माणुसकीसाठी आपुलकी...

मी सोलापूरमधून सांगलीत आलो. सांगलीत सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यावर, माझा सांगलीचा सहकारी शैलेश पेठकर याच्यासोबत एका छोट्याशा टपरीवर लस्सी घेत आम्ही थांबलो होतो.
Mustafa Mujawar
Mustafa MujawarSakal
Summary

मी सोलापूरमधून सांगलीत आलो. सांगलीत सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यावर, माझा सांगलीचा सहकारी शैलेश पेठकर याच्यासोबत एका छोट्याशा टपरीवर लस्सी घेत आम्ही थांबलो होतो.

मी सोलापूरमधून सांगलीत आलो. सांगलीत सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यावर, माझा सांगलीचा सहकारी शैलेश पेठकर याच्यासोबत एका छोट्याशा टपरीवर लस्सी घेत आम्ही थांबलो होतो. समोर रस्त्यावर एका माणसाच्या मागे दोघे-तिघे धावत होते. त्या माणसाच्या अंगावर कपडे नव्हते. पाठीमागून येणाऱ्या माणसाने त्या वेड्या माणसाला पकडलं, ते त्याला कपडे घालायचा प्रयत्न करत होते. मी शैलेशला विचारलं, ‘कोण आहेत ही माणसं?’

शैलेश म्हणाला, ‘आमच्या शहरात मुस्तफा नावाचा एक तरुण आहे. त्याने शहरात, शहराच्या आसपास असणाऱ्या अनेक वेड्या माणसांना, भिकाऱ्यांना, बेघरांना एकत्रित केलं, त्यांचं पालकत्व स्वीकारलं.’ मुस्तफाबाबत शैलेश मला खूप काही सांगत होता. मी शैलेशला म्हणालो, ‘आपण मुस्तफाला भेटू या.’ शैलेशने लगेच होकार दिला.

सांगलीच्या काँग्रेस भवनच्या भागातील सावली बेघर निवारा केंद्रामध्ये गेलो. आत प्रवेश करताना एक जण म्हणाला, ‘मुझे पाकिस्तान जाने का है।’ दुसरा म्हणाला, ‘मला दाऊदला जेलमध्ये टाकायचंय.’ जी माणसं भेटत होती, ती एक तर काहीच्या काही बोलायची, तर काही एकटक लावून आमच्याकडं बघायची. आम्ही आतमध्ये गेलो. एक व्यक्ती काहीतरी काम करत बसली होती. शैलेशने माझी त्या व्यक्तीशी ओळख करून दिली. ते मुस्तफा होते. अंगावर छोटीशी बंडी, लांब दाढी, बरमोडा, चेहऱ्‍यावर कमालीचं समाधान!

‘नमस्कार, बसा. काय घेणार? चहा, कॉफी?’ असं बोलत त्यांनी आमचं स्वागत केलं. बाहेर नजर जाईल तिकडं माणसंच माणसं दिसत होती. कोणाला अंघोळ घालण्याचं काम सुरू होतं, कोणी चहा घेत होतं, तर कोणाच्या जखमांवर औषध लावायचं काम सुरू होतं.

किचनमध्ये दुपारच्या जेवणाची लगबग सुरू होती. तिथल्या मावशी मुस्तफांजवळ येऊन म्हणाल्या, ‘गरम गरम जेवायला वाढू का?’ मुस्तफा म्हणाले, ‘हो, वाढा ना.’ आमच्या गप्पा सुरू होत्या. वनभोजनाला बसावं, तशी माणसं तिथं जेवायला बसली होती. तिथलं सगळं वातावरण बघितलं आणि लक्षात आलं, हे सगळं उभं करणं एवढं सोपं नाही. यासाठी प्रचंड झपाटून गेल्याशिवाय हे काम होत नाही, जे मुस्तफा यांनी करून दाखवलं होतं. गप्पांमधून मुस्तफांची सगळी कहाणी कळाली. तिथं असणाऱ्या अनेक लोकांशी बोलल्यावर मला कळालं की, खूप चांगली माणसं तिथं खितपत का पडलीत ते. अनेक जण बोलताना सांगत होते, ‘आमची मुलं आम्हाला स्वीकारत नाहीत.’ मुस्तफांच्या कष्टातून त्या ‘सावली’मधली सामाजिक सावली अजून गडद झाली होती.

मुस्तफा इलाही मुजावर (९०२१५१६१७६) सांगलीमधला एक कुख्यात गुंड म्हणून त्याला कधीकाळी सगळेजण घाबरायचे. आज त्यांच्या सामाजिक कामामुळे त्यांना भेटण्यासाठी लोकांची सतत ये-जा सुरू होती. ‘गंभीर स्वरूपाचे गुन्हे माझ्यावर होते,’ असं मुस्तफा मला सांगत होते. कुठं-कुठं जेलमध्ये जावं लागलं, कसे मित्र होते, हे सारं मुस्तफा मला सांगत होते. अंगावर काटा आणणारी मुस्तफा यांची कहाणी ऐकून मन सुन्न झालं होतं.

मुस्तफा यांचे वडील इलाही मुजावर हे एक कामगार होते. आपल्या वडिलांना कामावर सोडण्यासाठी मुस्तफा वडिलांसोबत रस्त्याने जात होते. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मुस्तफांच्या वडिलांनी आपल्याजवळ असलेली भाकरी उघडली. त्या दोन भाकरींमधली एक भाकर आणि थोडीशी भाजी त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या भिकाऱ्याला दिली.

मुस्तफा यांनी वडिलांना विचारलं, ‘तुम्ही अर्धपोटी उपाशी राहून भिकाऱ्याला का खाऊ घातलं?’ त्यावर वडिलांनी एकच उत्तर दिलं, ‘ते तुला कळणार नाही.’ मुस्तफा जेव्हा-जेव्हा वडिलांना घेऊन जायचे, तेव्हा-तेव्हा वडिलांना भिकाऱ्याला अर्धा डबा देताना पाहायचे. मुस्तफांना ते छान वाटायचं.

२००९ मध्ये रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला पाहून मुस्तफांना फार वाईट वाटलं. तिच्या जखमांमध्ये किडे पडले होते. मुस्तफांनी तिला अंघोळ घातली, तिला नवीन कपडे दिले, दवाखान्यामध्ये नेऊन तिच्या जखमांवर इलाज केला. ‘हे काम केल्यावर त्या रात्री मी इतका निवांत, शांतपणे झोपलो, की असं वाटत होतं, जणू ती आजी डोक्यावर थापटवत मला झोपी घालते आहे. पहिल्यांदा सकाळी उठल्यावर प्रसन्न मनाच्या वेगळ्या भावना होत्या. आपण काही तरी केलं याचा अभिमान सातत्याने भरून येत होता.’ हे सारं मुस्तफा मला सांगत होते. ‘आता हेच काम करायचं, असं मी ठरवलं आणि मी माझं काम मनपाच्या शाळेत सुरू केलं. तेव्हापासून आतापर्यंत रोज येणाऱ्या बेघरांची संख्या आणि जाणाऱ्यांची संख्या समसमान आहे.’ मी मुस्तफांशी बोलताना विचार करत होतो, मुस्तफांमधल्या ‘वाल्या’ला हे कसं सुचलं असेल, आपण असंही काही काम सुरू करावं ते. आज मुस्तफांमधला वाल्मीकी इतका परिपक्व झालाय, की त्याने मानवतेचा झेंडा अटकेपार लावला आहे.

अनेक वेडी माणसं कित्येक वर्षांनंतर ठणठणीत होऊन, डॉक्टरांचा इलाज घेऊन घरी गेली. अनेक जण गंभीर आजारातून वाचून चांगलं आयुष्य जगू लागले. त्यांनी मुस्तफांना मुलगा मानलं आहे. तिथं काही चांगली, हुशार माणसंही होती, काही जण निवृत्त अधिकारीही होते, त्यांच्या मुलांना वडील नकोत. काही जण अजूनही आपल्या घराकडे टक लावून आहेत. त्यांना वाटतं, कोणीतरी येईल आणि घरी घेऊन जाईल. कित्येकांना आपण कोण आहोत, आपलं नाव काय, आपलं घर कुठे आहे, याचा काही पत्ता नाही. इलाज करूनही त्यांची स्मरणशक्ती काही परत आली नाही. मी त्या मुंबईच्या अधिकारी व्यक्तीशी बोलत होतो. ते सांगत होते, ‘माझ्या मागे-पुढे कोणी नाही. आयुष्यभर लोकांचं चांगलं करत गेलो. डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाटायला लागलं. मुंबईहून सांगलीपर्यंत कसा आलो, माहीत नाही. सांगलीत कित्येक महिने फिरलो. फुटपाथवर झोपलो. एके दिवशी मुस्तफा आणि त्यांच्या माणसांनी मला इथं आणलं. माझ्यावर उपचार केले. आता मी कोण आहे, हे माझ्या लक्षात आलं. जिथं मला आयुष्य मिळालं,तिथल्या चांगल्या कामासाठी स्वतःला वाहून घ्यायचं मी ठरवलं,’ असं ते अधिकारी मला सांगत होते.

दुसरे एक काका म्हणाले, ‘बारा-तेरा वर्षं घराच्या बाहेर पडलो. तिथं आल्यावर दोन वर्षं उपचार केल्यानंतर शुद्धीवर आलो. मी कोण होतो, हे मला कळालं. अनेक वेळा मुस्तफांनी माझ्या घरच्यांना निरोप पाठवला. मुलाचाही निरोप आला. तो म्हणाला, तुम्ही आमच्यासाठी मेलात.’ तिसरा एक जण अस्खलित पंजाबीमध्ये बोलत सांगत होता, ‘मुझे पाकिस्तान जाने का है, तिथं माझं घर आहे.’ पण कुठलं शहर, कुठलं गाव हे त्याला काहीही आठवत नव्हतं. तिथं असणारा प्रत्येक माणूस ‘अजब’ रसायन होता. बाहेर असताना अंगावर कपडे नव्हते, डोक्यावरील केस इतके वाढले होते की, माणूस आहे की पशू, हे कळायला मार्ग नव्हता. मुस्तफांचे जुने अल्बम मी बघत होतो, तेव्हा अंगावर काटा येत होता. असं वाटत होतं, की ती किडे पडलेली माणसं, रक्तबंबाळ झालेली माणसं, आता एक माणूस म्हणून जगत आहेत. ज्यांना कळत होतं, त्यांना किमान माणसात आलो, याचं समाधान वाटत होतं. ज्यांना काहीच माहीत नव्हतं, त्यांना माणसासारखं माणसात राहायला मिळत होतं, हे काय कमी नव्हतं.

मुस्तफा सांगत होते, ‘मी लग्न केलं ते बायकोने सेवाभावी काम करावं लागेल या अटीवर. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी मला मुलगी झाली. मी तिचं नाव ‘जिजा’ ठेवलं. माझ्या घरच्यांना, सगळ्यांना हे नाव खूप आवडलं. आता मी हे काम करताना माझे जुने, गुन्हेगारीशी संबंधित असलेले मित्र माझ्याकडे येतात, दोन दिवस राहतात, तेव्हा त्यांतील अनेकांचं मनपरिवर्तन होतं.

कोरोना काळामध्ये इथल्या माणसांना सांभाळता-सांभाळता मला आईला वाचवता आलं नाही. तिची सावली, तिच्यातील चांगुलपणा, इथं माणूसपण मिळालेल्या प्रत्येक माणसामध्ये मला दिसतो.’ आईविषयी बोलताना भावुक झालेले मुस्तफा स्वतःला सावरतात आणि आमच्याशी बोलत-बोलत एका वेड्या माणसाच्या पट्ट्या बदलायला लागतात. मी मुस्तफांना म्हणालो, ‘हे सगळं चालतं कसं?’

मुस्तफा म्हणाले, ‘काही नाही हो. चालतं सगळं. माणुसकी अजून शिल्लक आहे.’ शैलेश मला सांगत होते, ‘मुस्तफांकडे काहीही नव्हतं. त्यांनी सगळं विकलं. बायकोचे दागिनेसुद्धा ठेवले नाहीत. एवढ्या चांगल्या कामासाठी शासनाकडून रुपयाची मदत वेळेवर होत नाही.’ मुस्तफा शैलेशला मध्येच म्हणाले, ‘जाऊ द्या.’ अशा वातावरणातही इतक्या उत्साहाने मुस्तफा काम करत होते, ही कमाल होती. हे वातावरण डोळ्यांत साठवून मी निघालो. माणूसपणाचा सुगंध मुस्तफांच्या कर्तृत्वाला, मनाला चिकटला होता. मुस्तफांमध्ये असलेला ‘वाल्या’ केव्हाच मरून मुस्तफांच्या वडिलांच्या संस्कारातून एक नवीन अंकुर उदयाला आला होता. शेकडो जणांना त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडणारा, शेकडो जणांना घरपण देणारा मुस्तफा आज सांगलीकरांचा निश्चितच अभिमान असणार. आपल्या अवतीभोवती असे अनेक मुस्तफा असतील, ज्यांनी चांगलं काम करण्याचा चंग बांधला आहे. त्यांना मदत करणं हे तुमचं-आमचं कर्तव्य आहे. मुस्तफांच्या कामाला गती मिळणं फार आवश्यक आहे, बरोबर ना !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com