले, ‘‘चला तर आपण भेटू त्याला. बोललो तर किमान बिचाऱ्याला थोडे हलके तरी वाटेल.’’ मी आणि तो आम्ही दोघेही त्या आवाजाच्या दिशेने निघालो.

‘ऊठ पंढरीच्या राजा फार वेळ झाला

घडा वैष्णवाचा दारी दर्शनास आला।’

हे गाणं एका लिंबाच्या झाडाखाली एक आजोबा अगदी सुरात गात होते. आमच्या पायाची चाहूल लागल्यावर ते एकदम शांत झाले. तागापासून हाताने दोरी तयार करणे, समोर पडलेल्या सोयाबीनच्या मालाची राखण करणे, गाणे गाणे, बाजूला बसलेल्या कुत्र्याकडे लक्ष देणे, अशी एक नाही तर अनेक कामे ते आजोबा करत होते. त्या हॉटेलमालकाने माझी आजोबाला ओळख करून दिली. आम्हाला समोरच्या फाटक्या पोत्यावर बसा, असा आग्रह आजोबांनी धरला. आम्ही बसलो. हॉटेलचे मालक संतोष कराड म्हणाले, ‘‘आजोबांना दोन मुलं होती. दोघांची लग्ने झाली. त्यांनाही मुलेबाळे झाली. एक अपघातात वारला आणि एकाने आपण बसलोय त्या याच झाडाला दोर बांधून फाशी घेतली.’’ माझ्या पोटात एकदम धस्स झाले. आमच्याशी बोलता बोलता आजोबाचे दोरी तयार करायचे काम सुरूच होते. मी एक एक प्रश्न विचारत होतो, आजोबा त्या प्रश्नाला उत्तरे देत होते.

आमच्या बोलण्यात गरिबी हा विषय होताच; पण मागच्या चार पिढ्यांपासून शेतीचे चुकलेले गणित, कर्ज यामुळे गहाण ठेवलेला स्वाभिमान सारे काही रोज मरणाच्या दारात घेऊन जाणारे होते. घाट्यात जाणारी शेती, कधी न फिटणारे कर्ज यामुळे आजोबांसारख्या बापाच्या भूमिकेत असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना रोज आपल्या गळ्याभोवती फास आवळून घ्यावा असे वाटत असेल, हे त्यांच्याकडे बघून दिसत होते. त्यातले आजोबांसारखे असणारे असंख्य शेतकरी आपल्याला कर्ज चुकते केले नाही म्हणून मेल्यावर लोक नावं ठेवतील, सुखाने मरणार नाही, या भावनेतून जगत आहेत.

मी ज्या आजोबांशी बोलत होतो, त्यांचे नाव सदाशिव रामजी पाटील. लहानपणापासून सदाशिव यांच्या मागे दुःखाचा ससेमिरा सुरू होता. आता म्हातारपणात आजाराने त्यांना ग्रासलं आहे. आजोबा आठ वर्षांचे असताना त्यांची आई गिरजाबाई गेली. सदाशिव यांचे लग्न होऊन एक वर्ष झाले तेव्हा वडील आपाराव गेले. पहिल्या मुलाचे लग्न झाल्यावर त्यांची पत्नी पार्वती दारिद्र्यामुळे औषधोपचार न झाल्याने आजारात त्यांचे निधन झाले. मोठा मुलगा रामभाऊ हा सदाशिव यांची वडिलोपार्जित असणारी चार एकर शेती कसत होता. शेतीला जोडधंदा म्हणून रामभाऊने शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी कर्ज काढले. सुरुवातीला दोन वर्षं हा व्यवसाय चांगला चालला, पण पुढे शेळ्यांवर रोग आला. निम्म्याहून अधिक शेळ्या रोगाने ग्रासल्या. काही मेल्या. खर्च कायम वाढत होता आणि उत्पन्न काहीही नव्हते. हप्ते थकले, बँक घरी येऊन बसत होती. शेतीवरचे कर्ज, व्यवसायावरचे कर्ज, माझ्या आजोबापासून थकीत असणारे कर्ज याचे टेन्शन मोठ्या मुलाने घेतले. दिवाळीला पोरगा शेतात आला. त्याने शेळ्यांना बांधलेली दावण काढली आणि गळ्याला फास लावून घेतला. आम्हाला वाटले मुलगा बाजारासाठी गेला असेल.

कधी कधी शेळ्या विकताना त्यांचा मुक्काम पडायचा. दोन दिवसांनंतर मृतदेहाचा वास सुटला. शेळ्या राखणाऱ्या मुलांनी घरी येऊन सांगितले, तेव्हा आम्हाला कळाले. म्हाताऱ्या बापाच्या खांद्यावर मुलाचा मृतदेह घेऊन जाणे म्हणजे काय यातना असतात, हे मी कसे सांगू. दुःख करत बसायचे, की अंत्यसंस्कार करायचे, असा प्रश्न माझ्यासमोर होता. मी सर्व जमीन विकू दिली नाही म्हणून माझ्या मुलाने आत्महत्या केली, असा ठपका माझ्यावर ठेवला गेला. लहान मुलगा अपघातात वारला. सुनांनी नवे संसार थाटले. नातू बिचारे लहानगे, त्यांना काय बोलावे. आता जिकडे तिकडे सर्व गेले. म्हातारपणात काही मुद्दल असेल तर ठीक, नाही तरी काठीलाही आपण जड वाटतो. हे समजून घ्यायला एकटेपणातले म्हातारपण भोगावे लागते. मला यातना प्रचंड होतात, पण मी कधी देवाला मरण मागत नाही, कारण मला कर्ज फेडायचे आहे. मी माझ्या वडिलांना तसे वचन दिले होते. ज्या दिवशी कर्ज फेडेन, त्या दिवशी मी आनंदाने मरेन.

मी म्हणालो, कर्ज कशाचे? ते म्हणाले, फार मोठी कहाणी आहे. काय सांगावे. माझ्या आजोबाने सावकाराकडून कर्ज घेतले. त्यासाठी आजोबा काम करत राहिले. त्यांच्या पश्चात आयुष्यभर माझ्या वडिलांनी त्या कर्जासाठी जिवाचे रान केले. माझ्या आजोबांचे कर्ज, वडिलांचे कर्ज आणि माझ्या काळातले कर्ज हे कर्ज फेडण्यासाठी माझे आयुष्य गेले. सावकारी आणि खासगी अशी दोन्ही कर्जे आहेत. माझे आजोबा, वडील आणि मी आम्ही खंबीरपणे कर्जासाठी आयुष्य वाहिले, पण माझ्या मुलाला ते जमले नाही. तो खचला. बारा एकर असलेली जमीन चार एकरवर आली, तेव्हाही आम्ही कुणी खचलो नाही. माझा मुलगा मात्र हा भार सोसू शकला नाही. त्याला वाटले, मेलो म्हणजे सुटलो. पण असे नाही. माझ्या वडिलांना आजोबांनी, माझ्या वडिलांनी मला आणि मी माझ्या मुलाला सांगितले होते की, घेतलेले आणि डोक्यावर असणारे कर्ज चुकते करत राहायचे. कुणाचा एक रुपया बुडवायचा नाही. मग ती बँक असो की सावकारी. आपण ताठ मानेने, स्वाभिमानाने जगायचे. ही शिकवण आमच्या संस्कारामधली. आजोबा बोलताना मी मध्येच म्हणालो, ‘‘मग शेतीमध्ये पिकायचे नाही का?’’ ‘‘काय सांगावे, या वर्षी होते तसे दरवर्षी होते. कधी बोगस बियाणे, कधी पाऊस अजिबात नाही, कधी पाऊसच पाऊस आहे, कधी भाव नाही, अशा अनेक अडचणी येतात. यातून होते काय, फार फार तर त्या काळात परिवारासाठी दोन वेळच्या खाण्याची व्यवस्था होईल एवढे होते. शेतकऱ्याचा जन्म म्हणजे शापित कर्माचा भाग आहे. जो संपतही नाही आणि पुरतही नाही. आपण एकच खूणगाठ मनाला बांधायची, जसा मिळाला तसा आनंद घ्यायचा आणि पुढे जायचे.’’

हॉटेलवाले कराडकाका म्हणाले, ‘‘निसर्गाच्या फटक्यातून एक रुपयाचे नुकसान झाले तर शासन दहा पैसे देण्याचा विचार करते. तेही आपल्यापर्यंत येईल याची गॅरंटी नाही. आता या वर्षी अख्ख्या पिकाचा चिखल झाला. अनेक लोकांपर्यंत रुपया गेला नाही. शासनाच्या कोरड्या वल्गना नुसत्या कागदावर आहेत. असे दरवर्षी होते. म्हणून मी माझी तीन एकर जमीन विकून टाकली. काही पैसे बँकेत टाकले, काही पैशांमधून हे छोटे हॉटेल सुरू केले.’’ आमचे बोलणे सुरू असताना सदाशिव आजोबा उठले. त्याच्यासोबत असणारा कुत्राही शेपटी हलवत कान टवकारून त्यांच्या मागेच निघाला. समोर असणाऱ्या सोयाबीनवरचे झाकलेले कापड त्या आजोबांनी काढले. आता उन्हाची तिरीप त्या सोयाबीनवर पडत होती. आजोबा पुन्हा जाग्यावर बसले. कराड यांच्याकडे पाहत म्हणाले, ‘‘माझ्या पोराने मला कळू न देता माझ्या जमिनीचा सौदा केला होता. जेवढ्या यातना मुलाचे पार्थिव खांद्यावर घेतल्यावर झाल्या ना? तेवढ्याच यातना ही जमीन दुसऱ्यांना विकल्यावर झाल्या. जमीन आणि शेतकरी याचे नाते समजून घ्यायचे झाले ना, तर शेतकऱ्याच्या जन्माला जावे लागेल.’’ कराड पुन्हा म्हणाले, ‘‘मी केली एकदा हिंमत काका, काय करू. मुलगी लग्नाला आली होती. जमाना कसा निघाला? जवळ एक छदाम नव्हता.’’

आम्ही बराच वेळ बोलत बसलो होतो. शेती, शेतकरी, यांच्याशी संबंधित असणारे कित्येक विषय आजोबा मला सांगत होते. सर्व विषय थक्क करणारे होते. त्यांना आपण काय बोलावे? शासकीय नीती, राजकारण, निसर्ग हे अनुभवातून ते कोळून प्यायले होते. माझे ज्ञान त्यांच्या अनुभवापुढे प्रचंड फिके होते. आपल्या कुटुंबाच्या संपलेल्या सर्व धाग्यादोऱ्यांची उकल करून सांगताना आजोबांच्या डोळ्यांचा ओलावा काच फुटलेल्या चष्म्यातून स्पष्टपणे दिसत होता.

आजोबाने तयार केलेली दोरी मी हातात घेऊन पहिली. ती दोरी प्रचंड मजबूत होती, त्यापेक्षाही जास्त मजबूत आजोबांमधला प्रामाणिकपणा, कठोरपणा. कोणाचे बुडवायचे नाही, कुणाचे लुबाडायचे नाही ही वृत्ती केवळ शेतकरी जमातीमध्ये आहे. हे आजोबा अशा असंख्य शेतकऱ्यांचे उदाहरण होते.

मी जाण्यासाठी निघालो. आजोबांची कहाणी एकूण माझे डोके सुन्न झाले होते. मी विचार करत होतो. कर्जातून कित्येकांना बुडवणाऱ्या ‘महाठक’ यांना आपण रोज पाहतो. पण कर्जासाठी पिढ्यांच्या पिढ्या बुडताना मी पहिल्यांदा पाहत होतो. ज्याचा कुणीही वाली नाही, ज्यांना ना सरकारचा आधार, ना निसर्गाचा. ज्याच्यामुळे पोटात चार घास जातात, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायम दुय्यम आहे. येथून सर्वांची मानसिकता बदलावी लागेल. ही मानसिकता जेव्हा बदलेल तेव्हाच सदाशिव पाटील यांच्यासारखी कुटुंबेच्या कुटुंबे उद्‍ध्वस्त होण्यापासून वाचतील.