‘भाग्ययोगा’ची दीक्षा...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Puri

मी परवा सांगलीत होतो. सकाळी सकाळी मला एक फोन आला. ‘नमस्कार दादा, मी संगीता जाधव, सातारा येथून बोलते. मी तुमचं पेपरमधील लिखाण, अनेक पुस्तकं वाचली आहेत.

‘भाग्ययोगा’ची दीक्षा...!

मी परवा सांगलीत होतो. सकाळी सकाळी मला एक फोन आला. ‘नमस्कार दादा, मी संगीता जाधव, सातारा येथून बोलते. मी तुमचं पेपरमधील लिखाण, अनेक पुस्तकं वाचली आहेत. तुमचं मला आवडणारं पुस्तक ‘ट्वेल्थ फेल’. यावर चित्रपट येतोय म्हणून तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी फोन केला.’ मी म्हणालो, ‘आभारी आहे.’ तिच्या बोलण्यातून तिच्याविषयीचे अनेक पैलू मला ती सांगत होती. तिचा विषय गंभीर असल्यामुळे मलाही ते ऐकावंसं वाटत होतं. ‘‘मी दोन दिवसांनी साताऱ्यात आहे, भेटू या,’ असं म्हणत मी फोन ठेवला. मी साताऱ्यात गेलो. संगीताने मला तिच्या घरी नेलं. छोट्या, मोडक्यातोडक्या घरात ती रहात होती.

संगीता मूळची परभणीची. तिचे वडील आजारात गेले. तिच्या तीन बहिणी, आजारी आई घेऊन संगीता तिच्या आईच्या वडिलांकडे साताऱ्याला राहते. खूप वेळ बोलल्यावर त्या कुटुंबाची माहिती माझ्यासमोर आली. संगीताचे वडील ड्रायव्हर होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. या कुटुंबाला कुणाचाही आधार नव्हता. आईच्या सततच्या आजारामुळे या कुटुंबाला काय करावं कळत नव्हतं. एका नातेवाइकाकडून संगीताला सामाजिक कार्य करणाऱ्या एका तरुणाची माहिती मिळाली. आज संगीता, सर्व बहिणींचं शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह यासाठी लागणारा खर्च तो तरुण देतो. त्या तरुणाबाबत संगीता आणि तिच्या बहिणींकडून मी खूप किस्से ऐकले. संगीताची आई डोळ्यांत आलेले अश्रू पुसत सांगत होती, ‘‘तो तरुण देवासारखा धावून आला, त्यामुळे आमचं कुटुंब सावरलं.’’

मला, संगीता ज्या मदत करणाऱ्या तरुणाविषयी सांगत होती, त्यांचं नाव डॉ. धर्मवीर योगिराज भारती (९५४५५५११११), ते मूळचे परळीमधल्या विद्यानगरचे. लातूरलाही त्यांचं घर आहे. सामाजिक, व्यावसायिक कामानिमित्ताने त्यांचं राज्यभर भ्रमण सुरू असतं. लातूर, औरंगाबादसह पुण्यातही त्यांचं एफसी रोड या भागात कार्यालय आहे, जिथून त्यांचं सामाजिक काम चालतं.

संगीता आणि तिच्या कुटुंबीयांवर जी वेळ आली ती कुणावरही येऊ नये; पण त्या परिस्थतीत धर्मवीर भारती धावून आले आणि वाईटपणाच्या खाईमध्ये चाललेलं त्यांचं आयुष्य सावरलं. संगीताने माझं आणि धर्मवीर यांचं दूरध्वनीवरून बोलणं करून दिलं. तुम्हाला भेटायचंय, अशी विनंती मी धर्मवीर यांना केली, त्यांनीही भेटीसाठी होकार दिला. मी मराठवाडा दौऱ्यावर असताना परळी इथं धर्मवीर यांना भेटायला गेलो. धर्मवीर यांची भेट झाली. धर्मवीर यांचा एकूण प्रवास आणि त्यांनी लोकांना काही तरी देण्यासाठी घेतलेला जन्म, सारं काही अद्‍भुत आणि आगळंवेगळं होतं.

धर्मवीर यांचे वडील योगिराज दत्तात्रेय भारती आणि आई भागीरथी यांच्याकडून मी जेव्हा धर्मवीर यांचा सारा प्रवास ऐकून घेतला तेव्हा वाटलं, यांचा जन्म लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठीच झाला असला पाहिजे. धर्मवीर यांची स्टोरी एखाद्या चित्रपटासारखी होती. धर्मवीर यांच्या घरी, त्यांच्या मामाच्या परभणी जिल्ह्यातील बाभळगाव इथं भिक्षा मागून गुरुधर्म पाळायची प्रथा होती, आजही कायम आहे. दोन्ही कुटुंबीयांना गुरू म्हणून मानणारा मोठा वर्ग आहे.

‘माझ्या कुटुंबाने नेहमी देण्याची भूमिका घेतली. अवघा गाव आमच्या घरापुढे नतमस्तक व्हायचा. माझे आजोबा शिक्षक होते, माझे पहिले गुरू तेच होते. आपण या समाजाचे गुरू आहोत, गुरूची जबाबदारी दुःखितांचे अश्रू पुसण्याची आहे. आपल्याकडे काही ठेवायचं नाही, सर्व लोकांना देऊन टाकायचं. पाच घरी भिक्षा मागायची, मिळेल ते खायचं.

आपलं काम पीडितांना मदत करणं एवढंच असेल. आपण कितीही मोठं झालो, तरी आपला धर्म आपण सोडायचा नाही. जिथं अश्रू असतील, तिथं आपल्या गुरुपणाचा ठसा उमटवायचा. आपल्याकडे जे काही येतं ते लोकांना देण्यासाठी आहे, ही आजोबा व आई-वडिलांची शिकवण कायम मनात होती. मी शिकलो, इंजिनिअर झालो, मोठा झालो, चार पैसे आले, त्यातून पीडित लोकांना मदत केली. मी लातूरला आलो तेव्हा पायात एक स्लीपर होती. घराचं भाडं भरलं नव्हतं म्हणून घरमालकाने मला घराबाहेर काढलं. ती रात्र मी माझ्या कुटुंबीयांसह कशी काढली असेल आता कसं सांगू!’ धर्मवीर आयुष्यात आलेले खाचखळगे मला सांगत होते आणि मी ऐकत होतो.

धर्मवीर केवळ एका गोसावी समाजाचे तारणहार नाही झाले, तर राज्यातल्या त्या दुःखितांचे ते तारणहार, मदतगार झाले, ज्यांना मदतीची गरज आहे; ज्यांचं शिक्षण, लग्न थांबलं आहे, ज्यांच्या घरी चूल पेटत नाही, ज्यांना मोठ्या आजाराने ग्रासलं आहे... अशांना मदत करण्यासाठी धर्मवीर यांनी ‘निश्चल पुरी फाउंडेशन’ची सुरुवात केली. मागच्या पाच वर्षांत २२ हजार मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या अनेक तरुण-तरुणींचं पालकत्व धर्मवीर यांनी स्वीकारलं.

बोलता बोलता एक विषय पुढे आला तो म्हणजे ‘निश्चल पुरी’ फाउंडेशनचे ‘निश्चल पुरी’ हे कोण आहेत? त्यांनी हेच नाव का दिलं? धर्मवीर मला सांगत होते, ‘‘निश्चल पुरी यांनी २४ सप्टेंबर १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा अभिषेक केला. म्हणून निश्चल पुरी हे नाव ठरलं. दरवर्षी २४ सप्टेंबरला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा अभिषेक फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून केला जातो.धर्मवीर, त्यांचे आई-वडील, निश्चल पुरी फाउंडेशनचे सचिव अनिल पुरी (८९०८४९११११) आणि आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारत होतो. धर्मवीर यांच्या पत्नी सुरेखा आणि मुलं श्रुती, श्रेयस शालेय मुलांना देण्याची किट तयार करत होते. एका बॅगेत वही, पेन, पुस्तक आणि अन्य साहित्य टाकण्याचं काम सुरू होतं. दरवर्षी धर्मवीर यांच्या आईच्या वाढदिवशी श्रुती, श्रेयस अनेक मागास वस्त्यांमध्ये जाऊन या शालेय साहित्याचं वाटप करीत असतात.

धर्मवीर यांच्या घरी, नातेवाइकांत भिक्षा मागण्याची प्रथा आजही आहे. ‘मागतात ती भिक्षा आणि देतात ती दीक्षा.’ समाजाच्या उन्नतीसाठी ही ‘दीक्षा’ देण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावर धर्मवीर आणि त्यांची टीम, त्यांचं फाउंडेशन मोठ्या प्रमाणावर करीत होतं. मागेल त्याला मदत आणि गरजू असल्याचा शोध घेऊन त्याला सतत होणारी मदत, असं काम इथं घडत होतं. धर्मवीर यांच्या आई-वडिलांच्या पायांवर डोकं ठेवत मी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मी परतीच्या प्रवासाला निघालो. माझ्या मनात विचार चालला होता, काही संस्कार जिन्समधून येतात; आई-वडील, आजोबा यांच्याकडून येतात. आपला जन्म इतरांना देण्यासाठी झाला आहे, हा विचार मनात घेऊन जो काम करतो, तो खरा ‘धर्मवीर’, धर्माचं रक्षण करणारा असतो. त्यांच्या आयुष्याचा सुगंध सर्व ठिकाणी पसरतोय. ज्यांना माणुसकी राखता येते, तोच खरा धर्म, हेच धर्मवीर यांनी त्यांच्या कामातून सांगितलं आहे. चला तर मग, आपण सारेही धर्मवीर होऊ या.

टॅग्स :Sandip Kalesaptarang