
मुंबईवरून मी सोलापूरला निघालो. सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये रिझर्व्हेशनच्या डब्यातही गर्दी होती. कल्याण गेल्यावर आजूबाजूला बसलेल्या माणसांचे चेहरे मला दिसायला लागले.
वारसा सेवेचा-संस्काराचा !
मुंबईवरून मी सोलापूरला निघालो. सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये रिझर्व्हेशनच्या डब्यातही गर्दी होती. कल्याण गेल्यावर आजूबाजूला बसलेल्या माणसांचे चेहरे मला दिसायला लागले. माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीनं फुटबॉल, बॅट-बॉल असं खेळण्याचं भरपूर साहित्य सोबत घेतलं होतं. मी अंदाज बांधला, या व्यक्तीचं खेळाच्या साहित्याचं दुकान असावं. मला खाली पाय सोडता येईना. माझ्या मनाची घालमेल झालेली पाहून ते गृहस्थ मला म्हणाले, ‘‘माफ करा; माझ्या सामानामुळे तुम्हाला त्रास होतोय.’’ त्या व्यक्तीच्या नम्र आवाजाने माझ्या चेहऱ्यावर एकदम चमक आली. तसं प्रवास करताना अशा नम्र व्यक्ती फार कमी भेटतात. मी त्या व्यक्तीला म्हणालो, ‘‘नाही हो, ठीक आहे. तुमचं खेळाचं साहित्य विकण्याचा व्यवसाय दिसतोय! ’’ ते नाही म्हणाले.
मी म्हणालो, ‘मग हे एवढं सामान?’ त्या व्यक्तीने मला सांगितलं, ‘माझ्या शाळा आहेत आणि तिथं निवासी असणाऱ्या मुलांसाठी मी हे खेळाचं साहित्य नेत आहे.’ आमच्या गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला मोजकंच बोलणारे ते गृहस्थ नंतर मात्र चांगलेच खुलले. मी जेवणाचा डबा आणला होता, तोही आम्ही खाल्ला. गप्पांमध्ये रात्रीचे दोन कधी वाजले हे कळलं नाही. मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो, त्यांचं नाव सचिन मोहन चव्हाण ( ९९२१५६७७७७). सचिन हे व्यवस्थापनशास्त्रामध्ये उच्चशिक्षित आहेत. बंगलोरमध्ये मोठ्या पदावर असणाऱ्या सचिन यांनी नोकरी सोडून समाजसेवेचा मार्ग स्वीकारला. त्यांचे आजोबा दलितमित्र चंद्राम चव्हाण यांनी उभ्या केलेल्या मागास समाज सेवा मंडळाच्या अनेक शाळा, कॉलेज ते चालवतात. या शाळेत शिकणारे हे सारे विद्यार्थी मागास समाज, मागास भागातील आहेत. तुकडोजी महाराज यांच्यासोबत अनेक महिने भारत भ्रमण केल्यावर सचिन यांचे आजोबा चंद्राम यांनी ज्येष्ठ नेते वसंतराव नाईक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आग्रहाखातर १९५८ मध्ये सोलापूर आणि परिसरातील गरीब, गरजू, वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केली. सुरुवातीला आठ विद्यार्थी होते, त्यांना आजीच स्वयंपाक करून घालायच्या. शिकवण्यासाठी शिक्षक भेटायचे नाहीत. समाज टिंगल-टवाळी करायचा. सचिन त्यांच्या आजी रुक्मिणी, आजोबा चंद्राम यांनी सांगितलेले अनेक किस्से मला रेल्वेत सांगत होते. ‘पहिल्या आठमधल्या तुकडीचे जी. के. पवार हे आय.पी.एस. झाले, उर्वरित सात जण प्रोफेसर. आजी आणि आजोबा कमालीचे शिस्तबद्ध होते. आजोबांनी हळूहळू करत माझे वडील मोहन यांच्याकडे संस्थेचं काम सुपूर्त करायला सुरुवात केली. मी शिक्षणाच्या निमित्ताने आमच्याच आश्रमशाळेत शिक्षण घेऊन बाहेर गेलो. सुटीमध्ये मी जेव्हा घरी यायचो, तेव्हा आजोबा वसतिगृहात मुलांमध्येच असायचे. आमचा खूप मोठा परिवार, त्या सर्वांमध्ये आजोबांचा माझ्यावर फार जीव होता. आजोबा मरण पावले, त्याच्या काही दिवस अगोदर त्यांनी मला बंगलोरहून घरी बोलावलं.
माझा हात हातामध्ये घेऊन ते म्हणाले, ‘बाळा, ही आपली संस्था मी लहान मुलाप्रमाणे वाढवली.’ तुकडोजी महाराज, वसंतराव नाईक यांनी मला ही संस्था म्हणजे समाजपरिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे, तू खूप कष्ट घे, असं सांगितलं होतं. मी ते केलंही. आता माझे निरोप घेण्याचे दिवस जवळ आले आहेत. या माझ्या संस्थेला आता तू सांभाळावं. तुझ्याकडे सेवाभावी दृष्टी आहे. आजोबा मला हे सर्व सांगताना, माझ्याकडे सर्व सुपूर्द करताना एकीकडे आजोबांची छाती अभिमानाने भरली होती आणि दुसरीकडे डोळेही भरले होते.’’
सचिन माझ्याशी हे बोलताना भावुक झाले होते. मी त्यांचा हात माझ्या हातात धरत, स्वतःला सावरा अशी विनंती त्यांना केली. शुभ रात्री म्हणत आम्ही एकमेकांचा झोपण्यासाठी निरोप घेतला. मी विचार करत होतो, आपला समाज सुधारला पाहिजे, यासाठी अनेक माणसं आयुष्यभर खस्ता खातात. बंजारा समाजासह वाडी, तांड्यावर राहणारा मोठा समाज आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहतोय, त्याला चंद्राम, सचिन यांच्यासारखी माणसं कारणीभूत आहेत. मी सचिनकडे पाहत होतो, आपल्या आजोबांच्या आठवणींत बुडालेल्या सचिनची झोप उडाली होती. विचारात कधी झोप लागली कळालं नाही.
सकाळी सचिन यांचा आवाज आला. ते म्हणाले, ‘‘चला आलं सोलापूर.’’ आम्ही ट्रेनच्या बाहेर पाय ठेवला, तोच चार-पाच मुलं सचिन यांच्या दिशेने पळत आली. त्यांनी सचिन यांना मिठी मारली. त्या मुलांच्या सोबत असणाऱ्या माणसांनी ते सामान उचललं. सचिन म्हणाले, ‘‘तुमचं सोलापूरला येणं फार कमी होतं. चला आमची संस्था बघायला.’’ मीही सचिनला होकार दिला. सोलापूर स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या सलगर वस्तीमधल्या शाळेत आम्ही गेलो. आमच्या गाडीचा आवाज आला, तशी मुलं पळत आमच्याकडे आली. काही क्षणांत गाडीतलं खेळाचं साहित्य मुलांनी घेतलं. ते खेळायला ग्राउंडवर गेलेही. साधेपणाला आपलेपणाची झालर लागलेली असावी, अशी ती शाळा होती. आम्ही किचनमध्ये गेलो. स्वयंपाक करणाऱ्या एका महिलेची ओळख करून देताना सचिन म्हणाले, ‘‘ही माझी आई निर्मला, माझी आजी रुक्मिणी यांचा वारसा चालवणारी अन्नपूर्णा.’ मी सचिन यांच्या आईच्या पायावर डोकं ठेवलं. माझ्या डोक्यावरून हात फिरवत आईने आपल्या कपाळावर नेऊन कडकड बोटं मोडली. ‘बाप रे! किती प्रेम करतात ही माणसं,’ असा विचार माझ्या मनात आला. आम्ही शाळा फिरलो, ग्राउंडवर गेलो, ग्रंथालयात गेलो. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत मिळवलेलं सर्व प्रावीण्य मी पाहत होतो. इतक्या सकाळी आपल्या पोशाखात वर्गावर शिकवण्यात दंग असणारे शिक्षक भान हरपून शिकवत होते. आम्ही एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जात होतो. सचिन यांना फोन आला. सचिन फोनवर बोलायला बाजूला गेले.
झाडाखाली एक मुलगी महात्मा गांधींचं ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक वाचत बसली होती. मी जवळ जाताच ती मुलगी सावरली. मी त्या मुलीला म्हणालो, ‘अरे वा, तुम्ही गांधी वाचताय.’ तिने मान हलवून होकार दिला. ती बोलायला घाबरत होती. मी सचिन यांच्याकडे बोट दाखवत, मी त्यांचा मित्र आहे, असं सांगितल्यावर ती मुलगी बोलायला लागली. रूपाली कांबळे असं त्या मुलीचं नाव. आई-वडील नसलेल्या रूपालीला तिच्या मामाने वाढवलं. रूपालीच्या सहा वर्षांनंतर तिला इथं वसतिगृहात प्रवेश दिला. तिला इथं दहा वर्षं झाली. रूपालीचं ‘मेरिट’ कधी हुकलं नाही. रोज किमान चार तास वाचन अशी सवय रूपालीला लागली होती. आपली लाल दिव्याची गाडी आपल्या वसतिगृहासमोर लावायची, असं स्वप्न रूपालीने उराशी बाळगलं आहे. सचिन आमच्याजवळ येताच रूपाली दादा म्हणत सचिनच्या पाया पडते. सचिन रूपालीबद्दल भरभरून बोलले आणि रूपाली सचिनबद्दल.
सकाळपासून मी जितक्या जणांना भेटलो, तो प्रत्येक जण मला भरभरून सकारात्मक बोलत होता. त्यांच्या बोलण्यात प्रचंड ऊर्जा होती. ‘ही संस्था नाही, माझं घर आहे’ हे रूपालीचं वाक्य माझ्या कानाभोवती घुमत होतं. मी ज्या-ज्या मुलांना भेटलो, त्या प्रत्येक मुलाच्या कुटुंबाला गरिबीची प्रचंड मोठी वाळवी लागली होती. कुणाला आई नाही, कुणाला बाबा नाहीत, कुणाला कुणीच नाही. कुणाच्या घरातून पहिल्यांदा कुणीतरी शाळेची पायरी चढली आहे, कुणाची सावत्र आई, असं चित्र. राठोड, चव्हाण, पाटील, देशमुख, जोशी आणि कुलकर्णीही अशा सर्व जाती-धर्मांची मुलं या संस्थेत शिकत होती. अवघं चव्हाण कुटुंब आजोबा चंद्राम यांचा सेवाभावी वारसा चालवण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावत होतं. नऊ आश्रमशाळा, अनेक कॉलेज, सैनिकी शाळा, असा खूप मोठा शैक्षणिक वटवृक्ष मागास समाजसेवा मंडळाचा झाला आहे.
आजोबा चंद्राम यांचा शिक्षणातून जपलेला सेवाभावाचा वारसा त्यांचे नातू सचिन चालवत आहेत. दर वर्षी किमान तीन हजार मुलं या संस्थेतून बाहेर पडतात आणि अभिमानाने, आपल्या हक्काच्या वारशाला पुढे नेतात. सचिन मला सांगत होते, ‘महाराष्ट्र आश्रमशाळा संस्थाचालक संघाचा मी राज्य उपाध्यक्ष आहे. शासनाकडून मिळणाऱ्या पैशांमधून इथं काही होत नाही. थोडीही फी भरण्याची अवस्था पालकाची नसते. आपल्याला या गरीब, वंचित मुलांना वाऱ्यावर सोडून चालत नाही. आम्ही चार पैसे वाढवून मिळावेत, यासाठी खूप पत्रव्यवहार केला; पण या मुलांच्या भवितव्याकडे शासन गांभीर्याने पाहतच नाही. आम्ही आमचा लढा सुरूच ठेवला आहे. माझे आजोबा वरून या कामाकडे पाहत असतील, शाळेच्या विकासाकडे पाहत असतील, तेव्हा त्यांनाही मी चालवत असलेल्या वारशाचा नक्की अभिमान वाटत असेल.’
मी सचिन यांना कडाडून मिठी मारली. मी माझ्या प्रवासाला लागलो. सचिन मला गेटपर्यंत सोडायला आले. त्यांच्यासोबत मुलं, शिक्षकपण होते. प्रत्येकाच्या डोळ्यांत आपलेपणा होता. मला त्यांच्या डोळ्यांमध्ये चंद्राम आजोबा यांचे संस्कार दिसत होते.