
मानवतचा कार्यक्रम आटोपून मी सोलापूरकडे निघालो. थोडं पुढे गेल्यावर एक छोटीशी वस्ती लागली. रस्त्याच्या कडेला खळखळ करत पाइपातून पाणी पडत होतं.
उसवलेलं आयुष्य शिवताना...!
मानवतचा कार्यक्रम आटोपून मी सोलापूरकडे निघालो. थोडं पुढे गेल्यावर एक छोटीशी वस्ती लागली. रस्त्याच्या कडेला खळखळ करत पाइपातून पाणी पडत होतं. पाणी संत्र्याच्या बागेला जात होतं. मी गाडी थांबवायला सांगितलं. सूर्यनारायणाची तपस्या जोरकसपणे सुरू झाली होती. मी डोक्यावर रुमाल टाकला आणि त्या पाण्याच्या दिशेने निघालो. तिथं पडणारं पाणी मी ओंजळीत घेऊन सपसप तोंडावर मारलं. ते गोड पाणी कितीही प्यायलो तरी मनाचं समाधान होत नव्हतं. त्या संत्र्याच्या बागेला पाणी देणारे शेतकरी खांद्यावर फावडं घेऊन माझ्या दिशेने येत होते. माझ्या जवळ आल्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘दादा तुमच्या विहिरीचं पाणी खूपच गोड आहे.’’ त्यांनी हसत संत्री तोडत मला खायला दिली.
मी म्हणालो, ‘‘या दिवसांत संत्री?’’
ते शेतकरी म्हणाले, ‘‘अजब संकरित बियाणं आहे. अनेक झाडं अशी आहेत, त्या झाडांना कधीही फळं येतात.’’
मी मध्येच म्हणालो, ‘‘झालं का पाणी देऊन?’’
ते म्हणाले, ‘‘नाही, पलीकडच्या कडेला दोन जनावरं मरून पडली. त्या जनावरांचं कातडं काढणारी मुलं आलीत. ती कातडी काढताना खूप वास सुटला. म्हणून इकडं आलो.’’
मी पुन्हा त्यांना विचारलं, ‘‘कुठली मुलं आहेत ही?’’
ते म्हणाले, ‘‘आमच्याच गावातली आहेत.’’
थोडं पुढे जाऊन मी पाहिलं, तर दोन मुलं दोन मेलेल्या जनावरांची कातडी काढत होती. मी बऱ्याच वेळाने पुन्हा त्या मुलांकडे पाहिलं. त्यांचं कातडी काढणं आता झालं होतं. ती कातडी बॅगांमध्ये भरून ते निघाले होते.
मी त्या शेतकऱ्यांचा निरोप घेत गाडीमध्ये बसलो. ते दोघे जण चालत जात काही अंतरावर गेले होते. मी त्यांच्याजवळ गेलो. गाडी थांबवली. बोलत-बोलत त्यांच्यासोबत चालायला लागलो. मी त्या दोघांनाही म्हणालो, ‘‘ते शेतकरी तुमच्या दोघांचं खूप कौतुक करत होते.’’ आमचं बोलणं सुरू झालं. वाटेने जात असताना त्या कातड्यांचा प्रचंड वास मला येत होता. त्यांना दोघांना तो वास येत नव्हता. मला तो वास प्रचंड सामाजिक विषमतेचा वाटत होता. कुठं ती टाय घालून फिरणारी शहरातली मुलं आणि कुठं ही डोक्यावर कातडं घेऊन, पायात तुटकी चप्पल घालत नशिबाचा भाग म्हणून प्रचंड कष्ट करणारी मुलं! किती सामाजिक तफावत ही!! आम्ही त्या वस्तीमध्ये पोहचलो. माझी गाडी मागून येत होती. ‘‘पाणी मिळेल का प्यायला?’’ असं मी त्या दोघांना विचारलं. दोघांनीही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. माझ्या लक्षात आलं, त्या दोघांना मला त्यांच्या घरी न्यायचं नव्हतं. ‘‘चला, तुमच्या घरीच पाणी पिऊ,’’ म्हणत मी त्यांच्या खांद्यावर हात टाकला. वस्तीच्या कडेला लाकडांच्या भिंती असलेल्या छोट्याशा त्या घराची त्या मुलांनी कडी वाजवली. एका आजोबांनी दरवाजा उघडला. ते माझ्याकडे निरखून बघत होते.
माझ्यासोबत असणारा मुलगा त्या आजोबांना म्हणाला, ‘‘मुंबईचे साहेब आहेत, पाणी प्यायला घरी आलेत.’’ आजोबांना आनंद झाला. आम्ही घरात बसलो. घरात एक लक्ष्मीचा फोटो होता. जशी थोडी वाऱ्याची झुळूक येत होती, तसा तो फोटो जोराने हलायचा. अण्णा भाऊ साठेंच्या फोटोंवर पाण्याचे डागच डाग पडले होते. ते दोन्ही फोटो मला आर्थिक आणि सामाजिक जाणीव करून देत होते. त्या घरात असलेल्या माठातलं पाणी पिऊन मला मनापासून समाधान वाटलं. त्यांच्यासोबत माझ्या गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पांमधून त्यांचं आयुष्य, ते करत असलेलं काम माझ्यासमोर आलं. मी ज्या मुलांशी बोलत होतो, ते रुख्माजी आणि भिवाजी. दोघेजण सख्खे भाऊ. त्या दोघांच्या आजोबांचं नाव केरा मरे. रुख्माजी आणि भिवाजी लहान असतानाच त्यांची आई साप चावल्याने वारली. वडील आजारी होते, त्या आजारात ते वारले. आजोबांनी या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. परंपरेने चालत आलेलं कातडं काढायचं काम. लोकांच्या घरी जाऊन अन्न मागायचं, त्यावर आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा, हे काम ही दोन्ही मुलं करतात. रुख्माजी आता अकरावीला आहे, भिवाजी बी.ए. प्रथम वर्षाला शिकतोय. आसपासच्या अनेक गावांमध्ये जनावर मेल्यावर यांच्याकडे निरोप येतो. मग हे त्या गावात जातात, त्या जनावराला गावापासून दूर आणतात, तिथं त्याचं कातडं काढतात. कातडं काढल्यावर त्यावर मिठाचं पाणी टाकायचं, ओल्या बाभळीची साल काढून त्या कातड्यावर घासायची, बाभळीच्या शेंगांचं कूट तयार करायचं, त्याचा लेप त्या कातड्यावर लावायचा, त्यातून त्या कातड्याचा रंग तांबूस होतो. त्या कातड्याला वाळवायचं आणि बाजारात नेऊन ते विकायचं. त्यापासून ढोलकी, मृदंग, चपला, जोडे तयार होतात.
त्या छोट्याशा घरामध्ये इतर वस्तू कमी आणि वाळवत ठेवलेली कातडी जास्त दिसत होती. मी त्या आजोबांना म्हणालो, ‘‘तुम्ही काय व्यवसाय करायचात?’’
आजोबा म्हणाले, ‘‘माझ्या आजोबांपासून आमच्या खानदानीमध्ये कातडी काढण्याचा व्यवसाय आहे. माझ्या मुलाने तेच केलं, आता नातूही तेच करत आहेत. आता हा व्यवसाय जवळजवळ बंद झालाय. आमच्या आसपास कोणी कातडी काढणारे नाहीतच. म्हणून माझ्या नातवांना महिन्यातून चार ठिकाणी तरी बोलावणं येतं. आता जनावरं कापण्यासाठी थेट मशिनचा वापर होतो. श्रद्धा आहे, म्हणून लोक जनावरं शेतामध्ये पुरतात. जेसीबीच्या माध्यमातून खड्डा खोदायचा, जनावराला त्यामध्ये टाकायचं. ज्या कातड्यावर अनेकांच्या पोटाची खळगी भरते, ते गणितच कुणाला माहीत नाही. आत्ताची पिढी तर सोडून द्या. मी पिकलं पान आहे, केव्हाही गळून पडेन. म्हणूनच माझे नातू माझ्याजवळ आहेत, त्यांनाही आता शहराकडे जाण्याचे वेध लागले आहेत.’’
मी आजोबांना मध्येच म्हणालो, ‘‘तुमच्या नातवांचं बरोबर आहे. कशाला हे प्रतिष्ठा नसलेलं काम करायचं?’’ आजोबा हसले आणि म्हणाले, ‘‘अहो, आपली संस्कृती आहे. हे काम आपण नाही करायचं तर कोणी करायचं? धर्म, परंपरा, कामाची विभागणी कशाला केली गेली होती? काय होता तो जमाना, गावातला कर्ताधर्ता माणूस, श्रीमंत असणारा माणूस, पाटील, देशमुख असणारा माणूस, गावातल्या प्रत्येक गरिबाची काळजी घ्यायचा. आता कुठं उरलंय ते माणूसपण?’’ आजोबा एकेक करून त्यांच्या काळामधील अनेक माणुसकीचे किस्से मला सांगत होते. नातवांना आजोबांचं ऐकण्यामध्ये रुची नव्हती, हे मला जाणवत होतं. आजोबा म्हणाले, ‘‘‘बलुतं’ संपलं, ‘यसकरकी’ संपली. आपल्या गावातल्या छोट्या छोट्या माणसांची कदर करत त्यांची जपणूक करणं संपलं. थोडी शिल्लक असलेली माणुसकी कधी संपू नये, एवढंच मागणं निसर्गाकडे आहे.’’
आमचं बोलणं सुरू असताना मध्येच दरवाजा वाजतो. दरवाजा उघडल्यावर समोर असणाऱ्या मुलांकडे बघून आजोबांचा चेहरा एकदम संतापाने लाल होतो. ‘‘आले का परत? चालते व्हा इथून,’’ असं म्हणत आजोबा त्या मुलांवर चिडतात. ती मुलं निघून जातात. मी त्या आजोबांना विचारलं, ‘‘कोण होती ती मुलं?’’
आजोबा म्हणाले, ‘‘काम धंदा करत नाहीत. आई-वडिलांनी खूप कमावून ठेवलंय, त्यांच्या जिवावर उड्या मारतात. ‘झुंड’च्या ‘झुंड’ने एकत्रित येतात. रस्त्याने जाणाऱ्या माणसांना अडवायचं, वर्गणी गोळा करायची. त्या वर्गणीच्या पैशांतून दारू ढोसायची.’’ आजोबांचा संताप बघून दोन्ही नातू एकदम शांत होते.
आजोबा म्हणतात ते खरं होतं. रबरामुळे कातडी कमावणाऱ्या कष्टकऱ्यांची जमात संपुष्टात आली. ‘लीडकॉम’वर सहकाराची सावली पडली. ‘लीडकॉम’मुळे कातड्याला मिळणारी थोडीशी ‘झळाळी’ कोळशासारखी होऊन बसली.
ते दोन्ही नातू मला सांगत होते, ‘‘आमच्याकडे हे काम करताना दर्जाहीन म्हणून बघितलं जातं. आम्हाला मित्र नाहीत. आमच्याशी कॉलेजमध्ये कोणी फारसं बोलत नाही. आम्ही जे काम करतो, त्या कामातून तयार झालेल्या कातड्याला चांगला भाव मिळेल, असं अजिबात नाही.’’ त्या दोघांची आपल्या कामाप्रती तळमळ, आपल्या आजोबांवर असलेलं त्यांचं प्रेम, शिक्षणाप्रती असलेली रुची मला कमालीची जाणवत होती. ‘‘आमच्या आजोबांनी आम्हाला शिकवलं, आपलं काम अभिमानाने करायचं.’’
मी त्या दोघांच्याही वह्या पाहत होतो. सुंदर अक्षर. सगळ्या विषयांत चांगले मार्क. या दोघांचं आयुष्य म्हणजे, एकीकडे मेलेल्या जनावराचं कातडं काढायचं आणि दुसरीकडे आपलं उसवलेलं आयुष्य सतत शिवत राहायचं असं होतं.मी त्या तिघांचाही निरोप घेऊन माझ्या गाडीच्या दिशेने निघालो. ती दोन्ही मुलं माझ्यासोबत होती. मी दोघांच्याही खांद्यावर हात टाकला. गावात असणारी माणसं त्या दोघांच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघत होती. मी विचारांमध्ये दंग होतो आणि ते दोघेही अभिमानाने छाती पुढं काढून चालत होते. त्या दोघांनाही मी घट्ट मिठी मारून त्यांच्या कष्टाचा सुगंध माझ्या मनाला लावून घेतला. मी तिथून निघालो. एक, आपल्या आजोबांचा चालत आलेला व्यवसाय करायचा आहे. दुसरं, पोटाची खळगी भरायची. उराशी अजून खूप स्वप्नं आहेत, त्या स्वप्नांना फुलवायचं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही दोन मुलं धडपड करत होती. आजोबा आजोबांच्या ठिकाणी होते आणि नातू नातवांच्या ठिकाणी होते. त्या तिघांच्या वाटा वेगळ्या होत्या; पण विचार मात्र एकच होता. तो विचार म्हणजे माणुसकीचा, स्वाभिमानाचा, सन्मानाचा. दारिद्र्याची ठिगळं खूप होती. एखाद्या जनावराचं सोडा, कपाळाचं कातडं लावलं तरी दारिद्र्य कधीही झाकणारं नव्हतं; मात्र त्यांनी प्रयत्न आणि परंपरा सोडली नव्हती.
Web Title: Sandip Kale Writes Pjp78
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..