
नवी मुंबईत होतो, पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. माझी गाडी नवी मुंबईच्या सिग्नलवर थांबली. मी गाडीची काच थोडी खाली केली आणि बाहेर हात काढून मोकळ्या हवेचा आनंद घेऊ लागलो.
‘बाप’पणाच्या झळा...!
नवी मुंबईत होतो, पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. माझी गाडी नवी मुंबईच्या सिग्नलवर थांबली. मी गाडीची काच थोडी खाली केली आणि बाहेर हात काढून मोकळ्या हवेचा आनंद घेऊ लागलो. आता मी काच बंद करणार, तितक्यात एका तरुणाने मोठंच्या मोठं मोरपीस गाडीच्या काचेतून आत सरकवलं. तो तरुण मला म्हणाला, ‘दादा घ्या ना मोरपीस, तुम्हाला आवडतील, सकाळपासून भोवणीपण झाली नाही.’ त्याचं बोलणं ऐकून मी त्याला म्हणालो, ‘तू बीडचा आहेस का?’ तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, ‘उस्मानाबादचा आहे.’ तो न घाबरता मला म्हणाला, ‘साहेब, तुम्ही बीडचे का?’ मी म्हणालो, ‘नाही, मी तसा नांदेडचा; पण आता मुंबईकर.’ मी म्हणालो, ‘‘काय भाव आहे एका मोरपिसाचा?’ आमचं बोलणं सुरू असताना, एक मुलगी आली. तिच्या एका हातात वही, तर दुसऱ्या हातात विकण्यासाठी असलेले टिश्यू पेपर होते. ती त्या तरुणाला म्हणाली, ‘बाबा, शंभर रुपयांचे चिलर द्या ना...!’ त्याने लगेच चिल्लर दिले. तो मला काही बोलणार तितक्यात दुसरी मुलगी आली आणि तिने त्या तरुणाकडची थोडी मोरपिसं नेली. मी त्या तरुणाला विचारलं, ‘या मुली कोण आहेत?’ तो म्हणाला, ‘माझ्याच आहेत.’ मी एकदम आश्चर्यचकित झालो. एवढ्याशा मुलाला एवढ्या मोठ्या मुली? मी गाडी बाजूला घेतली. मला ती देखणी मोरपिसं घ्यायची होती. आमचं बोलणं सुरू असतानाच, त्या युवकाला एक फोन आला,
तो तिकडच्या मित्राशी बोलत होता, ‘पोलिस त्रास देतात म्हणून मी मुंबईला आलो, मला आता पुन्हा फोन करू नकोस.’ तो एकदम चिडला होता, चिडूनच त्याने फोन ठेवला. मी त्याच्याकडे निरखून पाहिलं, त्याला विचारलं, ‘का, काय झालं? ज्याला पोलिस त्रास देत आहेत, ज्याची विचारणा करीत आहेत, तो काय पारधी समाजाचा मुलगा आहे का?’ तो एकदम रागाने माझ्याकडे पाहत म्हणाला, ‘का, पारधी समाज माणसांच्या यादीत येत नाही का?’ मी म्हणालो, ‘हो मग, येतो ना..! का नाही?’ तो पुन्हा म्हणाला, ‘तर मग जरा काही वाईट घटना घडली, की पारध्याच्या मुलांकडे एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे का पाहतात ही पोलिस मंडळी?’
मी काहीच बोललो नाही. एकदम शांत बसलो. त्याचा राग आता काहीसा शांत झाला होता. बाजूला असलेल्या बाईकडे त्याने आपल्या हातातील मोरपिसं दिली. मी विचारलं, ‘या कोण आहेत?’ तो म्हणाला, ‘माझी बायको आणि ही सर्व मुलं.’
नवी मुंबई महापालिकेच्या सिग्नलपासून अगदी थोड्या अंतरावर मी ज्याच्याशी बोलत होतो, त्याचं नाव सुनील अर्जुन शिंदे (९३२६०५३२१२).सुनील वगळता सर्वांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता. सुनीलची आई नागरबाई, पत्नी आशाबाई, नागेश, निकिता, प्रियंका, राणू, नंदनी अशा आठ माणसांचं कुटुंब त्या सिग्नलवर होतं. सुनीलशी बोलताना माझ्या लक्षात आलं की, जीवन जगण्याच्या लढाईत जर जात नावाचा वाईट शिक्का आपल्यावर बसला, ‘बाप’ नावाचं छप्पर डोक्यावरून उडून गेलं, तर आयुष्याचा सत्यानाश कसा होऊ शकतो, याचं सुनील आणि त्याचं अख्खं कुटुंब उत्तम उदाहरण होतं. जवळजवळ अडीच तास मी सुनीलसोबत बोलत होतो.
सुनीलच्या बोलण्यामधून जे वास्तव समोर आलं, ते धक्कादायकच होतं. मी ज्या सुनीलशी बोलत होतो, तो मूळचा ईटकुर (महादेवनगर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) चा. २००९ मध्ये सुनीलचे वडील अर्जुन एका अपघातामध्ये वारले. उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. सगळ्या बहीण-भावांमध्ये सुनीलच मोठा होता. वडिलांच्या पश्चात काही मदत मिळावी, यासाठी सुनीलने अनेक हेलपाटे मारले, हाल-अपेष्टा सहन केल्या; पण एक फुटकी कवडीदेखील त्याच्या हातावर पडली नाही. सुनीलची आई नागरबाई नेहमी आजारी असते. तिची चार-चार ऑपरेशन झाली आहेत. लहान वयामध्ये सुनीलचं लग्न केलं, ते त्याच्या आईला मदत व्हावी यासाठी! सुनीलला कोवळ्या वयात ना कुठली समज होती, ना कुठली जबाबदारी येईल याचं भान. ‘गावात आसपास असणाऱ्या
भागात पारधी म्हणून जगायचं म्हणजे काही विचारूच नका. कुठंही काही घटना, गुन्हा घडला, तर सगळ्यात आधी पारधी म्हणून आमच्याकडेच शंकेच्या नजरेने बघितलं जायचं. काबाडकष्ट करूनही चार घास सुखाने वाट्याला आलेत, असं कधीच व्हायचं नाही. सतत होणारा त्रास, वाढलेल्या जबाबदाऱ्या, यांतून आता गावात राहणंच नकोसं झालं होतं. वडिलांच्या घटनेनंतर तीन दिवस घरात खाण्यासाठीही दाणा नव्हता. आपल्यावर वाईट वेळ येते, तेव्हा कोणीही मदत करत नाही....’’ सुनील बोलत होता आणि मी ऐकत होतो.
कोणीतरी माणूस आपली विचारपूस करतोय, असं कदाचित सुनीलच्या मुला-बायकोसाठी पहिल्यांदाच घडलं असेल. आपला बाप काय बोलतो, याकडे पोरांचं लक्ष नव्हतं, पोरांचं लक्ष माझ्या बोलण्याकडे होतं. मीही त्या लहान मुलांचं निरीक्षण करीत होतो. ‘आपला बाप असतो, तेव्हा बापाची किंमत कोणाला असते...’ सुनील सांगत होता, ‘बाप काबाडकष्ट करायचा, घर चालवायचा. जेव्हा डोक्यावर बापाचं छप्पर होतं, तेव्हा जगण्याची फिकर नव्हती, बाप होता तेव्हा त्याची कदर नव्हती. आता तो नाही तर वाटतं, डोक्यावर आभाळ नावाचा प्रकारच शिल्लक नाही.’ केवळ सुनीलच नव्हे, तर त्याचे अनुभव बोलत होते.
मी म्हणालो, ‘सुनील, आपण तुझ्या मुलींना शिकवू या, त्यांना चांगल्या शाळेत टाकू या.’ सुनील म्हणाला, ‘माझाही तोच विचार आहे; पण गावाकडे नको आता. तो पारधी - पारधी म्हणून हिणवून मारलेला शिक्का पुन्हा मारून घेण्यात काही अर्थ नाही. माझं लहानपण ऊस तोडणीमध्ये गेलं. जसं कळायला लागलं, तसं अंगावर जबाबदारीचं भलंमोठं ओझं पडलं. आता मुलं मोठी झाल्यावर कळतंय, बाप किती महत्त्वाचा आहे ते. ‘बाप’पणाच्या झळा जोपर्यंत लागत नाहीत, तोपर्यंत आपला बाप काय होता, हे कळत नाही.’ आपल्या वडिलांच्या आठवणींमध्ये पाणावलेले डोळे पुसणारा सुनील आईच्या अंगावर पांघरूण टाकत होता.
मी सुनीलला माझं कार्ड दिलं आणि त्याला म्हणालो, ‘सुनील, बेलापूर स्टेशनच्या बाहेर ‘सकाळ भवन’ असं लिहिलेलं माझं ऑफिस आहे. तुला जेव्हा गरज वाटेल, तेव्हा नक्की ये, किंवा फोन कर.’ मी गाडीत बसायच्या अगोदर सुनील आपल्या हातातली मोरपिसं घेऊन ती विकण्यासाठी या गाडीकडून त्या गाडीकडे असा प्रवास करत होता. त्याला जबाबदारीची जाणीव होती. आता दिवसभर हात-पाय हलवले नाहीत तर रात्री लेकरं, आईला उपाशी झोपावं लागेल, हे त्याला माहिती होतं.
मी गाडीत बसलो. मनात विचार करत होतो, ‘चोरटी जात’ हा शिक्का किती वाईट आहे. ‘त्या’ जातीतल्या एखाद्या माणसाने चोरी जरी केली असेल, तरी त्यात बाकी माणसांचा काय दोष? कालच आम्ही मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला... सुनीलसारखे युवक पाहिल्यावर त्या मुक्तिसंग्रामाला काही अर्थ आहे का, हा प्रश्न पडतो... आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, ‘बाप’ असतो तेव्हा त्याची किंमत वाटत नाही आणि जेव्हा तो नसतो, त्याची जबाबदारी आपल्यावर पडते, तेव्हा किती संकटांना सामोरं जावं लागतं, ते विचारायचं नाही. शिवाय अज्ञान, दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव हे जर पाचवीला पूजलं असेल, तर मग पुढचं न बोललेलंच बरं...!