
छत्रपती संभाजीनगरहून मी जळगावला पोहोचलो. सुरेश उज्जैनवाल, मुफ्ती मोहम्मद हारून नदवी ही मंडळी माझी वाट पाहत होती. उज्जैनवाल यांच्या घरून आम्ही मुफ्ती यांच्या घरी गेलो. मुफ्ती आणि माझा परिचय गेल्या तीन वर्षांपासूनचा. दुपारचे जेवण झाल्यावर मुफ्ती त्यांच्या मुलीची ओळख करून देत म्हणाले, ही माझी मुलगी रक्षदाफातिमा, सध्या ‘नीट’ची तयारी करते. तिला डॉक्टर व्हायचे आहे.
मुफ्ती यांचे जनसेवेचे काम मोठे आहे. मुस्लिम समाजाचे सामूहिक विवाह सोहळे, मुस्लिमांच्या शेकडो मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत, अॅम्बुलस सेवा, फिरते दवाखाने, सामाजिक बांधिलकीवर देशभर व्याखाने देण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. ते जेव्हा जळगावमध्ये असतात तेव्हा ते मशिदीमध्ये मौलाना म्हणून काम करतात. मुफ्ती यांच्या आजोबांपासून घरात उच्च शिक्षणाची कास धरली गेली. त्यातूनच मुफ्ती (९९२३२२३३६१) यांच्या घरात सर्व डॉक्टर, इंजिनिअर झाले आहेत.
थोड्या वेळाने मी आणि मुफ्ती आम्ही दोघे घरातून बाहेर पडलो. मुफ्ती ज्या मशिदीमध्ये मौलाना होते, त्या मशिदीमध्ये आम्ही गेलो. नमाजानंतर मुफ्ती यांनी सामाजिक बांधिलकी या विषयावर मार्गदर्शन केले. महत्त्वाच्या व्यक्तींना ते माझी ओळख करून देत होते. मी हिंदू आहे, मी मशिदीमध्ये कशाला आलो. नमाजच्या वेळी या माणसाचे काय काम, या नजरेमधून माझ्याकडे कोणीही पाहिले नाही.
आम्ही मशिदीच्या बाहेर आलो. बाहेर असणाऱ्या सर्व भिकाऱ्यांच्या टोकरीमध्ये मुफ्ती यांनी दान टाकायला सुरवात केली. एका भिकाऱ्याजवळ जाऊन मुफ्ती थांबले आणि त्याच्या झोळीत दान टाकत म्हणाले, तुझ्या मुलीचे कसे सुरू आहे. तिचा अभ्यास काय म्हणतोय. तो भिकारी म्हणाला, आल्लाहच्या कृपेने सर्व काही ठीक आहे. मुफ्ती पुन्हा म्हणाले, काही लागले तर नक्की सांगा. भिकाऱ्याने मान होकाराची हलवली.
आम्ही निघालो, मी माझ्या दिशेने जाणार होतो आणि मुफ्ती त्यांच्या दिशेने. मी मुफ्तींना जाताना म्हणालो, त्या भिकाऱ्याची मुलगी काय शिकते, त्यावर मुफ्ती म्हणाले, ती मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला आहे. मला खूप आश्चर्य वाटले. मुफ्ती म्हणाले, सर, हे जळगाव आहे. येथे मुस्लिमांच्या शिक्षणाचे प्रमाण खूप चांगले आहे. त्याचे कारण आजूबाजूचे वातावरण खूप पोषक आहे.
विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये प्रत्येक पालक इथे काळजी घेतोय. एखादी मुलगी जेव्हा हुशार असते, ती एका ध्येयाने प्रेरित होते. तेव्हा आम्ही सगळे जण मिळून तिला मदत करतो. मुफ्ती निघाले. मी फोनवर बोलत होतो. त्यात माझा बराचसा वेळ गेला. माझी गाडी निघाली. त्या भिकाऱ्याची मुलगी मेडिकलला होती. तो माझ्यापुढे चालत चालत घरी निघाला. मी गाडीच्या खाली उतरलो. त्या भिकाऱ्याला नमस्कार केला. त्यांनी मला पटकन ओळखले.
तो म्हणाला, तुम्ही आत्ता मुफ्ती साहेब यांच्याबरोबर होतात ना. मी म्हणालो, हो, तो म्हणाला, रस्ता चुकलात का? तुम्हाला कुणाचा पत्ता हवा काय? मी म्हणालो नाही, मला तुमच्याशी बोलायचे होते. म्हणून गाडीच्या खाली उतरलो, तो म्हणाला, बोला. अत्यंत स्वाभिमानी, करारी, आपल्या धर्माशी प्रचंड इमान असलेला हा माणूस आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.
मी जेव्हा वारंवार बोलताना त्याच्या मुलीविषयी विचारत होतो, तेव्हा तो मला शंकेने विचारत होता, तुम्ही माझ्या मुलीविषयी का विचारताय ? कशासाठी तुम्हाला ही माहिती हवी आहे. मला हवी असलेली माहिती मी चांगल्या कामासाठी घेतोय, हे त्याला पटल्यावर तेव्हा तो माझ्याशी बोलायला लागला. मी त्या माणसाला म्हणालो, मी तुमच्या घरी येऊ शकतो का? मला तुमच्या मुलीशी बोलायचे होते. तो मला जवळजवळ नकार देण्याच्या तयारीत होता.
त्या माणसाला मी मुफ्ती यांना फोन लावून दिला. मुफ्ती बोलल्यावर तो तयार झाला. मी त्या माणसाच्या घरापर्यंत कसाबसा गेलो. ते घर म्हणजे माणसं किती संघर्ष करतात याचे उदाहरण होते. मी ज्या भिकाऱ्याच्या घरात बसलो होतो, त्याचे नाव अमजद. त्याच्या मेडिकलला शिकत असणाऱ्या मुलीचे नाव अंजुम. अंजुमला अजून चार भावंडे.
अंजुम ही सगळ्यात मोठी मुलगी. पहिलीपासून अंजुमचे मेरिट कधी हुकलेच नाही, त्याचे कारण तिच्या वडिलांनी तिला मिळवून दिलेला आत्मविश्वास. दुसरे गरिबी हटवणे हे तिने आयुष्याचे सूत्र बनवले. कमी वयामध्ये तिच्यामध्ये असलेली परिपक्वता ही कमालीची होती.
मी अंजुमला म्हणालो, कुठल्या भाषेमध्ये तुझे शिक्षण झाले आहे, तुला कुठली भाषा आवडते. ती म्हणाली, माझे शिक्षण इंग्रजी भाषेत झाले. मला वाचायला उर्दू भाषा आवडते, मी हिंदीमध्ये बोलते. पाचवीला असताना माझी शिक्षिका आशिया हिने मला सांगितले होते, तुला मोठे व्हायचे असेल, तर इंग्रजी भाषा तुझ्यासाठी आवश्यक आहे. मी तेव्हापासून इंग्रजी भाषेची कास धरली. मी अंजुमला म्हणालो, आता पुढे काय करायचे.
ती म्हणाली, काही नाही, माझे वैद्यकीय शिक्षण झाले, की इथून मी माझ्या आई-वडिलांना घेऊन बाहेर जाणार आहे. मला माझ्या भावांना खूप शिकवायचे आहे. मला लग्न नाही करायचे. त्यामुळे कदाचित माझ्या भावांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल. मी तिला म्हणालो, की तू अभ्यास कसा करतेस. कुठे क्लास लावलास का? ती म्हणाली, क्लास कशाला? दिवसभर मला माझ्या कॉलेजमध्ये शिकवले जाते. त्याचे रिव्हिजन करत मी घरी अभ्यास करते. तुझ्या मैत्रिणींना उच्च शिक्षणाबद्दल काय वाटते?
तुझ्यासारखीच अनेकांची परिस्थिती आहे का? ती म्हणाली, माझ्यासारख्या अनेक आहेत, ज्यांना संध्याकाळी काय खावे, हा प्रश्न आहे. त्यांना पुढे खूप शिकायचे आहे. त्यांना छान पद्धतीने पुढे जायचे आहे. त्या प्रत्येकीला धर्म, संस्कार याबद्दल खूप आदर आहे, पण त्यांच्यावर धर्माच्या नावावर कोणी काहीही लादावे हे त्यांना अजिबात आवडत नाही. माझ्यासह त्याला सारे विरोध करतात.
मी पुन्हा अंजुमला म्हणालो, तू नियमित लागणाऱ्या खर्चाचे काय करतेस. ती म्हणाली, पैशांसाठी, माझा कुठलाही विषय आतापर्यंत थांबला नाही. गरज पडल्यावर काही ना काही नक्की मार्ग निघतो. लोक मदत करण्यापूर्वी माझा रिझल्ट कसा आहे हे पाहतात. तो पाहून लोकांचा प्रतिसाद कायम असतो. माझ्यासमोर दोन केळी ठेवत अमजद यांच्या पत्नी रुकसाना मला म्हणाल्या, दादा, अल्लाची कृपा आहे, त्यातून सगळे काही ठीक आहे.
एक मुलगी आता शिकली, बाकी मुले शिकावीत. मी विचारले, ताई, तुम्ही काय काम करता, त्यावर त्या म्हणाल्या, जिथे जे काम मिळेल ते काम मी करते. त्या सगळ्या कुटुंबावर इस्लाम धर्माचा कमालीचा पगडा आहे. आमच्या तिघा जणांचा संवाद चालला होता.
त्यात मध्येमध्ये माझ्या अगोदर ती मुलेच त्या आई-वडिलांना उत्तर देत होती. त्यांचे आलेले उत्तर त्या दोघांनाही पटत नव्हते, पण ती मुले खरी बोलत होती. माझ्यासमोर ठेवलेली केळी मी खाल्ली. त्या सर्वांचे आल्यापासून ते जाईपर्यंत माझा सन्मान करणे सुरूच होते.
अंजुमचे भाऊ मला मामा पाणी देऊ, मामा केळी देऊ असे करत होती. मी खिशामध्ये हात घातला, होते तेवढे पैसे त्या अंजुमच्या हातात ठेवले. त्या सर्व घरावर एकदा मी नजर फिरवली आणि निघालो. मी निघताना मी दिलेले पैसे अंजुमने माझ्या हातावर परत ठेवले. मला तिने सांगितले, आता मला पैशांची गरज नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा नक्की सांगेन.
मी अंजुमकडे पाहतच राहिलो. मला तिथे भेटलेली सारीच माणसे स्वाभिमानी लढ्याची पावले पुढे टाकत होती, असे वाटत होती. थोड्या वेळापूर्वी झालेले माझे भाचे अनवाणी पायाने मला सोडायला गाडीकडे येत होते. त्या घरापासून ते गाडीपर्यंत यायला मला खूप त्रास झाला. मी विचार करत होतो, एका वेळेला तासाभरामध्ये मला एवढा त्रास झाला तर आयुष्यभर किंबहुना, पिढ्यान पिढ्या ही माणसे जीव मुठीत धरून कसे आयुष्य जगत असतील.
रस्ते, नालेसाफाई, खांबावर लाइट या सर्व विषयासाठी प्रशासनाला काही देणे-घेणे नव्हतेच. हे चित्र बदलण्यासाठी आता अंजुमसारखा एखादा आशेचा किरण त्यांच्यासमोर दिसतोयही. त्याला रूढी-परंपरावाले कितपत मान्य करतील हे सांगता येत नाही. असे असले तरीही आता स्वाभिमानी लढ्याचे पाऊल हळूहळू करून पुढे सरकत आहे.
सतत बुरखा पांघरून, उर्दूसारख्या भाषेला माझी भाषा आहे असे म्हणून कवटाळून बसणारी मुस्लीम मुलगी, आज जेव्हा इंग्रजीची कास धरून मला डॉक्टर व्हायचेय, मुफ्ती यांच्यासारखी लोकांची सेवा करायची असे सांगू लागते. तेव्हाच चांगुलपणाचे, खरेपणाचे दिवस येणार आहेत, असे वाटू लागते. तुमच्या आजूबाजूला अशा अनेक अंजुम असतील. ज्यांना मदतीची गरज असेल. तुम्ही त्या तमाम अंजुमला नक्की मदत करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.