हृदयातल्या हिरव्या स्वप्नाची सावली..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sayaji Shinde
हृदयातल्या हिरव्या स्वप्नाची सावली..!

हृदयातल्या हिरव्या स्वप्नाची सावली..!

औरंगाबादला यिनच्या ‘चला घडू देशासाठी’ या उन्हाळी शिबिराच्या पूर्वतयारीची बैठक आटोपून मी कोल्हापूरकडे निघालो. आता मराठवाड्यातल्या रस्त्याची वाईट अवस्था हळूहळू चांगलं रूप धारण करू लागली आहे. गंगाखेडच्या जवळ आलो नि माझा सारथी गणेश डावखरने एकदम गाडीचे ब्रेक दाबले. पुढे पहिलं, तर गाड्यांची एकदम रांगच्या रांग होती. बराच वेळ झाला, रस्ता काही सुरू होईना. पुढे नेमकं काय झालंय, हे कुणालाही कळेना. मी गाडीच्या खाली उतरत पुढं चालायला लागलो. एक झाड कापण्याचं मशिन वडाच्या झाडाला कापण्यासाठी तयार होतं. एक व्यक्ती त्याच वडाच्या झाडाला मिठी मारून उभी होती. लोक जमले होते, काय घडतंय अजून काही कळेना. मी अजून पुढे गेलो, तर मला एकदम धक्का बसला. चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे त्याच वडाच्या झाडाला मिठी मारून, हे झाड मी कापू देणार नाही असा आग्रह धरत होते. दोन्ही बाजूंनी मोठ्या रस्त्याचं काम सुरू होतं. अगदी एक गाडी जाईल एवढा रस्ता. आजूबाजूने गाडी नेता येणार नाही अशी अवस्था. झाड कापणारी माणसं सयाजी यांना सांगत होती, ‘अहो, आम्हाला हे झाड कापायला सांगितलं आहे. आम्ही काय करायचं?’ झाड कापणारे म्हणत होते, ‘आम्ही कापतोच’; तर सयाजी म्हणत होते, ‘मी कापू देणार नाही’. अशी वादावादी तिथं सुरू झाली. बरीच माणसं गोळा झाल्यावर सयाजी यांनी त्या झाडाची मिठी सोडली. मागे वळून सयाजी यांनी पहिलं तर वाहनांची मोठी रांग त्यांना दिसली. त्यांनी त्यांच्या चालकाला गाडी पुढे घे असं रागात सांगितलं.

काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली. सयाजी आणि झाड कापणाऱ्यांची कुणाकुणाशी फोनाफोनी सुरू होती. सयाजी पुन्हा-पुन्हा त्या झाडाजवळ जात होते, त्या झाडाला मिठी मारत भावुक होत होते. ते सगळं वातावरण मी माझ्या मनाच्या कप्प्यात अगदी तल्लीन होऊन साठवून ठेवत होतो. एका झाडाविषयी एखादा माणूस इतका भावनिक होतो, हे मी कधीही पहिलं नव्हतं. चिपको आंदोलन मला आठवलं. बऱ्याच वेळाने पोलिस, वन विभाग, बांधकाम विभागाची माणसं आपल्या लवाजम्यासह तिथं आली. काही जण सयाजी यांना काय झालं म्हणून विचारपूस करीत होते, तर काही जण सेल्फी काढण्याच्या तयारीत होते.

मराठवाड्यासह राज्यातील सर्व भागांत सध्या चार पदरी, आठ पदरी रस्त्यांची निर्मिती सुरू आहे. रस्त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली झाडं तोडण्याचा सपाटा सुरू आहे. शेकडो वर्षांपूर्वीची वड, पिंपळ ही झाडं जिवानिशी जात आहेत. जितकी झाडं तोडली जात आहेत, त्याबदल्यात एखादं झाड कुणी लावलं तर नवल. सयाजी यांनी झाड तोडू देणार नाही या घेतलेल्या भूमिकेचा शेवट काय होतो हे मला पाहायचं होतं. कुणी फोनवर, कुणी एकमेकांशी असं त्यांचं बोलणं सुरू होतं. अजून काही वेळाने एक गाडी आली. त्यांनी झाड कापणाऱ्या माणसांच्या मदतीने वडाच्या उघड्या पडलेल्या मोठ्या मुळांना बांधायला सुरुवात केली. आम्ही एका गाडीत बसलो. थोडं पुढे असलेल्या एका फार्म हाउसवर गाडी थांबली. झाड, झाडाचं महत्त्व, सयाजी यांचं झाडांशी असलेलं भावनिक नातं सयाजी मला सांगत होते. त्या तोडल्या जाणाऱ्या झाडाबाबत सयाजी यांच्या चेहऱ्यावरची काळजी आता दूर झाली होती. तिथं एक युवक सयाजी यांना भेटायला आला होता. त्या युवकाची आणि माझी ओळख सयाजी यांनी करून दिली. सयाजी मला सांगत होते, ‘हा मंगेश दळवी. कुरुंदा, जिल्हा हिंगोली येथील आहे. मागच्या वेळी मला हा ‘झाडं लावायची आहेत, तुम्ही गेस्ट म्हणून चला’, असं निमंत्रण द्यायला आला होता.

मी तेव्हा बिचाऱ्याला चांगलंच फटकारलं. मी त्याला म्हणालो होतो, ‘चल जा येथून, फोटोसाठी तुम्ही असं करता. मी जर कार्यक्रमाला हवा असेन ना, तर अगोदर काही झाडं लाव, मग मला बोलवायला ये.’ पठ्ठ्याने एकोणीस ते वीस हजार झाडं लावली.’ मी मंगेशला विचारलं, ‘झाडांविषयीचं हे प्रेम आलं कसं?’ तो म्हणाला, ‘मी सयाजी सर यांच्यासोबत राज्यभरात अनेक ठिकाणी झाडं लावण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी होतो. आपल्या गावात, परिसरातही हे काम सुरू झालं पाहिजे, असं आम्ही ठरवलं. जर या उपक्रमात सयाजी असतील, तर अजून कामाला गती येईल, ही भावना मनात होती. टोकाईजवळ देवीचं मंदिर आहे. तिथं साठ एकर गायरानावर आम्ही पंधरा हजार झाडं लावली. अनेक लोक आले; कुणी जमीन दिली, कुणी पाणी, तर कुणी साहित्य दिलं.’’ मंगेश, सयाजी सर दोघेही त्यांनी झाडांना घेऊन सुरू केलेलं काम मला सांगत होते. आमच्या गप्पा खूप रंगल्या. आता हे ठरलं, की गंगाखेडच्या त्या फार्म हाउसला रात्री मुक्काम करायचा आणि सयाजी यांच्यामधलं वृक्षप्रेम समजून घ्यायचंच.

जसजशी रात्र पुढे सरकत होती, तसतशी आमच्यामधली गप्पांची मैफील रंगत होती. सयाजी पडद्यावर खलनायक असतात; पण प्रत्यक्षात मात्र अतिशय हळवे, संवेदनशील होते. त्यांच्या आईची आठवण काढली, की एकदम हळवे होणारे सयाजी, नातवांची आठवण काढली की विचारमग्न होणारे सयाजी, त्यांना घेऊन असणाऱ्या अनेक विषयांवर आम्ही बोलत होतो.

सयाजी शिंदे (९७६८४५५५५२) वाईजवळच्या धोम धरणावर वॉचमन होते, तेव्हा त्यांना अगदी अल्प पगार मिळायचा. तेव्हापासून आता पाचशेच्या वर चित्रपटांचा प्रवास, सात राज्यांचा सुपरस्टार, त्यांनी झाडांसाठी दिलेलं मोठं योगदान, हा सर्व प्रवास एका रात्रीत समजून घेणं शक्य नव्हतंच. मी त्यांना विचारत होतो आणि सयाजी माझ्याशी अंतःकरणातून बोलत होते.

‘अत्यंत हलाखीचे दिवस, कितीही त्रास झाला तरी वडिलांनी कधीही आपली तत्त्वं, मूल्यं सोडली नाहीत. दारावर शासनाच्या कुठल्याही योजनेला नको म्हणणाऱ्या वडिलांना झाडं फार प्रिय होती. आम्ही जिथं कुठं जायचो, तिथं आई झाड विकत घ्यायची. एकदा आम्ही गोव्याला गेलो होतो, तिथं गोड आंब्याच्या कोयी आई गोळा करीत होती. मी आईला म्हणालो, ‘आई हे असं करू नको, लोकांना काय वाटेल?’ आई म्हणाली, ‘वाटू दे काय वाटायचं ते.’ असं म्हणत आई कोयी गोळा करीत होती. झाडासाठी आई असं सतत काही तरी करत असायची. मी आईच्या पंचाण्णवव्या वाढदिवशी आईची बिया-तुला केली. तिला खूप आनंद झाला होता. आज राज्यात चाळीस ते पंचेचाळीस ठिकाणी वनराईचं काम सुरू आहे. हे काम पाहायला आई नाही याचं वाईट वाटतं.’’ आपल्या आईच्या आठवणींत सयाजी पूर्णपणे बुडून गेले होते. मी त्यांना सावरत विचारलं, ‘तुम्ही हे सगळं काम उभं करता, त्याला अडचण येत नाही? लोक नावं ठेवत नाहीत?’ सयाजी हसत म्हणाले, ‘‘खूप ठिकाणी अडचणी असतात. फार कमी लोक माझ्या सेवाभावी उपक्रमांमध्ये मला साथ देतात.

अनेक गावांमध्ये, अनेक भागांमध्ये आम्ही पदरमोड करून काम करतो. लोकांना वाटतं, आम्हाला किती पैसे मिळाले असतील! अनेक ठिकाणी आमचं काम बंद पाडण्यासाठी भाग पाडलं जातं. कुठे राजकारण, हेवेदावे येतात. मी आणि माझे चार सहकारी यांच्या माध्यमातून आमची चळवळ सुरू आहे. आज मी महिन्यातील दहा दिवसांची कमाई झाडांच्या कामावर खर्च करतो. खरंतर माझ्या डोक्यात खूप मोठ्या कल्पना आहेत; पण त्यासाठी पैसा नाही. जे मदत करणारे आहेत, ते माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. पण मला आशा आहे, आज ना उद्या माझ्या स्वप्नांमधला हिरवागार महाराष्ट्र निश्चितच निर्माण होईल.’ बोलता बोलता कधी डोळे मिटले ते कळालं नाही. सकाळी नगरवरून पानसरे नर्सरीचे बाळासाहेब पानसरे आले. त्यांनी झाडाच्या ऑपरेशनची सर्व तयारी केली. काही दिवसांनंतर ते झाड दुसरीकडे जाण्यासाठी प्रवास सुरू झाला होता. पानसरे यांची तिसरी पिढी झाडांसाठी काम करीत होती. सयाजी यांच्यासोबत सेवाभावी भावनेतून पानसरे यांनी मोठ्या असणाऱ्या शेकडो झाडांचा जीव वाचवला होता. थायलंडवरून पानसरे हे तंत्र शिकले होते. पानसरे यांच्याशी बोलून त्यांचा प्रवास कळाला. मी निघताना सयाजी मला मिठी मारत म्हणाले, ‘संदीप या झाडांसाठी काही तरी करू रे बाबा..!’ सयाजी यांच्या मिठीत मला मोठ्या भावाचा, आपलेपणाचा ओलावा जाणवत होता.

सयाजी यांनी वाचवलेल्या झाडाचा शेकडो वर्षांचा मुक्काम आता दुसरीकडे हलणार होता. झाड ऑक्सिजन तयार करायचं जे काम करतं, ते कोणीच करू शकत नाही, हे माहिती असतानादेखील आपण सारे उभ्या असणाऱ्या झाडांना आडवं करण्याची मोहीम आखतो. मराठवाड्यामध्ये तर केवळ मोजक्या ठिकाणी बाभळ, लिंबाची झाडं शिल्लक आहेत, तीही चुलीवरचं मटण शिजवण्यासाठी तोडली जातात. सयाजी यांनी आपल्या सह्याद्रीच्या माध्यमातून झाडांसाठी चालवलेली चळवळ आता सगळ्यांना माहीत झालीय. सयाजी यांच्या माध्यमातून केवळ झाडांविषयी चळवळच सुरू झाली नाही, तर राज्याच्या कानाकोपऱ्यांत मंगेशसारखे शेकडो सयाजी तयार झालेत. बाळासाहेब पानसरेंसारखे अनेक जण सेवाभावी वसा हिरिरीने चालवतात. सयाजी यांनी सह्याद्रीच्या माध्यमातून चालवलेली चळवळ तुम्हा आम्हा सगळ्यांची चळवळ झाली पाहिजे. या चळवळीमध्ये सहभागी होऊन, या चळवळीला सढळ हाताने मदत करू या, बरोबर ना...!

Web Title: Sandip Kale Writes Sayaji Shinde Tree Cutting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top