प्रतिक्रांती रोखण्यासाठी...!

महिन्यातून एकदा तरी माझे नांदेडला जाणे होते. माझ्या ‘ऑल इज वेल’ या पुस्तकामुळे माझी आई एकदम सेलिब्रिटी झाली. ‘ऑल इज वेल’ पुस्तकामुळे आईला भेटण्यासाठी पाटनूरला अलीकडे अनेक जण येत असतात.
Deepak Kadam
Deepak KadamSakal
Summary

महिन्यातून एकदा तरी माझे नांदेडला जाणे होते. माझ्या ‘ऑल इज वेल’ या पुस्तकामुळे माझी आई एकदम सेलिब्रिटी झाली. ‘ऑल इज वेल’ पुस्तकामुळे आईला भेटण्यासाठी पाटनूरला अलीकडे अनेक जण येत असतात.

महिन्यातून एकदा तरी माझे नांदेडला जाणे होते. माझ्या ‘ऑल इज वेल’ या पुस्तकामुळे माझी आई एकदम सेलिब्रिटी झाली. ‘ऑल इज वेल’ पुस्तकामुळे आईला भेटण्यासाठी पाटनूरला अलीकडे अनेक जण येत असतात. पुण्यावरून राजू आणि मनोज हे माझे दोन मित्र आईला भेटण्यासाठी पाटनूरला येणार होते. मीही पाटनूरला पोहोचलो. मित्र आईला भेटून गेले. मला रमेश चिते दाजींचा फोन आला. म्हणाले, ‘दाजी एका मित्राने सिडकोच्या जवळ शेतीमध्ये खूप छान प्रयोग केले आहेत.

आपल्याला तिकडे जायचं आहे.’ मीही होकार दिला. मी आणि गजानन मोरे नांदेड सिडकोच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉर्नरला चिते दाजी यांची वाट पाहत बसलो होतो. गाडीतून माझं लक्ष सहज बाहेर लावलेल्या बोर्डकडे गेलं. बाहेरच्या बोर्डवर लिहिलं होतं, ‘आंबेडकरवादी मिशन. आंबेडकर विचारातील संस्थात्मक चळवळ. युवकांनो, तुम्ही सहभागी व्हा, या देशाला सक्षम बनवा!’

मी माझ्यासोबत असणाऱ्या मोरे यांना विचारलं, ‘आंबेडकरवादी मिशन काय आहे?’ मोरे म्हणाले, ‘अहो, खूप मोठं काम आहे. बहुजन समाजातली, गरिबांची शेकडो मुलं दीपक कदम नावाच्या एका विचारवंत व्यक्तीने क्लास वन, क्लास टूमध्ये आणली. कुठलीही फी न घेता हे मिशन चालतं.’ आपण नांदेडचे असून आपल्याला एवढं मोठं काम माहिती नाही, याचं मला वाईट वाटलं. आम्ही दोघंही त्या मिशनच्या दिशेने निघालो. ते मिशनचं ऑफिस एखाद्या चळवळीचं केंद्र वाटत होतं.

ऑफिसमध्ये बाबासाहेब, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वैचारिक कोट, चारी बाजूने पुस्तकंच पुस्तकं, ग्रंथालय, अभ्यासिका, मुला-मुलींची राहण्याची व्यवस्था... एकीकडे वर्ग सुरू होते. ते सारं मी बारकाईने पाहत होतो. मोरे यांनी काही मुलांशी माझी ओळख करून दिली. त्या मुलांशी मी बोलत होतो. त्यांनी दिलेली माहिती ऐकून मला आश्चर्य वाटत होतं. सर्व जाती-धर्मांची मुलं तिथं होती. कुणाला आई नाही, कुणाला वडील नाहीत, कुणाला कुणीच नाही, कुणाकडे प्रचंड गरिबीशिवाय काहीच नाही. अशा कित्येकांना या मिशनने एक वाट दाखवली आहे. अनेक जण इथं शिक्षण घेऊन आयपीएस, आयएएस होऊन लोकांच्या आयुष्यात आपल्या लाल दिव्याने प्रकाश टाकत आहेत. कार्यालयामध्ये असणाऱ्या व्यवस्थापक, विद्यार्थी या सर्वांशी बोलत-बोलत मी सर्व माहिती काढत होतो. रात्रीच्या जेवणाची लगबग सुरू होती. व्यवस्थापक सर्व मुलांना दबक्या आवाजात सांगत होते, ‘आज जेवायला वरणभातच आहे.’ माझे कान त्यांच्या बोलण्याकडे होते.

‘जिथं बाबासाहेब, शाहू महाराज यांचे विचार प्रत्यक्ष रुजवण्याचं काम होतं, तिथंही मदत मिळत नाही? बाप रे, किती ही समाजाची अनास्था!’ मी विचारात गुंग झालो होतो. तितक्यात चिते दाजींचा मला फोन आला, तेही आले. चिते दाजी यांनी त्या मिशनचे प्रमुख असणारे कदम यांना फोन करून बोलावून घेतलं.

आम्ही कदम यांच्या ऑफिसमध्ये बसलो. हे मिशन सुरू करण्यापासून ते आतापर्यंतचा सर्व प्रवास मी कदम यांच्याकडून समजून घेतला. कदम हे ध्येयवेडे होते. ते तहसीलदार होते. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सामाजिक व्यवस्थेने त्यांना व्यथित केलं होतं. तहसीलदार असताना त्यांनी अनेक गरिबांची, बहुजनांची मुलं शिकवली, अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लावली. आपण हेच काम पूर्णवेळ करायचं, या भावनेतून कदम यांनी आपली नोकरी सोडून आंबेडकरवादी मिशनची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. आपल्या काही समविचारी मित्रांना घेऊन त्यांनी एक मीटिंग बोलावली. पुढे अनेक दिवस गेले; पण कुणी संस्था सुरू करण्यासाठी, निधी जमा करण्यासाठी पुढाकार घेईना. कदम यांनी धीर सोडला नाही. शेवटी निधीची व्यवस्था झालीच नाही. कदम यांची बहीण करुणा रामदास तारू यांनी आपल्याजवळ जे काही होतं ते विकलं आणि कदम यांना संस्थेसाठी जागा घेऊन दिली. २००१ मध्ये १ जानेवारीला आंबेडकरवादी मिशनची सुरुवात झाली. १ जानेवारीला महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली होती. भीमा कोरेगावचा विजय दिवस याच मुहूर्तावर सुरू झालेल्या या

मिशनमध्ये सुरुवातीला दहा मुलं होती, आता तीनशे मुलांची बॅच महिनाभरात फुल्ल होते. विज्ञानवादी विचारांची कास धरून मिशनच्या कामामध्ये कदम यांनी पूर्णपणे स्वतःला वाहून घेतलं. लग्न केल्यामुळे कामात व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे कदम यांनी लग्नही केलं नाही.

कदम यांच्याशी चर्चा करीत असताना ते अनेक विषय माझ्यासमोर मांडत होते. नांदेडच्या मिशननंतर दिल्लीला दोन संस्था सुरू केल्या; पण कोरोनामुळे त्या दोन्ही शाखा बंद कराव्या लागल्या. चांगल्या कामासाठी लोक सढळ हाताने मदत करीत नाहीत. यशस्वी झालेले विद्यार्थी थोडीबहुत मदत करतात तेवढीच. मी कदम यांना बोलताना मध्येच थांबवलं. मी म्हणालो, ‘आता रात्री जेवणाचीही व्यवस्था नाही, अशी स्थिती आहे का?’ कदम थोडे शांत होऊन म्हणाले, ‘अशी स्थिती अनेक वेळा येते. आम्ही खचत नाही. दोन दिवसांत काही तरी मार्ग निघतोच. लोक अनाथाश्रम, मंदिर या ठिकाणी मोठी मदत करतात; पण जिथं साक्षात भविष्य निर्माण होणार आहे, तिथं मदत होत नाही.’ आम्ही बोलताना चिते दाजी मध्येच म्हणाले, ‘बहुजन माणसाची ही मानसिकतासुद्धा आहे. एकदा एका ठिकाणी दान केल्यावर परत त्या ठिकाणी दान करत नाहीत.’’

मी कदम (८८८८९८०२१३) यांना म्हणालो, ‘तुम्हाला का वाटलं, की आपण अधिकारी घडवले पाहिजेत?’ कदम म्हणाले, ‘प्रतिक्रांती रोखण्यासाठी क्रांतीचा मार्ग तयार करावा लागेलच. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, ‘बहुजन समाजाला शासनकर्ते जमात बनवा.’ बाबासाहेबांचे हे विचार शिक्षणाच्या माध्यमातून घडतील. ८० टक्के समाजाची समस्या ही प्रशासकीय आहे. पेशवे कोण होते? अधिकारीच ना...! आमच्याकडे सातत्याने प्रतिक्रांती निर्माण करण्याची षड्‍यंत्रं आखली जातात. ही गरिबांची मुलं शिकली, तर क्रांतीची मशाल कायमपणे धगधगती ठेवतील.’ कदम बोलत असताना माझ्या अंगावर काटा येत होता. मराठा, बंजारा, कासार, आदिवासी, चांभार, कुंभार, बौद्ध अशा अठरापगड समाजातील बुद्धिमान युवकांसोबत कदम यांनी माझा संवाद करून दिला. मला दिसत होतं, ही मुलं माझ्या देशाचं भवितव्य होती. त्या मुलांचं कुणी नव्हतं. त्यांच्याकडे दोनच गोष्टी होत्या, एक त्यांची इच्छाशक्ती आणि दोन त्यांच्यासोबत सर्वांची भूमिका पार पडणारे त्यांचे कदम सर. तिथं शिक्षण घेणारी अश्विनी गोरे मला सांगत होती, ‘मला वडील नाहीत. मला आणि माझ्या भावाला इथं मोफत प्रवेश मिळाला आहे. यश आता जास्त दूर नाही. इथं कुटुंब आणि यशासाठी आवश्‍यक असलेलं शिक्षण, या दोन्हींविषयीची जबाबदारी पार पाडली जाते.’ असे अनेक युवक मला आपल्या भावनिक कहाण्या सांगत होते.

आम्ही निघालो. मी कदम यांचा हात माझ्या हातामध्ये घेतला आणि म्हणालो, ‘मला तुमच्या प्रत्येक विचारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सुगंध दरवळताना दिसतोय. त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं नाही; पण त्यांचे काहीतरी अंश तुमच्यात असावेत.’

कदम म्हणाले, ‘बाबासाहेबांच्या पायाची थोडीशी धूळ मला होता आलं, तरी मी माझं भाग्य समजेन.’ मी निघत असताना कदम यांनी मला बाबासाहेबांची एक छोटीशी प्रतिमा भेट दिली. ती प्रतिमा उराशी धरून मी त्या ठिकाणावरून बाहेर पडलो. आपल्या अवतीभोवती किती योगदान देणारी माणसं असतात, याचा मी विचार करीत होतो. तुम्ही-आम्ही सर्वांनी मिळून अशा माणसांना मदत केली पाहिजे. त्यांचं काम पुढे अविरत चाललं पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ‘ बहुजन हिताय, बहुजन सुखाय ’चा नारा देत, ‘प्रतिक्रांती रोखण्यासाठी’ कदम यांच्याप्रमाणे आपणही सज्ज होऊ या... बरोबर ना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com