तिसऱ्या पिढीचं आश्वासक पाऊल...!

सकाळी सहा वाजता (मुल, जि. चंद्रपूर) शासकीय विश्रामगृहातून भोजराज गोवर्धन आणि मंगेश पोटवार या दोघा पत्रकारांबरोबर बाहेर पडलो.
Somnath Shram Sanskar Camp
Somnath Shram Sanskar Campsakal

सकाळी सहा वाजता (मुल, जि. चंद्रपूर) शासकीय विश्रामगृहातून भोजराज गोवर्धन आणि मंगेश पोटवार या दोघा पत्रकारांबरोबर बाहेर पडलो. आदल्या दिवशी रात्री झोपताना आम्ही ठरवले होते, सकाळी ‘मुल’ आणि आसपासच्या परिसरात जाऊन भेटी द्यायच्या. आम्ही बाहेर पडलो.

‘मुल’मध्ये फेरफटका मारून आम्ही सोमनाथच्या दिशेने निघालो. सोमनाथ माझ्यासाठी तसे नवीन नव्हते. आता जेव्हा मी खूप वर्षांनंतर सोमनाथला जात होतो, तेव्हाचे चित्र आज वेगळे दिसत होते.

आम्ही आतमध्ये गेलो. भोजराज आणि मंगेश हे सोमनाथच्या शाळेत असलेल्या शिक्षकांशी बोलत थांबले. मी अनेक वर्षांपूर्वी सोमनाथला शिबिरार्थी म्हणून आलो होतो. त्या परिसरातल्या आठवणी मनात येऊ लागल्या. सोमनाथ रोडे सर, राजाराम वटमवार सर यांच्यासोबत मी बसलो होतो.

याच पेंडॉलमध्ये विकासभाऊ, डॉ. अशोक बेलखोडे, माधव बावगे भाषण करायचे. याच पिंपळाच्या झाडाखाली बाबा एक खाट टाकून झोपलेले असायचे. साधनाताई बाबांचे पाय दाबत सेवा करायच्या. अचानक माझ्या कानावर

गीत गा रहे हैं आज हम

रागिणी को ढुंडते हुए...

या गाण्याचे शब्द पडले. मी आवाजाच्या दिशेने निघालो. एक युवती सात-आठ युवतींना घेऊन बिया पिशवीत भरत होती. मला आठवले, माधव बावगे यांना हे गाणे खूप आवडते. मी त्या मुलीला म्हणालो, ‘तुम्ही खूप छान गाताय.’ साऱ्यांचे गाणे म्हणत काम सुरू होते. तेवढ्यात एक तरुण तिथे आला आणि म्हणाला, ‘आमचे काम आटोपले, आपण मिळून आता हे काम करू, म्हणजे लवकर आटोपेल.’ मी त्या तरुणीशी आणि त्या तरुणांशी बोलत होतो. त्या दोघांमधला उत्साह पाहून इथे आजही चांगले काम सुरू आहे, यावर माझी खात्री झाली.

मी ज्या युवतीशी बोलत होतो तिचे नाव योगिनी राजेंद्र पाटील. योगिनी उच्च शिक्षित आहे. योगिनीने २०१६ मध्ये सोमनाथच्या श्रम संस्कार छावणीमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर ती सोमनाथला पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून काम करते. तिने सोमनाथला अनेक यशस्वी प्रयोग केलेत. मी ज्या युवकाशी बोलत होतो, त्याचे नाव भूषण किशोर नेवे (९३७१५५५५२२). भूषणचे शिक्षण एम. कॉम. झाले आहे. भूषण २०१८ च्या छावणीमधील शिबिरार्थी. तोही आता येथे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करतो.

विचारांशी बांधिलकी व त्यातून काम करणारे भूषण आणि योगिनी माझ्यासमोरची ही दोन उत्तम उदाहरणं. ज्यांनी दाखवून दिले होते, एका विचाराशी बांधून तुम्ही परदेशात नव्हे तुमच्या गावात इतिहास निर्माण करू शकता.

मी, योगिनी आणि भूषण आम्ही तिघे सोमनाथमधील अनेक प्रयोग पाहत होतो.

आम्ही एका बंधाऱ्याजवळ येऊन थांबलो. तो टायरचा बंधारा होता. या कडेचे त्या कडेला नजर जाईपर्यंत तिथे पाणी होते. त्या पाणी अडवणाऱ्या टायरचे आयुष्य वाढावे यासाठी तिथे अनेक जण त्या टायरला काळा रंग लावत होते. त्या सर्व माणसांना कामाचं नियोजन सांगणाऱ्या माणसाचा चेहरा मला ओळखीचा वाटत होता.

मी अजून पुढे जाऊन पाहिले तर ते अरुण कदमकाका होते. मी काकांच्या जवळ जात त्यांच्या पायावर नतमस्तक झालो. त्यांनी मला जवळ घेतले ‘अरे संदीप, किती वर्षांनी भेटतोयस रे बाबा,’ बोलताना अरुणकाकांचा ऊर भरून आला. मला सोडत त्या बंधाऱ्यातल्या पाण्यानी काकांनी डोळे धुतले. मी म्हणालो, ‘काका, किती हे पाणी, बापरे!’ काका म्हणाले, ‘तुम्हा सर्व शिबिरार्थींची मेहनत कामाला आली.

विकासभाऊ, कौस्तुभने टायरसारखा अद्‍भुत प्रयोग केला. याच बंधाऱ्यावर खाली १७ बंधारे आहेत. भातशेती चांगली आहे. पाण्यावर येणाऱ्या अनेक पिकांचे प्रयोग आम्ही करतो. बाराशे पन्नास एकरमधून आठशे एकर जमीन आम्ही कसतो.’ अरुणकाका जे सांगत होते ते सारे काही अद्‍भुत होते.

आम्ही बोलत बोलत पुढे निघालो. वाटेत काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांची अरुणकाका विचारणा करीत होते. एका कामगाराशी कदमकाका (९४२०३९८४१०) बोलत होते. मी काकांना म्हणालो, ‘हे खूप जुने आहेत. मी त्यांना अनेक वेळा इथेच पाहिले आहे.’ काका म्हणाले, ‘हो, हे माधव, अवघ्या गावाने त्यांना कुष्ठरोगी म्हणून टाकून दिले होते.

माधव यांना बाबांनी त्यांच्या गावावरून आणले, बरे केले, आपल्या कुटुंबाचा सदस्य बनवले.’ आमच्या गप्पांमध्ये माधव बाबा आमटे यांच्याबद्दलच्या आठवणी सांगत होते. ते म्हणाले, ‘बाबांनंतर विकासभाऊ, मग कौस्तुभदादा आमच्यासारख्या अनेकांचा आधार बनले. आज बाबांची तिसरी पिढी सोमनाथचा वारसा चालवते.

माधव यांच्याशी बोलून आम्ही पुढे निघालो. अरुणकाका म्हणाले, ‘बाबांसोबत महारोगी सेवा समितीच्या झेंड्याखाली सोमनाथ, आनंदवन, हेमलकसा, मुलगव्हाण झरी, असे अनेक प्रोजेक्ट उभे करण्यासाठी शेकडो पूर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हात, त्यांनी वेचलेले आयुष्य कामाला आले. त्यात शंकरदादा पहिले, मी दुसरा आणि भूषण, योगिनी तिसरे.’

बाबांची तिसरी पिढी आणि कार्यकर्त्यांची तिसरी पिढी त्याच उत्साहाने सोमनाथ येथे काम करू लागली आहे. जे प्रश्न बाबांच्या काळात होते, ते आजही कौस्तुभदादांच्या काळात कायम आहेत. कुष्ठरोग कमी झाला असला, तरी त्या सर्व माणसांविषयीची वाईट मानसिकता आजही कायम आहे. कुष्ठरोगापेक्षा गंभीर आजार आता आहेतच.

१९६८ पासून बाबांच्या विचारांना, सेवाभावी कार्याला पुढे नेणारी मंडळी सोमनाथ छावणी शिबिरातून दरवर्षी १५ ते २२ मे या दरम्यान तयार होतात. त्या कार्यकर्त्यांनी इथे सोमनाथमध्ये येऊन पूर्ण वेळ काम करावे, असे अजिबात नाही. ते जिथे कुठे असू दे, तिथून ते काम करतात.

घरच्यांच्या अपेक्षा काळाप्रमाणे असतात, पण जो कार्यकर्ता इथे येऊन घडतो, तो काळ घडवण्याचे काम करतो. अनंत अडचणी आहेत, पण विचार सर्वांत महत्त्वाचा आहे. विचार जगला तर मानवता जगेल, असे योगिनी आणि भूषण सांगत होते.

सोमनाथमधून माझा पाय निघत नव्हता, पण निघणे गरजेचे होते. मी निघालो, योगिनी म्हणाली, ‘‘लवकर या, तुमच्यासोबत बोलून मन भरले नाही.’ मी निघताना सर्वजण मला माहेराहून पाठवणाऱ्या लेकीसारखे वागत होते. तिथून मी निघालो खरा, पण त्या आठवणी काही मनातून जात नव्हत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com