उष्ट्या अन्नाची मालकीण

नांदेड जिल्ह्यातल्या बारड इथं माझे मेव्हणे सचिन कल्याणकर यांचं लग्न आटोपून मी माझी बहीण शारदा वरवंटकर हिला भेटण्यासाठी स्टेशन उमरी येथे गेलो.
Old women cleanning pots
Old women cleanning potssakal
Summary

नांदेड जिल्ह्यातल्या बारड इथं माझे मेव्हणे सचिन कल्याणकर यांचं लग्न आटोपून मी माझी बहीण शारदा वरवंटकर हिला भेटण्यासाठी स्टेशन उमरी येथे गेलो.

नांदेड जिल्ह्यातल्या बारड इथं माझे मेव्हणे सचिन कल्याणकर यांचं लग्न आटोपून मी माझी बहीण शारदा वरवंटकर हिला भेटण्यासाठी स्टेशन उमरी येथे गेलो. खूप दिवसांनी शारदाकडे भेटायला गेल्यामुळे मेव्हणे संदीप वरवंटकर यांचं आदरातिथ्य विचारू नका. संदीप यांचे मित्र बाळू यांनी भोकर उमरी रोडवर एक नवीन हॉटेल सुरू केलं. त्या हॉटेलला जायचा आमचा बेत ठरला. त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या गावरान मेनूची चव खूपच छान होती. आम्ही मुंबईकर शहराच्या नावाने मोठे; पण जिभेला चवीच्या नावाने कायम कमनशिबी.

एकदम छान जेवण झाल्यावर मी मागच्या बाजूला हात धुण्यासाठी गेलो. हात धुताना थंडीनं काकडणाऱ्या एका आजीबाईंकडं माझं लक्ष गेलं. ती बाई हॉटेलमधील खरकटी भांडी धूत होती. तिच्या अवतीभोवती इतकी भांडी पडली होती, की त्यातून तिचा चेहराही दिसत नव्हता. ती एका हाताने भांडी धूत होती आणि दुसऱ्या हाताने आजूबाजूच्या कुत्र्यांना हाकलत होती. कमालीचा गारवा, त्यात चहूबाजूंनी पाणी, वर मोकळं आकाश... असं वाटत होतं, त्या आजीच्या कर्मासहित निसर्गही तिची परीक्षा पाहतोय.

जसजशी थंडी आपलं विशाल रूप धारण करीत होती, तसतसं त्या आजीच्या समोर असणारा भांड्यांचा ढीग वाढत होता. ती आजी मला त्या आईचं ‘प्रतीक’ वाटत होती, ज्या आईला कधीही, कुठंही आणि कुणीही हरवू शकत नव्हतं. तिचं प्रेम, जिव्हाळा तर विचारूच नका. ‘‘आरे खंडोबा, राजा, जरा दमानं खा, किती घाई रं तुमची?’’ ती त्या कुत्र्यांना आपल्या लेकरांना बोलावं असं बोलत होती. थंडीने त्या आजीच्या दातांचा कुडकुडण्याचा आवाज माझ्यापर्यंत येत होता. आजीभोवती असणाऱ्या कुत्र्यांना हाकलत मी आजीजवळ गेलो. माझी चाहूल लागताच आजीने डोक्यावरचा पदर दातांमध्ये एकदम घट्ट पकडला. मी आजीला म्हणालो, ‘‘अहो आजी, तुम्हाला थंडी वाजत नाही का?’’

माझे ‘अहो’ शब्द ऐकताच आजीच्या डोळ्यांमधली भीती एकदम नाहीशी झाल्याचं मला दिसत होतं. आजी हळू आवाजात म्हणाली, ‘‘वाजते ना बापू, मग आता काय करू माय.’ आपले हात चालवत आजी बस्स तेव्हढंच बोलली. ती आजी एका रिकाम्या भांड्यामध्ये ते उष्टं अन्न काढत होती आणि आजूबाजूंच्या कुत्र्यांना भांडण न करता ते अन्न समसमान करून वाटत होती. असं वाटत होतं, ती आजी उष्ट्या अन्नाची का होईना, मालकीण आहे. मी त्या आजीजवळ थांबलो, हे पाहताच त्या हॉटेलचे मालक शंकर शिंदे ऊर्फ बाळू (९८८१६०७२७३) माझ्याकडे पळत आले. ‘काय पाहिजे आपणास, काय झालं?’ असं ते विचारत होते. मी बाळू यांना म्हणालो, ‘‘काही नाही. मला आजींशी बोलायचं आहे. माझं बोलणं होईपर्यंत इथे कुणालाही पाठवू नका.’’

बाळू आजीला म्हणाला, ‘‘आजी, हे आपले पाहुणे आहेत, बोला तुम्ही यांच्याशी,’’ असं म्हणून बाळू आतमध्ये गेले. बाळूचं बोलणं ऐकताच आजीने आपला तोंडात असणारा पदर सोडला. मी अनोळखी माणूस, ही तिची धाकधूक निघून गेली. मी आणि आजी दोघं एकमेकांशी खूप बोललो. आजीच्या मनामध्ये असणारं प्रचंड दुःख आजीच्या अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत होतं. त्या आजींच्या आठवणी, दुःख सांगताना, ऐकताना ना आजीला थंडी वाजत होती, ना मला. दु:खाची ताकद सर्वांत जास्त असते, हे मला त्या आजीशी बोलताना जाणवत होतं. एका कुत्र्याचं पोट भरलं होतं. तो कुत्रा आजीला चाटत होता.

मी ज्या आजीशी बोलत होतो, तिचं नाव राधाबाई कांबळे. उमरीमध्ये पाण्याच्या टाकीजवळ राधाबाईचं घर आहे. राधाबाईला दोन मुलं आहेत. दोन्ही ड्रायव्हर आहेत. दोन सुना, सहा नातू असा मोठा परिवार; पण या मोठ्या परिवारात राधाबाईला बिचारीला एकटं एकटं वाटतं. आजी अगदी पिकलं पान, सत्तरी पार केलेल्या. मी राधाबाईला म्हणालो, ‘‘आजी, तुमचा एवढा मोठा परिवार आहे आणि तुम्ही म्हणता मी एकटी आहे. असं कसं?’’ आजी म्हणाल्या, ‘‘बापू, इथं कुणी कुणाचं नाही हो. बाईचा जन्मच विस्तवावर पाय ठेवल्यासारखा आहे; तरीही जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू असतं, तोपर्यंत ‘ती’ कितीही दुःखी असली, तरी तिच्या जगण्यात आनंदाचा सुकाळ असतो. एकदा मंगळसूत्राचा मालक गेला, की पुन्हा तिला विचारणारा कुणीही वाली नसतो.’’ आजी भांडी घासणारी बाई होती; पण तिचं तत्त्वज्ञान, अनुभव एखाद्या महात्म्यासारखा होता. मी आजीला म्हणालो, ‘‘तुमचे मालक कधी वारले?’’ आजी एकदम किंचाळत म्हणाली, ‘‘ते कधी जिवंत होते? माझं माहेर तामसा. बापाने काबाडकष्ट करून त्याच्याकडे जे होतं-नव्हतं, ते माझ्या यजमानाला दिलं. बिचाऱ्याने कधी सुख दिलं नाही. दिवसभर हमाली करायचा आणि रात्री दारू पीत बसायचा. लहान-लहान दोन मुलं बाप घरात आला, की आता मारणार म्हणून थरथर कापायची. एका रात्री दारू पिऊन पोरांचा बाप रात्री झोपला. मी सकाळी कामावर जायचं नाही का म्हणून उठवत होते, तर कळालं, पोरांच्या बापात जीवच नाही.’’ हातातलं ताट तसंच बाजूला ठेवत आजी डोळ्यांतले अश्रू पुसत म्हणाली,

‘संन्याशी गेला, मला एकटीला सोडून, इथं रोज जिवंतपणी मरायला.’’

‘आजी, तुमची मुलं आहेत ना? मग काळजी कशाची?’’

आजी म्हणाली, ‘‘आहेत ना बापू, पोटच्या दोन्ही पोरांना माझं देणं-घेणं नाही. बापाच्या पावलांवर पाऊल ठेवत पोरंपण दारू प्यायला शिकली. आपली माय मेली का जिवंत आहे, त्यांनी कधीही विचारलं नाही. रोज मरे, त्याला कोण रडे, अशी माझी अवस्था झाली आहे.’’ आजी पुन्हा स्वतःहून म्हणाल्या, ‘‘सुना कशा आहेत, त्या माझ्यासोबत कशा वागतात, हे विचारू नका. कधी म्हातारी मरणार, या भाषेत माझ्याशी बोलतात. नातवाला माझ्याविषयी सुनांनी खूप भरवलं. माझे नातू लहानाचे मोठे मी केले. आईप्रमाणे मी वाढवलं, त्यांना माझ्यापासून तोडलं. दर दिवशी मला इथं कामाचे दोनशे रुपये मिळतात, तेही सुनेच्या हाती द्यावे लागतात. मी तसं नाही केलं, तर माझे केस आणि तिचे हात असतात. बापा, पोरांना मोठं करण्यासाठी अवघं आयुष्य वेचलं हो आणि हाती काय आलं?’’ आजी काम करत-करत रडत होत्या आणि मी आजीची समजूत काढत होतो. आजीला काय बोलावं हे मला सुचत नव्हतं. आता सर्व कुत्री शांत होऊन बाजूला बसली होती. काय माहीत, त्यांचं पोट भरलं म्हणून शांत होती, की आजी रडत आहे म्हणून शांत बसली होती. रोज ‘खंडोबा महाराज, खंडोबा महाराज’ म्हणणारी आजी आज का रडते, असा प्रश्न त्या कुत्र्यांना पडला असेल. तसं त्या कुत्र्यांशिवाय आजीवर प्रेम करणारं या जगात कुणीही नव्हतं. माझेही डोळे पाणावले होते.

माझे मेव्हणे संदीप वरवंटकर, माझे मामा संभाजी वरवंटकर, माझा भाऊ आनंद काळे, सुभेदार बालाजी शिंदे, बालाजी पतंगे, माझा मुलगा अथर्व ही सगळी मंडळी माझी वाट बघत बसली होती. हॉटेलचे मालक बाळू माझ्या जवळ येऊन त्यांनी मला आवाज दिला. मी आणि आजी दोघंही भानावर आलो, तेव्हा थंडी जाणवत होती. बाळू म्हणाले, ‘‘दादा आजी खूप स्वाभिमानी आहे. मी तिला नेहमी म्हणतो, आजी तुम्हाला काय हवं ते तुम्ही माझ्याकडून घेऊन जा, अशा थंडीत इथं काम करू नका; तर आजी मला म्हणतात, मला काम देणार असाल, तर पैसे द्या.’’

स्वाभिमान गरीबालाच असतो, हे आजीच्या करारीपणामध्ये दिसत होतं. मी खिशात हात घातला, होते तेव्हढे पैसे आजीच्या हातावर ठेवले. ते पैसे आजीच्या हातात ठेवताना तिचा स्वाभिमान, संघर्ष, मातृहृदय या भावनांचा मला स्पर्श झाला. आजीचा निरोप घेऊन मी निघालो. मी दूर जाईपर्यंत आजी तोंडाला पदर लावून एकसारखं टक लावून बघत होती. काय माहीत, तिला मला अजून काय सांगायचं होतं ते!

सर्वांनी टाकून दिलेल्या अशा अनेक राधाबाईंसारख्या आजी रोज जीव मुठीत धरून पावलोपावली मरताना आपल्याला दिसतात. ‘मातृ देवो भव’ असं केवळ पोथी-पुराणांत दिसतं आणि तुम्ही-आम्ही राधाबाईला आईपण मिळवून देण्यासाठी काय करतो? आपल्या अवतीभोवती अशा अनेक राधाबाई आपल्याला रोज भेटतात, दिसतात. आपलं कर्तव्य आहे, त्यांना मायेची ऊब द्यायचं. बरोबर ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com